Posts

Showing posts from March, 2026

संघर्ष, स्वाभिमान आणि मानवतेच्या वाटा - तृतीयपंथी समुदाय

Image
आपण आपल्याच विश्वात इतके मश्गुल असतो की या दुनियेत आपल्यासारखीच दिसणारी; पण नियतीनं वेगळा बेत आखला म्हणून संघर्षमय आणि नाईलाजास्तव सामान्यांपेक्षा वेगळं आयुष्य जगण्यास भाग असणारी अनेक माणसे आहेत याकडे आपले लक्षही नसते किंवा लक्ष असले तरी अंगाला-मनाला काहीही लावून न घेता बिनदिक्कत झापडे पांघरून आपल्याला निघून जाता येते. पण अशी झापडं सगळ्यांनाच लावता येत नाही; अगदी त्यांनाही नाही ज्यांना स्वतःच मदतीची गरज असते; आपलीच झोळी फाटली असतांना ती उरलेली लक्तरं घेऊन इतर गरजुंच्या मदतीसाठी पुढे येतात. नागपूर शहराच्या वर्दळीमध्ये अनेक समाजघटक आपापल्या संघर्षांसह जगत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा, पण दुर्लक्षित समाजघटक म्हणजे तृतीयपंथी समुदाय. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेले हे लोक आजही स्वतःच्या अस्तित्वासाठी, सन्मानासाठी आणि समान हक्कांसाठी झुंज देत आहेत. आपल्या समाजाने स्त्री आणि पुरुष अशा दोन ठराविक चौकटी उभ्या केल्या; मात्र त्या चौकटीत न मावणाऱ्या तृतीयपंथीयांकडे अनेकदा संशय आणि उपेक्षेच्या नजरेने पाहिले गेले. शिक्षण, नोकरी, निवारा आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत हक्कांसाठीही त्यांना सतत सं...

आपल्या संवेदना न मरो...

  शताब्दी चौकात दोनदोनच्या जोडीत त्या चौघी आळीपाळीने दिसत राहतात . पहिली जोडी आहे १३ - १४ वर्ष वयाची आणि दुसऱ्या दोघी असाव्यात २२ - २५ तल्या . विशेष म्हणजे चौघींजवळ चार बाळ आहेत .. अगदी छप्पर फाड के दिलंय बघा त्यांना देवाने . ही बाळं झोळीत निपचित पडलेली असतात किंवा कडेवर रडत , पेंगत बसलेली असतात , उन्हातान्हात , पावसात , धुळीत . दुसऱ्या १३ - १४ वर्ष वयाच्या ज्या दोघी आहेत . त्या स्वतःच किशोरी असताना त्यांच्याजवळ प्रत्येकी एकेक चिमुकलं असतं . सिग्नल लागला की त्या पुढे येतात , काच ठोठावतात . तुम्ही ' ये किसका बच्चा उठाकर घुमते हो ' असं विचारलं की त्या ' मेरा बच्चा है ' असं सांगतात आणि तुम्ही पुढला प्र श्न विचारण्याच्याआत भरभर चौक सिग्नल ओलांडून निघून जातात . मग पुढले काही दिवस गुडूप होतात . दिसत नाहीत ... मग पुन्हा येतात . पुन्हा झोळीत बाळं ; तीच का नवी …? माहिती नाही . प्रश्र्न असा की प्रत्येकीकडे एक या दराने असे किती चिमुकले असतात यांच्याकडे .. इतक्या ठोक भावाने कुठे मिळतात इतकी लहान मुले ? एका चौकात इतकी तर शहरात किती ? आणि राज्यात ? देशात ?   ही मुले जरा मोठी झ...

वेड्यांच्या दुनियेतली शहाणी माणसे -

शहाण्या माणसांच्या गजबजाटात काही चेहरे असे असतात, जे पहिल्या नजरेत “वेडे” वाटतात. विस्कटलेले केस, मळकट कपडे, असंबद्ध बडबड, तटस्थ नजरा; आपण त्यांना एका क्षणात वेडे ठरवून मोकळे होतो. पण कधी थांबून त्यांच्या जगण्याच्या पायवाटा शोधल्या, त्यांच्या कथा ऐकल्या तर लक्षात येतं की वेडेपणाच्या आवरणाखाली काही विलक्षण शहाणपण जपलेलं असतं. या शहाण्या दुनियेत जी माणसं वेडी ठरवली जातात, तीच कधी कधी आपल्याला माणूसपणाचा आरसा दाखवतात. त्यांच्या अस्ताव्यस्त रूपामागे लपलेला असतो स्वाभिमान, कर्तव्याची जाणीव, नात्यांनी दिलेल्या जखमा आणि तरीही जगण्याची हट्टाग्रही ओढ... हे सगळं आपल्याला विचार करायला भाग पाडते.  मनोविकार जडलेल्या आणि समाजाने वेड्या ठरवलेल्या माणसांना समाजाने अव्हेरली असली; तरीही त्यांच्यात माणुसकीची, विचारांची, चांगुलपणाची लव अखंड धगधगत असते. कुणी स्वच्छतेला आपला धर्म मानून झाडू हातात घेऊन रस्ते झाडतो; कुणी शब्दांविना शांतपणे उपाशीपोटी बसूनही आत्मसन्मान जपतो; कुणी भूतकाळाच्या चुकांची शिक्षा स्वतःलाच देत, तीन विटांच्या चुलीवर आपलं आयुष्य पुनःपुन्हा पेटवत राहते. त्यांच्याकडे मोठमोठ्या पदव्या न...

हिजाबपलीकडचा लढा : इराणमधील स्त्रियांचा विद्रोह

Image
कालच्या इराणमधील घडलेल्या युद्ध घटनेच्या जवळजवळ महिनाभरापूर्वी तरुण भारत आकांक्षा पुरवणीसाठी लिहिलेली ही कव्हर स्टोरी... युद्ध, हिंसा किंवा हत्या यांच्या विरोधात आपले संस्कार असले तरी, कुणासाठी दया दाखवावी याचेही भान आपल्याला असले पाहिजे... हजारो माणसांचा जीव घेणाऱ्या एका क्रूर माणसासाठी आपला जीव तुटत असेल, तेव्हा त्या हजारो माणसांच्या अत्याचारात आपण त्याच्यासोबत होतो हा त्याचा अर्थ असतो.. असे असेल तर आपण स्वतःची तपासणी आधी केली पाहिजे... इराणची सत्ता नेस्तनाबूत होण्याआधी इराणची परिस्थिती काय होती हे समजून घेतले पाहिजे... ***********  इंट्रो - जग फक्त मथळे स्क्रोल करत पुढे सरकत असताना, इराणच्या अंधारात एक अमानुष नरसंहार घडतो आहे. महिनोन्‌महिने चालू असलेल्या आंदोलनांवर सरकारने केवळ लाठीचार्ज किंवा अटकपुरते न थांबता थेट रक्तरंजित दडपशाहीचा मार्ग निवडला आहे. इंटरनेट बंदीच्या भिंतीआड हजारो लोकांचे आवाज दडपवले जाताहेत, गुदमरले जाताहेत, छायाचित्रे आणि व्हिडीओ बाहेर येणे थांबवले गेले आहे... म्हणूनच आतापर्यंत जगाला जे दिसत होते, ते फक्त “हिमनगाचा टोक” होते. आता जे सत्य हळूहळू समोर येते आहे...