प्रगल्भ जाणिवांचा अविष्कारी संग्रह 'उन्हात घर माझे'
नितीन भट यांना मी प्रत्यक्ष व्यासपिठावरून ऐकलंय. त्यांच्या गझलांतील आशय अर्थात गझलियत, त्यातील अंतर्भाव आणि त्यांचे आकर्षक सादरीकरण सगळंच प्रगल्भ जाणिवांतून अवगत झालेले असल्याचे लक्षात आल्यावाचून राहत नाही. एकाच माध्यमांचे प्रवासी असल्याने पुढे वाढत गेलेल्या ओळखीतून त्यांचे संवेदनशील असलेले माणुसपण देखील पुढ्यात येत राहीले. अश्या जाणून असलेल्या कवीमित्राचा अत्यंत देखणा आणि वाचनीय असा 'उन्हात घर माझे' नावाचा गझल-कविता संग्रह हातात आला तेव्हा आनंद होणं सहाजीकच होतं. पुस्तकाचे ओढ लावणारे आकर्षक शिर्षक, साधेच पण देखणे मुखपृष्ठ, त्यावर लिहिलेली कोरीव सुंदर शब्दरचना आणि कवीची आत्ममग्न छबी. बघताक्षणीच एक सुंदर वाचनमेजवानी आपल्याला मिळणार आहे हे लक्षात आले. हातात आॅलरेडी दोन पुस्तकं वाचायची असल्याने 'उन्हात घर माझे' वाचायला जरा उशीर झाला पण वाचायला हातात घेतला तेव्हा अधाशासारखे एका बैठकीत वाचून काढला. त्यानंतर आजारपण आल्यानं लिहायचं मात्र राहीलंच, पण हा संग्रह स्वस्थ बसू देत नव्हता यावर लिहायचंय ही अस्वस्थता सतत छळत राहीली. पुस्तकातल्या लक्ष वेधून घेणाऱ्या बाबी म्हणजे पुस्तक...