लाडका सोनचाफा ..
एकेक क्षण महत्वाचा असतो पण एखादा क्षण किती खास असतो ना ? आज ऑफिस मध्ये मोठ्या बहिणीसारख्या असलेल्या एका जवळच्या मैत्रिणीने तिच्यासाठी नवऱ्याने मुंबईहून खास आणलेल्या फुलांतून माझ्यासाठी निवडून जपून आणलेला 'सोनचाफा' हातात दिला आणि काय सांगू काय वाटलं.... सोनचाफा .. अतिशय आवडतं फुल . म्हणतात हे स्वर्गीय फुल आहे. देवांच लाडकं… सोनचाफ्याशी काही आठवणी निगडीत आहेत. मुंबईच्या... मला आठवतं, तशी सोनचाफ्याशी माझी ओळख फारशी नव्हतीच. त्याचं कारणही तसं होतं. नागपुरात हा फारसा दिसतंच नाही. चाफ्याचे सगळे प्रकार आढळतात पण सोनचाफा क़्वचितच दिसतो....तर मुंबईत सोनचाफ्याची ओळख तेव्हाच्या तिथल्या ऑफिसातल्या एका मैत्रिणीने दादरच्या स्वामींच्या देवळात दर्शनाला जातांना करून दिली आणि मी वेडावून प्रेमातच पडले. त्यानंतर जेव्हा जेव्हा सोनचाफा दिसला तो ओंजळीत भरून घेऊन तासंतास त्या सुगंधानं तल्लीन होऊन तादात्म पावत राहिले. सोनचाफा स्वामींच्या पायाशी वाहिल्यावरही हाताला त्याचा मंद सुगंध घट्ट धरून असायचा. त्या हातांना लाभलेला तो सात्विक स्पर्श अन जीव प्रसन्न करणारा सुगंध इतका हवाहवा वाटायचा क...