पांढरे डाग- समज गैरसमज
वैद्यकीय कामानिमित्त एकदा कुठल्याश्या गावी जावे लागले. काम वगैरे आटोपून परतीच्या प्रवासाच्या वेळी नेमकी गाडी बंद पडली आणि नाईलाजास्तव बस ने प्रवास करावा लागला. नेमकी संध्याकाळची वेळ असल्याने बरीच गर्दी होती. बस गच्च भरलेली आणि बरीच माणसं उभी देखील होती. इतक्या गर्दीतही एक सीट मात्र खाली होती. येताजाता लोक त्याकडे बघत होती, बसायला म्हणून जात होती पण तिथे बसत मात्र नव्हते. असं का होतंय? मुळात जिज्ञासू असणारी वृत्ती जागृत झाली आणि मी प्रत्यक्षच तिथे बघायला गेले. तिथे जे काही बघितले ते आश्चर्यकारकच नाही तर धक्कादायक देखील होते. तिथे एक मध्यमवयीन इसम बसलेले होते, त्यांच्या शरीराचा बराचसा भाग पांढऱ्या डागांनी व्यापला होता. आणि म्हणूनच कुणीही त्यांच्याजवळ बसायला तयार नव्हते. पांढरे डाग ज्याला बोलीभाषेत 'कोड' असे संबोधतात. अश्या व्यक्तीला स्पर्श झाला तर ते डाग आपल्यालाही होतील अश्या बिनबुडाच्या कल्पनेने, भ्रामक विचारांनी लोकं किती ग्रासली आहेत या विचाराने मन सुन्न झाले. आज तंत्रज्ञानाच्या युगात आपण चंद्रापर्यंत भरारी मारत असतांना. पांढऱ्या डागांसारख्या अतिशय साधारण अन अजिबात घा...