Tuesday 27 September 2016

स्मिताच्या स्मृतीने दरवळणारा पुरस्कार

उत्कृष्ट अभिनयाचं कौशल्य हे नुसतेच सुंदर दिसण्यावर कसे भारी पडू शकते ह्याचे सर्वात जिवंत उदाहरण कायम केले ते स्मिता पाटील हिने. हिरोईन व्हायचं असेल तर गोरं चामडं आणि रूपवती असलंच पाहिजे हे भारतीय चित्रपटांचं शतकात चोख बसलेलं सूत्रच बदलवून टाकणारी मराठी व हिंदी दोन्‍ही चित्रपटसृष्‍टीवर दोन दशके अधिराज्‍य गाजवणारी हि गुणी लाडकी अभिनेत्री स्मिता पाटील.
 या अभिनेत्रीने हिंदी- मराठी रसिकांना रडवले, हासवले, विचार करायला भाग पाडले. स्मिता पाटील यांना जाऊन आज 30 वर्षांचा कालावधी लोटला. परंतु, चित्रपटसृष्‍टीतील सर्वोत्‍तम अभिनेत्री कोण असा प्रश्‍न उपस्‍ि‍थत झाल्‍यास आजही स्मिता पाटील यांचे नाव अग्रगण्य ठरते. तिच्या नंतरही कित्तेक हिरोईन आल्या अन गेल्या पण भारतीय कलाविश्वावर छाप पाडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ठसा उमटवलेली स्मिता कधीच सिनेरसिकांच्या विस्मरणात जाऊ शकली नाही.

दिवंगत प्रतिभावंत अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या स्मिता पाटीलची आत्ता इतकी ठळक आठवण येण्याचे कारण म्हणजे हल्लीच बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिला 'स्मिता पाटील स्मृती' पुरस्कार सोहळ्याने सन्मानित करण्यात आले. तिला या पुरस्काराची घोषणा झाल्यापासूनच नेटिझन्स सोशल नेटवर्किंग साईटवरून तिला ट्रॉल करीत तिची खिल्ली उडवत आहेत. आपल्या मनात असणाऱ्या स्मिता पाटीलची अजरामर छबी कतरिनाच्या रूपात पाहणे रसिकांना मान्यच नसल्याचे यावरून लक्षात आले.

पण हे सगळे कतरिनाच्याच वेळी का घडावे हा प्रश्नही उभा राहतो. यापूर्वी हा पुरस्कार तन्वी आझमी, श्रीदेवी, मनीषा कोयराला, उर्मिला मातोंडकर, तब्बू, विद्या बालन, ऐश्वर्या राय बच्चन, करिना कपूर खान, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पण कतरिनाला या पुरस्काराने सन्मानित करण्याच्या निर्णयावर मात्र वादंग सुरु झाले. कतरिनाला बॉलिवूड इंडस्ट्रीत येऊन तब्बल दहा वर्ष झालीत. सध्य स्थितीत आघाडीची अभिनेत्री असूनही कतरिनाचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही छाप सोडू शकले नाही. गेल्या दहा वर्षात चित्रपट सृष्टीला तिने दिलेले योगदान कलेच्या अनुषंगाने पाहिल्यास फार वाखाणण्यासारखे जरी नसले तरी, तीने वारसाहक्काने इथे प्रवेश केला नव्हता. डोक्यावर हात धरणारा कुणी नसतांनाही इथे टिकण्यासाठी, तग धरून धैर्याने पाय रोवत स्वतःला सिद्ध करत राहणे यासाठी तिने घेतलेले कष्ट नाकारता येणार नाही. यापुढेही ती काम करणार आहे तेव्हा तिच्याकडून चांगल्या चित्रपटांची अपेक्षाही इथे संपत नाही.


समांतर चित्रपटातील अभिनयातून रसिकांच्या मनामनात अधिराज्य गाजवणाऱ्या स्मिताचे 'मंथन' 'अर्थ' 'भूमिका' 'आक्रोश' तसेच मराठीतले 'उंबरठा'  'जैत रे जैत' सारखे चित्रपट सिने इतिहासात अजरामर ठरले.ज्या चित्रपटांनी समांतर आणि मनोरंजनाचा योग्य समतोल साधला. तिने स्‍त्रीप्रधान भूमिका करून वेगवेगळ्या विषयांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले. व्यावसायिक चित्रपट तिची प्राथमिकता कधीच होऊ शकले नाही. दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्रीला भारतीय सिनेमातील अमूल्य योगदानासाठी पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले. तिच्या याच सामाजिक बांधिलकीचे आणि भारतीय चित्रपटांना दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी सन्मान म्हणून 'स्मिता पाटील स्मृती पुरस्कार' प्रियदर्शनी अकॅडमीतर्फे देण्यात येतो.

अभिनयासोबतच सामाजिकतेचे भान जपणा-या स्मिता पाटील यांचा आदर्श आजच्या काळातल्या प्रत्‍येक अभिनेत्रीने जपावा. कतरिना सारख्या महेनती कलाकाराने तसेच आजतागायत या पुरस्काराने सन्मानित इतर अभिनेत्रींनीं देखील स्मिता पाटीलचा हा वारसा पुढे चालवावा. पुरस्कार घेतांना ती तंतोतंत तशीच छबी असावी, तसेच योगदान दिलेले असावे, तीच प्रतिष्ठा प्राप्त असावी असा त्याचा अर्थ होत नाही. तर योगदानाबरोबरच भविष्यात तशी जाणीव निर्माण व्हावी, तसा आदर्श घडवणारा प्रयत्न केला जावा, त्यासाठी प्रोत्साहन मिळावे ह्याच हेतूने हा पुरस्कार देण्यात येतो. कतरिनाला ह्यासाठी हा पुरस्कार मिळालाय असे गृहीत धरले तर आता वाटतेय तसे आश्चर्य वाटणार नाही. आणि  'स्मिता पाटील स्मृती' पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण सर्व तिचे अभिनंदनच करू. 




 

हाक - बलुचिस्थानची

 लुचिस्थान मधील विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष करीमा बलोच हिने नुकतंच एका विडिओद्वारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भावुक करणारा संदेश पाठविला होता. सोशल मीडियावरून हा व्हिडीओ संदेश मोदींपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करीमाने केला त्यात तिने म्हंटले होते कि, 'बलुचिस्थान मधल्या महिला तुम्हाला भाऊ मानतात, पाकिस्तानच्या चांगुल मधून स्वतंत्र करण्यास आपण पुढे येऊन आमची मदत करावी.' मोदींना भाऊ संबोधून बलूचमध्ये सध्या सुरु असलेल्या नरसंहार, अपराधीक घटना, अत्याचार विरुद्ध त्यांच्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावर मदतीची मागणी करावी. त्यांच्या पाठी उभे राहावे असे आवाहन तिने केले होते. नरेंद्र मोदी दर महिन्याला देत असणारा संदेश 'मन कि बात' चे प्रसारण आता बलुचिस्तानात बलूच भाषेतही होणार यासाठी केंद्र सरकारने आता परवानगीही दिली आहे. 

भारताने पाकिस्तानसाठी नीतीत अचानक काही बदल घडवून आणले आणि पाकिस्तानात खळबळ माजली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांनी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी त्यांच्या भाषणातून पाकिस्तानमधील अधिकृत काश्मीर आणि बलुचिस्थान मधील नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी आवाज उठवला आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी समर्थन असल्याचे बोलून दाखवले आणि बलुचिस्थान मधील नागरिकांमध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. वेगवेगळ्या संस्था संघटनांमधून मोदींना मदतीसाठी आव्हान करण्यात येत आहे. मात्र त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांचे अत्याचार अधिकच तीव्र झाल्याच्या झळा उठू लागल्या. बलूच रिपब्लिकन पार्टीचे नेते अब्दुल नवाज बुगती यांच्यानुसार पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानच्या लोकांवरील अत्याचारात वाढ केली आहे. पाक लष्कराद्वारे नव्याने सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात महिला आणि मुलांचा समावेश असल्याचे बुगती यांनी सांगितले. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी बलुचिस्तानच्या बोलन क्षेत्रातून 40 पेक्षा अधिक महिला आणि मुलांचे अपहरण केले आहे. पाकिस्तान बलुचिस्तानात सातत्याने आपले अत्याचार वाढवत आहे. बलुचिस्तानात मानवाधिकार उल्लंघनाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. पाककडून तेथे ‘मारा आणि फेका’ धोरण अवलंबिले जात असल्याचा दावा बलूच कार्यकर्त्या फरजाना मजीद बलूच यांनी केला.

पाकिस्तानासारख्या देशात रुढीपरंपरावादी लोकांमुळे महिलांची परिस्थिती फारच वाईट आहे. मानवाधिकार आंदोलनाच्या कार्यकर्त्या फर्जाना मजीद बलूच हिनेतर सध्या बलुचिस्तानमध्ये महिलांवर केले जाणारे अत्याचार, नरसंहार आणि मानवाधिकार उल्लंघनाची तुलना 1971 साली झालेल्या बांग्लादेशच्या स्वातंत्र्य संग्रामसोबत केली. पाकिस्तानी सैनिकांद्वारा बलूच महिलांना लक्ष्य करून सूड उगवणे हे 1971 मध्ये महिलांवर होणारे अत्याचार आणि बलात्काराएवढे पाशवी असल्याचे त्या बोलल्या. बलूच मधून विद्यार्थी नेते जाकीर माजिदच्या बहिणीने मजीद बलुचने डूरा बुगतीच्या वेगवेगळ्या भागातून महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर पाशवी अत्याचार होत असल्याचा गौप्य स्फोट केला. राजकीय दृष्ट्या पुढाकार घेऊ इच्छिणाऱ्या किंवा स्वान्त्र्यासाठी आवाज उठविणाऱ्याव महिलांचे वर्चस्व संपुष्ठात आणण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने येथे अभियानाचा राबवले असल्याची माहिती अब्दुल नवाज बुगती यांनी दिली.

14 ऑगस्ट या पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी कला दिवस मनावणाऱ्या बलूच लोकांनी 15 ऑगस्ट हा भारतीय स्वतंत्रता दिवस अतिशय हर्षोल्लासात साजरा केला होता. बानूक झरीना बलूच या बलुची महिलेने 15 ऑगस्टला एका छोट्या मुलाचा हात ज्यावर भारतीय झेंडा रंगवला होता आणि त्यात आई लव्ह इंडिया असे लिहिलेला फोटो सोशल मीडियावर टाकला होता म्हणजेच लहानमुलांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच मोदींकडून अपेक्षा असल्याचे त्यातून संदेश देण्याचा हा प्रयत्न होता.



  • बलुचिस्थान मधील उइगर नेता डोल्कुन ईसा हिला भारताने हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे राहणाऱ्या तिब्बतींचे  सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा ह्यांना भेटण्यासाठी वीजा मान्य केला आणि पाकिस्तानसकट चीनमध्ये सुद्धा भारतविरोधी सूर उमटू लागले. डॉकुन इसा हि चीन मध्ये आतंकवादी प्रमुख म्हणून प्रतिबंधित आहे. याआधीही भारताने बलूच नेता नीला कादरीला व्हिजा दिला होता तेव्हा त्यावर पाकिस्तानातही असाच विरोधाचा स्वर उमटला होता. 


  • बलुचिस्थान पाकिस्तानच्या चार प्रांतांपैकी एक आहे. ते पाकिस्तानचे सर्वात मोठे राज्य आहे. पाकिस्तानचे जवळ जवळ 44% क्षेत्रफळ बलुचिस्तानने वेढले आहे. येथील लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 7% म्हणजेच जवळ जवळ 1.3 करोड एवढी आहे. इथे राहणाऱ्या नागरिकांना बलूच नागरिक असे संबोधिले जाते. या प्रदेशाला 'ब्लैक पर्ल' किंवा 'काला मोती' देखील म्हणतात. तेल, गॅस, सोने, तांबे अश्या नैसर्गिक संपत्तीने हा प्रदेश संपन्न आहे.




Monday 19 September 2016

वैनगंगा ..

भंडाऱ्या जिल्ह्यातील लाखनी वरून परतीच्या रस्त्यावर, धावत्या गाडीतून सूर्यास्ताच्यावेळी घेतलेले हे वैनगंगा नदीचे  चित्र 







Tuesday 13 September 2016

माजघरातले रुदन ..

अतिशय कर्तृत्ववान, हुशार, देखणी असलेली स्वकर्तृत्वाच्या जोरावर प्रतिष्ठा मिळवून सांस्कृतिक क्षेत्राची लाडकी झालेली. करिअरच्या उत्तुंग शिखरावर असतांना आयुष्यात घेतलेल्या एका चुकीच्या वळणाने आयुष्यच श्राप बनून बसलेली डॉली. गुणी निवेदिका म्हणून नागपूरकरांच्या घराघरात पोहचलेला एक सुंदर चेहरा तिच्या चाहत्यांच्या आणि एकंदरीतच समाजासमोर मोठा प्रश्नचिन्ह सोडून आज ब्रेनडेड होऊन निपचित पडलेली आहे. तिची हि करून कहाणी. 
 ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून संपूर्ण आयुष्यच समर्पित केले अश्या माणसाने फसवणूक केली. सात महिन्याआधी सप्तपदी चालून ज्याच्या उंबरठ्या आत पाऊल ठेवले त्या नवऱ्यानेच दगा दिला. पैशांसाठी, हुंड्यासाठी पिळवणूक केली. शारीरिक मानसिक अत्याचार केले. म्हणून वाढदिवसालाच फाशी लावून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या डॉलीला तिच्या माहेरच्या माणसांनी ताबडतोब उपचारार्थ भरती केले परंतु तोपर्यंत डॉली कोमात गेली होती आणि आता नागपूरच्याच कुठल्याश्या रुग्णालयात अति दक्षता विभागात मरणासन्न अवस्थेत मृत्यूशी झुंझ देते आहे.  हल्लीच दिल्लीत आप या राजकीय पार्टीचे मोठे नाव असलेला नेता सोमनाथ भारतीच्या पत्नीने लिपिका मित्राने नवर्याकरवी  आपल्यावर घरगुती हिंसा होत असल्याची तक्रार पोलिसात टाकली होती. त्याआधी अनेकवर्ष तिने हा अत्याचार सहन केला होता. दोनेक वर्षाआधी अशीच गाजलेली घटना 70 कोटीचे चित्रपट नावावर असणाऱ्या बंगरुळुच्या सिनेइंडस्ट्रीचा लोकप्रिय अभिनेता दर्शन विरुद्ध त्याच्या पत्नीने 'घरगुती हिंसाचाराची' तक्रार केली. 8 वर्ष प्रचंड मारहाण आणि अत्याचार सहन केला पण जेव्हा तिच्या मुलाच्या जीवावरही तो उठला तेव्हा सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि तिला पुढे यावे लागले होते. सुशिक्षित सुसंस्कृत संपन्न समजल्या जाणाऱ्या घरातली हि व्यथा असेल तर निरक्षर गरीब कुटुंबाचे काय?

स्त्री सहनशील आहेच. मानसिक रीतीने सबळ देखील असते. कुठल्याही परिस्थितीत तग धरून उभे राहून आपल्या माणसांना धीर देण्याचे कामही ती करू शकते मात्र जेव्हा अन्याय अत्याचार आपल्याच माणसांकडून होतो तेव्हा मात्र ती खचते. कोसळते. आपलीच माणसे आपले वैरी का होतात ?? हा मात्र आजतागायत कधीही न सुटलेला प्रश्न आहे.

अनादी काळापासून शोषण सहन करणारी 'कन्यादान' 'सती जाणे' 'देवदासी' 'बालविवाह' सारख्या प्रथांना मागे टाकून आकाशाला गवसणी घालायचा प्रयत्न करणारी स्त्री, आजही स्त्रीभ्रूण हत्या, बलात्कार, हुंडाबळी अश्या अनेक बड्या समस्यांना तोंड देत असतांनाच कौटुंबिक हिंसाचारासारख्या दुर्लक्षित समस्येला ती रोज तोंड देते आहे. यात, शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक, शाब्दिक किंवा कुठल्याही प्रकारची मानहानी म्हणजे हिंसा तिच्या वाट्याला येते. गाव पातळीवरील महिला, शहरी, नोकरीपेशा, सुशिक्षित, श्रीमंत गरीब, स्वतः कमावती असणारी काय किंवा घरातील चौकटीपलीकडे स्वतःची प्रतिष्ठा असणारी काय. चार भिंतीआत मात्र अनेकदा अश्या अत्याचारांना तोंड देत असते. बऱ्याचदा भावनिक हिंसाचार हा गृहितच धरला जात नाही. त्याची तीव्रता आणि व्याप्तीही मोजता येत नाही. कारण ती व्यक्तिगणिक बदलू शकते. कुटुंबांमधला भावनिक हिंसाचार हा अधिक धारदार आणि माणसांचा कडेलोट करणारा असू शकतो. शारीरिक हिंसाचार हा बऱ्याचदा या भावनिक हिंसाचाराचंच प्रकट रूप असतं. स्त्रियां कडे बघण्याचा समाजाचा आणि काही विकृत पुरुष मनोवृत्तींना आळा घालण्या साठी लहानपणा पासून शालेय शिक्षणा बरोबरच सभ्यतेनी कसं वागावं याचं रितसर शिक्षण-धडे मुलांना देणे प्रचंड गरजेचं आहे. महिला दिना निमित्त फक्त एक दिवस ही सगळी चर्चा करून पुन्हा उरलेले दिवस समाजाच्या अन्यायापुढे गुडघे टेकणे, बचावात्मक पवित्रा घेणे जेंव्हा बन्द होईल तेंव्हा स्त्री ने स्त्रीमुक्तीच्या दृष्टीने एक पाउल पुढे टाकले असे म्हणायला हरकत नाही.

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करतांना आपण विकासाच्या बड्या बाता मारतांना आजही स्त्रीमुक्तीच्या आंदोलनांना सामोरे जावे लागत असतांना, तिच्या प्राथमिक गरजाच पूर्ण होतं नसतांना तिच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतांना तिच्या शरीराला खुसपटसामान भोगवस्तू मानली जाऊन जागोजागी तिचे लचके तोडले जात असतांना. आम्ही भारत विश्वप्रमुख बनण्याचे स्वप्न पाहतो हा खरतर वैश्विक विनोदच नाहीये का?




 2005 च्या राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणात असे लक्षात आले कि 15 ते 49 वयोगटातल्या 81 % स्त्रियांना शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक छळांना सामोरे जावं लागतं. पॉप्युलेशन कौन्सिल ऑफ इंडिया (दिल्ली) या संस्थेच्या  सर्वेक्षणात ८,०५२ विवाहित पुरुष आणि ९३,९१२ विवाहित स्त्रिया (१८ ते २९ वयोगट) यांच्या अभ्यासातून निष्कर्षांला आलंय की आपल्या प्रागतिक सुधारक महाराष्ट्रात 23 टक्के स्त्रियांना नवऱ्याद्वारा लैंगिक हिंसाचाराला सामोरं जावं लागतं. त्यामध्ये १४ टक्के अत्याचार लग्नाच्या पहिल्या वर्षांत होतात. अपमानास्पद बोलणे किंवा थप्पड खाणे 97 % स्त्रियांसोबत होते. लाथा, बुक्क्या, पट्ट्याने मार खाणे, सिगरेटचे चटके, घराबाहेर हाकलून लावणे हे प्रकार सर्रास घडतांना दिसतात. २००५ साली कौटुंबिक हिंसेपासून स्त्रियांचे रक्षण करणारा कायदा अस्तित्त्वात आला.
४९८ कलमामुळे गुन्हेगाराला शिक्षा मिळते.  हा दिवाणी कायदा असल्याने पोलिसांचा हस्तक्षेप नसतो. पुन्हा फक्त स्त्रीच नव्हे तर तिचे नातेवाईक, शेजारी, मित्र, हितचिंतक अर्ज करू शकतात. त्याकरता वकिलांची गरज नसते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनाने नेमलेल्या संरक्षण अधिकारी, नोंदणीकृत सेवाभावी संस्था, मॅजिस्ट्रेट किंवा पोलिस अधिकारी यापैकी कुणाकडेही ही स्त्री तक्रार नोंदवू शकते. पण शोकांतिका म्हणजे आज 11 वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी समाधानकारक होऊ शकत नाहीये. 




('सकाळ' नागपूर आवृत्तीच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित.  http://epaper4.esakal.com/14Sep2016/Enlarge/Nagpur/NagpurToday/page9.htm)

स्क्रिझोफ्रेनिया





आपल्या अवतीभवती अनेक प्रकारची माणसे आपण रोज पाहत असतो. जितकी माणसे, तितकेच निरनिराळे स्वभाव. "जितक्‍या व्यक्ती तितक्‍या प्रवृत्ती', अशी म्हणच आहे. या सगळ्यात आपण सामावून गेलो असतो. त्या सगळ्यांना स्वीकारले असते. स्वतःलाही त्यांच्यात सामावून घेतले असते. पण, कधीतरी विचित्र वागणारी माणसे दिसतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात समन्वय नसतो. सामान्यांपेक्षा काहीतरी वेगळ्याच हालचाली ते करीत असतात. असंबंध बडबडत असतात. त्यांना आपण विक्षिप्त किंवा पागल ठरवून मोकळे होतो. पण, त्यांना असे का झाले असावे, त्यामागची कारणे काय, त्यावर उपाययोजना काय, याचा विचारही आपण करत नाही. अनेकदा अशी लोक स्क्रिझोफ्रेनियाचे रोगी असू शकतात.

काय आहे हे स्क्रिझोफ्रेनिया प्रकरण?
स्क्रिझोफ्रेनिया हा रुग्णाच्या विचार, भावना व वर्तणुकीवर परिणाम करणारा मानसिक आजार आहे.
हा विकार दीर्घ काळ चालणारा, गंभीर व मानसिक संतुलन बिघडविणारा आजार आहे. या आजारात रुग्ण जीवनातल्या वास्तविकतेपासून दूर होत जातो. त्याला वास्तविकता व भ्रम यात फरक समजून येत नाही. बऱ्याचदा तो काल्पनिक जीवनात रममाण होतो आणि तसेच वर्तन करतो. त्यामुळे त्याच्या एकंदरीतच वागण्यात विक्षिप्तपणा येत जातो.

स्क्रिझोफ्रेनिया होण्याची निश्‍चित कारणे अजूनही शोधता आली नाहीत. तरीही आनुवंशिकता, मुळात विस्कळीत व्यक्तिमत्त्व असणारी, वास्तविक जीवनापासून दूर राहून पुस्तके, चित्रपट यात रमून स्वतःचे वेगळे विश्‍व निर्माण करणारे, सतत मानसिक दडपणाखाली जगणारे, बाळंतपण किंवा एखाद्या गंभीर आजारातून-अपघातातून होणारे शारीरिक-मानसिक बदल, अशी कारणे यासाठी सांगितली जातात. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही मानसिक आजार होतात. पण, स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त दिसून येते.

स्क्रिझोफ्रेनियाची लक्षणे म्हणजे, खूप एकापाठोपाठ एक दिवास्वप्न पाहणे, तोंडातल्या तोंडात पुटपुटणे/बडबड करणे, कारण नसताना हसणे व रडणे, लहान मुलांप्रमाणे वर्तणूक करणे, काहीतरी विचित्र क्रिया करणे, नकारार्थी भूमिका घेणे, पुन:पुन्हा तेच शब्द उच्चारणे, अंगस्थिती विचित्र ठेवणे, विक्षिप्त हावभाव करणे, इच्छाशक्ती कमी, उद्देश, ध्येय नसते, रोजचे दैनंदिन कामदेखील करण्याची इच्छा नसते. घरातील नातलग किंवा मित्रमैत्रिणी यांच्यात बोलायला आवडत नाही. निर्णय घेता येत नाही. भावना बोथट झालेल्या असतात. काहींच्या मध्ये त्या अतिशय उथळ असतात. इतक्‍या की त्या व्यक्ती भावनावेग आवरू शकत नाहीत. सहानुभूती, प्रेम, जिव्हाळा काहीही नसतो. उदा. रडण्याची परिस्थिती असेल तर तिथे ते खूप हसावयास लागतात. बऱ्याच वेळा बऱ्याच रुग्णामध्ये अगदी विविध भावनात्मक जाणिवा निर्माण होतात.

असा रुग्ण आढळल्यास त्याच्या वागणुकीने वैतागून न जाता त्याला मानसिक तज्ज्ञांकडे नेऊन योग्य उपचाराची गरज आहे हे ओळखले पाहिजे. त्याला सहृदयची वागणूक दिली पाहिजे. प्राथमिक स्वरूपातील आजार लवकर बरा होण्याचे चान्सेस असतात. अन्यथा मानसिक रोग बरे होण्यास बराच काळ लागतो तितके दिवस धीर धरून उपचार सुरू ठेवणे गरजेचे असते.


सुंदर दिसण्याचा रामबाण उपाय

"डॉ .हिला चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काहीतरी द्या ना"
त्या तरूणीची आई सांगत होती.
"ग्लो येण्यासाठी म्हणजे ?" माझा प्रतिप्रश्न
"चेहरा उजळण्यासाठी !...चेहरा कसा ना, असा चमकला पाहिजे."
"मग कानाजवळ दोन छोटे छोटे एल ई डी  बल्ब लावा की, सेलवरचे ! चेहरा आपोआप उजळेल."
"डॉक्टर , तुम्ही चेष्टा करताय हं !"
"नाही, मी सीरियसली बोलतोय, चेहरा उजळण्यासाठी हा सर्वात चांगला उपाय आहे "
"तसं नाही हो .....सध्या तिला बघायला रोज पाहुणे येताहेत. तेव्हा चेहरा चांगला दिसायला पाहिजे ना ; पाहा ना, चेहरा कसा निस्तेज दिसतोय.  एखादी क्रीम ,एखादा साबण असलं काहीतरी मिळालं तर बरं होईल. चेहऱ्यावर जरा  तेज यायला पाहिजे "
डॉक्टर हसले
"का हसलात?" तिनं विचारलं.
"तू आधी काय वापरत होतीस?".
"फेअर अँड लव्हली ,फेअरएवर ,फेअरग्लो अशा बऱ्याच क्रीम लाऊन झाल्या ; पण फरक कशाचाच नाही !पाच वर्षांपासून हे नाही ते किंवा ते नाहीतर हे लावत असते पण थोडा तरी फरक पडावा ?काडीचाही फरक नाही." ती. 

"बरोबर आहे फरक पडणारच नाही. चेहरा आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी याचा उपयोगच नाही.
त्यासाठी  माणसाजवळ आत्मविश्वास असला पाहिजे.
चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं.
मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.
मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो.
मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो.
मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात
तुमचा चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो.जसे तुमचे विचार तसा तुमचा चेहरा."
"आता काय बोलावं ?"
"पाहा ना !इथं आल्यापासून तुमची मुलगी अजून एकही शब्द बोललेली नाही.सगळं तुम्हीच बोलताय !
माणसानं घडघड बोललं पाहिजे ,
खळखळून हसलं पाहिजे,
दिलखुलास विनोद केले पाहिजेत ,
मनसोक्त रडलं पाहिजे
!थोडक्यात स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवलं पाहिजे.
त्यासाठी वाचन पाहिजे ,चिंतन पाहिजे ,खेळ पाहिजे.हे सगळं जवळ असेल तरच चेहरा सुंदर !...
..आजपासून हे सुरू कर आणि मग बघ कसा फरक पडतो ते !.......
लोक धबधबाच बघायला का जातात ? लोकांना पाण्याचं  साठलेलं डबकं का आवडत नसावं  ? माणसाचंही धबधब्याप्रमाणेच आहे ! चैतन्यमय व्यक्तिमत्व सगळ्यांनाच आवडतं !.....आणि असं व्यक्तिमत्व म्हणजेच तेजस्वी चेहरा !
व्यक्तिमत्व खुलवा चेहरा , आपोआप तेजस्वी होईल. जे लोक आरशाचा कमीत कमी उपयोग करतात तेच लोक जास्त सुंदर असतात !"

किती खरं बोललेत ना डॉक्टर. चलातर व्यक्तिमत्व खुलवूया, सुंदर दिसूया. 

(व्हाट्सअप वर वाचलेला एक आवडलेला लेख )

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...