Posts

Showing posts from 2019

आसमान छुती लडकीया !!

Image
आ पण एक्केविसाव्या शतकात जगतोय असे सांगतांना अनेकदा उर भरून येतो, हे संगणकाचं युग आहे..तंत्रज्ञानाचं युग आहे. विज्ञानानं आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे. तरी या युगात अजूनही अनेक क्षेत्र पुरुषी मक्तेदारीचाच भाग असल्याचे दिसणे किंवा कुठल्याही कारणाने का होईना अजूनही स्त्रिया अनेक पैलूंना स्पर्शू शकल्या नाही तिथवर पोचूच शकल्या नाही, हे ऐकून विषन्न व्हायला होतं. खरतर जिथे भारतीय महिलांना अजूनही सामाजिक हक्कांसाठी सतत लढावं लागतं तिथे इतर अपेक्षा अनेकदा कुचकामी ठरतात. पण गेल्या दोन दशकात महिलांचं कर्तृत्व आणि नेतृत्व परिपक्व होत गेलंय. तिच्या अंगी फार काळ ही ऊर्जा दडपून ठेवणे शक्य नव्हतेच तिच्या पंखांनी भरारी घेणे ठरले होतेच ते आता घडू लागले आहे. महिलांच्या गोटात आनंद पेरणाऱ्या अश्याच दोन बातम्या याच वर्षात कानावर आल्या मे महिन्यात भावना कांत ही भारतीय हवाई दलाची पहिली महिला ऑपरेशनल फाइटर पायलट बनली. जी युद्धाच्या मोहिमेवर जाण्यासाठी आता लढाऊ विमान उडवणार आहे .. तर मागच्याच आठवड्यात सब लेफ्टनंट शिवांगी नौदलाची पहिली महिला पायलट बनली, शिवांगी पाळत ठेवणारी विमाने म्हणजे...

मामाचं पत्र हरवलं ..

Image
पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र, आणि लिफाफ्यातून येणारी चिट्ठी..... आठवतंय ना ? आपल्या साऱ्यांचंच लहानपण  कुणाला तरी पत्र लिहिण्यासाठी आसुसलेलं किंवा कुणाच्या तरी पत्राची वाट पाहण्यात अस्वस्थ झालेलं गेलं आहे. या पत्रांना सांभाळून त्या त्या काळच्या सगळ्या आठवणी जपणं किती सहज सुंदर असायचं .. मग कधीतरी जुनी पत्र काढून वाचण्याचा आनंद तर अवर्णनीय आहे.  पत्राचं काय महत्व असतं ते आपल्या पिढीला तरी वेगळं सांगावं लागणार नाही. दारात आलेलं पत्र पाहिलं कि आनंद व्हायचा. आज दारात फक्त बिलं येतात किंवा नोटीस. व्हाट्सॲप किंवा सोशल नेटवर्किंगने जग इतकं जवळ आणलाय की जवळच्या माणसांबद्दल काहीच वाटेनासं करून टाकलंय. आपण एकमेकांशी साधलेला संवाद पुढे कधीतरी ५ वर्षांनी वाचावासा वाटलं तर ? जितके पटापट मेसेज करता येतात तितकेच पटापट ते संपुष्टातही येतात..कुठलेही नामोनिशाण न ठेवता .. म्हणूनच पूर्वी या भावना नात्यांना एकमेकांशी बांधून ठेवायच्या आता बांधून ठेवायला लागणाऱ्या शब्दांचा ओलावा उरतंच नाही आणि म्हणून नात्यांचाही ओलावा हल्ली तात्पुरता झालाय. पूर्वी पत्र कुणी कुणाला लिहायचे तर प्रेयसी प्रियकराल...

लँड ऑफ होप - अंजा रिग्रेन

Image
बराक ओबामा, पोप फ्रान्सिस, दलाई लामा इत्यादी प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहेऱ्यांना मागे टाकून डेन्मार्कस्थित सामाजिक कार्यकर्ता अंजा रिंग्रिन लोवेन जगातील प्रेरणादायक लोकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आल्या होत्या 'उम' नावाच्या जर्मन भाषेच्या लोकप्रिय मासिकाने ही यादी प्रसिद्ध केली तेव्हा माझाही उर अभिमानाने भरून गेला होता. अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवून शेकडो नायजेरिअन मुलांना जीवनदान देणाऱ्या त्यांच्यासाठी त्यांच्याच देशात राहून जीव ओतून कार्य करीत असलेल्या अंजाची या दिशेने जाण्याची जीवनकहाणी तिच्या सुरुवातीच्या काळापासून मी पाहत आले आहे. काही बोटावर मोजण्याइतक्या प्रेरणा स्थानांमध्ये अंजाचे नाव माझ्या यादीत अग्रगण्य आहे. हो प आता मोठा झालाय... इतर कुठल्याही सामान्य मुलांएवढाच तंदुरुस्त आणि आनंदी दिसतो. कोण आहे हा होप ? ही एका अश्या दुर्दैवी लहान मुलाची कहाणी आहे ज्याला अज्ञान, दारिद्र्य आणि अंधश्रद्धा मानणाऱ्या बेगडी समाजाने मरणासन्न अवस्थेत रस्त्यावरून टाकून दिले होते. दारिद्र्यामुळे जगण्यासाठीचा करावा लागणार संघर्ष, अशिक्षितपणा आणि त्यामुळे समाजातील घसरलेली मूल्य या...

अरण्य वाटेचा प्रवासी - हिमांशू बागडे

Image
तुम्ही फक्त भटकंतीचा विषय काढता..विषय रमत जंगलापर्यंत येऊन पोचतो. जंगल म्हणजे त्याचे घरच जणू आणि वाघ त्याच्या जिव्हाळ्याचा विषय. पण माया वाघिणीशी मात्र त्याचे आत्मिक नाते आहे. तिच्याबद्दल बोलताना तो तल्लीन होऊन बोलत राहतो. कुठल्याही समयी कोणत्याही निमित्ताने कितीही वेळ तो मायाबद्दल बोलू शकतो.. तिच्या हालचालीतून तिचा मूड त्याला ओळखता येतो, तिच्या वागण्यामागची कारणे तो  समजावत राहतो. तिच्या चपळाईची, बुद्धिमत्तेची भरभरून तारीफ करतो. मी पुढ्यात बसून हे सगळं अनिमिष ऐकत असते. अचंभित करणारे अनवट वाटेचे हे किस्सेच नाही तर एखाद्या वाघीण आणि मनुष्यात असणारे हे अनोखे नाते त्याच चैतन्यमयी भटक्याकडून ऐकत सहाही संवेदनाने अनुभवत असते. सगळंच अचंभित  करणारं. आपल्याला ज्या-ज्या गोष्टी आवडतात, आपण ज्यात रमतो.. पॅशन वगैरे म्हणतात असे काहीसे असते, पण  आजच्या धावपळीच्या जीवनात या सर्वाचा आनंद घ्यायला फुरसत आहे कोणाला. आधी पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा असतो जो कधीच सुटत नाही..आणि आयुष्यभर मनातल्या इच्छा मनातच विरून जातात.  पण तुम्हाला आवडतात त्या सगळ्या गोष्टी पूर्ण वेळ करायला मिळणे ...

लेखकांच्या गोष्टी

Image
#लेखकांच्या_गोष्टी ''If a writer loves you, every single moment spent together, good and bad, will be documented, reflected on, glorified, transformed into poetry. They will turn even the ugliest sides of you into something lovable, perfect. Writers are obsessively observant, they feel the rawest form of emotions, they see human behaviour as something to always take note of. You become their favourite character.'' परवा एका मित्राने गंमतीनेच हा कोट फॉरवर्ड केला “If a writer falls in love with you, you can never die.” जवळ जवळ वर्षभरापूर्वी मीही गमतीने अशीच पोस्ट टाकली होती .. “ जर लेखक तुमच्या प्रेमात पडला तर तो तुम्हाला कधीच मरू देणार नाही, पण तुम्ही लेखकाच्या प्रेमात पडलात तर तो जगू देणार नाही '' हा गमतीचा भाग असला तरी लेखकांबद्दल अनेक समज-गैरसमज कायम असतात हे खरे. हे वाक्य वाचले तेव्हा अनेक वर्षांआधी दूरदर्शनवर 'मिट्टी के रंग' मधून की झी च्या 'रिश्ते' मध्ये ते आठवत नाही मात्र एक भन्नाट कथा पाहिल्याचं आणि ती डोक्यात ठासून बसल्याचं आठवतं....
Image
तसे रोजचेच तर असते जगणे  अंधारातही उजाडले अंगण बघणे  मनात चांदणं असतं फुललेलं तोवर  झाकोळला राहतो अंधार सारा .. तेव्हा एक करावं  .. रोज थोडं थोडं चांदणं  मनातून काढून गोळा करावं  कुपीत घालून जपून ठेवावं ..  रात्र उलटेल .. दिवस पालटतील कधी सरकलीच पायाखालची उजेडाची जमीन .. आलाच अंधार दाटून, अन दडपला मनातला उजेड तर  कुपीतल्या चांदण्या द्याव्या उधळून,  पेराव्या, सिंचाव्या आणि उगवाव्या चांदण्या  उगवल्या की अलगद जागवाव्या चांदण्या .. मनात भरून घ्याव्या जागल्या चांदण्या  कारण  मनात चांदणं असतं फुललेलं तोवर  झाकोळला राहतो अंधार सारा ! - रश्मी पदवाड मदनकर
Image
 स्वच्छ प्रतिबिंब दाखवतो तोवर   आरसा हवा हवा वाटत असला, तरी  प्रकाशाच्या सान्निध्यात आल्यावर   प्रतिबिंबित करणारा लखलख कवडसा  डोळ्यांना अडसर वाटू लागतो ..तसा  फिरवून घेतो आपण चेहेरा .. अगदी आहे तशीच दिसणारी माणसे  हवी हवी वाटतात..पण   इतरांच्या सान्निध्यात आल्यावर   प्रतिबिंबित काय करतात यावर ठरतात  त्यांचे हवे असणे नको असणे ..  रश्मी पदवाड मदनकर.
मध्यरात्रीच्या पलिकडे पहाट होण्याआधी अंधार उजेडाच्या चिंतेआड सत्या असत्याच्या भ्रमाबाहेर नाश अविनाशाच्या मिती सोडून सुखा दुःखाच्या आशा खोडून जाणीव नेणीवेचे ठेवून भान गाडली असतीस माझी नाळ ... आई .. तर .. तर.. उदासीतमस्वी जरा आत्मघाती आयुष्याचा सुर्य उगवण्याआत पाचवीला पुजलेल्या करंट्या जिन्याची परिटघडी मोडून, वाढून ठेवलेल्या निग्रही प्रतारणा संभ्रमाच्या, अस्वस्थतेच्या फेसाळून येणा-या लाटा सटवाईच्या पदरी पुन्हा बांधून परतवून लावता आल्या असत्या मलाही रात्रीच्याच अंधारात सगळा अंधार उपसून ओतून देता आला असता ... आणि आणि मध्यरात्रीच्या पलिकडे पहाट होण्याआधी अंधार उजेडाच्या चिंतेआड सत्या असत्याच्या भ्रमाबाहेर नाश अविनाशाच्या मिती सोडून सुखा दुःखाच्या आशा खोडून जाणीव नेणीवेचे ठेवून भान नव्या जगण्याचा नवा उजेड पांघरून घेतला असता मी  ... आई .. ! पांघरून घेतला असता मी आई !! - रश्मी पदवाड मदनकर

डॉ श्रीधर शनवारे :- एक व्रतस्थ कवी !

Image
एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि व्यक्तीमत्वात भिनलेला एक उत्कृष्ट कवी. त्यांच्या लिखाणातली वैचारिक वीण नेहेमीच मराठी साहित्याला नवे परिमाण मिळवून देण्यास महत्वपूर्ण ठरले आहे. यांच्या वाड्मयीन प्रवासातले ठळक टप्पे बारकाईने न्याहाळले तर त्यांच्या लिखाणाला प्रतिभेचे अनेकविध पंख फुटलेले दिसतात. वैदर्भीय रसिकांना अभिमान बाळगण्यास महत्वपूर्ण कारण ठरलेल्या या कविमनाच्या साहित्यिकाच्या वाण्ग्मयीन प्रवासाचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न. या संवेदनशील साहित्यिकाचा जन्म ५ आक्टोबर १९३५ रोजी अमरावती जिल्ह्यातल्या' साहूर' येथे झाला. मात्र शिक्षण अन नौकरीच्या निमित्त्याने नंतर च्या काळात ते नागपुरात स्थायिक झाले. ते एम.ए., पीएच.डी.होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले आणि मराठी विभागप्रमुख पदावरून निवृत्त झाले. गेल्या चार दशकांपासून त्यांचे साहित्य सृजन अव्याहत चालू होते. ‘‘उन्हंउतरणी सुरू होईल आता, पण वाती भिजलेल्या नसतील, धुपारतीची वेळ होईल लवकर अन् माझ्याजवळ फुले जमलेली नसतील,’’ असं म्हणत सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला...

'फ्रायडे फॉर फ्युचर' - ग्रेटाची ग्रेट चळवळ

Image
तिने खरतर शाळेत असायला हवे होते.. खेळण्याबागडण्याच्या वयात जणू घराला आग लागली आहे आणि आपण सर्वांनी जागे होऊन ती विझवायला आता याक्षणी प्रयत्न करायला हवे असे तळमळीने सांगत फिरते आहे. कोण आहे ती? ऑ गस्ट २०१८ पासून “स्कूल स्ट्राइक फॉर क्लाइमेट” नावाने आंदोलनाला जन्म देऊन ते फक्त प्रांत, राज्य, देशात नाही तर जगभर पसरत जाणाऱ्या क्रांतीचे रूप घेतलेल्या जलवायू परिवर्तनाच्या विरोध चळवळीला हल्लीच पुन्हा एकदा मूर्त रूप आले, ते ग्रेटाच्या 'हाऊ डेअर यु ?' असं जगातील पुढाऱ्यांना ठणकावून विचारणाऱ्या यूएनमधील भाषणामुळे. पर्यावरण संरक्षणाचा हेतू पुढे ठेवून ''फ्राइडेज फार फ्यूचर'' ही आंदोलनाची मालिका ग्रेटानं चालू केली होती जी जगातील 100 हून अधिक शहरांमध्ये पसरत गेली. ही मोहीम अजूनही निरंतर चालू आहे. स्वीडनमध्ये जन्मलेली ही किशोरी जगातील पर्यावरण रक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षाला एक नवीन आयाम देणारी सगळ्यात अल्पवयीन कार्यकर्ती ठरली आहे. तिला वाटते की बेजबाबदार राजकारणी आणि उद्योगांमुळे ही धरती प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी जे काही प्रयत्न केले जायला हवे ते ह...

नायरा टू ग्रेटा... व्हाया मलाला - कहाणी अश्रूंची

कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं ( संदेश सामंत ह्यांचा एक विचार करायला लावणारा लेख) दिवस होता १० ऑक्टोबर १९९० चा. अमेरिकेच्या काँग्रेशनल ह्युमन राईट्स कॉकसमध्ये एक साक्ष होणार होती. आणि साक्ष देणारी व्यक्ती होती एक १५ वर्षांची तरुणी. नायरा असं तिचं नाव सांगण्यात आलं. आपण कुवेती आहोत आणि इराकच्या सद्दामच्या सैन्याने कुवेतमध्ये अत्याचारांचं काहूर माजवलंय, असा तिचा आरोप. साक्ष सुरू झाल्यावर तिने काही विधानं केली. ज्याने जगाच्या काळजाचा ठोका चुकला. तिने केलेला एक गंभीर आरोप फार महत्त्वाचा होता. नायराच्या मते इराकी सैन्याने कुवेतमधील एका इस्पितळात घुसून इंक्युबेटरमधील काही नवजात बालकांची हत्या केली. हे सर्व सांगताना नायरा रडू लागली. आपलं दुःख आवरणं नायरला आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच कठीण झालं. सद्दामकडून होत असलेले अत्याचार किती भीषण आहेत, याची जाणीव सर्वांना होऊ लागली. "आपण याआधी इतकं भीषण आणि वाईट काहीच ऐकलं नव्हतं," हे तिथे उपस्थित काही व्यक्तींनी नमूद केलं. अमेरिकेने नायराचा साक्षीचा व्हिडीओ जगभर पसरवला. जगभरात कुवेतच्या बाजूने एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली. सद्दाम...

लढा स्त्रीवादाचा !

Image
'फेमिनिज्म म्हणजे ब्रा जाळून मिश्या वाढवणे नव्हे' - sonam kapoor - रश्मी पदवाड मदनकर 'फेमिनिज्म म्हणजे ब्रा जाळून मिश्या वाढवणे नव्हे' असे वक्तव्य करणारी सिने अभिनेत्री सोनम कपूर हिने पुन्हा एकदा हा सार्वकालीन वाद पटलावर आणला आहे. स्त्रीवाद हा विषय तसा आजचा नाही. स्त्रीस्वातंत्र्य आणि समानतेसाठी पुरुषप्रधान समाजाशी दोन हात करण्याची स्त्री चळवळ अनेक दशकांपासून चालूच आहे. स्त्रीवादी चळवळीचा हेतू स्त्रियांना राजकीय, आर्थिक व सामाजिक हक्क आणि समान संधी याची जाणीव करून देणं, तिला आत्मनिर्भर बनवणं इतकाच नाहीये, तर हे साधताना आर्थिक स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य आणि निर्णयस्वातंत्र्य म्हणजे नेमके काय याचे स्पष्टीकरण करणे आहे,’ असे एकदा अरुणा ढेरे म्हणाल्या असल्याचे आठवते. चित्रपट, साहित्य, कलाक्षेत्रातील अनेक नामवंतांचे याबाबतचे मत-मतभेद अनेकदा चर्चेचा विषय होत राहिलेला आहे. आजही स्त्रीवादाचा प्रश्न निर्माण झाला की त्याची परिभाषा अनेक स्तरातून होत असते. गेले वर्षभर महिलांशी जुळलेल्या प्रश्नांनी सोशल मीडिया ओसंडून वाहत होता, गेल्या वर्षभरात 'हैशटैग मी टू' ने सो...
मला वाटलं ... की तू मला आता माझी जात विचारशील. कुसवाआतली की कुसवाबाहेरची. वाडीतली की वाड्यातली. माणूस की बाईमाणूस. माझ्या नावाचं लेबलही तस निश्क्रीयचं. कुठल्याच चौकटीत न बसणारं. बसवताही न येणारं. मैला वहाणारी मी दैवपुजेत रमणारी. तुमच्या भातुकल्या दूरुनच बघणारी. तिन्ही सांजेला दिवा लावणारी. भुकेल्या कावळ्यांसाठी गिधडांना शमवणारी. डोई झाकल्या पदरात जट वाढवणारी, वीतभर कपड्यात पण रामायण वाचणारी. गळ्यातल्या धडुत्यात तान्हूल निजवणारी, पाळणाघराच्या पाय-यांवर नकळत थबकणारी. मी कालची, मी आजची. कधी गर्भात खुडलेली, कधी उमल्याआधी श्वापदांनी कुस्करलेली. मी रमा , मी आनंदी. मी जिजा, मी सावित्री . मी सिंधू , मी किरण, मी अहिल्या .मी अभया......             मी......मी......फक्त माणूस...                                  बाईमाणूस...... ...............डॉ भाग्यश्री यशवंत............

वेड्या माणसांच्या गोष्टी !! - 4

Image
#भेटलेलीमाणसं सातेक वर्षाआधीची गोष्ट. नागपूरच्या इंडियन स्केटिंग अकादमीच्या २३ चम्पिअन्सने पायाला चाक बांधून म्हणजेच स्केटिंग वरून कन्याकुमारी ते नागपूर प्रत्यक्षात २००० किलोमीटरचा प्रवास केवळ अकरा दिवसात यशस्वीपणे पार पाडला होता विश्वविक्रम घडवून आणणाऱ्या या विक्रमवीरांचा साहसी प्रवास कसा घडला..कोणकोणत्या टप्प्यातून...कोणत्या संकटातून यांना तावून सुलाखून निघावं लागलं, कश्या स्वरूपाच्या अडचणींना तोंड द्याव लागलं याचाच आढावा घ्यायला मी या चमुंना भेटले..यांना भेटणे म्हणजे खरच एक पर्वणी होती. वय वर्ष ११ ते २५ वयोगटातली ही मंडळी त्यांचे अनुभव मांडतांना प्रचंड उत्साही होते. त्यांचे थरारक अनुभव त्यांच्याच भारावून जाणारया शब्दात ऐकणे सुद्धा जणू थरारच होता जो मी अनुभवत होते ...अनेक घटना मन हादरवून टाकणाऱ्या मेंदू सुन्न करणाऱ्या, काही दुःखद तर काही आनंदून सोडणाऱ्या...या प्रवासात या मुलांचे किरकोळ अपघात झाले, शारीरिक इजा झाल्यात, मानसिक दडपण आले, अनेक संकट आ वासून उभे होते...या सर्वांतून यांना पार जावं लागलं पण कौतुकाची बाब म्हणजे ही मुलं कुठल्याच क्षणी खचली नाहीत...आताही त्यांच्या बोलण्य...

रूपाताई कुलकर्णी-बोधी

Image
काही माणसांचा जन्म कुठल्यातरी कारणासाठी घडून आलेला असतो. त्यांच्या जीवितकार्यासाठी नियतीशी जन्माआधीच ठरलेला करार असावा यावर विश्वास बसावा इतके एखाद्याचे आयुष्य कार्याशी करार असल्यागत प्रामाणिक पुढे सरकत राहतं त्यांच्या हातून आयुष्याला पुरून उरणारी महत्कार्य होत जातात. आणि हे कार्य वाचतांना किंवा ऐकतांना पुढल्या पिढीचा नियतीवरचा विश्वास फिका पडतो कारण या माणसांच्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीवर नियतीही भाळलेली दिसते आणि आपला त्यांच्या कर्तृत्वावरचा विश्वास अधिक प्रगाढ होत जातो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे वाईट वाटणार नाही असा माणूस विरळाच पण या घटनांसाठी संवेदनशील होत परिस्थितीशी तह करत, वंचितांच्या आयुष्याची नवी घडी बसवण्याचे मनसुबे रचवत,  अक्ख्या समाजातच मन्वंतर घडवून आणण्याच्या आर्त तळमळीने अग्निकुंडात उडी किती जण घेत असतील?  'एखादा विचार दीर्घकाळ दुर्लक्षित राहिला म्हणून महत्वाचा नसतो असे नाही, निव्वळ बहुमताच्या जोरावर  त्याला डावलण्याची युक्ती कोणीतरी वापरते आणि मग तीच वहिवाट बनून जाते' असे रूपाताई म्हणतात पण मग अश्या या धगधगत्या जगाच्या उंबरठ्यावरून बाहे...