Posts

Showing posts with the label स्फुट

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले, सोलले, रंगवले घराच्या दृश्य भागात निगुतीने सजवले. इतर फांद्यांचा कोंडा केला, चुलीत घातला   चुलीवरच्या चविष्ट मटणावर मग यथेच्छ ताव मारला. मी म्हणाले, अहो दादा, तुम्ही झाडे तोडायला नको होती पक्ष्यांची घरटी अशी मोडायला नको होती बाग बघा कशी ओकीबोकी झाली परिसरातली आपल्या हो रयाच गेली...रयाच गेली दादा म्हणाले ताई जरा इकडे या, मी काय म्हणतो कान देऊन ऐका..   तुम्हाला नसेल माहित, मी पर्यावरणवादी आहे तुम्हाला नसेल माहित मी पर्यावरणवादी आहे आणि काय सांगू अहो, निसर्गाच्या बाबतीत जरा जास्तच दर्दी आहे... तशी माझी नजर पारखी आहे बरे निसर्गात दिसतात मला चमचमते हिरे हिऱ्यांना पेहेलू   पाडल्याशिवाय चमक येते होय? आणि हिऱ्यांशिवाय सौन्दर्याची मजा येते होय ??   वृक्षारोपण तर मी दरवर्षीच करतो..   आणि त्या वाढत्या वृक्षामध्येच सौन्दर्य घेरतो. काय माहित वृक्षाला त्याची जागा कुठे असते बघा आमच्या बंगल्यात कसा पठ्ठा शोभून दिसते उभे राहून झाड थकले...
 हल्ली मी लिहित नाही तुझ्यावर काही  उल्लेख तुझा ... हवाय कशाला ??  पूर्वी असायचा कवितेतल्या प्रत्येक ओळीत  शब्दाशब्दा मागे छुप्या भावनेच्या खोलात अलगद हसून केलेला तुझा उल्लेख…  पण तेव्हा त्या ओळीत असूनही कुठे असायचास तू ?   अन आज कुठेच नसतोस … तरीही असतोच ना ?    उर्दू गझलेच्या काही शब्दांचे अर्थ संदर्भकोशातून शोधावे,   नाहीच मिळाले तर जुळवून घ्यावा अर्थ लागतो तसा ..  तसेच काहीसे …  तसेच काहीसे …  तुझ्या असण्याचे अन नसण्याचे संदर्भ  शोधूनही लागत नाही हल्ली…  संवेदना जाणवत राहतात …. फक्त  अन त्या संवेदनांचा न लागलेला अर्थ  शोधत राहते मग मी … प्रत्येक ओळीत  आणि म्हणूनच …  जाणून असणाऱ्या या संवेदनांचा  उल्लेख करायचे सोडून दिलेय मी  कळतंय का ?  हल्ली लिहित नाही मी तुझ्यावर काही … रश्मी पदवाड मदनकर

विस्मृतीचा शाप ...

Image
 विस्मृतीचा शाप ...  अंधारलेल्या एखाद्या बोगद्यात शिरावे  आणि एक एक पाऊल पुढे चालताना  घूप्प अंधार गवसत रहावा ...  आकाश, जमीन, प्रकाश  आणि सजीवांचे भास-आभास  सगळंच दूर-दूर पुसट होत,  ठिपका होत नाहीसे होईपर्यंत येऊन पोचावे ..  नाव, गाव ओळख मिटू लागावी,  भूत, वर्तमान भविष्याचा संदर्भच कळू नये  माणसांच्या भेटण्याच्या, त्यांच्या निघून जाण्याच्या,   घट्ट झालेल्या नात्यांच्या, निसटलेल्या हातांच्या कथा,  कणकण आनंद, क्षणक्षण दुःखाच्या व्यथा.. आणि या सर्वात धडपडत तगून-जगून दाखवण्याच्या निष्ठुर प्रथा ..बाष्प होऊन उडून जाव्यात  ..  रंग, गंध, दृष्टी, स्पर्शाच्या पलिकडे कुठेतरी वैचारिक, बौद्धिक- मानसिक आंदोलनं गहिवरलेली स्पंदनं ... विरावीत  इच्छा-आकांक्षा,अपेक्षांची वाफ व्हावी.   अनोळखी होत जावे सारे, आपण चालत रहावे... अंधाराच्या पटलावर पुढे चमकताना दिसेल काहीतरी धाव घेऊ नये मृगजळ असेल ते .. काळाकभिन्न परिसर, फसव्या दिशा  अनिश्चित अंतरे, अनाकलनीय स्थिती  अनासक्त प्रवास ... आणि  अनवट भिवतीच्य...

कवी महोदय, जागे व्हा !

 तुझं पहिलं आणि एकमेव प्रेम कविता असलं पाहिजे  कवितेतच जगणं आणि कवितेतच रमणं माणसांच्याही तू कविता करून टाकल्यात  आणि कवितेतच माणसं शोधलीस  माणसांची मात्र कदरच केली नाहीस सहसा ..  इतका मग्न झालास कवितेत कि आयुष्याची अनेक सालं कल्पनेच्या कुठल्याश्या जगात भटकत राहिलास ..  माणसांत परत येऊनही तू माणसांत आलाच नाहीस ..  अरे कविता अश्रू पुसत नाही तिच्याजवळ खांदा नसतो रडायला  ती कुशीत घेऊन जोजवत नाही  मायेचा स्पर्श देऊन दुःख हलकं करत नाही  कवितेला आई होता येत नाही  तिला बहिणीची माया देता येत नाही  प्रेयसीची प्रीती तिला होता येणार नाही  तिला तन-मन-आत्मा शांतवता येत नाही .. तिला हवे असतात तुझे श्वास तुझे ध्यास  ती निर्माण करू शकते सतत नसलेले भास  तुझ्यातलं सगळं हिरावून ती नटत मुरडत अवतरते  आत आत हेलावून क्षणभर सुखावते  सतत अस्वस्थता पेरत पोकळी निर्माण करत राहते..  तिच्याकडून घेता येत नाही रे काही  तिला हसतंखेळतं पाहण्यासाठी तिला सतत देत रहावं लागत असतं.. सतत घेत राहून आत-बाहेर रिक्त करणाऱ्या कवितेच्या न...
 जन्माच्याच वेळी सटवाई लिहिते तिच्या माथी - 'बाई' मग ती होते लेक, बहीण, बायको.. आई गात राहते आयुष्यभर पीडेतून उठलेली जीवनगर्द अंगाई .. गुणगुणते तटतटत्या वेदनेतून भावसमेवर आलेल्या अंतर्लयी .. ती छेडत राहते प्राणाच्या वीणेवर अम्लान सुखाची तान  पानगळीतही शोधत बसते मनाचे लसलसते हिरवे रान  उजवते चैतन्याची कूस अन शिवून घेते उसवलेले काळीजभान   चिंब ओल्या सांजपावसातही फुलवते जाणिवांचे विवर्त विराण  ती घेते नात्यांना खोल काळजात रुजवून  प्रत्येक कणाला भावओल देऊन देते मायेने भिजवून  रात्र रात्र पाहते स्वप्न - ठेवते सगळे जागवून आकांक्षांच्या उडत्या पाखरांना ठेवते पदरात निजवून  ती आणते रखरखत्या उन्हातून शीतल गारवा चोरून  वाटत फिरते प्रेम-जिव्हाळा ओंजळ भरभरून फाटक्या तुटक्या मोडक्या विटक्या गोष्टी ठेवते झाकून बोलते हसते रमते खेळते ..मुखवटा घेते ओढून.  रश्मी..
Image
घोंगावणाऱ्या वाऱ्याने नाहीच दिले विनाशाचे संकेत एके रात्री विशालकाय आभाळाचा तुकडा अचानक फाटला, कोसळला .. आणि  उंबऱ्यापासून गाववेशीपर्यंत वाहून घेऊन गेला लक्तरं जगण्यासाठीच्या सगळ्या संभावना विस्कळीत पायाखालची जमीन आणि डोक्यावरचे आभाळही अश्रूंच्या महापुरात तुडुंब .. संसार उघडे पडले..हातातले हात सुटले शिल्लक राहिलेत काही जिवंत पार्थिव ..   पंचतत्वात विलीन व्हावे असे कितीही वाटले तरी नियती इतकी सहज सुटका करीत नाहीच अक्ख्या आयुष्याच्याच नाका-तोंडात पाणी जाऊन फुगून वर आलेल्या  छिन्न विच्छिन्न,  कुजलेल्या लिबलिबीत प्रेतासारखी एकेकाची चित्तरकथा .. पडझड झालेल्या अर्ध्या उभ्या भिंतींवर आदळत राहणार आहेत अनेक वर्ष ..अखंड ! माणसे गिळणारा हा लाल-काळा चिखल तुडवत उरलेल्यांना चालत राहावे लागणार आहे. काळ सोकावत जाईल वाहून गेलेले मृतदेह घुसळले जातील, फसतील, रुतली जातील, खोल आत आत चिखलात ..आणि एक दिवस विरघळून जातील. पण जीव न गेलेल्या देहातील आशा आकांक्षांचे पाण्यावर तरंगणारे कलेवर मात्र येत राहतील वरवर महापुराच्या विनाशाची चित्र रंगवत मनःपटलावर चिरकाल .. ...

काळीजहाक ..

भवतालच्या परिघातून घुमत येते एखादी काळीजहाक आणि ..दिगंतात दुमदुमू लागते दर्दस्त अंतर्लय अंतर्यामातील वीणेच्या तारेवर रणकंदते एखादी झंकार आणि वाजू लागते अम्लान वेदनेची स्निग्ध तार प्राणाच्या समेवर राग चंद्रकंस छेडला जातो.. आणि संथागारातील मर्मतळातून .. आकांतून बाहेर पडतात अव्यक्त आत्मप्रलय नको असतात हाका, हाका त्रास देतात काळजावर कोरलेल्या अनेक डोळ्यांच्या खळातून आक्रंदत पाझरू लागतात ऋतुगर्द आठवणींचे जीवनलय.. जसे पाषाणाचे हृदय भेदत जखमांच्या भेगांतून बाहेर येऊ पाहतात काळ्याभोर ढेकळांचे कवच फोडणारे गर्दकोवळे कोंब ... रश्मी - २६/०६/२०
कुणीतरी हाक घालतं  मनाच्या बांधावरच हात घालतं बंद असलेली दारे उघडी होऊ बघतात आणि भीती दाटून येते कधीतरी दुखऱ्या अनुभवांचे संचित मनात कोंडून आपणच दारं गच्च बंद करून टाळे लावून घेतलेले असतात आत बाहेरचे सर्व रस्ते बंद करून टाकले असतात अंतर आखले अंतर राखले असतात .. मान्य - अंतरं जवळीक साधत नाहीत पण अंतरं मन मोडतही नाहीत मनांचा मनाशी संवाद घडत राहायला हरकत नाही एकवेळ .. पण मनाचा बांध मोडून सोडून जाणाऱ्यांना मनाच्या टाळ्याची चावी मात्र देऊ नये ..     
Image
तसे रोजचेच तर असते जगणे  अंधारातही उजाडले अंगण बघणे  मनात चांदणं असतं फुललेलं तोवर  झाकोळला राहतो अंधार सारा .. तेव्हा एक करावं  .. रोज थोडं थोडं चांदणं  मनातून काढून गोळा करावं  कुपीत घालून जपून ठेवावं ..  रात्र उलटेल .. दिवस पालटतील कधी सरकलीच पायाखालची उजेडाची जमीन .. आलाच अंधार दाटून, अन दडपला मनातला उजेड तर  कुपीतल्या चांदण्या द्याव्या उधळून,  पेराव्या, सिंचाव्या आणि उगवाव्या चांदण्या  उगवल्या की अलगद जागवाव्या चांदण्या .. मनात भरून घ्याव्या जागल्या चांदण्या  कारण  मनात चांदणं असतं फुललेलं तोवर  झाकोळला राहतो अंधार सारा ! - रश्मी पदवाड मदनकर
Image
 स्वच्छ प्रतिबिंब दाखवतो तोवर   आरसा हवा हवा वाटत असला, तरी  प्रकाशाच्या सान्निध्यात आल्यावर   प्रतिबिंबित करणारा लखलख कवडसा  डोळ्यांना अडसर वाटू लागतो ..तसा  फिरवून घेतो आपण चेहेरा .. अगदी आहे तशीच दिसणारी माणसे  हवी हवी वाटतात..पण   इतरांच्या सान्निध्यात आल्यावर   प्रतिबिंबित काय करतात यावर ठरतात  त्यांचे हवे असणे नको असणे ..  रश्मी पदवाड मदनकर.
मध्यरात्रीच्या पलिकडे पहाट होण्याआधी अंधार उजेडाच्या चिंतेआड सत्या असत्याच्या भ्रमाबाहेर नाश अविनाशाच्या मिती सोडून सुखा दुःखाच्या आशा खोडून जाणीव नेणीवेचे ठेवून भान गाडली असतीस माझी नाळ ... आई .. तर .. तर.. उदासीतमस्वी जरा आत्मघाती आयुष्याचा सुर्य उगवण्याआत पाचवीला पुजलेल्या करंट्या जिन्याची परिटघडी मोडून, वाढून ठेवलेल्या निग्रही प्रतारणा संभ्रमाच्या, अस्वस्थतेच्या फेसाळून येणा-या लाटा सटवाईच्या पदरी पुन्हा बांधून परतवून लावता आल्या असत्या मलाही रात्रीच्याच अंधारात सगळा अंधार उपसून ओतून देता आला असता ... आणि आणि मध्यरात्रीच्या पलिकडे पहाट होण्याआधी अंधार उजेडाच्या चिंतेआड सत्या असत्याच्या भ्रमाबाहेर नाश अविनाशाच्या मिती सोडून सुखा दुःखाच्या आशा खोडून जाणीव नेणीवेचे ठेवून भान नव्या जगण्याचा नवा उजेड पांघरून घेतला असता मी  ... आई .. ! पांघरून घेतला असता मी आई !! - रश्मी पदवाड मदनकर

दुखऱ्या बाधेचा 'कृष्णकिनारा' !

दिवस समपात बिंदूवर असताना एखाद दिवस अचानक उन्ह हरवतं, सावली साथ सोडत जाते अंधारून येतं सगळं.. आणि आतात मळभ दाटत जातं. अवेळीच उगवलेली कातरवेळ .. मी हातातले 'कृष्णकिनारा' उपडे ठेवते.. काळेभोर खांद्यावर पसरलेले कुरळे केस, एकत्र गुंडाळून टाळूवर बांधून घेते. चष्म्याची फ्रेम दुमडून ठेवत, खोल उसासा घेते. जडावलेल्या देहाची बोचकी विसरून, आराम खुर्चीत पाठ टेकते... मन शांतावण्याच्या प्रयत्नात असताना, उरी काहूर माजतं, गम्य-अगम्याच्या लाटा उठतात वेणूची साद रुंजी घालायला लागते ..आणि मी मी, पुन्हा निळकांती कृष्णाच्या अथांगतेच्या लहरीत खोल खेचली जाते.. ही वेळ समर्पणाची असते स्वीकार्य .. आहे ती स्थिती ..तशीच मनःस्थिती समर्पण तसेच.. राधा, कुंती, द्रौपदीनं स्वतःला कृष्णार्पण केले तसे.. काही क्षण अनंत काळासारख्या रंध्रारंध्रातून ओथंबत राहतात. अंतरंगाचा तळ ढवळून काळ निसटून जातो .. मिटल्या डोळी काजळओलीतून कातरवेळ वाहून जाते .. सचैल न्हाऊन निघतो दुखऱ्या बाधेचा 'कृष्णकिनारा' ! औदास्याचे ग्रहण सुटते ..हरवलेले चित्त भानावर येते. आभाळ घनव्याकूळ ऐलतिरी अन पैलतीरी नभांगणाच्या नक्षी खुणावू लागतात.. ...

तू आणि मी !

भिन्न ध्रुवांवरील दोन भिन्न बिंदू या बिंदूंना जोडणारी एक ती अदृश्य रेषा तिलाही कुठेतरी मध्यबिंदू आहेच ना दोघांनाही सारख्याच अंतराने मिळवणारी एकाच संंज्ञेेत बांधणारी … भौमितीय गणितातील आपण दोघे दोन प्रमेये संबंध जोडायचाच ठरवलं तर सिद्धांत सापडतोच अवकाशाच्या दोन टोकांना जोडणाऱ्या पोकळीतही पावसाच्या सरींचा निमित्त्यमात्र आधार गवसतोच कधीतरी… दोन विरुद्ध दिशेंनाही वाहणारा एकाच वाऱ्याचा झोत स्पर्शून जातोच तुलाही अन मलाही चंद्राला अन सुर्याला भेटवणारी सायंकाळ तुला मला टाळता येत नाहीच उन्ह अन पावसाचा लपंडाव तुझ्या अन माझ्यासाठीच इथून तिथवर वक्राकार इंद्रधनू तुला मला जोडण्यासाठीच …. तुला स्पर्शून येणारा कवडसा मला येउन का बिलगतो मोगरा तिथलाही अन इथला सारखाच का गंध देतो कितीही दूर असलो तरी कुठेतरी कश्यानेही जुळलेले असतोच हे जाणवतं मला तुला जाणवतं का रे ? - रश्मी पदवाड मदनकर
Image
सिगरेटच्या टोकावर शिलगावलेल्या  चिमूटभर निखाऱ्याएवढीच धग पेटली होती तुझ्या मनात .. सिगरेट जळायला लागावा तेवढ्याच वेळाचं नातं तू टिकवू  शकला ओठावर रेंगाळू शकलास नंतर धूर काढून टाकावा शरीरातून, नाकातोंडातून बाहेर आणि राख द्यावी झटकून तसेच धुत्कारत गेलास नात्यातल्या संवेदना, हळवे क्षण आठवणी वगैरे .. पण सिगारेट पिऊन झाल्यावर तू भिरकावलेलं ते उष्टं थोटूक मी धरून ठेवलंय अजून ते जळतंय..धूर सोडतंय.. संपत चाललंय .. चटका बसतोय . आणि हे सतत नजरेसमोर दिसणारं चित्र माझी वेदना कायम ठेवतंय तू या चित्रालाच चुरगाळून फेकून तरी दे तरीही आठवणीत उरलीच मी जरा तर .. एक कर तू माझीही सिगरेट कर पेटवून घे , झुरके घे .. जळू दे राख कर.. धुरात उडवून लाव थोटूक उरेलच तरीही ..  धरून ठेवू नको ..फेकून दे .. मातीच होऊन जाऊ दे... मातीच होऊन जाऊ दे ! - रश्मी पदवाड मदनकर 

भरजरी कविता ..

ऐक ना... तू तुझ्या आकांक्षाचे सगळे धागेदोरे वापरून सहज कलेने नक्षीदार सौंदर्य विणून तलम आलंकारिक शब्दांना एकात एक गुंफूण भरजरी कविता तयार केली होतीस आठवतं ? ती मला दाखवायला आणलीस आणि गप्पांच्या ओघात माझ्या ड्रेसींगजवळ तशीच विसरून गेलास मी उचलून हातात घेतली तेव्हा मखमली पोताची तुझी कविता ओढ लावू लागली.. सहज अंगावर ओढून पाहीली खुप आवडली, राहवलं नाही म्हणून मग नेसूनच घेतली तुझी कविता चापूनचोपून बसवताना माझ्या तनामनाशी संधान साधत राहीली कवितेच्या सौंदर्याचं प्रतिबिंब अंगोपांगी उतरले होते अंग अंग निखरून आले होते .. आता 'माझ्यावर कविता लिहीना रे' असा हट्ट करणार नाहीये मी... तू केलेली कविताच माझ्यावर लपेटून घेणार आहे. मग 'तुला कोण जास्त आवडतं सांग मी का कविता ?' या माझ्या प्रश्नावर तूला संभ्रमात पडायला होणार नाही.. कारण ती न मी आता एक व्हायचे ठरवले आहे एकमेकीत तल्लीन होऊन तादात्म पावायचे ठरवले आहे. सांग तुझी प्रत्येक कविता भरजरी करशील ? मला नेसायला देशील ? रश्मी पदवाड मदनकर 5 ऑक्टोबर 18

वाटतंय ..

वाटतंय डोळ्यांना अन मनाला उन्हात नेऊन सोडून यावं दाटलेली ओल आटली पाहिजे.. सुकली पाहिजे उरलेली सगळी उब मग डोळ्यातच साठवून घेऊन यावी ठेऊन द्यावी उशाशी .. कधीतरी जागल्या रात्री तगमग वाढतेय असं वाटेल भावनांचा उद्रेक होईल, मग ती उशाखालची उब पेनात भरावी .. आणि नक्षीदार वळणांनी ओतत राहावी कागदावर शब्दसुमने गुंफत गुंफत आकार घेतील,  नाद, गंध, रंग स्पष्ट होऊ लागतील अर्थ उमटू लागतील ..ते भिनू द्यावेत आतात उधळून टाकू नये.. राखून ठेवावे तिथेच मनाच्या भावविभोर अवस्थेसाठी .. कधीतरी ओल पुन्हा दाटून आलीच कि .. डोळे पाझरायला लागले कि अन उबेचे शब्दही भिजले कि, डोळ्यांचा डोह करावा ..मनाचा सागर आणि डोळ्यांना अन मनाला उन्हात नेऊन सोडून यावं पुन्हा ... पुन्हा
Image
मी एक अख्खा काळ नेसून घेतलाय स्वतःभोवती..माझा माझ्यापुरतं असलेला एक काळ माझ्या आयुष्याएवढा .. किंवा आयुष्य एका काळाएवढं.. आयुष्यापलीकडचा काळ मला माहीत नाही काळापलीकडचे आयुष्यही ठाऊक नाही... नेसलेल्या काळात मी रंगवलंय माझं एक आकाश माझ्या वाट्याचा उजेड सांडत राहावा म्हणून त्यात टाचलाय एक सुर्य, एक चंद्र थोडे तारे पेरले आहेत काही बियाणे थोडं धनधान्य टीचभर पोटासाठी जन्मभर लागणार्या अन्नासाठी... विदग्ध आत्म्याला विसावा म्हणून टीचभर परिघातल्या चंद्रमौळी घरात अशक्यतेचं अफाट विश्व सामावलंय ते मी माझंच मानून घेतलंय कायमचं जगण्यासाठी मनाच्या रखरखत्या जमिनीवर मारत असते भावनेच्या ओलाव्याचा शिडकावा उगवत राहते प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वगैरे जपून ठेवते काही खाणाखुणा जगण्यासाठी विदीर्ण आत्म्याला लावत असते संवेदनेचा लेप वगैरे भिरभिरणाऱ्या अस्तित्वाचा गुंता  सोडवण्यात, आणि विखुरलेल्या स्वप्नांची चुंबड जमवण्यात निघून चाललाय हा जन्म वगैरे हव्या त्या माणसांचे गर्दीतले चेहेरे शोधत धुमसत राहतो जीव अखंड अल्पकाळ परीघ ओलांडून आत येणाऱ्या माणसांनी  दिलेल्या तात्पुरत्या दुःखाचे कढ सोसत आयुष्याला पुरेल ए...
जुनेच इशारे जुन्याच खुणा त्या पानावर कोरलेल्या जुनीच कपाटे जुनाच खणा त्या पानांनी भरलेल्या तू अजूनही तिथे तसाच आहे जिव्हाळ्याने जपलेला तो थेंब सुना लांघून गुन्हा नयनांमध्ये लपलेला भिजले शब्द जुनेच गाऱ्हाणे, भावुकतेच्या लाटेने एकटीच निघाले मी वेडी मग आठवणींच्या वाटेने ! रश्मी मदनकर ४/०३/२०११

टीमटीम तारे .. !

निजल्या देहाच्या शिणलेल्या गात्रांना पहाटे स्फुरण चढतं..मग  रात्रीची खुंटीला टांगलेली रिकामी स्वप्नांची थैली तो झटकून तपासून घेतो.. इच्छा, आकांक्षा, अर्धउन्मलित स्वप्ने..  कोंबून भरतो पुन्हा उमेदीने निघतो पुर्ततेच्या प्रयत्नाच्या प्रवासाला.. पुन्हा कालसारखाच .. रणरण वणवण करून रात्री परतल्यावर घरात शिरण्याआत पिशवीतली सारी अपुर्ण स्वप्न त्वेषात भिरकावून देतो आकाशात.. चेहेरयावर हसू ओढतो.. थैली खुंटीला टांगतो. आनंदी वावरतो .. आणि दमला भागला जीव करतो झोपेच्या हवाली  अर्ध्यारात्री कधीतरी... इकडे नाऊमेदीचे अर्धगळके थेंब डोळ्यात..अन भंगलेल्या स्वप्नांचे तयार झालेले तारे आकाशात टीमटीमत राहतात रात्रभर..  निजल्या देहाच्या शिणलेल्या गात्रांना पुन्हा पहाटे स्फुरण चढतं.. मग ... 
Image
पहाटसमयी अंगणात नेत्राकर्षक पखरण दिसते खरी .. पण रात्रीच्या अंधाराचे गुपित तुला माहित नाहीत रे .. गळताना प्राजक्ताच्या हुंदक्यांचे रंग लवंडले असतात  .. खुडतांना अबोलीच्या चित्कारण्याचे फवारे उडाले असतात  .. आणि तुला .. तुला मात्र सूर्योदयाच्यावेळी आसमंतात पसरलेल्या लाल-केसरी रंगाची भूल पडते ... मग मला सांग, मला आवडतो तो काळा रंग अधिक प्रामाणिक नाहीये का रे ? रश्मी पदवाड मदनकर २४ जुलै १८