Posts

Showing posts from November, 2019

अरण्य वाटेचा प्रवासी - हिमांशू बागडे

Image
तुम्ही फक्त भटकंतीचा विषय काढता..विषय रमत जंगलापर्यंत येऊन पोचतो. जंगल म्हणजे त्याचे घरच जणू आणि वाघ त्याच्या जिव्हाळ्याचा विषय. पण माया वाघिणीशी मात्र त्याचे आत्मिक नाते आहे. तिच्याबद्दल बोलताना तो तल्लीन होऊन बोलत राहतो. कुठल्याही समयी कोणत्याही निमित्ताने कितीही वेळ तो मायाबद्दल बोलू शकतो.. तिच्या हालचालीतून तिचा मूड त्याला ओळखता येतो, तिच्या वागण्यामागची कारणे तो  समजावत राहतो. तिच्या चपळाईची, बुद्धिमत्तेची भरभरून तारीफ करतो. मी पुढ्यात बसून हे सगळं अनिमिष ऐकत असते. अचंभित करणारे अनवट वाटेचे हे किस्सेच नाही तर एखाद्या वाघीण आणि मनुष्यात असणारे हे अनोखे नाते त्याच चैतन्यमयी भटक्याकडून ऐकत सहाही संवेदनाने अनुभवत असते. सगळंच अचंभित  करणारं. आपल्याला ज्या-ज्या गोष्टी आवडतात, आपण ज्यात रमतो.. पॅशन वगैरे म्हणतात असे काहीसे असते, पण  आजच्या धावपळीच्या जीवनात या सर्वाचा आनंद घ्यायला फुरसत आहे कोणाला. आधी पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा असतो जो कधीच सुटत नाही..आणि आयुष्यभर मनातल्या इच्छा मनातच विरून जातात.  पण तुम्हाला आवडतात त्या सगळ्या गोष्टी पूर्ण वेळ करायला मिळणे ...

लेखकांच्या गोष्टी

Image
#लेखकांच्या_गोष्टी ''If a writer loves you, every single moment spent together, good and bad, will be documented, reflected on, glorified, transformed into poetry. They will turn even the ugliest sides of you into something lovable, perfect. Writers are obsessively observant, they feel the rawest form of emotions, they see human behaviour as something to always take note of. You become their favourite character.'' परवा एका मित्राने गंमतीनेच हा कोट फॉरवर्ड केला “If a writer falls in love with you, you can never die.” जवळ जवळ वर्षभरापूर्वी मीही गमतीने अशीच पोस्ट टाकली होती .. “ जर लेखक तुमच्या प्रेमात पडला तर तो तुम्हाला कधीच मरू देणार नाही, पण तुम्ही लेखकाच्या प्रेमात पडलात तर तो जगू देणार नाही '' हा गमतीचा भाग असला तरी लेखकांबद्दल अनेक समज-गैरसमज कायम असतात हे खरे. हे वाक्य वाचले तेव्हा अनेक वर्षांआधी दूरदर्शनवर 'मिट्टी के रंग' मधून की झी च्या 'रिश्ते' मध्ये ते आठवत नाही मात्र एक भन्नाट कथा पाहिल्याचं आणि ती डोक्यात ठासून बसल्याचं आठवतं....
Image
तसे रोजचेच तर असते जगणे  अंधारातही उजाडले अंगण बघणे  मनात चांदणं असतं फुललेलं तोवर  झाकोळला राहतो अंधार सारा .. तेव्हा एक करावं  .. रोज थोडं थोडं चांदणं  मनातून काढून गोळा करावं  कुपीत घालून जपून ठेवावं ..  रात्र उलटेल .. दिवस पालटतील कधी सरकलीच पायाखालची उजेडाची जमीन .. आलाच अंधार दाटून, अन दडपला मनातला उजेड तर  कुपीतल्या चांदण्या द्याव्या उधळून,  पेराव्या, सिंचाव्या आणि उगवाव्या चांदण्या  उगवल्या की अलगद जागवाव्या चांदण्या .. मनात भरून घ्याव्या जागल्या चांदण्या  कारण  मनात चांदणं असतं फुललेलं तोवर  झाकोळला राहतो अंधार सारा ! - रश्मी पदवाड मदनकर