Thursday 28 January 2021

दहा मिनिटे ..

 सतत तुझा पाठलाग.... 

सतत वाट पाहणं 

तू कधी येणार आहेस?

दहा मिनिटानंतर....पण कोणत्या?

अनेक शतकं लोटून जातात तुझी वाट पाहण्यात

तरीही तू येत नाहीस पुढल्या कुठल्याच दहा मिनिटात

तुझ्यासाठी मी फक्त एक 'आठवण' चौकटीसारखी 

तू आतल्या प्रतिमा बदलत राहतोस वेगवेगळ्या अस्तित्वाच्या.. 


दहा मिनिटे ही अशी युगप्रवर्तक परिवर्तीत होऊ शकली असती....

दहा मिनिटांसाठी तू 'मी' आणि मी 'तू' झाले असते

केवळ दहाच मिनिटे तू बघितली असती माझी वाट

आणि अनेक युग जगला असतास माझ्या विरहात

आणि इतके करून तू निव्वळ  'आठवण' म्हणूनच उरला असता.. 


तुझ्या या बेपर्वाह प्रतिभाशाली वागण्याची मी ही झाले असते साक्षी 

आणि वेदना माझ्या मनीच्या तुलाही भोगता आल्या असत्या  

....

देशील का तू ही दहा मिनिटं ......दोघेच जगूया ही दहा मिनिटं

अशी अनेक युगाच्या गर्भात दडलेली सगळी दहा मिनिटं येऊ शकतील

आपल्या वाट्याला..... एकमेकांच्या जगण्याला .. कुणाच्याही पाठ्लागाशिवाय.....

देशील का?.........

सांग दहाच मिनिटांसाठी येशील का??


 आभाळाशी नाते माझे

धरतीशी बंध सारे

मेघ होते बरसते

गार ओले होते वारे


वाऱ्यावर झुलते मी

ऊन घेते लपेटून

माती अंगी लिंपुनीया

घेते गंध समेटून


बोरी बाभळीची लेक

काट्या फुलात फिरते

रानीवनी जीव वसे 

झाडावेलीत डोलते


डोळी तळा साठवते 

धुंद धुक्याशी बोलते 

अंगोपांगी पानोपानी 

दव होते पाझरते 


संध्याकाळी क्षितिजाशी

मत्त होते तेजाळते

पाश सारे सोडवून

मौन होते मावळते.


रश्मी प म ..




Wednesday 20 January 2021

 खुप गहिवरून हाक दिली तरी 

चंद्राला नसतं देणंघेणं..

तो मग्न असतो त्याच्या दुनियेत 

काळ्या सावळ्या ढगात 

अनंत चांदण्यांच्या गराड्यात.. 

कधी पौर्णिमा होण्यात, कधी अमावस होण्यात

सहज चमकून येण्यात, बरंच गहाळ होण्यात. 

ती टिकून असते तीथेच, थिजून असते जागीच 

वर्षानुवर्षे वाट पाहत.. एका कटाक्षासाठी..

एकेका हाकेसाठी..

न ढळणारी‌ धृव बनून ...

Wednesday 13 January 2021

जयवंत काकडे ‌- व्यंगचित्रकार

 #भेटलेलीमाणसे -७


हे आहेत जयवंत काकडे ‌- अनेक वर्षांपासून वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यंगचित्रकार, लेखक  असलेल्या जयवंतजींचे व्यंगचित्र यंदाच्या आपल्या 'अनलाॅक' दिवाळीअंकात प्रकाशित केले होते, म्हणून जेव्हा वरोराला जाणं झालं आणि त्यांना प्रत्यक्ष भेटायचा विषय निघाला तेव्हा रात्री उशिर होत असतानाही दहा मिनीटं भेटायचच ठरलं.. दहा मिनीटांचा तासभर कसा झाला ते मात्र कळलंच नाही, पण त्यांना भेटून-बोलून जे समाधान मिळालं त्याला तोडच नाही... त्यांच्याबद्दल जे काही ऐकून वाचून होते त्यावरून माझ्या मनातली त्यांची छबी फार वेगळी होती.. त्यांना प्रत्यक्ष पाहीलं तेव्हा कितीतरी दशकं रसिकांचे मनोरंजन करणारे..एका एका कार्टुनमधुन मोठा आशय मांडत, वैचारिक खाद्य पुरवणारे. महाराष्ट्रभर स्वतःचे लाखो-करोडो चाहते निर्माण केलेला एखादा कलावंत इतका साधा इतका जमिनीवरचा असेल असं वाटलंच नाही. आजवर फक्त ऐकून होते पण 'साधी राहणी उच्च विचार' मी त्या दिवशी ह्याची देही ह्याची डोळा अनुभवले. 



एखाद्या जुन्या आधारवडासारखा जुना-जर्जर पण खंबीर ठाम उभा असलेला वाडा. आजी-आजोबांनी गोष्टी सांगताना कल्पनेत दिसतो तसाच अगदी..जुन्या काळातील स्थापत्याच्या खाणाखुणा अजुनही अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या भिंती-खांबं. जुनाट फर्निचर त्यात भरलेली पन्नासच्याही पुर्वीच्या दशकातली दुर्मिळ अशी चित्र-पुस्तके आणि काय काय..हावरटासारखं पाहतच राहावं असं. 


आजच्या घडीला जयवंतजींचं वय आहे ८०. वयाच्या ७८ वर्षांपर्यंत म्हणजे २०१८ पर्यंत फोटोत दिसतेय त्या लुनावर शहर भ्रमंती करत त्यांनी वकिली केली. ते वकील पण आहेत हे नव्यानेच कळाले. दोन वर्षांपासून वकिली आणि लुना दोन्ही चालवणे बंद केले. १९५२ साली त्यांच्या वयाच्या १२-१३ व्या वर्षी त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं होतं... नंतर विविध वृत्तपत्रांमधून  व्यंगचित्र प्रकाशित होऊ लागले आणि त्यांचा एक काळ त्यांनी प्रचंड गाजवला. जयवंत काकडे यांच्या व्यंगचित्रांसाठी वृत्तपत्रांना मागणी यायची. ते विदर्भाच्या मातीतले असले तरी मुंबई पुण्यासारख्या संस्कृतीच्या माहेरी त्यांच्या नावाचा गवगवा होता, तो आजही आहे.. 





त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली गाजली.. विशेष सांगायचे म्हणजे ते आजही प्रचंड उर्जामय आहेत सक्रिय आहेत. अनेक वार्षिकांकाच्या कामासाठी ते वर्षभर तयारी करत असतात. त्याहून मला त्यांची आवडलेली गोष्ट म्हणजे ते आजही सोशल मिडियावर सक्रिय आहेत. आजच्या पिढीला काय आवडतं, आपल्या अवतीभवती काय सुरू आहे..कुठल्या घटना घडतात त्यांचे वैचारिक प्रतिबिंब आजच्या समाजावर काय उमटतात ..असे अपटूडेट राहण्यासाठी त्यांची सतत धडपड असते. आजच्या काळातल्या गोष्टी आपल्या चित्रात लेखनात उतराव्या म्हणून ते आजही त्यांच्या वाड्याच्या एका कोपऱ्यात असलेल्या जुनाट खोलीत सगळे संदर्भ गोळा करून ठेवतात, अभ्यास करतात. ते एक वाक्य वारंवार सांगतात 'मी पैशांसाठी कधीच काम केले नाही जगण्यापुरते कमावले' याची प्रचीती त्यांच्या एकंदरीतच जगण्यातून आपल्याला येत राहते. 


एक पिढी त्यांच्या वागण्यातून कृत्यातून त्यांच्या पुढल्या पिढीला संस्काराचं, अनुभवाचं, जगण्याच्या पद्धतीचं आंदण देत असते. जयवंतजींना भेटून मला काय वाटलं काय मिळालं हे एवढ्या कमी शब्दात सांगण्यासारखं नाहीच. खुप काही सांगता येण्यासारखं आहे पण तुर्तास इतकंच ... पुढे कधीतरी त्यांची प्रत्यक्ष मुलाखतच घ्यायचं मानस आहे .. पाहू कसं जमतं .. 




जयवंतजींना लिहीतं राहण्यासाठी आरोग्यमयी शुभेच्छा 💐🌷


@रश्मी पदवाड मदनकर 

 मौन म्हणजे उणीव, उणीव शब्दांची 

जशी उजेडाची उणीव अंधार म्हणजे 

अंधारात नसतात पण 'सावल्या' दिसतात उजेडात 

उजेडात दिसणारी सावली अंधारासारखीच...काळीकभिन्न 

तश्या सावल्या असतील का शब्दांना ?

शब्दांना मौनाच्या सावल्या … शांतसुन्न !!


 रश्मी..

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...