Posts

Showing posts from 2018

माणसे ...

माणसे ...  पाळली जातात टाळली जातात चाळली जातात गाडली जातात  माणसे ...  पकडली जातात जखडली जातात अडवली जातात नडवली जातात रडवली जातात माणसे ...  घेरली जातात पेरली जातात  पीडली जातात रेटली जातात माणसे ...  ढवळली जातात खवळली जातात सतवली जातात बधवली जातात माणसे ...  वापरली जातात चाळवली जातात नाचवली जातात नागवली जातात माणसे ...  आवरता येतात सावरता येतात घडवता येतात  स्विकारता येतात..  जपली जाऊ शकतात आपली राहू शकतात ..  माणसे माणसे असतात !! रश्मी मदनकर 21 डीसे. 18
काय कळाले कळले नाही, असेच झाले जगणे नजरी काही भिडले नाही असेच झाले बघणे ! डोहमनाच्या खोलीचा मज थांगच कळला नाही उथळ मोहाच्या खेळामधे असेच झाले फसणे ! गणगोतास देऊन अंतर,जगलो वेड्यावानी चरणस्पर्श मज घडले नाही उगाच झाले तगणे ! चांगल्या  वाईटामधला, भेद आकळला नाही पस्ताव्याचे अश्रू ढाळत उगाच झाले रडणे ! सोबतीची बातच सोडा , कुणीच थांबले नाही प्रताडणेची भोगून पिडा, असेच झाले खचणे ! रश्मी मदनकर. 12 डीसे. 18

चर्चा सेलिब्रेटी मॅरेजेसची ...

Image
जगातल्या सर्व बातम्या देण्यासारख्या घटना संपुष्टात येऊन केवळ डोळ्यांचे पारणे फेडणा-या दिमाखदार विवाह लग्नसोहळ्याच्या बातम्या येऊ लागल्या तर ?? जिकडे तिकडे हि एकमेव चर्चा सुरु असली तर ? सकाळपासून टीव्ही चॅनेल्सवरून छोट्या छोट्या गोष्टींचे लाइव्ह प्रक्षेपण.. गेल्या वर्षभर प्रसारमाध्यमात जेकाही सुरु आहे ते पाहून हे प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. जणूकाही जगातील सर्व घटना संपल्या आहेत, राजकारण बंद पडलंय, समाजकारण संपुष्टात आलंय, अपघात, चोऱ्या चपाट्या, मृत्यू, गरिबी, भ्रष्टाचार हे सगळं सगळं व्हायचं थांबलंय आणि घडतंय फक्त नं फक्त सेलिब्रेटींचे विवाह असे वाटायला लागावं इथवर या लग्नाच्या बातम्या, फोटो, व्हिडीओ प्रसारमाध्यमांमधून फिरताहेत.. नुसतं फिरत नाहीयेत तर गल्ली-बोळात, कट्ट्यावर, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर ह्याचे चर्वित चर्वण वायरल होतंय. यंदाचं वर्ष म्हणजे जगप्रसिद्ध भारतीय इंडस्ट्रीयालिस्ट आणि बॉलिवूडमधील ख्यातनाम व्यक्तींच्या लग्नसराईचं वर्ष म्हणून गाजलं. रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश आणि नीता अंबानींच्या मुलाचे लग्न आटोपले आता सुरु आहे लगीनघाई मुलीच्या लग्ना...

वाटतंय ..

वाटतंय डोळ्यांना अन मनाला उन्हात नेऊन सोडून यावं दाटलेली ओल आटली पाहिजे.. सुकली पाहिजे उरलेली सगळी उब मग डोळ्यातच साठवून घेऊन यावी ठेऊन द्यावी उशाशी .. कधीतरी जागल्या रात्री तगमग वाढतेय असं वाटेल भावनांचा उद्रेक होईल, मग ती उशाखालची उब पेनात भरावी .. आणि नक्षीदार वळणांनी ओतत राहावी कागदावर शब्दसुमने गुंफत गुंफत आकार घेतील,  नाद, गंध, रंग स्पष्ट होऊ लागतील अर्थ उमटू लागतील ..ते भिनू द्यावेत आतात उधळून टाकू नये.. राखून ठेवावे तिथेच मनाच्या भावविभोर अवस्थेसाठी .. कधीतरी ओल पुन्हा दाटून आलीच कि .. डोळे पाझरायला लागले कि अन उबेचे शब्दही भिजले कि, डोळ्यांचा डोह करावा ..मनाचा सागर आणि डोळ्यांना अन मनाला उन्हात नेऊन सोडून यावं पुन्हा ... पुन्हा

कातरवेळ !

हि कविता म्हणजे एका निराशेने ग्रासलेल्या सखीने दुसऱ्या तश्याच हळव्या सखीला उद्देशून केलेला संवाद आहे. अनुभव समांतर असला की ते दुःख आपलं वाटतं. खरंतर समदुःख हे परानुभूती सहजतेनं देत असेल .. म्हणून नभ भरून आलं कि, पाऊस बरसून गेल्यावर, रात्र दाटून आली कि बरेचदा सारखे फीलिंग असतात, म्हणूनतर कविता आवडतात त्या बरचजणांना सारखंच रडवतात कुणीतरी तयार केलेली गाणी ऐकताना , चित्रपट पाहताना डोळ्यातून पाणी वाहू लागतं, मनाच्या घालमेली तश्याच अनुभवताना, जवळून बघत जगताना खूप कठीण आणि त्रासदायक होत जातं, असं मन घेऊन जन्माला येणं प्राक्तनच म्हणायचं..  पण आता आपल्यात बदल होत नाहीच हे समजावून घेउन स्वतःलाच सांभाळून घ्यावं लागतं कारण आपल्या मनाची त्या त्या घटनेला त्या त्या परिस्थितीला होणारी अवस्था समजून घेणारा सहयोगी प्रत्येकवेळी तश्याच मनाचा असतो असे नव्हे, तश्या मनाचा असला तरी त्याचे तुमचे प्राक्तन सारखे असतेच असे नाही आणि म्हणून तो त्या त्या प्रत्येकवेळी सोबत असतोच असे नव्हे..एकसारख्या मनाची माणसं एका विशिष्ट घटनेत विशिष्ट वेळी एकाठीकाणी सेम अनुभवातून जात असणे किंवा निदान मनाने तीथे...

आकांक्षांपुढती गगन ठेंगणे!

Image
म हिलांनी स्वतःच्या अस्तित्वाची लढाई सुरु करून आता बराच काळ लोटला. दरम्यानच्या काळात  समाजागणिक, व्यक्तीगणिक स्त्रियांच्या व स्त्रियांसाठीच्या ह्या अव्याहत लढ्याची वेगवेगळी रूपे पाहावयास मिळाली.  एक दुर्लक्षित, असहाय जिणे, परिस्थितीचे चटके खात जगणे तिला मान्य नव्हते.. हा लढा देत असतांनाच तिला अनेक संघर्षाला, आव्हानांना सामोरे जावे लागले. स्त्रियांना जगण्याची - जन्म घेण्याची संधी, पदोपदी संघर्ष न करता समान शिक्षण व अर्थार्जनाची संधी, समान वागणूक, श्रमांचे समान मूल्य व असुरक्षिततेची भावना न बाळगता समाजात सन्मानाने वावरता येणे हे सहज साध्य करणे शक्य नव्हते. सुरुवातीचा काळ कठीण होता खरा पण आता महिलांच्या तंबूतले वारे बदलू लागले आहेत. तीन तिच्या कष्टाने निगुतीने प्रयत्न करून स्वतःसाठी स्वतःच असं अस्तित्व निर्माण करून घेतलं आहे. तिला शिक्षणामुळे व आर्थिक स्वयंपूर्णतेमुळे एक अनुभव-समृद्ध आयुष्य जगता येऊ लागलं आहे. तिचे स्वतःचेच नव्हे तर सर्व घराचे आर्थिक निर्णय घेणे, गुंतवणूक - आर्थिक नियोजन करणे यासारख्या गोष्टींबरोबरच नोकरी - करियरमध्येही तिला भरपूर वाव मिळायला ल...
या दिवाळीत माझं लिखाण वाचा - > विदर्भ 'सकाळ' आवृत्तीच्या दिवाळीअंकात 'सौभाग्याची लेणी' ही कविता - > 'झी मराठी'च्या दिवाळी अंकात 'फुगे' कथा > 'विकासकर्मी अभियंता मित्र' या वार्षिकांकात नागपूर मेट्रो प्रवासावरील लेख. > 'चारचौघी' वार्षिक अंकात 'अंतरीच्या गुढ गर्भी' कथा .. > 'कोकणदिप' दिवाळी अंकात '306' ही कथा..
एरवी टीव्ही पाहायला अजिबात वेळ नसतो .. सलग एखादी सिरीज पाहील्याचं आठवतं ते एपीक चानलवर ठाकुरजींच्या कथांवर अनुराग बासूनं दिग्दर्शित केलेली संपुर्ण सिरीज झपाटून गेल्यासारखी पाहीली होती दोन वर्षांपूर्वी... त्यानंतर दोनचार चुटूक पुटूक चित्रपट सोडले तर टीव्ही पाहणं फारसं शक्य होत नाही. पण अलिकडे मस्त सरप्राईज मिळालं काही दिवसाआधी नवरयानं तुझ्यासाठी छान काहीतरी सुरू झालंय बघ सांगत एक चानल सबस्क्राईब करून दिलं... टाटास्कायवर काही दिवसांपासून 'टाटास्काय थीएटर' हे स्पेशल पेड चानल सुर ू झालंय. देशातल्या सर्व प्रांतात सर्व भाषेत गाजलेली नाटकं ते अत्यंत कसदार कलावंतांनी अभिनय केलेल्या नाटकांच्या खास फिल्मस बनवून थीएटर रूपात हिंदी भाषेत आपल्यासाठी सादर करीत आहेत.. यात वैचारीक नाटक आहेत, संस्पेन्स, थ्रीलर, मर्डर मिस्ट्री, चाईल्ड अब्युज, मनोरंजन, विनोदी असे सगळेच प्रकार आहेत विशेष म्हणजे ड्रामा मेकींगच्या त्याच्या कंसेप्टबद्दल अभिनय करताना आलेला अनुभव, पात्रांची वैशिष्ट्ये, परदे के पिछे का ड्रामा यावर मधून मधून चर्चा होते.. दिवसाला एकतरी नाटक यावर पाहायचं असं ठरवलं होतं पण वेड...

एक मतला दोन शेर ..

एक मतला दोन शेर .. काय फासे टाकतो तू काय खेळी मांडतो लागल्या वेडापरी का सांग ना तू भांडतो ! आपुलीती माणसे वैरी तुला का भासती गाडले ते ऊखरूनी काढतो अन् कांडतो ! हर्ष ना वाटे तुला ना आस दाटतसे मनी फसवतो खेळात तू नी रडवुनीचं थांबतो !
Image
मी एक अख्खा काळ नेसून घेतलाय स्वतःभोवती..माझा माझ्यापुरतं असलेला एक काळ माझ्या आयुष्याएवढा .. किंवा आयुष्य एका काळाएवढं.. आयुष्यापलीकडचा काळ मला माहीत नाही काळापलीकडचे आयुष्यही ठाऊक नाही... नेसलेल्या काळात मी रंगवलंय माझं एक आकाश माझ्या वाट्याचा उजेड सांडत राहावा म्हणून त्यात टाचलाय एक सुर्य, एक चंद्र थोडे तारे पेरले आहेत काही बियाणे थोडं धनधान्य टीचभर पोटासाठी जन्मभर लागणार्या अन्नासाठी... विदग्ध आत्म्याला विसावा म्हणून टीचभर परिघातल्या चंद्रमौळी घरात अशक्यतेचं अफाट विश्व सामावलंय ते मी माझंच मानून घेतलंय कायमचं जगण्यासाठी मनाच्या रखरखत्या जमिनीवर मारत असते भावनेच्या ओलाव्याचा शिडकावा उगवत राहते प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वगैरे जपून ठेवते काही खाणाखुणा जगण्यासाठी विदीर्ण आत्म्याला लावत असते संवेदनेचा लेप वगैरे भिरभिरणाऱ्या अस्तित्वाचा गुंता  सोडवण्यात, आणि विखुरलेल्या स्वप्नांची चुंबड जमवण्यात निघून चाललाय हा जन्म वगैरे हव्या त्या माणसांचे गर्दीतले चेहेरे शोधत धुमसत राहतो जीव अखंड अल्पकाळ परीघ ओलांडून आत येणाऱ्या माणसांनी  दिलेल्या तात्पुरत्या दुःखाचे कढ सोसत आयुष्याला पुरेल ए...

ठरवले आहे ..

तुझा उल्लेख मी टाळायचे ठरवले आहे नियम हा एक मी पाळायचे ठरवले आहे । तुला ते शोधतात मी गायल्या गझलांमधुनी तुझे तर नावही गाळायचे ठरवले आहे ।  नवा चल डाव मांडू मागचे विसरून जाऊ आपला व्याप सांभाळायचे ठरवले आहे । नसे कोणी कुणाचे जीव ओवाळून कळले छबीवर आपुल्या भाळायचे ठरवले आहे । नको आधारही अता कुणाचा शब्दानेही तुझ्या पत्रासही जाळायचे ठरवले आहे । कलेवर आठवांचे अंगणी या पुरुन टाकू उगवेल मोगरा माळायचे ठरवले आहे । रश्मी पदवाड मदनकर जुलै 18 (मात्रावृत्तात लिहीण्याचा एक प्रयत्न)

नक्की कुणाचा दोष आहे ??

Image
चला कोणीतरी बोललं म्हणायचं - न भिता, न घाबरता, कोपऱ्यात बातमी न लावता कुठल्याही राजकारणाचे दडपण न ठेवता - माध्यमाची जबाबदारी बाळगत सत्य ठामपणे उघडावं वाटलं.... हितवाद तुम्ही अभिनंदनास पात्र आहात. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात झालेल्या त्या तीन विद्यार्थिनीच्या अपघाताबाबत शहरभर गदारोळ माजला, राजकारण पेटले, आरोप प्रत्यारोपाचा धुराळा उडाला. मोर्चे, आंदोलनं, धरणे आणि काय काय.. त्या दिवशी पूर्णसत्य माहिती नसल्याने बातम्यांचे पेव उठणे, वाऱ्याच्या वेगाने खोट्या अफवा पसरणे साहजिक होते, त्या अनुषंगाने दुसऱ्या दिवशी बातम्या छापून आल्या .. मान्य. पण नंतर सीसीटीव्हीचे फुटेज बाहेर आले. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हावं इतकं सगळं स्पष्ट झालं. प्रत्यक्षदर्शींचे स्टेटमेंट आणि पोलीस तपासणीतूनही अनेक बाबी समोर आल्या. इतकं सगळं खरं-खोटं कळाल्यावर आणि अपघातग्रस्त मुलींची नुसती चूकच नव्हती तर दखलपात्र गुन्हा होता हे लक्षात आल्यावरही कुठल्याच दुसऱ्या वृत्तपत्रांना त्यावर सत्य प्रकाशात आणणारी बातमी करावी वाटली नाही ?? अपघाताच्या दिवशी जे काही राजकारण झाले मृतदेहाला कार्याल...

उजेडाचा मिलन 'स्पर्श' !

(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं ) एखादा भावनाप्रधान चित्रपट पाहायला आवडतंच त्यात तो जुना आवडत्या अभिनेत्यांचा असेल तर क्या बात .. पण एखाद्या अत्यंत संवेदनशील नजरेने टीपलेले चित्रपटाचे सिन आणि त्याचा उलगडा इतका हळुवार इतका विलोभनीय की चित्रपट पाहील्यावर इतका कळला नसता तो वाचनातून झिरपतोय आपण त्या विश्वात तन्मयतेनं रमतोय असं वाटत राहतं ... एक अत्यंत आवडलेला लेख. ................................................. उजेडाचा मिलन 'स्पर्श'! संजय आर्वीकर उजेड हा मुक्तीचा भावसंकेत असतो. आत्मज्ञान आणि आत्मशोधाच्या प्रवासातला हा एक वाटाड्या असतो. उजेडाच्या प्रकाशात अहंगंडात रूपांतरित झालेला न्यूनगंड वितळवून टाकण्याची शक्ती असते. त्यागाच्या आवरणाखाली लपलेले प्रेम सूर्यफुलासारखे उमलण्याची असते. सई परांजपेंचा ‘स्पर्श’ हा सिनेमा उजेडाच्या जादूई मिलनाची गोष्ट सांगतो... नवजीवन अंध विद्यालयाचा प्रमुख असलेल्या अनिरुद्धचं घर. तो स्वतः दृष्टिहीन, पण विलक्षण स्वाभिमानी. घरात अनिरुद्ध आणि त्याच्याच विनंतीवरून शाळेत येऊ लागलेली कविता. कविताच्या पतीचं तीन वर्षांपूर्वी अपघातात निधन झालेलं...

बँडवॅगन इफेक्ट !!

Image
याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात केरळच्या एका छोट्या गावात तांदूळ आणि खाण्याच्या वस्तू चोरीच्या संशयावरून वेडसर आदिवासी तरुणाला शिकल्यासवरल्या टोळक्‍यानं बेदम मारहाण केल्याची, ती मर्दमुकी मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केल्याची अन्‌ शेवटी त्या दुर्दैवी तरुणाचा मृत्यू झाल्याची संवेदनशील मनाचा थरकाप उडविणारी घटना  पलक्‍कड जिल्ह्यातल्या अट्टापडी इथे घडली होती. नंतरही कधी मोबाईल चोरीच्या संशयावरून तर कधी मुलं चोर समजून, गोहत्या केली म्हणून तर गोरक्षक आहे म्हणून कुठलीही शहानिशा न करता पुढे कुणीतरी दिसतंय म्हणून, संधी मिळालीय म्हणून, गम्मत वाटतेय म्हणून, सगळेच मारताहेत म्हणून गर्दी जमत राहिली आणि मारमार मारून एकट्या तावडीत सापडलेल्या माणसांना गलितगात्र करून, अर्धमेले करून किंवा जीव जाईपर्यंत मारत मज्जा पाहत राहिली. २०१२ मधली दिल्लीच्या निर्भयाशी, मुंबईच्या शक्तीमिलच्या पीडितेशी, काश्मीरच्या आसिफा आणि कितीतरी अश्या केसेस, एकावेळी अनेक माणसांनी मिळून केलेले क्रूर कर्म कुणालाही विसरता येणार नाही. कुठून येत असेल एवढं क्रौर्य हा संशोधनाचा विषय आहे. पण...मला पडलेला प्रश्न अ...
सांगायचे होते मला जे ते तुला कळलेच नाही शब्द होते लाख ओठी गीत पण जुळलेच नाही स्पर्शातून का वेदनेचा दाह हा नडतो कधी कळवायचे होते तुला जे कळले पण वळलेच नाही पेटले विरहात अन मज वाटले सुटले अता शांत झाला ताप पण  पोळले परी जळलेच नाही का असा आलास अन अर्ध्यातूनी गेलास तू पाठ फिरता रे तुझी मी जगी रुळलेच नाही रश्मी मदनकर
जुनेच इशारे जुन्याच खुणा त्या पानावर कोरलेल्या जुनीच कपाटे जुनाच खणा त्या पानांनी भरलेल्या तू अजूनही तिथे तसाच आहे जिव्हाळ्याने जपलेला तो थेंब सुना लांघून गुन्हा नयनांमध्ये लपलेला भिजले शब्द जुनेच गाऱ्हाणे, भावुकतेच्या लाटेने एकटीच निघाले मी वेडी मग आठवणींच्या वाटेने ! रश्मी मदनकर ४/०३/२०११
वृत्त:- मंजुघोषा लगावली:- गालगागा गालगागा गालगागा ! -------------------------------------------------------- गोंदलेल्या वेदनेला नाव नाही घाव झाले खोल का ते ठाव नाही हारते हा खेळ जिंकाया नव्याने मी रडीचा मांडलेला डाव नाही ओढ मज आहे नभाची ध्येयवेडी कुंपणा , माझी तुझ्यावर धाव नाही आटले कोठे उमाळे अंतरीचे प्रेम नाही वा कुठे सद्भाव नाही पाडले फासे जरी आता मनाने प्राक्तनाशी खेळण्याला वाव नाही लाख भांडू दे कुणीही दैवताशी होतसे जे व्हायचे बदलाव नाही # मराठीगझल रश्मी पदवाड मदनकर 28 जुलै 18

टीमटीम तारे .. !

निजल्या देहाच्या शिणलेल्या गात्रांना पहाटे स्फुरण चढतं..मग  रात्रीची खुंटीला टांगलेली रिकामी स्वप्नांची थैली तो झटकून तपासून घेतो.. इच्छा, आकांक्षा, अर्धउन्मलित स्वप्ने..  कोंबून भरतो पुन्हा उमेदीने निघतो पुर्ततेच्या प्रयत्नाच्या प्रवासाला.. पुन्हा कालसारखाच .. रणरण वणवण करून रात्री परतल्यावर घरात शिरण्याआत पिशवीतली सारी अपुर्ण स्वप्न त्वेषात भिरकावून देतो आकाशात.. चेहेरयावर हसू ओढतो.. थैली खुंटीला टांगतो. आनंदी वावरतो .. आणि दमला भागला जीव करतो झोपेच्या हवाली  अर्ध्यारात्री कधीतरी... इकडे नाऊमेदीचे अर्धगळके थेंब डोळ्यात..अन भंगलेल्या स्वप्नांचे तयार झालेले तारे आकाशात टीमटीमत राहतात रात्रभर..  निजल्या देहाच्या शिणलेल्या गात्रांना पुन्हा पहाटे स्फुरण चढतं.. मग ... 
Image
पहाटसमयी अंगणात नेत्राकर्षक पखरण दिसते खरी .. पण रात्रीच्या अंधाराचे गुपित तुला माहित नाहीत रे .. गळताना प्राजक्ताच्या हुंदक्यांचे रंग लवंडले असतात  .. खुडतांना अबोलीच्या चित्कारण्याचे फवारे उडाले असतात  .. आणि तुला .. तुला मात्र सूर्योदयाच्यावेळी आसमंतात पसरलेल्या लाल-केसरी रंगाची भूल पडते ... मग मला सांग, मला आवडतो तो काळा रंग अधिक प्रामाणिक नाहीये का रे ? रश्मी पदवाड मदनकर २४ जुलै १८

धडा -

जात-धर्माच्या महाकाय पाषाणाखाली ते समजतात सुरक्षित स्वतःला बिनबुडाच्या अस्मितेचा प्रश्न जगण्याहूनही पसाभर मोठाच झालाय पिढ्यागणीक उद्धाराचा हेतू वळचणीखाली झाकोळला गेलाय संस्कृती रक्षणाचा भार पाषाणावर आणि...खाली तकलादू अस्मितेच्या चिघळट घसरंडीचा तोल बिघडत चाललाय.. प्रत्येकाजवळ जातीच्या कुबड्या असल्या तरी दावणीला लावलेला पाय घसरलाच.. आणि महाकाय पाषाण आदळलाच...तर ? तर आम्ही आमचेच एकत्र आत चेपले जाऊ दडले जाऊ...गाडले जाऊ. मग आमच्या धर्म संस्कृतिचा मोहेन जोदाडो- हडप्पा काय करू नये याची साक्ष भविष्यातल्या इतिहासाच्या पानावर देत राहील विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लावत राहील.. अभ्यास तर दुर ते वाचायलाही हात लावणार नाहीत इतके रटाळ अन टुकार वाटत राहतील धडे .. रश्मी मदनकर 4 एप्रिल 18
काही जवळची माणसं चुकताहेत हे दिसूनही काहीच करता न येणं यासारखी दुसरी हतबलता नसते .. आपण सर्व प्रयत्न करून थकलो असतो .. पुढ्ल्यानं ऐकायचंच नाही ठरवलं असेल ... चुकीच्या मार्गानं जायचंच ठरवलं असेल तर त्याचे कान आणि पाय धरूनही उपयोग नसतो .. दूर निघून जाणारयाला बघत राहण्याशिवाय उपाय नसतो .. सदिच्छा तेवढ्या पाठी पाठी पाठवत राहाव्या ...तेवढं तर हातात असतंच.
दिवसभर केसात माळून ठेवलेला गजरा तू येईपर्यंत वाट पाहून दमला, चिमला आणि तू येता येता.. तसाच पायवाटेवर गळून पडला . . . तू येतांना त्याच फुलांवरून चालत आलास . . एवढंच काय ते त्यांनी पाहायचं बाकी होतं मग काय .. कायमचे डोळे मिटूनच घेतलें त्यांनी ...
चांदण्यांचे वर्ख सारे देहभर मी गोंदते, चंद्र असतो साक्षिला अन मी नभाशी बोलते ! पारिजाताच्या फुलांचे रंग घेते ओढुनी, गंध होतो देह सगळा मी अशी गंधाळते ! उंबऱ्यापाशी घराच्या रात्र का अंधारली, ओंजळी घेउन उजेडा काजव्यांशी डोलते ! छेडता जेव्हा कधी मी जीवघेणा मारवा, मखमली आलाप ते मग गीत जन्मा घालते ! सांजवेडे दुःख मग सुर्यास देते अर्पुनी, ध्येयवेडे स्वप्न मी घेउन उराशी चालते ! * रश्मी पदवाड मदनकर - ४ एप्रिल १८ # मराठीगझल
तुलाच बघते तुझाच दर्पण करते आहे तुझेच देणे तुलाच अर्पण करते आहे तुझाच मी राग छेडता शब्दावाचूनी तुझेच गाणे तुलाच तर्पण करते आहे विलीन केले तुझ्यात मी अन झाली कृष्णा तुझीच मीरा तुला समर्पण करते आहे.. *रश्मी - 15.04.18

भास !

जेव्हा फार एकटे असतो तेव्हा एकटे नसतो आपण गोतावळा होतो.. कोलाहल झोंबतो जीव गुदमरतो खूप गर्दीत असतो तेव्हा गर्दीत कुठे असतो आपण ? फार एकटे असतो .. आतली हाक पोचतच नाही कुणापर्यंत आतच विरते .. जीव चडफडतो असल्या नसल्या जाणिवांचे सगळे नुसतेच भास असतात. आहे तसे नसतेच काही नसलेले असते पण बरेच काही असल्या-नसल्या वाटण्याचे सगळे भास ठरतात शेवटी. ध्यानीमनी दिसते ते भास असतात किंवा नुसतीच आस असते. सगळी दुनियाच जगते आहे एकतर आस लावून किंवा भास ओढून .. मग ..वस्तू दिसतात, माणसे दिसतात, रस्ते दिसतात हे सगळं खरंच आहे .. की हेही सगळे भास ? की मी निर्मनुष्य एखाद्या बेटावर भासमयी विश्वाच्या पसाऱ्यात एकटी जगते आहे ? मी दिसणारी मी तरी आहे का की आहे एखाद्याचा भास .. की ..मग, मी माझाच भास कुणाच्याही विश्वात नसणारा तात्पुरता मनःपटलावर उमटलेला .. भास आहे तोपर्यंतच जगून घेऊ का एकदिवस पाण्यावरचा बुडबुड्याप्रमाणे विरून जाईन मग बुडबुडा - खरंच असतो ? (c)रश्मी पदवाड ...
आज चंद्र विझणार याचं केवढं अप्रूप केवढा उत्साह फाटक्या संसाराची फाटकी लक्तरं वेशीवर टांगून नसणाऱ्या श्रद्धेचा बाजार मांडून उदास खिन्न रात्रीला.. विझल्या उजेडाच्या पिकल्या अंधाराचे भांडवल करून पोटाची खळ बुजवायला मिळणं हे क्वचित घडतं...कधीतरी ... तसेही श्रद्धा-अंधश्रद्धेची..पुण्य-पापाची, देवा-राक्षसाच्या भीतीची उतरण मिळवून काहिवेळच्या पोटापाण्याची आग विझणार असेल तर ... विझता चंद्र-सूर्य येऊ देत दर महिन्याला कोणाचं काय बरं अडतंय ?? "दे दान तर सुटे ग्रान !!" रश्मी पदवाड मदनकर 19 jun 18
शेवटी काय ना सगळ्यांचेच पाय मातीचे असतात. आदर्शवत वगैरे असं काही नसतच..म्हणूनच व्यक्तीपुजा मुर्तीपुजेइतकीच फसवी असते. नकोच करायला कुणाचीही.
कानावर पडणारे आणि मनाला भिडणारे स्वर हे खूपदा वेगवेगळे असतात. खरं तर मनाला भिडणाऱ्या गोष्टी व्यक्त स्वरूपातल्या असव्यातच असेही नाही. त्या सोन ओळींमधल्या रिकाम्या जागेसारख्याही असू शकतात, ज्या ना सांगताही कळतात-भिडतात मनात ठाण मांडून बसतात. व्यक्त केलेल्या गोष्टीही बरेचदा दिसतात तश्या असतात कुठे?? ओठांची एखादी तिरकी रेषा, डोळ्यातली चमक किंवा मलूल दिसणारे डोळे, आर्त स्वर, कातर झालेले शब्द, पडलेला-फुललेला चेहेरा, दिलेलं-न दिलेलं स्मित अश्या किती किती गोष्टी असतात पुढच्याच्या मनातलं समजून घ्यायला.. पण मनातलं समजून घ्यायला आधी मन दिसायला हवं आपलं वाटायला हवं, त्यासाठी ते आपलं करून घ्यावं लागतं त्यासाठी आयुष्यातला वेळ-ऊर्जा इन्व्हेस्ट करावी लागते ..दोन्ही बाजूने..ते न देताच फक्त मिळत राहण्याची अपेक्षा फोल ठरणारच. म्हणूनच तर मैत्रीचे नाते असे व्याख्येपलीकडे असते कारण इथे दोन्ही बाजूने समान देवाण घेवाण झालेली असते.....साऱ्याच नात्यात हि इन्व्हेस्टमेंट व्हायला हवी ... ती ती नाती जपायची असेल तर ...  खरया समाधानासाठी....
काही जवळची माणसं चुकताहेत हे दिसूनही काहीच करता न येणं यासारखी दुसरी हतबलता नसते .. आपण सर्व प्रयत्न करून थकलो असतो .. पुढ्ल्यानं ऐकायचंच नाही ठरवलं असेल ... चुकीच्या मार्गानं जायचंच ठरवलं असेल तर त्याचे कान आणि पाय धरूनही उपयोग नसतो .. दूर निघून जाणारयाला बघत राहण्याशिवाय उपाय नसतो .. सदिच्छा तेवढ्या पाठी पाठी पाठवत राहाव्या ...तेवढं तर हातात असतंच.
अंतर्यामाच्या सागरडोहात ..अथांग खोलात उतरत जाते. तेव्हा आठवणींच्या गडद प्रतिबिंबाशी भेटी होतात. प्रेमाचं हतबलतेशी फार गहिरं नातं आहे म्हणतात, त्या क्षणांशी आत्म्याचे मिलन होतांना अंतरात्म्याची होणारी तडफड थांबवण्याचे धारिष्ट्य कुणातच नसते. या क्षणांचा गंध झिंग रूपात चढत जातो. आत्म्यात झिरपत देहात पसरतो..रोम रोम गंधावत नेतो. त्याक्षणात - गंधात तादात्म पावणार काहीतरी खास असतंच ना ?  काही क्षणांच्या आठवणींचं व्यसन जडतं रे ... Rashmi. (एका दीर्घ ललितलेखाचा छोटा भाग)

विषय !

ते कपाळावर आठ्या आणतात विचारतात...  काय गं, तू हेही करतेस तू तेही करतेस.. दिवसरात्र लगलग करत बरंच काय काय करत असतेस.. कसंच बाई जमतं तुला ? ती खमकं हसते .. उत्तरते... खरं सांगू, मला बरंच काय काय करायचं नसतं.. टाळायचंच असतं खरंतर .. ते करण्याची उर्मी दाटून येऊ नये आसक्ती उफाळून त्रास देऊ नये म्हणून बरंच काय काय करत असते काही काही विसरायला काहीबाही आठवत असते.  विषय आठवून, जमवून करण्याचा नसतोच हो विषय विसरून हसून जगण्याचा असतो .. तेच करत असते ..  रश्मी मदनकर 16 मे 18.
Image
कधी लाट वाटे जरा आपुलीशी कधी भास तिचा जशी सावलीशी जरा ओल येतो तुशारात शिंपून अकस्मात होते जरा बावरीशी मी .....उभी एकटी बोलते सागराशी !!
दुनियेत मुखवट्यांचा सूकाळ फक्त आहे वठवावयास सोंगे तय्यार तख्त आहे l मेंदूत खलबते नी ओठात जप हरीचा बाजार देवतांचा मांडून भक्त आहे भासे अखंड प्रीती भेटीत आर्ततेच्या नाती मनामनाची आतून रिक्त आहे l आहे जरा दिलासा माणूसपण मरेना किमया खरेपणाची अजूनी सशक्त आहे l कोणी म्हणे मनीचे सांगून मोकळे हो जखमा मनातल्या पण, माझ्या अव्यक्त आहे l रपम / 12.5.18 #मराठीगझल

वेड्या माणसांच्या गोष्टी

Image
सालं..! तर आयुष्य म्हणजे नेमकं असतं काय सांगू ... आपल्या सारखीच वेडी, अवलिया, आपापल्या छंदांना वाहून घेतलेली पॅशनेट माणसं आयुष्याच्या टप्प्याटप्प्याला भेटत राहणं .. ती भेटलीत कि त्यांच्या लाभलेल्या सहवासानं आयुष्य ढवळून बिवळून ज्या ज्या काही अंतर्गत मानसिक-बौद्धिक हालचाली होतात आणि त्यातून जो जो काही छोटा मोठा आंतरिक आनंद मिळतो ते म्हणजेच खरे आयुष्य, आणि सुख बिख काय म्हणतात ते ...बाकी सब तर मोह-माया आहे. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे हे एक वेडं कुटुंब आहे. यातली हि गोंडस मुलगी आमची सक्खी मैत्रीण तृप्ती आणि तो तिचा सक्खा नवरा इंद्रनील, यांना एक यांच्यासारखंच गोडुलं लेकरू पण आहे तिचं नाव चिन्मयी.. आमची चिनू आणि विशेष म्हणजे सवयीने ती डिक्टो यांच्यावरच गेली आहे. हि तिघेही पूर्ण वेडी माणसं आहेत. उच्चशिक्षित असतांना नोकरीच्या,व्यवसायाच्या, मशिनींच्या, गाडीघोड्याच्या मागे पाळायचे सोडून ह्यांनी स्वतःला पूर्णपणे निसर्गाला बहाल केलंय. पोटापाण्यापुरतं कमावणारी .. पैश्याच्या मागे मरमर न करता छंद जोपासण्यात पूर्ण वेळ मन भरून आनंद लुटणारी हि लोकं. इंद्रनील वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत, विशेषतः पक...

भयभितांचा तांडा आणि दुर्दैवाचा दशावतारी देश - सीरिया !!

Image
  मी इकडेच का आहे ? इथे म्हणजे महाराष्ट्रात ?  इथे याच प्रदेशात का जन्म झाला असावा ? तिकडे बिहार-आसाम एखाद्या आदिवासी नक्सली भागात जिथे स्त्रियांवर पदोपदी अन्याय होतात जीला कस्पटापेक्षाही हीन दर्जा दिला जातो जी जिवंत मरणयातना भोगते … तिकडे का नाही ? किंवा मग उग्रवाद्यांच्या, बगदादिंच्या,  तावडीतल्या भूप्रदेशात का नाही ? मी ज्यू होऊन नाझींच्या अत्याचाराला बळी पडले नाही.. सिरीया इराक जिथली महिला आज अब्रू अन जीव मुठीतला सुटू नये म्हणून एका मुठीत उरलेला संसार आणि दुसऱ्या मुठीत बंदूक घेऊन फिरतेय.  नशीब म्हणावं का ?  इथे जिथे मी रोज नवनवीन अनुभवातून जात असते ... विविधरंगी सुखदुःखे भोगत असते. तिथे कुठेतरी दूर माझ्याचसारखी 'ती' जीवाच्या आकांताने अब्रू हातात घेऊन जन्मापासून मरेपर्यंत लढत असते. पण मग हे सगळं उघड्या डोळ्याने बघावे वाचावे ऐकावे लागते तेव्हा आणि त्यामुळे संवेदनशील मनाला मानसिक भावनिक त्रास होत राहतो. त्याहून अधिक लिहिण्याशिवाय आपण त्यांच्यासाठी अधिक काहीच करू शकत नाही याचेही वैषम्य बोचत राहते ..तिची तिथली दशा पाहून इथला माझा ...