Tuesday 19 May 2015

मृत्यूच्या तांडवातला सृजन-सोहळा !

मन हेलावून सोडणारी …हृदय पिळवटून टाकणारी ही तीन आईंची कथा.
काळ कुठलाही असू दे, परिस्थिती कशीही येऊ दे … कितीही यातना, कितीही अडचणी, कुठलेही दुःख काही अगदी काहीही आईच्या ममत्वाला तिच्या मायेला झुकवू शकत नाही. स्त्रीच्या आईपनावर, तिच्या प्राणापेक्षा जास्त असणाऱ्या बाळावर गदा ओढवणार असेल तर तिच्या एवढ सहनशील, साहसी, धाडसी अन लढाऊ कोणी होऊ शकणार नाही. हेच उदाहरण कायम करणाऱ्या या ३ आईंना 'मदर्स डे' चे औचित्य साधून लोकसत्ता सोबतच माझाही सलाम.  

  
http://www.loksatta.com/chaturang-news/salute-to-three-mothers-on-occasion-of-mothers-day-1100645/

(लेख वाचण्यासाठी या लिंक क्लिक करा) 


Monday 18 May 2015

तिन्ही सांजा सखे मिळाल्या !



वो शाम कुछ अजीब थी … ये शाम भी अजीब है 
वो कल भी पास पास थी वो आज भी करीब है !!















All Photographs Clicked by Me

Friday 15 May 2015

गीलासा चांद खिल गया (स्वगत)



पहिल्या पावसातली पहिलीच संध्याकाळ एक अनामिक हुरहूर घेऊन येते … अनोळखी उदासीन. मन शांत अधिक शांत होत जातं. खिडकीच्या बाहेर अवेळी दाटलेला अंधार खिडकीच्या ओट्यावर बसून बघतांना बाहेर आज वेगळंच चित्र रंगलंय असा आभास देऊन जाते, कुंपणा पलीकडचा रोज दिसणारा चाफा गडद हिरव्या पाणावल्या रंगात डोलत असतो. काळेभोर आभाळ सांजेच्या सूर्याच्या छटा झाकोळून डोकावणारे . मन अजाणत्या विचारांच्या हिंदोळ्यावर आसीन झालेलं कुठेतरी दूर बघत राहावं वाटत राहतं, नजर दूर शून्यात जाते…नाही इच्छा होत उठायची, आतले दिवे पेटवायची. बाहेरच्या अंधारल्या मंद प्रकाशात सुरु असतो 'शोध'   माहिती नसलेल्या कसलातरी. खिडकीच्या अल्याड बसून मनातल्या खिडकीच्या पल्याडचा शोध. खिडकीकडलं अर्ध शरीर ओलं होतांना मनाच्या आतही काहीतरी ओलावत राहतं …तंद्री लागते … अन एक एक आठवण पाझरू लागते … ओसरणाऱ्या धारांसोबत गारवा अन तोच ओळखीचा मृद्गंध आसमंत भारून टाकतो.…. अलगद डोळे मिटले जातात. एक लांब श्वास … अन सगळंच ओथंबून वाहायला लागतं.…. काय होतंय हे कळण्याआत एखादी वीज कडाडते, चमकून जाते. धस्स होतं मनात. पलीकडल्या घरात कुणीतरी रेडिओ लावलाय …लता गातेय सगळे सूर वातावरणात भरून उरतात.


''सिली हवा छु गई सिला बदन छील गया नीली नदी के परे गीलासा चांद खिल गया''


सूर कानातून आतआत भिनत जातात. हृदयापर्यंत ओघळतात आणि आयुष्यातला साठलेला कुठलातरी पाउस धो धो बरसू लागतो. ओघळतो गालावर, अलगद ओठांवर हसू फुलवत. सगळं नितळ स्वच्छ धुऊन निघतं … पुन्हा मन मोहरून उठतं. दडून बसलेले आनंद पक्षी भिरकावतात पुन्हा आकाशी. असा हा पहिला पाऊस क्षणात कोरड्या मनाला भिजवणारा क्षणात पुन्हा हसवणारा प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच असा एखादा पाऊस. आयुष्याच्या मध्यावर झाकोळलेला अन मग कधीतरी अलगद ओथंबून चिंब भिजवणारा. …. आताशा खिडकीबाहेर पावसाचा वेग मंदावलेला असतो. घरातल्या कामाची आठवण होऊन आपण चौकट सोडतो. पलीकडल्या घरातून सूर येत राहतात. लताबाई जीव ओतून गात असतात...


'कतरा कतरा पिघलता रहा आसमाँ ..रुह की वादियों में न जाने कहाँ
इक नदी दिलरुबा गीत गाती रही... आप यूँ फासलों से गुजरते रहे..... '




'













Friday 8 May 2015

अजूनही..


अजूनही श्वास मनाचा खाली अन वर झुलते रोज
अजूनही गालामधल्या खळीत हसणे फुलते रोज
अजूनही स्वप्नांना ते पंख रुपेरी फुटतांना
आकाश गवसणी बाहू मुक्त अन खुलते रोज

अजूनही देह देखणा पोकळीत त्या दिसे व्याकूळ
अजूनही हर्षित होता नाच नाचतो मनमयूर
अजूनही पिवळा चाफा गंध घेउनि फुलतांना
गंधामध्ये रंग वेगळा भासत जातो सुमधुर 

अजूनही देठावारती सरसरत ते पिवळं पान
अजूनही ओल्या धारा हरपून घेतं उन्हकोवळं भान
अजूनही स्पर्श तरुचा मोहवतो अन जीव जाळतो
हिरवळ होऊन सारे रंग उधळत जातं सोवळं रान 


Wednesday 6 May 2015

टाळूवरचे लोणी ... !

काही महिन्यांआधी घराजवळ मेनरोडला प्रचंड गर्दी दिसली. पोलिसांच्या गाड्या, अम्ब्युलन्स, बघे…  नेमकं झालंय काय समजायला मार्ग नव्हता. अपघात झाला असणार असा अंदाज आला. तिथल्याच कुणाला विचारले तेव्हा कळाले कि रस्ता क्रॉस करणाऱ्या एका गरीब चाळीशीतल्या माणसाला ट्रक ने उडवले होते आणि त्यानंतर चालकाला पकडून लोकांनी चोप चोप चोपला होता. मुळात जिज्ञासू वृत्ती आणि वरून मीडियाशी संबंध घटनेमागची कारणे उकलून पहावी वाटली नाही किंवा आतली कहाणी बाहेर आणावी वाटली नाही असे होईलच कसे …. माझीही उत्सुकता जागृत झाली आणि इन्वेस्टीगेशन सुरू झाले.

घराजवळील चौकात अपघात झालाय म्हणजे कोणी पाहणीतला तर नसेल? अश्या एक नाही अनेक शंका जागृत झाल्या. त्याच संध्याकाळी मी तत्काळ त्या चौकात पोचले. जुजबी विचारणा केल्यावर तो इसम न्हावी असल्याचे कळाले. 'अरेरे बिचारा गरीब अपघाताने गेला' असे शब्द बाहेर पडले ..पण नंतर जी माहिती मिळाली ती ऐकून जबरदस्त धक्का बसला. त्यांना मागील काही वर्षांपासून कर्क रोग होता. आणि आता तो शेवटच्या स्तराला पोचला होता.  क़र्करोगाने झालेल्या मृत्यूचा इन्श्युरन्स वगैरे मिळत नाही. अपघाती मृत्यूचा मात्र  मिळतो. इन्श्युरन्स संस्थेकडून देखील आणि ज्या वाहनाने अपघात झालाय त्याच्या मालकाकडून आणि झालेच तर सरकार कडून देखील मोबदला मिळतो ,…एकदिवस मरायचेच आहे तर घरच्यांचे भले करून जावे असा विचार त्याने अनेकदा मित्राशी म्हणजे तिथल्याच दुकानदारांना बोलून दाखवला होता  … आणि तसा प्रयत्न देखील केला होता. यावेळी तो यशस्वी झाला. वेगात येणाऱ्या ट्रक समोर त्याने उडी घेतली आणि जागेवरच त्याच्या चिंधड्या उडाल्या. या सगळ्यात त्या ट्रक चालकाचा मात्र नाहक बळी गेला,  लोकांचा चोप बसला, कायद्याने शिक्षाही होणार आणि नावाला बट्टा लागल्याने भविष्य देखील अंधारमय..    

हि घटना पाहून अचानक मेळघाट आणि तत्सम आदिवासी भागातील कुपोषणग्रस्त मुलांच्या परिवाराची आंखोदेखी कहाणी आठवली. जगातील एकूण कुपोषितांपैकी तब्बल 40 टक्के कुपोषणग्रस्त एकटय़ा भारतात आहेत आणि यात लहानमुलांची संख्या विलक्षण आहे हा जागतिक अहवाल जरी खरा असला तरी नाण्याला दुसरी बाजू देखील आहे आणि ती नुसतीच धक्कादायक नाहीतर निंदनीय आहे. कुपोषणग्रस्त भागात सरकारचे अनेक धोरण राबवले जातात. स्वयंसेवी संस्थांकडूनही त्यांना पुरेपूर मदत केली जाते एवढंच नाही तर विदेशी अभ्यासक तसेच पर्यटक आणि काही समाजसेवक यांच्याकडूनही अनेक मार्गाने सहकार्य त्यांच्याकडे पोचत असतं असे असूनही कुपोषणाचे प्रमाण मात्र तसेच अन तेवढेच. ह्याचा अभ्यास केला गेला तेव्हा अतिशय दुःखद धक्कादायक सत्य उघडकीस आले. सरकारी सवलती, सुविधा आणि धोरणांचा लाभ घेता यावा, स्वयंसेवी संस्थांसमोर खोटेच पण विषन्न करणारी परिस्थिती सादर करता यावी म्हणून सर्वच नाही परंतु अनेक घरात निदान एक अपत्य कुपोषित ठेवण्यासाठीच जन्माला घातले गेलेले होते. त्याला जन्मापासूनच जाणीवपूर्वक कुपोषित राखण्याचा प्रयत्न केला जात होता. त्याचा जन्म ह्या पिडा भोगायलाच झालेला असायचा किंबहुना घडवून आणलेला असायचा. हे एक अपत्य जास्तीत जास्त हलाकीचा कसा दिसेल यासाठीच प्रयत्न केले गेलेले होते…आजही हि परिस्थिती बदललेली नाही कुपोषणग्रस्त भागात सगळ्याच परिवारात असे घडत नसले तरी आजही बहुतांशी परिवारात असे करणे सहज मानले जाते..

विदर्भात-मराठवाड्यात घडत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक आहे. पण काही स्थानिक सामाजिक समूह ,स्वयंसेवी संस्था, शासन, अभ्यास गट यांच्या माध्यमातून संशोधन होऊन आलेला खरा अहवाल अभ्यासला तर फार निराळे चित्र दृष्टीस पडतं. एकंदरीत शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे केवळ आणि केवळ पिकाचे नुकसान किंवा आर्थिक खच्चीकरण नाहीये. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे वेगवेगळी कारणे आहेत. जसे सगळेच हौशीनौशीने शेती करणार्यांना आपण कास्तकार किंवा शेतकरी संबोधित नाही तसेच निव्वळ जवळ शेती होती मात्र वेगळ्या कारणाने आत्महत्या केली गेली असेल तर त्यालाही 'शेतकऱ्यांची आत्महत्या' वर्गात खरतर धरले जायला नको पण असे घडत नाही. एकूण आत्महत्येपैकी ६९ % आत्महत्या या घरगुती त्रासाला कंटाळून. प्रकृतीच्या तक्रारींमुळे, म्हातारपणाला कंटाळून किंवा अन्य कारणांमुळे होतात, १७% आत्महत्या दारू आणि व्यसनाच्या आधीन झाल्यामुळे कर्जाच्या दृष्टचक्रात फसल्यामुळे होतात तर १४ % आत्महत्या निसर्गाच्या अनियमिततेमुळे पिकाचे नुकसान झाल्याने होत असतात. पण आपण सरसकट सगळ्याच आत्महत्यांना शेतकरी आत्महत्या मानून त्याचे संपूर्ण खापर सरकारवर फोडून मोकळे होत असतो.

सामाजिक कार्याच्या नावाखाली अनेक संस्थांमध्ये देखील असा काळा घोटाळा होत असतो कितीही देणग्या आणि कितीही अनुदान मिळत असूनही त्यांच्या संस्थेची दयनीय स्थिती कधीच सुधारत नाही किंबहुना ती त्यांना सुधारू द्यायची नसते… कारण अश्या दयनीय स्थितीला गरम ठेवूनच त्यांना त्यांच्या भाकऱ्या भाजून घेता येणार असतात

मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे ह्यालाच म्हणतात …. नाही का??  
  

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...