Saturday 27 June 2015

'स्वप्न' एक 3D Movie (अंबर हडप)

 अंबर हडप या गुणी लेखकाचा सकाळला वाचलेला अप्रतिम लेख. 
..........................................................................................................................................
'स्वप्न' एक 3D Movie (अंबर हडप)


‘स्वप्न‘ या गोष्टीवर आजवर बरंच काही लिहून आलंय. अनेकांनी त्याचे अर्थ लावलेत. काही जणांना स्वप्न ही गोष्ट काल्पनिक वाटते आणि काही जणांनी स्वप्नाला एन्कॅश केलंय. मला कोणी विचारलं की स्वप्न म्हणजे काय, तर मी म्हणेन, स्वप्न म्हणजे आपल्या मनाने तयार केलेला एक थ्रीडी सिनेमा असतो. असा सिनेमा, ज्याचे मेकर आपण असतो आणि प्रेक्षकही. काही स्वप्नं एखादा प्रोमो असतात आणि काही स्वप्न डेलीसोप. ही झाली झोपेत पडणारी स्वप्नं.

माझ्या मते हा स्वप्नांचा शो आपल्या हातात नसतो. आपला मेंदू आपल्या नकळत स्वप्नांचा शो लावून आपल्याला चकित करत असतो; पण जी दुसरी स्वप्नं असतात, ती स्वप्नं सगळ्यात महत्त्वाची आणि आवश्‍यक असतात आणि ती म्हणजे आपण जागे असताना जी स्वप्नं पाहतो ती. लहानपणी या स्वप्नांची संख्या खूप जास्त असते... मला पायलट बनायचंय. मला आकाशात उडायचंय. मला सुपरस्टार व्हायचंय वगैरे वगैरे. पुढे वर्तमानकाळ या स्वप्नांच्या सिनेमाची मेकिंग कॉस्ट सांगतो आणि मग आपण तो स्वप्नांचा सिनेमा परत बघायची हिंमत करत नाही. कारण परिस्थितीने आपल्याला तोवर एक शिकवण दिलेली असते, "जे परवडत नाही त्याची आशा धरू नये, म्हणजे त्रास होत नाही.‘ आणि माझ्या मते आपण इथेच चुकतो.

जगात आजवर ज्या ज्या लोकांनी स्वप्नांचा अशक्‍य सिनेमा पाहिलाय, त्यांचेच सिनेमे मनातही रिलीज झाले आणि जगातही. निसर्ग जितका भव्य, क्रिएटिव्ह आणि कलेच्या बाबतीत सुंदर आहे, तितकंच त्याने आपल्याला मनही क्रिएटिव्ह दिलंय. देवाने माणसाला मेंदूच यासाठी दिलाय की त्याने जे जगात नाही ते आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर या जगात तयार करावं. म्हणून तर आयफेल टॉवर बनला. म्हणून तर पिरॅमिड्‌स बनली. म्हणून ताजमहाल बनला आणि अशा कितीतरी वास्तू उभ्या राहिल्या, ज्यांना जगात आश्‍चर्य म्हटलं जातं. हे माणूसच करू शकतो. नाही तर जंगलात काही वाघ, सिंह, हत्ती काही तरी घडवताना दिसले नसते का? तरी माणसाच्या कल्पनाशक्तीला कॉम्पिट करायला देवाने काही पशू-पक्ष्यांना तयार केलंय... जशी कोळ्याची जाळी आहेत, गया पक्ष्याचे खोपे आहेत; पण तरीही माणूस तो माणूसच... वॉल्ट डिझ्ने... ज्याने जगातल्या पहिल्या ऍम्युझमेंट पार्कचं स्वप्नं पाहिलं. 100 हून अधिक बॅंकांनी या संकल्पनेला विरोध दाखवत त्याला कर्ज नाकारलं; पण जेव्हा ते उभं राहिलं, तेव्हा आज आपण म्हणतो, ते स्वप्नं कधी तरी पाहिलं म्हणून तर ते उभं राहू शकलं. आजवर लागलेला प्रत्येक शोध हा कधी ना कधी एक स्वप्नं होता आणि तो स्वप्नं होता म्हणून तो सत्यात येऊ शकला.
एक वेळ खरा सिनेमा पाहायला कोटी रुपयांची गरज असेल; पण स्वप्नं नावाचा सिनेमा पाहायला आपल्याला एका दमडीच्या इन्व्हेस्टमेंटची गरज नसते. डोळे बंद केले की काळोख होतो आणि मग सुरू होतो मनातल्या इच्छांचं टेलिकास्टिंग. अर्थात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वप्नं नावाचा सिनेमा नुसता बघून चालत नाही. तो सिनेमा सत्यात आणायला मेहनत तितकीच गरजेची आहे.

कोणी म्हणतं, काही स्वप्नं खरी होत नाहीत. मी म्हणतो, आपण पाहिलेलं प्रत्येक स्वप्नं खरं होऊ शकतं; पण त्यासाठी हातपाय हलवायला लागतात. हा फ्री ऑफ कॉस्ट सिनेमा आपल्याला Impossible चं स्पेलिंग I m possible आहे हे सिद्ध करतो. जगातल्या प्रत्येक यशस्वी माणसाने हा स्वप्न नावाचा सिनेमा तो शून्यावर असताना पाहिलाय. मग आपण का मागे राहायचं?
कॅमेरा-रोलिंग ऍक्‍शन म्हणा आणि सुरू करा सिनेमा. अर्थात कोणाचं वाईट चिंतून सिनेमात व्हिलन नका होऊ, तर कोणाचं तरी भलं चिंतून स्वप्नात हीरो व्हा; तर सत्यात हिरो होऊ शकाल.
मेल्यानंतर देव विचारेल, सिनेमा पाहिलास का? आपण नाही म्हणालो तर तो म्हणेल... तुला टॉकीज दिलं, वेळ दिला, सगळं दिलं आणि तू सिनेमाच पाहिला नाहीस... तेव्हा उत्तर द्यायला वेळ लागू नये म्हणून आत्ताच बघायला लागा "स्वप्नं‘ ...एक थ्रीडी मूव्ही.


Thursday 11 June 2015

भेटी लागी जीवा.....

तांबडा संधिप्रकाश डोकाऊ लागला होता. आकाशात अजूनही सूर्य त्याच्या नैसर्गिक स्वभावानुसार तळपत होता. प्रवासभर बंगाली सौंदर्य न्याहाळण्यात मी गुंगून गेले , रस्त्याच्या कडेने लागणारे अगणित छोटे छोटे तळे, त्याभोवताल पसरलेली समृद्ध हिरवळ, हवा तसा वेढा घेत वळणावळणाने उंची गाठत ताल धरत डोलणारी, तळ्यांची कडा शोभिवंत करणारी नारळाची आकृतीबद्ध झाडे.



अधून मधून वाटेत लागणारी छोटी चौकटीपूर्ण खेडी, झोपडीवजा घरे, बाजार आणि माणसांची रेलचेल..... कलकत्त्याहून दीडशे किलोमीटरचा प्रवास जवळ जवळ आटोपत आलेला. हळूहळू वस्तींची झुंबड कमी होऊ लागली. कुठे सपाट मैदान तर कुठे वाळूचा पसारा दिसू लागला. आपण अपेक्षित डेस्टीनेशनच्या जवळ पोचतोय असे आभास आता होऊ लागले होते. मन अंदाज लावू पाहत होते अगाध-अथांग अश्या नजरेला न पेलणाऱ्या अखंड अमर्याद पाणेरी बेटाचा. एका निमुळत्या अर्धवक्राकृती वळणावरून गाडी वळली आणि डाव्या बाजूने दूरवर फेसाळती पांढरीशुभ्र पुसटशी रेषा दिसू लागली. ते शुभ्र सौंदर्य नजरेने टिपण्याचा प्रयत्न करते न करते तोच गाडी कच्च्या दगडी रस्त्यावरून चढावाला लागली. गाडीच्या काचा उतरवून मी डाव्या बाजूच्या त्या फेसाळत्या हलत्या रेषा न्याहाळत होते. काहीश्या दमट उष्ण वाऱ्याचा झोत अंगाला स्पर्शून वाहत होता. केस भुरभूर उडून चेहेऱ्यावर येत होते वातावरणात मंद सुगंध पसरू लागला, 'हात अलगद बाहेर काढून हे न दिसणारं सौंदर्य ओंजळीत घेऊन चटकन मुठीत बंद करावे अन जवळच्या कुठल्याश्या कुपीत जपून ठेवावे का?' तेवढ्यात गाडी वळून उताराला लागली धक्का बसला आणि माझी एवढा वेळ लागलेली तंद्री तुटली स्वतःच्याच वेडगळ बाळबोध विचारांवर हसू आलं... हसतच नजर पुढच्या काचेतून बाहेर गेले आणि .......आणि पुढ्यात पसरलेली अथांग निळाई, दृष्टी पोचेल तिथवर.. बुद्धी स्तिमित करणारं, डोळे दिपवून टाकणारं तेच शुभ्र चंदेरी फेसाळत सौंदर्य.



पुढे दोनेक किलोमीटर समुद्राच्या अगदी काठावरून पाणी उडवत आम्ही आधीच बुक केलेले आमचे रीजोर्ट शोधत पुढे जात राहिलो ... मला न राहवून मी उतरले आणि निसर्गाचं गवसलेलं हे इतकं समृद्ध रूप मनाच्या कुठल्या कप्प्यात साठवू या संभ्रमात मुग्ध होऊन तिथेच किनाऱ्यावर उभी कितीतरी वेळ स्वतःपासून हरवत गेले.



तशी समुद्राशी माझी भेट काही नवीन नाही. समुद्र माझा लाडका जरा जिव्हाळ्यचाच विषय. समुद्रावर जितकं भरून बोलता येतं तितकं खुद्द समुद्राशी देखील. पहिल्यापासून समुद्राची ओढ वाटायची. लग्नानंतर मुंबईला जायचं ठरलं तेव्हा कोण खुश झाले होते मी. आता सागराच्या सान्निध्यात राहता येईल हवे तेव्हा त्याची भेट घेता येईल. मग तासनतास समुद्राच्या लाटांकडे मन्त्रमुग्ध होऊन बघत बसेन. असे स्वप्न रंगवले होते. मुंबईत बरेचदा तसे प्रसंग आलेही पण हा असा मनसोक्त, शांत विशेष म्हणजे तिन्ही सांजेचा अन रात्रीचाहि समुद्र कधी अनुभवता आलाच नाही. ती इच्छा अपूर्णच राहिली .. पण या इथल्या समुद्राची बातच काही निराळी. आजपर्यंत पाहिलेले अनुभवलेले सर्व बेटं आणि आज 'ह्याची देही ह्याची डोळा' मी अनुभवत असलेलं हे बेट निराळं आहे हे लक्षात यायला वेळ लागला नाही.



कलकत्तापासून पुढे जवळ जवळ २०० किलोमीटरवर असणारे 'मंदारमनी' बीच. आशिया खंडातले तिसरे मोठे, १४ किलोमीटर लांबीचे मोटरेबल बीच आहे. सौम्यशांत अश्या समुद्री लाटांसाठी प्रसिद्ध बेट. १९२३ मध्ये इंग्रज पर्यटक 'जॉन फ्रैंक स्मिथ' ह्याने इथे सगळी जुळवाजुळव करून सौन्दर्यीकरण केले. इथे ह्या सागराच्या काठावरच अगदी १०० पावलांवर अनेक उत्तमोत्तम रीजोर्ट अन हॉटेल आहेत. सागराला भरती असतांना लाटा या रीजोर्टच्या पायथ्याशी येउन धडकतात. रीजोर्टच्या बाल्कनीत बसून हा देखावा अनुभवणं हे स्वर्गसुखाहून विरळा नक्कीच नसावं हे जाणवत राहात.


राहण्यासाठी रीजोर्टशी संबंधित व्यावहारिक बाबी पूर्ण करून.. सामान गाडीतून काढून खोलीत हलवले. फ्रेश होऊन थोडी पोटपूजा, असे सगळे जैविक सोपस्कार आटोपेस्तोर सूर्य मावळतीला उतरला होता. आम्ही पुन्हा विशाल पसरलेल्या वाळूच्या गुळगुळीत गालिच्यावर येउन स्तब्ध उभे राहून समुद्र न्याहाळतो तोच चारही दिशा, अवकाश अन जमिनीवर पसरलेला हा अमर्याद सागर नारंगी पिंगट पिवळ्या रंगाने न्हाऊन निघाला आहे हे लक्षात आले. पश्चिमेला दूर आकाशात तांबड फुटलं होतं. आणि जणू वर उंचावर अवकाशी बसून अश्या अद्वितीय सौन्दर्याच चित्रण करतांना त्यात इंद्रधनू रंग भरतांना एखाद्या देवदूताच्या हाताने रंगाचे पात्र उपडे पडावे अन त्यातील सारे रंग घरंगळत आसमंत व्यापून जमिनीवर उतरावे असे काहीसे चित्र या निसर्गाच्या कॅन्वोसवर प्रत्यक्षात अवतरले होते आणि आम्ही नेमक्या त्याचक्षणी तिथे या सृष्टीच्या अद्भुत अतुलनीय रूपाचे साक्षी ठरत होतो.






सळसळनारया लाटा अंगावर झेलत पाण्यात मनसोक्त खेळूनही मन भरत नव्हते पण अंधारायला आले तसे बाहेर पडणे आवश्यक होऊ लागले पाण्याची पातळी हळू हळू वाढतेय आणि मघाच्या शांत सौम्य लाटांची गती सुद्धा वाढतेय हे लक्षात येत होते रात्री आठ नंतर भरतीला सुरुवात होणार होती. मी त्याच क्षणांची आतुरतेने वाट पाहत होते. खोलीवर येउन आंघोळ वगैरे आटोपून आम्ही पुन्हा बाल्कनीत येउन बसलो. … एक मोठी कॉमन बाल्कनी. कॅरम, पूल सारख्या विविध खेळांचे मंच सजलेले. सगळ्यांच्या प्राइवसिजचा विचार करत प्रत्येकाची स्पेस जपत केलेली बैठक व्यवस्था. नारळपाणी ते विंग्रजी दारू असे पिण्यापासून ते वेज अन नॉनवेज खाण्यापर्यंतची सुविधा अन दिमतीला पाच पन्नास पुढे मागे फिरणारे सेवक अश्या सर्व सुखसोयींनी युक्त असे रीजोर्ट, आणि हे समुद्राच्या अगदी पुढ्यात पन्नास पावलांवर, आता आम्ही बसलोय ती त्याची ओपन टेरेस अर्थात बाल्कनी. डोक्यावर अवकाशीय पोकळी, मिणमिणते अगणित तारे, भिरभिर वाहणारे सुगंधी वारे, भोवताल काळोख अन पुढ्यात पसरलेला भरतीने रूप बदललेला फसफसनारा, शुभ्र जीवघेण्या लाटांनी अंगावर धाऊन येणारा पण तरीही सौंदर्याने नटलेला अगाध-अथांग सागर. आपण असं काहीतरी आगळं अनुभवतो आहे आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसायला अजून वेळ लागणार असतो.


खेळ, गप्पा, हश्या, मस्ती अन जेवणं आटोपून गर्दी पांगू लागली. अगदी आपली मंडळी सुद्धा 'चल झोपायला जाऊया आता' असे विनंतीवजा दटावून दमून निघून गेलीत. मग उरली फक्त मी ..... 'मी अन तो' ... तो सागर अनाकलनीय, अनंत, अमर्याद, गूढ, अनेक गुपित दडवून ठेवलेला तरीही नम्र, संयमी. अन मी… मी मनात अनंत प्रश्नांची सरबत्ती घेऊन हिंडणारी, इवल्याश्या मनात आभाळभर जिज्ञासा बाळगणारी, जराशी हट्टी अन खट्याळ...दोघेही तसे पाहिले तर भिन्नच.…. आज सागराला बरंच काही सांगायचं होतं. त्याच्याकडून बरंच काही शिकायचं होतं...त्याच्या गूढ अनाकलनीय रूपाचं काही गुपित उलगडता येतं का ते बघायचं होतं. जसजशी रात्र चढत गेली लाटांची गती वाढत होती आताशा लाटा मी बघत बसलेल्या बाल्कनीच्या पायथ्याशी जडावलेल्या दगडांच्या तटबंदीवर येउन आदळू लागल्या. आधी एक … दुसरी… तिसरी, एक लाट येउन परत जात नाही तोच दुसरी लाट तिवरच तिसरी. मी मंत्रमुग्ध होऊन बघत राहते पापणीही न हलवता अप्रतिम असा देखावा.


वर आकाशात पाऊन चंद्राचा ढगाआड लपाछपीचा खेळ चाललाय तो बाहेर आला कि त्याचं प्रतिबिंब पडतं तेवढाच फक्त तेवढाच सागर पिवळसर पांढऱ्या चंदेरी रंगात चमकू लागतो. त्यापलीकडचा उरलेला दूरचा अमर्याद सागरी भाग काळोखात निव्वळ लहरींशी झटपटतांना मंद हलतांना दिसतो. अलीकडचा नजरेच्या टप्प्यातला समुद्र मात्र कुठल्याश्या विचारांच्या आवर्तनात अवरुद्ध होऊन बेचैन झालेला अन म्हणून विचारांच्या लहरींच्या हालचाली गतीत करतांना दिसतो. जणू त्याच्या येरझाऱ्या सुरु आहेत. मनात विचारांचे काहूर वाढले कि त्याची गती वाढते अन कुठल्याश्या विचाराने काही काळ अचानक जरा शांतता .... कितीतरी वेळ त्याची हि अशीच विचारांची कंपने अविरत सुरु असतात.



कि मग तो काहीतरी दाखवू पाहतोय ...स्वतःला खूप काहीतरी समजणाऱ्या, स्वतःच्या अस्तित्वाला सतत कुरवाळनाऱ्या मनुष्यास तो त्याचे प्रगाढ रूप दाखवण्याचा प्रयत्न करतोय का ? विश्वाच्या या विशाल विक्राळ रुपासमोर मनुष्य एका ठिपक्या प्रमाणेही नाही. त्याचे कर्तृत्व, त्याची प्रसृती या अगाध रुपासमोर वाळूचा कणही नाही. निसर्ग आपल्याहून विशाल, विस्तृत, अनंत, अखंड, अमर्याद आहे आणि हे रूप पाहून त्याला जाणीव होईल आणि मनुष्य गर्वाचा त्याग करेल असे काहीसे त्याला अपेक्षित असेल का ? आणि मग प्रयत्न करूनही यश न आलेले पाहून, दमून मग जरा शांत होत असेल, चार पावलं मागे सरकत विक्राळ रूप सोडून जरा नम्र होऊन दाखवत असेल का ?? कि मग दोन्ही बाजूची विरोधी रूपं दाखवून कसे असू नये अन कसे असावे ह्याचे धडे तो वर्षानुवर्ष मानवास गिरवून दाखवत असावा??





त्याचे विश्व वेगळेच. त्याचे हवे तेवढे राज्य, हवा तेवढा व्यास हवे तसे वाहने अन आपल्याच धुंदीत राहणे. त्याच्या लाटांचा ताल वेगळा. लाटांच्या स्वरांचे गीत वेगळे. त्याचे त्याचे असे सगळेच माझ्या जगावेगळे. सगळंच गूढ... अनाकलनीय, ज्याच्या मनाचा थांग लागत नाही असा हा सागर नेहेमीच काठाशी आणून अनुत्तरीत सोडतो. शेवटी माझ्या प्रश्नांची तृष्णा ह्या एवढ्या पाण्यानेही भागणार नसतेच .....नेहेमीप्रमाणेच. माझे प्रश्न मी माझ्याच मनाच्या गाठोड्यात पुन्हा गच्च बांधते आणि रात्री १.३० वाजता समुद्राचे क्रुद्ध रूप शांत होऊ लागले तसे उठून खोलीचा रस्ता धरते.




सागराचा रात्रीचा रासरंग बघून निवांत झोप येण शक्यच नव्हतं. काहीतास अर्धवट झोपेत काढून पहाटे ५ वाजता सूर्योदय पाहण्यास आम्ही बाहेर पडलो. नुकताच उगवू पाहणारा मंद प्रकाश नारळाच्या झाडांमधून डोकावू पाहणारा अर्धोन्मलीत सुर्य. आसमंत व्यापू पाहणारी सोनेरी किरणे. सृष्टीचे हे असे भरीव रूप उमलून येतांना पाहणे भाग्याचेच.








बीचवरून सवारी शोधत फिरणारे ओपन रिक्षा चालक अधून मधून तंद्रीत व्यत्यय आणतात पण यावेळी त्यांची गरजही होती. आम्ही निघालो रीजोर्ट पासून काही किलोमीटर अंतरावर सृष्टी अन जीव ह्यांचे एक वेगळेच नाते अनुभवायला.



बीचवरच एक मोठाच मोठा वाळूतला परिसर दुरून बघतांना लालेलाल झालेला नजरेस पडतो. या भागात व्हेइकल्स अलाऊ नाहीयेत. दूरच आपली गाडी सोडून अलगद पाय उचलत आपण पुढे चालू लागतो आणि त्या लाल रंगांच्या हालचाली जाणवु लागतात. हा लाल दिसणारा परिसर म्हणजे अगणित केकडे असतात. पहाटेचे कोवळे उन्ह खाण्यास ते असे जमिनीतून वर अवतरले असतात. या वाळूमय भागात अनेक बारीक छिद्र दिसतात ते म्हणजे या केकड्यांचे बीळ. एक एक पाउल टाकत आपण जसजसे पुढे सरकतो ते लगेच बीळ शोधून आत उडी घेऊन गुडूप होतात. हा अत्यंत विलोभनीय असा देखावा असतो. केकड्यांच्या बीळा भोवताल ते असे काही वावरतात कि वाळूवर सुंदर नक्षी तयार झालेली दिसते.







पुन्हा एकदा पहाटेच्या रम्य वातावरणात समुद्र स्नान घेऊन. फ्रेश होऊन दिवसाच्या पहिल्या वहिल्या सागर भरतीची वेळ होण्याआधी आम्ही पूर्ण समाधानी आणि आनंदी मनाने 'मंदारमनी'चा निरोप घेतो.





कलकत्ता गाठण्याआधी दिघा बीच बघावा हि इच्छा पूर्ण करावी वाटली म्हणून गाडी इथून २८ किलोमीटरवर असणाऱ्या दिघाकडे वळवली. 'दिघा' हे बेट मंदारमनीच्या सर्वस्वी विरोधी. मंदारमनी संपूर्णतः वाळूचा बेट कुठेही दगड गोट्यांचा अवशेषही नसलेला, दिघा मात्र अजिबात वाळू नसलेला मोठ्या दगडांची तटबंदी रचलेला. हा जितका शांत संयमी दिघा तितकाच खवळलेला मोठमोठ्या लाटा कडावर येउन आदळणाऱ्या. तो स्वच्छ-निर्मळ हा तितकाच मळकट- गढूळ. दिघाचा सागर बघायला ठीकेय पण त्याला स्पर्श करावा असं वाटलंच नाही.









शेवटी दिघा डोळ्यात तर मंदारमनी हृदयात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सागर मनात भरून आणलाय कि मनच सागराजवळ सोडून आलीये ह्याचा शोध मात्र अजूनही सुरूच आहे ....


             

                                                               

Monday 1 June 2015

एक ओला पाऊस !!

भरून यायलाच अवकाश कि
मनाचं आभाळ होतं....डबडबलेलं
नाहीच सावरलं तर ओसंडणारं

अलगद ओल साठते क्षणभर
मनाचं आभाळ पाझरत राहतं मनभर

मनातला पाऊस मनभर बरसला कि
मनातलं आभाळ लक्ख होत
मनातलं झाड मनातल्या
पाखराच्या मनातलं घर होतं

लक्ख झाल्या आभाळात स्वप्नांचे पंख पसरत
इंद्रधनू शोधत पाखरू मग उडून जातं 

एक ओला पाऊस मनात बरसून
मनात विरून जाणारा
तरी मनातल्या आभाळाचे
पाखरू पाखरू मन जपणारा

एक ओला पाऊस !!!

रश्मी / १ जून १५ 


ऋतू उन्हा पान्हा आला
जळजाळतो तापुन
जीव रापतो आटतो
कारे गेला रे कोपून


कारे गेला रे कोपून
डोळ्या तळे हे साचले
पोटा खळ नाही पाणी
नदी नाले बी आटले


नदी नाले बी आटले
झाडे गेलीत सुकून
वाट पाहतो सरीची
ध्यास जाएना विरून


ध्यास जाएना विरून
रविराजा शांत होना
ढगा पाणी ओत थोडे
धरणी शीतलता देना


धरणी शीतलता देना
रान हिरवे होऊ दे
गार वारे वाहू दे अन्
ऋतू बरवे होऊ दे.



Rashmi / 1 jun 15



देहावपान !



जगात या जगतांनाही
मी माझ्यात नसते कधी
चारचौघात वावरतांना
स्वतःसंगेच हसते कधी

रीत जगाची शीकतांनाही
बदलत नाही माझी चाल
गीत प्रथेचे गातांना मग
अलगद घेते माझाच ताल

वेचत जाते क्षणभंगुर ते
काळ गतीचे नसते भान
भूत, भविष्य अन वर्तमानही
गोंदून घेते देहावपान

Rashmi Madankar / 30 may 15



Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...