गेले द्यायचे राहून ...
बारा, साडेबारा झाले असतील. थंडीच्या दुपारच्या उबदार सोनजर्द उन्हासारखा आजचा दिवस तिला हवाहवासा उगवला होता. कोपऱ्यातल्या रेडिओत मंद आवाजात किशोरींची रागदारी सुरु होती 'अवघा रंग एक झाला...', शब्द वातावरणात भरून राहिले होते. गुणगुणतच आभानं पुन्हा एकदा आरशात वाकून पाहिलं. साडीच्या निऱ्या नीट केल्या. खांद्यावर घेतलेला पदर एकेरी करत हातावर पसरून घेतला. हातातल्या कंगनाची किणकिण झाली. कानातले डूल हळूच हलले, डोळ्यांची लकलक अन ओठांवर स्मित पसरलं. आज तिच्या मनभर चांदणं फुललं होतं. ती आरशाजवळ अगदी जवळ आली हाताने केस नीटशे करीत अगदी पुढ्यात दिसणाऱ्या पांढऱ्या केसांना उगाच लपवण्याचा प्रयत्न केला ...आणि आपण हे काय वेडे चाळे करतोय म्हणून परत तिचे तिलाच हसायला आले. जसजशी वेळ जवळ यायला लागली तिला अधिक बेचैन व्हायला लागले, आज जणू तिचा चातक झाला होता. ती पुन्हा पुन्हा जाऊन डायनिंगवरची जेवणाची भांडी नीट करू लागली. फ्लॉवरपॉटमधल्या निशिगंध फुलांना पुन्हा रचून ठेवू लागली. लक्ष सारं दाराकडे लागून होतं. आज सारं सारं त्याच्या आवडीचं असावं याची विशेष काळजी तिनं घेतली होती, त्याला आवडतात म्हणून निशिगंधाच...