भिन्न ध्रुवांवरील दोन भिन्न बिंदू
या बिंदूंना जोडणारी एक ती अदृश्य रेषा
तिलाही कुठेतरी मध्यबिंदू आहेच ना
दोघांनाही सारख्याच अंतराने मिळवणारी
एकाच संंज्ञेेत बांधणारी …
भौमितीय गणितातील आपण दोघे दोन प्रमेये
संबंध जोडायचाच ठरवलं तर सिद्धांत सापडतोच
अवकाशाच्या दोन टोकांना जोडणाऱ्या
पोकळीतही पावसाच्या सरींचा
निमित्त्यमात्र आधार गवसतोच कधीतरी…
दोन विरुद्ध दिशेंनाही वाहणारा एकाच वाऱ्याचा झोत
स्पर्शून जातोच तुलाही अन मलाही
चंद्राला अन सुर्याला भेटवणारी सायंकाळ
तुला मला टाळता येत नाहीच
उन्ह अन पावसाचा लपंडाव तुझ्या अन माझ्यासाठीच
इथून तिथवर वक्राकार इंद्रधनू तुला मला जोडण्यासाठीच ….
तुला स्पर्शून येणारा कवडसा मला येउन का बिलगतो
मोगरा तिथलाही अन इथला सारखाच का गंध देतो
कितीही दूर असलो तरी कुठेतरी कश्यानेही
जुळलेले असतोच हे जाणवतं मला
तुला जाणवतं का रे ?
- रश्मी पदवाड मदनकर
No comments:
Post a Comment