Monday 26 January 2015

महिला अपमानाची "पाळी"



योगायोगानेच वाचनात आलेला निरेन आपटे यांचा अप्रतिम लेख



++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++


महिला अपमानाची "पाळी"

-निरेन आपटे.


एक अतिशय गरीब कुटुंब होतं. घरात खायला दाणा शिल्लक नव्हता. जेव्हा घरावर संकट येतं तेव्हा पहिला फटका घरातल्या स्त्रीला बसतो. चिलापिलाना पोटभर खाता याव म्हणून ती उपाशी राहते. नवर्याला कपडे मिळावेत म्हणून स्वतः एका साडीवर अनेक महिने ढकलते. आणि कधी bulb चे सुट्टे भाग जोडण्याच काम मिळवून दिवसाला ५० रुपये कमावते, कधी भाजी विकते तर कधी जे पडेल ते काम करते. जेव्हा त्यातूनही घर चालत नाही तेव्हा शरीर विकायला सुरुवात करते. ह्या कुटुंबातील महिलेनेही तोच मार्ग स्वीकारला. शरीर विकायला सुरुवात केली... तिला ग्राहक मिळाले सभ्य लोकांच्या वस्तीत. तिथे राहणारे सर्व प्रतिष्ठित होते. एक MBA होता, दुसरा डॉक्टर आणि तिसरा बँक Manager ....अशी शिकवू मंडळी जिथे राहते तिथे नगरसेवक तयार होतोच. त्याला पंतप्रधान पदापर्यंत पोहोचायचं असतं. तो समाजकार्याची संधी शोधत असतोच....त्याला ह्या महिलेची माहिती मिळाली. समाजसेवेची संधी चालून आली. एके दिवशी ती भर वस्तीत सापडली, तेव्हा बोंबाबोंब सुरु झाली. सगळे जमा झाले. सगळ्यांना "Objection " होतं. नगरसेवकाने ठरवलं की हिला दगडांनी ठेचून मारायचं.... भर चौकात !! सगळ्यांनी दगड उचलले. तेवढ्यात तिथून एक वृद्ध गीता शिकवणारे शिक्षक चालले होते. नगरसेवकाला ते नकोशे झाले होते. कारण तो शाळेत असताना १० वीच्या परीक्षेत ह्याच शिक्षकांनी नगरसेवकाला कॉपी करू दिली नव्हती.
म्हणून नगरसेवकाने हुकुमी डाव टाकला. पटकन शिक्षकाला बोलावलं आणि म्हणाला-" आज ह्या वेश्येचा कायमचा फैसला करायचा आहे. तुम्ही जाणकार आहात. तुम्ही फक्त होकार द्या. तुमची आज्ञा शिरसावंद मानून आम्ही हिला ठेचून मारू"
शिक्षकानी जर होकार दिला तर हत्येचा कलंक त्यांच्या माथ्यावर लागणार होता आणि नकार दिला असता तर लफडेबाजी त्यांना मान्य आहे असा अर्थ निघणार होता. म्हणजे ती महिला लफडेबाज म्हणून मरणार होती आणि वृध्द शिक्षक दोन्ही बाजूने मारले जाणार होते.


त्यांनी चष्मा लावून सगळ्यांकडे पाहिलं. सगळे दगड घेवून तयारीत होते. मग महिलेकडे पाहिलं. ती थरथरत हात जोडून उभी होती. तिच्या कपाळावर एक दगड आधीच बसला होता. तो मारला होता media मधील एका बातमीदाराने.

मग त्यांनी विचारलं, " ही लफडेबाज आहे. पण तो पुरुष कुठे ज्याला ही भेटायला आली होती."

नगरसेवक म्हणाला, " पुरुषाने असं केलं तर चालतं. स्त्रीने व्यभिचार करावा ही आपली संस्कृती नाही. म्हणून हिला ठेचून मारण्याची आज्ञा द्या !! "

शिक्षक म्हणाले, " सगळ्यांनी दगड उचलले आहेत ना....ठीक आहे...हिला आज ठेचून टाकू. पण पहिला दगड त्याने मारावा, ज्याने जन्मभर कधीही पाप केलं नाही !"

सगळे एकमेकांकडे बघू लागले. एक म्हणाला- " मला ऑफिसला उशीर होतोय. मी निघतो"

दुसरा म्हणाला, "माझी दुकान उघडण्याची वेळ झाली " आणि खाली मान घालून तोही सटकला.

सगळे पळाले. उरला फक्त नगरसेवक.

त्याच्या हातात दगड नव्हता. त्याने सगळ्यात आधी दगड खाली टाकला होता.

शिक्षक त्याच्या जवळ गेले आणि शबनम ब्यागेतून गीता काढून म्हणाले, " हात कधी रिकामे ठेवू नकोस. हे वाच"

इतका मोठा ग्रंथ हातात आल्यावर नगरसेवक तिथे कशाला थांबेल?


शेवटी त्या महिलेने शिक्षकाचे पाय धरले आणि ती ओक्साबाक्षी रडून म्हणाली, " तुमच्यामुळे आज माझा जीव वाचला. मी जो धंदा करते त्याबद्दल मला माफ करा."

शिक्षक तिला उठवून म्हणाले, " मुली तूच मला माफ कर. मी तब्बल ४० वर्षे शिक्षण दिलं. पण तुला पोटभर खायला घालेल असा एकही विद्यार्थी तयार करू शकलो नाही."


भारताची अशीच अवस्था आहे. महासत्ता बनायला निघाला, पण महिलेला सन्मानाने जगण्याची व्यवस्था निर्माण करू शकला नाही.

भारतात साधारण १२ प्रमुख भाषा बोलल्या जातात. सगळ्या भाषांमधील शिव्या महिलांना उद्देशून आहेत.

महिला आजही अबला आहे आणि जरी शिकली- कर्तबगार झाली तरी" महिला असून इतकं करून दाखवलं!!" हे "कौतुक" चुकत नाही.

Domestic violence act २६ ऑक्टोबर २००६ पासून अमलात आला. त्याचा हेतू आहे कोणत्याही महिलेला सहन कराव्या लागणाऱ्या हिंसा, अत्याचाराचा प्रतिबंध घालणे. तो कायदा आल्यानंतर राजस्तानमध्ये सगळ्यात जास्त तक्रारी नोंदवण्यात आल्या. राजस्तानमध्ये राजे-महाराजे दौर्यावर जात तेव्हा राणीने पर पुरुषाशी संबंध ठेवू नये यासाठी गुप्तांगाला बंद करून ठेवल्याचे दाखले मिळतात. त्यामुळे तिथून महिला अत्याचाराची जास्त प्रकरणे बाहेर आली त्यात आश्चर्य काही नाही.

आणि महाराष्ट्राचीही "कीर्ती" वाचा. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला ह्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तालुका पातळीवर 2,164 protection ऑफिसर्स नेमले नाहीत म्हणून फटकारल होतं.


Domestic violence act मध्ये बलात्कार, acid attack , हुंड्यासाठी छळ करणे, मानसिक त्रास देणे इत्यादीला आळा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात एक तरतूद आहे की कमवत्या जोडीदाराच्या मिळकतीवर पूर्ण हक्क सांगणे हा सुध्दा गुन्हा आहे.. थोडक्यात एखादी महिला कमवत असेल तर तिच्या कमाईवर तिचा पूर्ण हक्क आहे. आपल्या मिळकतीच काय करायचं हे ठरवायचं स्वातंत्र्य तिला दिलेलं आहे. किती कमावत्या महिलांना आपल्या मिळकतीवर पूर्ण हक्क मिळतो? ज्या महिला पैसे कमवत नाहीत त्यांना पती घरात नसेल तर अचानक आलेल्या खर्चासाठी हातात किती रुपये दिले जातात? किती महिलांना घराच्या एकूण संपत्तीचा तपशील माहित असतो?

मुंबई मध्ये अधून मधून घडणारा एक हीन अत्याचार पहा. महिलांसाठी लोकल मध्ये स्वतंत्र डबा दिला आहे. ती लोकल सकाळी यार्डातून येते तेव्हा अनेक कर्मचारी महिला घाईघाईत डब्यात चढतात तेव्हा त्यांच्या हाताला विष्ठा लागलेली असते. यार्डात कोणीतरी असा "पराक्रम" जाणून बुजून केलेला असतो...बरोबर महिलांच्याच डब्यात.! महिला शिकल्या-नोकरी व्यवसाय करू लागल्या त्याचा हा राग असतो. जो असा व्यक्त केला जातो !!

महिला अजूनही अबलाच आहे. आपल्याला पावलोपावली मिळणारी वागणूक सगळ्या महिलांनी व्यक्त केली तर वर उल्लेख केलेल्या नागरसेवकासारखी समाजाची अवस्था होईल.

महिलांना कोंडीत पकडण्याचे अनेक मार्ग आहेत. तिला दुय्यम स्थान देण्याच्या असंख्य प्रथा आहेत. त्यातली एक परंपरा आहे पाळी आलेल्या महिलेला बाजूला बसवणे ! तिने पाळी आली असताना मंदिरात प्रवेश करायचा नसतो. पाळी येणे अशुभ आहे का? परमार्थ कसा साधावा हे सांगताना समर्थांनी लिहिले आहे:


रजस्वलेचा जो विटाळ | त्याचा आळोन जाला

गाळ | त्या गाळाचेंच केवळ | शरीर हें ||

वरि वरि दिसे वैभवाचें | अंतरीं पोतडें नर्काचें |

जैसें झांकणें चर्मकुंडाचें | उघडितांच नये ||


पाळी आलेली स्त्री नव्हे तर सारे सजीव अशुद्ध आहेत. तरीही त्यांनी भक्ती करून, योग्य ज्ञान मिळवून परमार्थ साधावा असा संदेश समर्थांनी दिला होता.

एकदा मला एक अजब परंपरा अनुभवायला मिळाली. एका घरात अनेक सगे सोयरे जमले होते. लहान मुले पकडापकडी-खेळताना अचानक खुर्चीवर बसलेल्या काकूकडे आली. आणि आपण काकूला ढकलूया असा पुकारा करून तिला खुर्चीसह दोन फुट ढकललं. काकू मनसोक्त हसली आणि सगळी मंडळीही मुलांची करामत पाहून हसत होती. तितक्यात काका जोरात ओरडला आणि सगळ्या मुलांना एका कोपर्यात उभं राहण्याची आज्ञा दिली. बावरलेली मुले खरच उभी राहिली आणि काकाने त्यांच्या अंगावर गोमुत्र शिंपडलं.

कारण काकूला पाळी आली होती.

ती पाळी चार दिवसांनी गेली असणार. पण महिलांना अपमान सहन करण्याची "पाळी" काही जात नाही.

-निरेन आपटे.

Sunday 18 January 2015

कुठेतरी काहीतरी चुकतंय का ?



पकडायला गेलं कि सुटतंय का ?
सांगायला गेलं कि चुकतंय का ?

मनात असतं खूप काही
बोलायला मात्र शब्दच नाही
शब्दांच्या वाटेने अश्रूंच्या लाटेने
काहीतरी कुठेतरी भिजतंय का ?
सांगायला गेलं कि चुकतंय का ?

हळूच काहीतरी डोकावून जाई
स्वप्नात पाहण्याची नुसतीच घाई
वाट तुझी पाहून रात्र जागी राहून
स्वप्नंच कुठेतरी तुटतंय का ?
सांगायला गेलं कि चुकतंय का ?

विचारांना आताशा दिशाच नाही
अविरत कुठेतरी भटकत राही
सांधायचा प्रयत्न करतेय तरी
कुठेतरी काहीतरी हुकतंय का ?
सांगायला गेलं कि चुकतंय का ?

अलवार येतो भावनेचा आवेग
अश्रूंच्या बांधाला सुटतो वेग
कुठेतरी मनात आत आत गाभ्यात
कुठेतरी काहीतरी सलतंय का ?
सांगायला गेलं कि चुकतंय का ?


(c) रश्मी / २०/०५/२०१३

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...