Posts

Showing posts from May, 2020

टाळीला थाळीची आस - भाग 2

Image
#लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा - सगळ्या औपचारिकता पूर्ण झाल्या .. आणि राणी किंग ह्यांनी सध्या चालू असलेल्या लॉकडाऊन काळातल्या तृतीयपंथीयांच्या उपजीविकेच्या समस्यांवर बोट ठेवले. ह्यांच्या मागण्या आणि समस्या ह्याबद्दल उहापोह करण्याआधी जाणून घेऊया राणी किंग आहेत कोण ? जात-पात-धर्म, स्त्री-पुरुष समानता अश्या अनेक हक्कांसाठी लढतांना किंवा त्यावर उर भरून बोलतांना आपण केवढे संवेदनशील होत असतो. मात्र ह्याच धर्तीवर जगणारे, मानवाच्या गर्भातूनच जन्म घेतलेले आपल्यासारखे जीव केवळ लैंगिक भिन्नतेमुळे उपेक्षित राहतात आणि नंतर संपूर्ण आयुष्यच केवळ हक्काचं जिणं जगण्यासाठी म्हणून झटत राहतात,  हे किती अन्यायकारक आहे हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे अश्यातलेच .. एखादा अक्खा समाज पोटाची खळगी भरण्यासाठी पिढी दर पिढी वर्षानुवर्षे केवळ रुढिवादातून चालत आलेल्या तुमच्या आमच्या अंधश्रद्धेच्या जोखडावर पाय रोवून टाळी वाजवत नाचत धडपडत हे दळभद्री आयुष्य जगत राहतो आणि सभ्यतेचा, समानतेचा, पुढारीपणाचा आणि समाजसेवेचा मुखवटा चढवून फिरणाऱ्यांना त्याचे वैषम्य वाटू नये किंवा त्याच्या बदलासाठी फारसे ठळक प्रयत्न होऊ नये ...

टाळीला थाळीची आस - 1

Image
#लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा - हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे'' आपण फोन केल्यावर ही सुरेख रिंगटोन कानावर पडते. ती ऐकतानाच त्यांच्याबद्दलचा पूर्वाग्रह आपोआप गळाल्यासारखा वाटू लागतो स्क्रीनवर 'राणी किंग' नाव झळकत असते.. राणी किन्नर (राणी ढवळे) फोन उचलतात. 'हा बोलो दीदी' अश्या अत्यंत नम्र आवाजात आपली विचारणा होते . बातमीसाठी भेटायचंय सांगीतल्यावर दोघींच्याही सहमतीने सोयीने भेटीची वेळ आणि ठिकाण ठरते.. खरतर नाही म्हंटले तरी जरा दबकतच आपण वेळेत जाऊन पोचतो, दिलेल्या पत्त्यावर पण जरा बाहेरच रस्त्याच्या कडेला झाडाखाली उभे राहतो, थोडी वाट पाहावी लागते .. तेवढ्याच वेळात मनात बरेच विचार येऊन जातात. तृतीय पंथीयांना असे पाहिले बोललो असलो तरी स्वतः त्यांच्या राहत्या जागी जाऊन प्रत्यक्ष भेटून बोलायची ही आपली पहिलीच तर वेळ असते. १५-२० मिनिटांचा वेळ जातो आणि राणी किंग त्यांच्या इतर ४ साथीदारांसह गाडीत...

मन बेबंद .. !

घर .. आंगण .. बाजार .. कार्यालये .. शहर लॉकडाऊन .. ... शेजारी .. सहकारी .. गणगोत .. मित्र मंडळी ..होम क्वारंटाईन सगळं सामसूम .. कडेकोट बंदोबस्तात आता कोणी कोणाला भेटत नाही. भेटल्यावर हसण्यातून-डोळ्यातून दाटून आलेला आनंद आता दिसत नाही. विश्वासाचा स्पर्श म्हणून कोणी हातात हात घेत नाहीत. आधाराची थाप आणि कौतुकाची शाबासकीही देत नाहीत. डोक्यावर आशीर्वादाचा हात कोणी ठेवत नाही आणि मित्र मैत्रिणी भेटल्यावर कोणी आवेगपूर्ण मिठीही मारत नाहीत. परवा आठवला तो पावसानं सगळा संसार उधळून लावल्यावर कवी कुसुमाग्रजांना भेटायला आलेला तोच तो कोणी.., दारात दूर उभा राहिला एक शब्दही न बोलता कसे म्हणावे '‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला''  एकटेपणा आता सगळ्यांच्याच पदरी पडलेला नाही का. 'पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा' इतकेही शब्द फुटेनात.. पाठीवर हात मागायचा तरी कसा ? सोशल डीस्टंसिग पाळायला हवे. ''पत्र लिही पण नको पाठवू शाई मधूनी काजळ गहिरे लिपीरेशांच्या जाळीमधूनी नको पाठवू हसू लाजरे'' इंदिरा बाईंना कोणी सांगावं की येऊ द्यात निदान तेवढं तरी.. तेवढ्याने काही ल...

झूम जब तक धड़कनों में जान है ...

Image
याद रख जीवन के पल हैं चार... सीख ले हर पल में जीना यार.. मरने से पहले जीना सीख ले !! कोणीतरी येऊन आपल्या कानाखाली बंदूक लावावी आणि सांगावे मरण जवळ येतंय, दिवस निघत जातायत, 'स्व'च्या पलीकडले जगणे काय असते शिक. आणि जगून घे मनासारखं एकदातरी. असच काहीतरी होतंय ना ... कोरोना नावाच्या बंदुकीच्या टोकावर आहोत आपण सगळे, कुणाची गोळी पहिले चालणार हाच काय तो प्रश्न.. या काळात अनेकांचे अवसान गळून पडले असतील. मुखवटे उतरले असतील. झगमगाटीपेक्षा, दिखाव्यापेक्षा जगण्यामरण्याचा प्रश्न महत्वाचा वाटायला लागावा असा काळ उगवून पुढ्यात येऊन ठाकला आहे. आता जमापुंजी साठवत बसण्यापेक्षा गरजवंतांसाठी पुढे येणारे हात दिसतायेत. एरवी स्पर्धेच्या चढाओढीत पायात पाय अडकवणारे पोटावर पाय देऊन पुढे जाणारेही एकमेकांना हात देऊन स्थिर करण्याचा प्रयत्न करताहेत. माणूस मरणाच्या रेषेवर उभा असतांना आणि मदतीचा पुढे आलेला हात धरतांना हा हात कुठल्या प्रांतातला, कोणत्या जातीचा-धर्माचा, नात्यातला की अनोळखी, पापी की पुण्यवान या सर्वांचा कितीसा विचार करत असेल…?? संकटाच्या काळी मदतीला आलेला कुठलाही हात हा 'देवस्वरूप...

क्वारंटाईन ..

शेवटी भांडून निघालो तेव्हा  अडकून पडणार आहोत आपण  एकमेकांपासून दूर .. आपापल्या घरात  क्वारंटाईन होऊन .. कुठे माहिती होते तुला मला    नकोच तू मला म्हणतांना  तोंडच बघायचे नाही ठरवतांना  जीव तटतटून आठवण येईल  पण नाहीच बघायला मिळणार एकमेकांना ..  कुठे माहिती होते तुला मला  हातातले हात सोडले तेव्हा  रागानेच विलागलो तेव्हा  एकमेकांच्या स्पर्शालाही पारखे होऊ  आठवणींशी झटत राहू ..  हा अंदाजही कुठे बांधता आला तुला मला  स्वप्नातले इमले होते इवले इवले  एकमेकांच्या सोबतीने पाहिलेले  तुझ्या डोळ्यात माझे माझ्या डोळ्यात तुझे  अवकाश होते झुकलेले ..  सोबतीचे अवकाशच असे दुरावेल    कुठे माहिती होते तुला मला  एकमेकांपर्यंत पोचायचे सगळे रस्ते बंद आहेत आता  एकमेकांजवळ घेऊन जाणाऱ्या पायांना टाळे  .. निरोपाचे रस्ते सुद्धा अदृश्य झाले तर ? ... आणि  शेवटचा श्वास घ्यावाच लागला तर  सांग कसे कळेल तुला मला ?...
कुणीतरी हाक घालतं  मनाच्या बांधावरच हात घालतं बंद असलेली दारे उघडी होऊ बघतात आणि भीती दाटून येते कधीतरी दुखऱ्या अनुभवांचे संचित मनात कोंडून आपणच दारं गच्च बंद करून टाळे लावून घेतलेले असतात आत बाहेरचे सर्व रस्ते बंद करून टाकले असतात अंतर आखले अंतर राखले असतात .. मान्य - अंतरं जवळीक साधत नाहीत पण अंतरं मन मोडतही नाहीत मनांचा मनाशी संवाद घडत राहायला हरकत नाही एकवेळ .. पण मनाचा बांध मोडून सोडून जाणाऱ्यांना मनाच्या टाळ्याची चावी मात्र देऊ नये ..