मला ना एकदा नदी व्हायचंय..!!
मला ना एकदा नदी व्हायचंय.. !! प्रवाही. अवखळ तरीही निस्सीह, शांत. संयमी..जन्मापासून हजारो मैल प्रवास करत न थकता न दमता चैतन्याचे तुषार उडवत.. मार्गात येणाऱ्या मोह माया त्यागत.. एखाद्या ऋषीकन्येचा संयत तेजस्वी भाव लेवून, जुनाच वेष धारूण, वेग आवेगही पांघरून. एकाच दिशेनं, जुन्याच वळणानं लयबद्ध ताल धरत, डोंगर दर्या कपारी पार करत, एखाद्या रणरागिणीप्रमाणे खोल दरीत स्वतःला झोकून देऊनही पुन्हा निश्चयाने कणखर होणारी. अविश्रांत धावत प्रवाहात स्वतःला सामावून घेत अधीक प्रगल्भ होत असोशीनं वाहत राहणारी. सदैव त्याच जागी भेटुनही तीथे न साठणारी रोज दिसणारी तरीही नवी भासणारी..लावण्य सुंदरी...भर दिवसा तळपत्या सुर्याची किरणं आत आत शोषून घेणारी..संध्याकाळी तांबड्यात न्हावून निघणारी अन चंद्राची शितल काया अंगभर लपेटून दिवसभराचा दाह शमवून घेणारी..पिढ्यांच्या रितीभाती..प्रथा परंपरांना मोठ्या मनानं पोटात घालून मायेचा डोंगर पेलणारी..गर्भातल्या जिवांना अंगाखांद्यावर खेळवत.. जागवणारी-जगवणारी ममतामयी मानीनी..सर्व विश्वाचा रंग तिच्यात येऊन मिसळूनही ती तीचा रंग मात्र बदलत नाही. रंगुनी रंगात सार्या रंग माझा व...