Posts

Showing posts from 2020

कवी महोदय, जागे व्हा !

 तुझं पहिलं आणि एकमेव प्रेम कविता असलं पाहिजे  कवितेतच जगणं आणि कवितेतच रमणं माणसांच्याही तू कविता करून टाकल्यात  आणि कवितेतच माणसं शोधलीस  माणसांची मात्र कदरच केली नाहीस सहसा ..  इतका मग्न झालास कवितेत कि आयुष्याची अनेक सालं कल्पनेच्या कुठल्याश्या जगात भटकत राहिलास ..  माणसांत परत येऊनही तू माणसांत आलाच नाहीस ..  अरे कविता अश्रू पुसत नाही तिच्याजवळ खांदा नसतो रडायला  ती कुशीत घेऊन जोजवत नाही  मायेचा स्पर्श देऊन दुःख हलकं करत नाही  कवितेला आई होता येत नाही  तिला बहिणीची माया देता येत नाही  प्रेयसीची प्रीती तिला होता येणार नाही  तिला तन-मन-आत्मा शांतवता येत नाही .. तिला हवे असतात तुझे श्वास तुझे ध्यास  ती निर्माण करू शकते सतत नसलेले भास  तुझ्यातलं सगळं हिरावून ती नटत मुरडत अवतरते  आत आत हेलावून क्षणभर सुखावते  सतत अस्वस्थता पेरत पोकळी निर्माण करत राहते..  तिच्याकडून घेता येत नाही रे काही  तिला हसतंखेळतं पाहण्यासाठी तिला सतत देत रहावं लागत असतं.. सतत घेत राहून आत-बाहेर रिक्त करणाऱ्या कवितेच्या न...
 आला आला रे डोंबारी त्याच्या हाती काठी दोरी पोरीसंगे तो दाखवतो फुटक्या जगण्याची लाचारी दोर टांगतो आकाशाला   तालावर पोरं नाचवतो टिचकीभर या पोटासाठी जीव दावणीला आंथरतो एकाएका पैशासाठी हात पसरतो दारोदारी  चिंध्यांचा संसार मांडतो उघड्यावरती भर बाजारी किती यातना सोसत जातो भोग कशाचे मोजत जातो सोस कशाचा नसे बापुडा बिनबोभाटा भोगत जातो रश्मी पदवाड  २३.११.२०

'स्वभान' जपणारी ग्रामीण स्त्री !

Image
 १८ व्या शतकाच्या शेवटी घडून आलेल्या औद्योगिक क्रांती, शहरी विकास आणि पुनर्जागृतीमुळे समाजात राजकीय, आर्थिक आणि सामाजिक बदल घडू लागले. त्यानंतरच्या काळात पश्चिमी देशांशी तुलना करत विकसनशील देशामध्ये जे परिवर्तन घडू लागले त्यालाच आधुनिकरण असे म्हंटले जाऊ लागले. हळूहळू तंत्रज्ञानाचा शोध, निर्मिती आणि वापर जसजसे वाढू लागले तसतसे जग अधिक जवळ येऊ लागले. सोयी-सुविधांसाठी तयार करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाच्या  वापरामुळे जगणे अधिक सुलभ सोप्पे होऊ लागले. भारतासारख्या विकसनशील देशात ह्याचे जास्त महत्व होते कारण एकतर पारतंत्र्याचा काळ भोगल्यानंतर शेकडो वर्षांनी स्वातंत्र्य मिळाले म्हणून शून्यातून सुरुवात करून वैयक्तिक प्रगती आणि देशाचा निदान मूलभूत विकास या दोन्ही गोष्टी कमावणं काही खायचं काम नव्हतं. एका बाजूने हे प्रयत्न सुरु होते तर दुसरीकडे पाश्चात्य संस्कृतीला भुलून तरुण पिढी भौतिक सुखाकडे आकर्षिले जाण्याकडे कल वाढत होता. भारतीय समाजाच्या आणि पाश्चात्य संस्कृतीच्या एकूण सांस्कृतिक जडणघडणीतच मुळात फरक असल्याने ह्याचे परीणाम वेगवेगळ्या स्तरावर होऊ लागले. एकंदरीत सर्व बाजूने गतीने बदल हो...

विस्मृतीचा श्राप ...

 अंधारलेल्या एखाद्या बोगद्यात शिरावे  आणि एक एक पाऊल पुढे चालतांना  घुप्प अंधार गवसत राहावा ...  आकाश, जमीन, प्रकाश  आणि सजीवांचे भास-आभास  सगळंच दूर-दूर पुसट होत,  ठिपका होत नाहीसे होण्यापर्यंत येऊन पोचावे ..  नाव, गाव ओळख मिटू लागावी,  भूत, वर्तमान भविष्याचा संदर्भच कळू नये  माणसांच्या भेटण्याच्या, त्यांच्या निघून जाण्याच्या कथा  कणकण आनंद, क्षणक्षण दुःखाच्या व्यथा  घट्ट झालेल्या नात्यांच्या, निसटलेल्या हातांच्या.. आणि  यासर्वात धडपडत तगून-जगून दाखवण्याच्या प्रथा  विघटित होऊन उडून जाव्या  ..    रंग, गंध, दृष्टी, स्पर्शाच्या पलिकडे कुठेतरी वैचारिक भूमिका, बौद्धिक- मानसिक आंदोलनं गहिवरलेली स्पंदन विरावीत .. इच्छा-आकांक्षा,अपेक्षांची वाफ व्हावी   अनोळखी होत जावे सारे ..  अंधाराच्या पटलावर दूर चमकताना दिसेल काहीतरी धाव घेऊ नये मृगजळ असेल ते .. काळा कभिन्न परिसर, फसव्या दिशा  अनिश्चित अंतरे, अनाकलनीय स्थिती  अनासक्त प्रवास ... आणि  अनवट भिवतीच्या अंधार वाटा ..  कुठे घेऊन ...
 जन्माच्याच वेळी सटवाई लिहिते तिच्या माथी - 'बाई' मग ती होते लेक, बहीण, बायको.. आई गात राहते आयुष्यभर पीडेतून उठलेली जीवनगर्द अंगाई .. गुणगुणते तटतटत्या वेदनेतून भावसमेवर आलेल्या अंतर्लयी .. ती छेडत राहते प्राणाच्या वीणेवर अम्लान सुखाची तान  पानगळीतही शोधत बसते मनाचे लसलसते हिरवे रान  उजवते चैतन्याची कूस अन शिवून घेते उसवलेले काळीजभान   चिंब ओल्या सांजपावसातही फुलवते जाणिवांचे विवर्त विराण  ती घेते नात्यांना खोल काळजात रुजवून  प्रत्येक कणाला भावओल देऊन देते मायेने भिजवून  रात्र रात्र पाहते स्वप्न - ठेवते सगळे जागवून आकांक्षांच्या उडत्या पाखरांना ठेवते पदरात निजवून  ती आणते रखरखत्या उन्हातून शीतल गारवा चोरून  वाटत फिरते प्रेम-जिव्हाळा ओंजळ भरभरून फाटक्या तुटक्या मोडक्या विटक्या गोष्टी ठेवते झाकून बोलते हसते रमते खेळते ..मुखवटा घेते ओढून.  रश्मी..
आयुष्यभर धावून धावून दमलेला असतो जीव .. त्यात तुम्ही नोकरी करणारे, घरचं बाहेरचं सगळंच सांभाळणारे असाल तर दमून, कावून, रापून गेलेला असतो जीव.. घरातल्या, गणगोतांच्या, संबंधातल्या, नात्यातल्या, माहितीतल्या, मैत्रीतल्या, भोवतालच्या सगळ्यांच्या फर्माईशी, इच्छा, अपेक्षा.. त्यांच्या त्यांच्या आपल्याबाबतीतच्या आकांक्षा पूर्ण करत राहणे, सगळ्यांची मर्जी सांभाळत जगणे .. अपरिहार्य असतं आॅफिस, तीथली कामं, कामाचा ताण, आॅफिस पाॅलिटीक्स, विवीध प्रकारची वृत्तीची माणसं सगळ्यांना फेस करणं, शिकणं शिकवणं, समजणं- समजावणं-समजून घेणं.. सतत गोतावळ्यात राहणं, सतत सगळं आणि सगळ्यांना ऍडजस्ट-मॅनेज करत राहणं .. पर्यायच नसतो तब्येतीच्या कुरकुरी तर कोपऱ्यातच ढकलायच्या .. या सगळ्यात मन दुखू द्यायचं नसतं .. दुखलं तरी दाखवायचं नसतं.. हसत राहायचं, सतत आनंदी दिसायचं .. या सगळ्यांवर उपाय म्हणून 'सुकून के पल' शोधत चार मित्र-मैत्रिणी शोधायच्या, एकत्र आणायच्या .. पण बरेचदा (नेहेमी नाही) इथंही फार वेगळं काही घडत नाही. माणसं कधी स्वार्थी असतात किंवा फार फार जजमेंटल निघतात.. कुठूनतरी कसेतरी पाठीत वार तरी होतात .. ...
तू गेल्यावर इथे सांडले गंध तुझ्या श्वासाचे तू गेल्यावर घट्ट जाहले बंध तुझ्या ध्यासाचे कातरवेळी तू स्वप्नांना हळुच जागर देतो अलगद येतो ओढून ऊब घट्ट मिठीची देतो तुझ्या भोवती फेर घालती माझ्या गंधित वेळा तू असण्याने शितल झाल्या तप्त उन्हाच्या ज्वाळा तव स्पर्शाची ओढ अनामिक व्याकुळ करते छळते मखमल शेजेवर दरवळते धुंद अशी तळमळते सहवासाच्या सुरम्यवेळी सांज सुखाची फुलते विरहामधली ओढ घेऊनी रात्र उशाशी झुरते तू गेल्यावर मन बावरते पापण ओले करते आठवणींची वेडी सर मग, श्रावण होत बरसते रश्मी पदवाड मदनकर ३०जुलै २०

'शिप ऑफ थिसीस - विरोधाभासाचा कॅलिडोस्कोप !

Image
'शिप ऑफ थिसीस' बऱ्याच दिवसांपासून पाहायचा होता.. थोडा थोडा तुटक पाहीला होता कधीतरी, पण सलग पाहायची इच्छा मात्र राहूनच जायची ती मागल्या आठवड्यात हट्टाने पूर्ण करून घेतली. ३ वेगवेगळ्या कथांचा बंच असलेला हा अत्यंत सूक्ष्म अश्या एका थेअरीवर बेतलेला सिनेमा आहे. 'शिप ऑफ थिसीस' ह्याच नावाची एक थेअरी आहे. ह्याचा गाभा असा आहे की, एखाद्या जुन्या तुटक्या पडक्या पण कामात असणाऱ्या नावेचे जुने भाग एक एक करत बदलत गेलो आणि एकदिवस एकूण एक भाग बदलले गेलेले असतील तेव्हा ती नाव पूर्वीचीच नाव उरेल का की ती पूर्णतः नव्या रंगाढंगांची जुनी वैशिष्ट्ये संपुष्टात येऊन नव्या विशेषांसह नवीच नाव बनलेली असेल ?? जुनी असेल तर कुठून जुनी असेल .. आणि नवी झालीय तर तो कोणता बिंदू कोणता भाग असेल ज्यामुळे त्याला नवी ओळख प्राप्त होईल? .... हा विरीधाभासी प्रश्न (पैराडॉक्सिकल) आणि हीच थीम ही थेअरी ३ माणसांच्या जीवन कहाणीद्वारा 'शिप ऑफ थिसीस' या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विषय जरा कठीणच आहे.. बुद्धीवर जोर देऊन पहावा आणि समजून घ्यावा लागतो मात्र समजला तर आत्यंतिक समाधान देणारा .. हे असे च...

काही गोष्टींचा आनंद मानावा की दुःख हेच कळत नाही ..

Image
संपूर्ण उन्हाळा लॉकडाऊनमध्ये पार पडला. कधी रखरखते पोळून काढणारे ऊन तापू लागले आणि कधी निवळले कळलेही नाही. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सुस्थितीतल्या चपला जमा करून ठेवल्या होत्या..त्या दरवर्षीप्रमाणे उन्हात पाय भाजत चालताना दिसणाऱ्या गरजवंतांना द्यायचे ठरले होते. तसे तळपत्या उन्हात प्रचंड संख्येने दूरदूर पायी चालत निघालेली एक नवीच जमात या काळात उदयाला आली होती पण त्या प्रत्येकापर्यंत पोचणं काही शक्य झाले नाही. लॉकडाऊन असतांना आपली घोडदौड शहराच्या आतल्या भागापर्यंतच सीमित राहिली शेवटी. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑफिसला निघताना (होय माझे ऑफिस चालूच होते) यातले २-४ जोड चपला गाडीत ठेवून घ्यायच्या आणि उन्हात भाजत पायपीट करणाऱ्या लहान मुलांना, गाडा ओढणाऱ्या, सायकलरिक्षा चालवणारे, भीक मागणारे, मजुरी करणारे किंवा गावातून शहरात येऊन भाजी दूध लोणी विकणाऱ्या गरीब मंडळींना द्यायचे हा शिरस्ता पाळायचा होता. पण या टोकापासून त्या टोकापर्यंत भयाण शांतता पसरलेल्या शहरात घरात दारात झोपडीत खोपटात पायपात ब्रिजखाली कुठेकुठे लॉकडाऊन होऊन पडलेली मंडळी दिसलीच नाही. गरजवंत दिसले नाही म्हणून आनंद मानावा की गरजवंत असू...
गझलकार सतीश दरडी ह्यांनी दिलेल्या मिसऱ्यावरून गझल लिहिण्याचा मी केलेला प्रयत्न -  (तुझे स्वप्न जेंव्हा पडू लागले) कसे दुःख सारे झडू लागले  तुझी आस जेथे मनी दाटली   तिथे भास सारे दडू लागले  उगी अडखळू लागली पावले   कळेना असे का घडू लागले  अश्या सांज समयी सुने वाटते  तुझे दूर जाणे नडू लागले  कुणाला पुसू काय हे दाटले  कशाला असे भडभडू लागले

माझा वेल्हाळ पाऊस

Image
माझा वेल्हाळ पाऊस असा येतो बरसतो  जणू अंगांगात साऱ्या   नवे चैतन्य पेरतो  माझा वेल्हाळ पाऊस  घर अंगण भिजवी खोल मातीत शिरून  नवे अंकुर फुलवी  माझा वेल्हाळ पाऊस  त्याची बातच वेगळी  त्याच्या फक्त स्पर्शामुळे फुलारते चाफेकळी माझा वेल्हाळ पाऊस  नदी होऊन वाहतो  तिच्या अंगाखांद्यावर  खुणा पेरून धावतो माझा वेल्हाळ पाऊस  पाझरतो आत आत  जणू रुजवून काही  पुन्हा उगवे कणात.. माझा वेल्हाळ पाऊस  करे धरतीशी माया  रस रूप गंध सारे  आला उधळून द्याया.. माझा वेल्हाळ पाऊस  उतरतो खोल खोल   गात्रागात्रातून वाहे  त्याच्या अस्तित्वाची ओल.

सुखाशी भांडतो आम्ही

Image
सुख सुख म्हणतात म्हणजे नेमके काय … ?? या प्रश्नावर नाही तर उत्तराच्या नेपथ्यावर खेचून उभं करणारं आणि सुखाच्या सर्व काल्पनिक, बेगड्या कल्पना धुऊन काढून मन ढवळून काढून सुप्त अन खऱ्या सुखाच्या इच्छा जागृत करणारं नाटक पहिलं आज …. 'सुखाशी भांडतो आम्ही' लेखकाच्या यथार्थ लिखाणाची , दिग्दर्शकाच्या प्रभावशाली दिग्दर्शनाची आणि कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाची … नाही खरतर व्यक्तिरेखा साकारण्याच्या त्यांच्या गुणांची अकल्पिक अनुभूती घ्यायची असेल तर एकदा तरी हे नाटक बघायलाच हवं …. लेखक नाटककार अभिराम भडकमकर यांनी फार वेगळा विषय या नाटकातून प्रेक्षकांसमोर मांडला आहे …. भद्रकाली प्रॉडक्शनचे कुमार सोहोनी दिग्दर्शित आणि कविता कांबळी निर्मित 'सुखाशी भांडतो आम्ही' एक अप्रतिम आणि उत्कृष्ट नाटक …. सदाशिव विठ्ठल नाशिककर (चिन्मय मांडलेकर)या शेतकी महाविद्यालयातील अतिशय हुशार कविमनाच्या प्राध्यापकाची मनोव्यथा…. मनोविकार जडलाय त्याला पण त्याच्या खुळ्या ठरलेल्या आणि समाजाने वेड्या ठरवलेल्या विचारांमध्ये प्रेक्षक कसा गुरफटत जातो हे कळतच नाही … दुसर्या बाजूने या वेड्याचा उपचार करणारा डॉक्टर श्रीधर (डॉ...
Image
घोंगावणाऱ्या वाऱ्याने नाहीच दिले विनाशाचे संकेत एके रात्री विशालकाय आभाळाचा तुकडा अचानक फाटला, कोसळला .. आणि  उंबऱ्यापासून गाववेशीपर्यंत वाहून घेऊन गेला लक्तरं जगण्यासाठीच्या सगळ्या संभावना विस्कळीत पायाखालची जमीन आणि डोक्यावरचे आभाळही अश्रूंच्या महापुरात तुडुंब .. संसार उघडे पडले..हातातले हात सुटले शिल्लक राहिलेत काही जिवंत पार्थिव ..   पंचतत्वात विलीन व्हावे असे कितीही वाटले तरी नियती इतकी सहज सुटका करीत नाहीच अक्ख्या आयुष्याच्याच नाका-तोंडात पाणी जाऊन फुगून वर आलेल्या  छिन्न विच्छिन्न,  कुजलेल्या लिबलिबीत प्रेतासारखी एकेकाची चित्तरकथा .. पडझड झालेल्या अर्ध्या उभ्या भिंतींवर आदळत राहणार आहेत अनेक वर्ष ..अखंड ! माणसे गिळणारा हा लाल-काळा चिखल तुडवत उरलेल्यांना चालत राहावे लागणार आहे. काळ सोकावत जाईल वाहून गेलेले मृतदेह घुसळले जातील, फसतील, रुतली जातील, खोल आत आत चिखलात ..आणि एक दिवस विरघळून जातील. पण जीव न गेलेल्या देहातील आशा आकांक्षांचे पाण्यावर तरंगणारे कलेवर मात्र येत राहतील वरवर महापुराच्या विनाशाची चित्र रंगवत मनःपटलावर चिरकाल .. ...

काळीजहाक ..

भवतालच्या परिघातून घुमत येते एखादी काळीजहाक आणि ..दिगंतात दुमदुमू लागते दर्दस्त अंतर्लय अंतर्यामातील वीणेच्या तारेवर रणकंदते एखादी झंकार आणि वाजू लागते अम्लान वेदनेची स्निग्ध तार प्राणाच्या समेवर राग चंद्रकंस छेडला जातो.. आणि संथागारातील मर्मतळातून .. आकांतून बाहेर पडतात अव्यक्त आत्मप्रलय नको असतात हाका, हाका त्रास देतात काळजावर कोरलेल्या अनेक डोळ्यांच्या खळातून आक्रंदत पाझरू लागतात ऋतुगर्द आठवणींचे जीवनलय.. जसे पाषाणाचे हृदय भेदत जखमांच्या भेगांतून बाहेर येऊ पाहतात काळ्याभोर ढेकळांचे कवच फोडणारे गर्दकोवळे कोंब ... रश्मी - २६/०६/२०

नरो वा कुंजरो वा !

Image
माणूस हा फार चक्रम प्राणी आहे.. प्रत्येक मानवी प्रवृत्ती गुणदोषांनी भरलेली असते हे तो मान्य करतो. आपल्या माणसांना गुण-दोषांसह स्वीकारावे हेही पटवून देतो,  स्वतःला मात्र कधीच जोखायला जात नाही,  किंवा स्वतःच्या बाबतीत माणूस अत्यंत सहिष्णू वगैरे असतो आणि इतरांकडूनही त्याची तशीच वागण्याची अपेक्षा असते. ..मात्र वास्तवात इतरांकडे पाहताना स्वतःचा दृष्टिकोन मात्र अत्यंत एकसुरी राखतो. दुसऱ्यांकडे पाहतांना तो प्रचंड जजमेंटल वगैरे होतो. पुढला एकतर अगदीच देव हवा असतो किंवा टोकाचा दानव. आपण कितीही प्रगल्भ झालो तरी आपण हे मान्य करायला तयारच नसतो की, माणूस चांगला का वाईट हे आपण कधीच ठरवू शकत नाही. माणूस ज्या वेळी जसा वागतो ते त्या त्यावेळी घडणाऱ्या परिस्थितीमुळे ..आणि परिस्थितीमुळे माणूस जसा वागतो तो तसा असतोच असे नाही ...ते वागणे तात्पुरते असते तेवढ्या परिस्थितीपुरते. आपण नेहमी फक्त माणसातल्या चांगुलपणावर विश्वास ठेवावा. आल्फ्रेड हिचकॉकच्या एका चित्रपटात एक दृश्य होतं ज्यात एक मवाली एका पादचाऱ्याच्या खिशातल्या तुटपुंज्या पैशांसाठी त्याचा निर्घृण खून करतो, त्याच्या अंगावरल्या, खिशातल्या...
जेव्हा माझ्या खिडकीशी चंद्र सलगी करेल तुझ्या गोड आठवांनी आसमंतही भरेल रात्र उशाशी येऊन तुझे गुपीत सांगेल चित्त बेभान होईल मनामध्ये काहुरेल असे आतुरेल मन कड डोळ्यांची भिजेल चाचपडेन मी शेज भ्रम भोपळा फुटेल तुझी वाट मी पाहते मन माझं अलवार ध्यास तुला भेटण्याचा जीव होई हळुवार चल लावू ये मोगरा आपुल्या या अंगणात गंधाळल्या सोबतीचा गंध वाहू दे घरात

टाळीला थाळीची आस - भाग ४ (अंतिम)

Image
लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा - प्रकरण 1 आपण आपल्याच विश्वात इतके मश्गुल असतो की या दुनियेत आपल्यासारखीच दिसणारी पण फक्त नियतीनं वेगळा बेत आखला म्हणून संघर्षमय आणि नाईलाजास्तव सामान्य माणसापेक्षा वेगळं आयुष्य जगण्यास भाग असणारी अनेक माणसे आहेत याकडे आपले लक्षही नसते किंवा लक्ष असले तरी अंगाला मनाला काहीही लावून न घेता बिनदिक्कत झापडे पांघरून आपल्याला निघून जाता येतं. पण अशी झापडं सगळ्यांनाच लावता येत नाही अगदी त्यांनाही नाही ज्यांना स्वतःच मदतीची गरज असतांना.. आपलीच झोळी फाटली असतांना देखील ती उरलेली लख्तरं घेऊन इतर गरजुंच्या मदतीसाठी पुढे येतात. म्हणूनच राणीची कमाल वाटते, कामाचा अकाल पडलेल्या कोरोनाच्या काळात स्वतःचे पोट भरत नसताना, उपजीविकेचे माध्यम लॉकडाऊन होऊन बंद पडलेले असतांना दावणीला बांधून ठेवलेली तुटपुंजी सेविंग देखील काढून ती गरीबांमध्ये अन्नदान करत सुटते .... लॉक डाऊन सुरुवातीचा हा काळ होता, अचानक संकट ओढवल्याने अनेक माणसे हवालदिल झालीत. कुणाची नोकरी गेली, अनेकांचा छोटा मोठा व्यवसाय होता तो बंद पडला, रोजंदारीवर जाणाऱ्यांची मजुरी मिळणे बंद झाले, दोन वेळ खाण्याचेही वांद...

टाळीला थाळीची आस - भाग ३

Image
#लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा - प्रकरण 1 ४ जून २०१९ ची घटना, या घटनेने संपूर्ण नागपूरचा किन्नर समाज हादरला होता. किन्नर समाजात नावारूपाला येणाऱ्या .. शहरात बऱ्यापैकी ओळख निर्माण झालेल्या आणि भविष्यात समाजाची पुढारी म्हणून आशा असणाऱ्या चमचम गजभियेचा भरदुपारी प्राणघातक हल्ला करून खून करण्यात आला होता. तृतीय पंथियांचा त्यावेळचा सेनापती म्हणजे गुरु मानला जाणारा उत्तम बाबा तपन याने आपल्या साथीदारांसह विरोधी गटातील आणि किन्नरांची अपेक्षित उदयोन्मुख सेनापती तृतीयपंथी चमचम गजभियेची कळमनातील कामना नगरात तिच्या घरात घुसून हत्या केली होती. खरतर तृतीयपंथीयांमध्ये वर्चस्वासाठीचा आपापसातला संघर्ष हा काही नवीन विषय नाही. सर्वाधिकार असणारी गादी मिळवून नेतृत्व करण्याची इच्छा इथे अनेक जण बाळगून असतात.. त्यातून चालणारी गटबाजी, कुरघोड्या, राजकारण हे नेहमीचेच. आपल्यावर कोणी हावी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त किन्नर आपल्या गोटात राखून शक्तिप्रदर्शनाने नेतृत्व गाजवण्याचा प्रयत्न हे प्रस्थापित आणि इच्छुक पुढारी करीत राहतात. त्यातून परस्परांवर हल्ले, हाणामाऱ्या, एकमेकांना धमक्या देणे इत्यादी राजरोसपणे घडत राहतं. प...

टाळीला थाळीची आस - भाग 2

Image
#लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा - सगळ्या औपचारिकता पूर्ण झाल्या .. आणि राणी किंग ह्यांनी सध्या चालू असलेल्या लॉकडाऊन काळातल्या तृतीयपंथीयांच्या उपजीविकेच्या समस्यांवर बोट ठेवले. ह्यांच्या मागण्या आणि समस्या ह्याबद्दल उहापोह करण्याआधी जाणून घेऊया राणी किंग आहेत कोण ? जात-पात-धर्म, स्त्री-पुरुष समानता अश्या अनेक हक्कांसाठी लढतांना किंवा त्यावर उर भरून बोलतांना आपण केवढे संवेदनशील होत असतो. मात्र ह्याच धर्तीवर जगणारे, मानवाच्या गर्भातूनच जन्म घेतलेले आपल्यासारखे जीव केवळ लैंगिक भिन्नतेमुळे उपेक्षित राहतात आणि नंतर संपूर्ण आयुष्यच केवळ हक्काचं जिणं जगण्यासाठी म्हणून झटत राहतात,  हे किती अन्यायकारक आहे हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे अश्यातलेच .. एखादा अक्खा समाज पोटाची खळगी भरण्यासाठी पिढी दर पिढी वर्षानुवर्षे केवळ रुढिवादातून चालत आलेल्या तुमच्या आमच्या अंधश्रद्धेच्या जोखडावर पाय रोवून टाळी वाजवत नाचत धडपडत हे दळभद्री आयुष्य जगत राहतो आणि सभ्यतेचा, समानतेचा, पुढारीपणाचा आणि समाजसेवेचा मुखवटा चढवून फिरणाऱ्यांना त्याचे वैषम्य वाटू नये किंवा त्याच्या बदलासाठी फारसे ठळक प्रयत्न होऊ नये ...

टाळीला थाळीची आस - 1

Image
#लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा - हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे'' आपण फोन केल्यावर ही सुरेख रिंगटोन कानावर पडते. ती ऐकतानाच त्यांच्याबद्दलचा पूर्वाग्रह आपोआप गळाल्यासारखा वाटू लागतो स्क्रीनवर 'राणी किंग' नाव झळकत असते.. राणी किन्नर (राणी ढवळे) फोन उचलतात. 'हा बोलो दीदी' अश्या अत्यंत नम्र आवाजात आपली विचारणा होते . बातमीसाठी भेटायचंय सांगीतल्यावर दोघींच्याही सहमतीने सोयीने भेटीची वेळ आणि ठिकाण ठरते.. खरतर नाही म्हंटले तरी जरा दबकतच आपण वेळेत जाऊन पोचतो, दिलेल्या पत्त्यावर पण जरा बाहेरच रस्त्याच्या कडेला झाडाखाली उभे राहतो, थोडी वाट पाहावी लागते .. तेवढ्याच वेळात मनात बरेच विचार येऊन जातात. तृतीय पंथीयांना असे पाहिले बोललो असलो तरी स्वतः त्यांच्या राहत्या जागी जाऊन प्रत्यक्ष भेटून बोलायची ही आपली पहिलीच तर वेळ असते. १५-२० मिनिटांचा वेळ जातो आणि राणी किंग त्यांच्या इतर ४ साथीदारांसह गाडीत...

मन बेबंद .. !

घर .. आंगण .. बाजार .. कार्यालये .. शहर लॉकडाऊन .. ... शेजारी .. सहकारी .. गणगोत .. मित्र मंडळी ..होम क्वारंटाईन सगळं सामसूम .. कडेकोट बंदोबस्तात आता कोणी कोणाला भेटत नाही. भेटल्यावर हसण्यातून-डोळ्यातून दाटून आलेला आनंद आता दिसत नाही. विश्वासाचा स्पर्श म्हणून कोणी हातात हात घेत नाहीत. आधाराची थाप आणि कौतुकाची शाबासकीही देत नाहीत. डोक्यावर आशीर्वादाचा हात कोणी ठेवत नाही आणि मित्र मैत्रिणी भेटल्यावर कोणी आवेगपूर्ण मिठीही मारत नाहीत. परवा आठवला तो पावसानं सगळा संसार उधळून लावल्यावर कवी कुसुमाग्रजांना भेटायला आलेला तोच तो कोणी.., दारात दूर उभा राहिला एक शब्दही न बोलता कसे म्हणावे '‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला''  एकटेपणा आता सगळ्यांच्याच पदरी पडलेला नाही का. 'पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा' इतकेही शब्द फुटेनात.. पाठीवर हात मागायचा तरी कसा ? सोशल डीस्टंसिग पाळायला हवे. ''पत्र लिही पण नको पाठवू शाई मधूनी काजळ गहिरे लिपीरेशांच्या जाळीमधूनी नको पाठवू हसू लाजरे'' इंदिरा बाईंना कोणी सांगावं की येऊ द्यात निदान तेवढं तरी.. तेवढ्याने काही ल...

झूम जब तक धड़कनों में जान है ...

Image
याद रख जीवन के पल हैं चार... सीख ले हर पल में जीना यार.. मरने से पहले जीना सीख ले !! कोणीतरी येऊन आपल्या कानाखाली बंदूक लावावी आणि सांगावे मरण जवळ येतंय, दिवस निघत जातायत, 'स्व'च्या पलीकडले जगणे काय असते शिक. आणि जगून घे मनासारखं एकदातरी. असच काहीतरी होतंय ना ... कोरोना नावाच्या बंदुकीच्या टोकावर आहोत आपण सगळे, कुणाची गोळी पहिले चालणार हाच काय तो प्रश्न.. या काळात अनेकांचे अवसान गळून पडले असतील. मुखवटे उतरले असतील. झगमगाटीपेक्षा, दिखाव्यापेक्षा जगण्यामरण्याचा प्रश्न महत्वाचा वाटायला लागावा असा काळ उगवून पुढ्यात येऊन ठाकला आहे. आता जमापुंजी साठवत बसण्यापेक्षा गरजवंतांसाठी पुढे येणारे हात दिसतायेत. एरवी स्पर्धेच्या चढाओढीत पायात पाय अडकवणारे पोटावर पाय देऊन पुढे जाणारेही एकमेकांना हात देऊन स्थिर करण्याचा प्रयत्न करताहेत. माणूस मरणाच्या रेषेवर उभा असतांना आणि मदतीचा पुढे आलेला हात धरतांना हा हात कुठल्या प्रांतातला, कोणत्या जातीचा-धर्माचा, नात्यातला की अनोळखी, पापी की पुण्यवान या सर्वांचा कितीसा विचार करत असेल…?? संकटाच्या काळी मदतीला आलेला कुठलाही हात हा 'देवस्वरूप...

क्वारंटाईन ..

शेवटी भांडून निघालो तेव्हा  अडकून पडणार आहोत आपण  एकमेकांपासून दूर .. आपापल्या घरात  क्वारंटाईन होऊन .. कुठे माहिती होते तुला मला    नकोच तू मला म्हणतांना  तोंडच बघायचे नाही ठरवतांना  जीव तटतटून आठवण येईल  पण नाहीच बघायला मिळणार एकमेकांना ..  कुठे माहिती होते तुला मला  हातातले हात सोडले तेव्हा  रागानेच विलागलो तेव्हा  एकमेकांच्या स्पर्शालाही पारखे होऊ  आठवणींशी झटत राहू ..  हा अंदाजही कुठे बांधता आला तुला मला  स्वप्नातले इमले होते इवले इवले  एकमेकांच्या सोबतीने पाहिलेले  तुझ्या डोळ्यात माझे माझ्या डोळ्यात तुझे  अवकाश होते झुकलेले ..  सोबतीचे अवकाशच असे दुरावेल    कुठे माहिती होते तुला मला  एकमेकांपर्यंत पोचायचे सगळे रस्ते बंद आहेत आता  एकमेकांजवळ घेऊन जाणाऱ्या पायांना टाळे  .. निरोपाचे रस्ते सुद्धा अदृश्य झाले तर ? ... आणि  शेवटचा श्वास घ्यावाच लागला तर  सांग कसे कळेल तुला मला ?...
कुणीतरी हाक घालतं  मनाच्या बांधावरच हात घालतं बंद असलेली दारे उघडी होऊ बघतात आणि भीती दाटून येते कधीतरी दुखऱ्या अनुभवांचे संचित मनात कोंडून आपणच दारं गच्च बंद करून टाळे लावून घेतलेले असतात आत बाहेरचे सर्व रस्ते बंद करून टाकले असतात अंतर आखले अंतर राखले असतात .. मान्य - अंतरं जवळीक साधत नाहीत पण अंतरं मन मोडतही नाहीत मनांचा मनाशी संवाद घडत राहायला हरकत नाही एकवेळ .. पण मनाचा बांध मोडून सोडून जाणाऱ्यांना मनाच्या टाळ्याची चावी मात्र देऊ नये ..     

हिरवे भान -

(वृत्त - महाराष्ट्र वृत्त) बकुळीखाली निजून आहे उन्हकेशरी हिरवे भान मुग्धफुलांची पखरण होता थरथर झाले सारे रान पहाटसमयी किलबिल झाली वनी पसरले गीत अजाण दवांत न्हाले उन्ह कोवळे बहकत गेले सारे रान फांद्यांवरती हिंदोळ्यावर फुले डोलली पानोपान अंगांगावर रंग उधळले बहरून आले सारे रान श्वासाश्वासा मधे पेरला गंधगारवा पाऊस छान माती भिजली अत्तर झाली मृद्गंधीले सारे रान थोडी सळसळ थोडी हळहळ नदीकाठच्या वाटेवरती पानगळीच्या ऋतुत कातर अधीर झाले सारे रान ... ©रश्मी

मै तुम्हे फिर मिलूंगी..

Image
खरं सांगू का अमृता तू म्हणजे देहभानापलीकडच्या जगात घेऊन जाणारी एक अवर्णनीय जादू..ती जादू आम्ही सगळ्यांनी कधीतरी अनुभवली आहे किंवा ऐकीव तरी आहे, किंवा पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळावी म्हणून लालसेने किंवा कधीच न अनुभवल्याने एकदा तरी अनुभवायला मिळावी या अपेक्षेने.. जगण्याच्या मूलभूत गरजांच्या पलीकडे, जिथं थांबतात, विसावतात आणि उसळतात आयुष्याचे काही क्षण अश्या आनंदाच्या अनुभूतीच्या ओढीने सतत तुझ्याकडे ओढले जात असतो. जगण्याचा खूप गुंता होत राहतो अधून मधून. आणि मग त्यापुढला बराच काळ गुंता सोडवण्यात निघून जातो. मनात हे असं काही काहूर माजतं कि, प्रापंचिक आन्हिकं, जबाबदाऱ्या निभावताना वेदना सहन करणाऱ्या भौतिक शरीराची कात भिरकावून द्यावीशी वाटते, कधीकधी तर बाईपण बोजड वाटायला लागतं..वाटतं परंपरेतून, संस्कृतीतून, प्रपंचातून, साचेबद्ध जगण्यातून या रोजरोजच्या धावधावपळीतून एवढंच काय या शरीरातूनही बाहेर पडावं; मोकळं व्हावं आणि दूर दूर जाऊन बघत राहावा आपणच घालून ठेवलेला घाट... जमलंच तर मोडून पाडावा, बंद करून घ्यावे परतीचे सगळे रस्ते.. हा आंतरिक मनाचा कल्लोळ शांतावताना का कुणास ठाऊक तू आठवत राह...