Thursday 19 January 2017

विसर्जन


सगळे हिशेब संपवायला जरा उशीरच झाला
रात्र पालथी पडून ... जरा उजेडायला आले होते
किर्र्र्र अंधार चिरत बारीकशी किरणे डोकावू पाहत होती ... पण
अजून अंधार कायम होता.
अंगावरच्या सगळ्या चिघळट खाणाखुणा,
भळभळणाऱ्या जखमा, खदखदणारी व्रण, ठसठसणारे स्पर्श  
तिनं पदरानं रगडून पुसून काढलीत.
त्या पदराची झोळी केली न खोचली कंबरेत
दोन्ही हाताच्या तळव्याने वाहते डोळे पुसले अन
साठवून घेतले ते अश्रू ओंजळीतच.

उंबरठा ओलांडला ....

चालत राहिली रस्ता नेईल तिकडे
आकाशात मेघ दाटून यायला लागले होते.
तिच्या मनातले मेघ आज धो धो बरसून साठले होते .. तिच्या तळव्यात. रिमझिम रिमझिम सुरु झाली तशी ओंजळ अधिक पुढे केली तिनं
पावलागणिक पाऊस ओंजळीत साठत होता... ती मात्र, ... ती मात्र
ओंजळ ओसंडू नये याची जाणीवपूर्वक काळजी घेत, ठार कोरडी होत चालली होती. 
ओलाव्याच्या सगळ्या खुणा पुसून टाकायच्या होत्या तिला... शरीराच्या अन मनाच्याही

चालता चालता ध्यानात येणाऱ्या ..
उरात उचंबळणाऱ्या लाटा, आयुष्यातल्या उभ्या आडव्या सरी,  डोळ्यातला पूर, मनातला पाऊस
भावनांचा ओघळ, नात्यांची ओल, आठवणीतला पाझर सगळं साठवून थेंब थेंब झोळीत ओतत राहिली . ...तळे तळे साठत राहिली ..

पोचली समुद्र किनारी ...

जरा शांत केलं स्वतःला .. दूरवर नजर फिरवली .
लाटा पायाशी घुटमळू लागल्या ... तशी अंगभर शिसारी आली तिला
सगळी घाण वेचून तिच्या तळाशी आणून टाकणाऱ्या अन तरी कुठलेच वैषम्य न बाळगता अथांग तोरा मिरवणाऱ्या;  क्षणात फसफसून क्षणात नाहीश्या होणाऱ्या अस्तित्वहीन लाटेच्या ओल्या-खाऱ्या स्पर्शाची.... शिसारी आली तिला...
दुसऱ्या उचंबळून आलेल्या लाटेत एका श्वासासरशी ओंजळ रिक्त केली तिने...
पदराची झोळीही ओतली तिथेच  ... पिळून काढली गच्चं
अन होतं नव्हत ते सगळं दिलं समुद्राच्या स्वाधीन करून ...

विसर्जन
समर्पणाचं विसर्जन ...

वाहून जाऊ दिले सारे सारे ...डोळ्यादेखत ... नजरेआड होईपर्यंत
भंपक ओलाव्याचा समस्त भार शिरवून टाकला होता...
पुढल्या लाटेसरशी तिनं जोरात किंकाळी फोडली .. धायमोकलून रडून घेतलं
तसे कानाकोपऱ्यात अडकलेले उरले सुरले शिंतोडेही मोकळे झाले.....हलकं हलकं झालं सारं

डोळे गच्चं मिटून, हात पसरून लांब श्वास घेत आकाशाकडे पहिले तिने आणि वळली ... निघाली नव्याच प्रवासाला
तिच्या वाटेत अडथळुन बसलेल्या धोंड्याला टेचात उडवून लावला अन शीळ वाजवत चालत राहिली रस्ता दाखवेल त्या वाटेवर..

लक्ख उजाडलं होतं आता .... बाहेर अन आतही !! 

Friday 13 January 2017

इसलिए तमाम पागल अपने अद्वितीय तरीके से पागल होते हैं..!





दुपारचे १२.. . सगळे आपापल्या कामात व्यस्त. कुणाला कुणाकडे लक्ष द्यायला वेळ कुठे असतो हल्ली. आम्ही चहा घेऊन जरा पाय मोकळे करायला पुढे आलो आणि काहीसे स्तंभित करणारे चित्र नजरेस पडले. एक पंचविशीतला तरुण रस्त्याच्या वळणावर एका कडेला. दोन रस्ते मिळतात तिथंच; कोपऱ्यात झाडाखाली बसलेला दिसला. त्याची त्यानं त्याच्यापुरती एक छान बैठक तयार केलेली.. तिथं तो दिवसभर बसून असतो. राजासारखा.... नव्हे, एखाद्या कलावंतासारखा! त्यानं कुठून कुठून जमा केलेल्या फाटक्या तुटक्या चपला, काही किरकोळ सामान. जमिनीवर पडलेला कागदांचा खच, फाटक्या बॅनरचे, पॅम्पलेटचे एकत्र जोडून ठेवलेले कागदी चिटोरे. त्या चिटोऱ्यांवर त्यानं चितारलेली अनाकलनीय चित्रे. बरीच चित्रं त्यानं झाडांच्या फ़ांदीला अडकवलेली . जणू चित्रांचे प्रदर्शन मांडलेले. तो नेमकं काय करतोय याचा अदमास येईना, पण हे काहीतरी वेगळं आहे हे ध्यानात यायला वेळ लागला नाही.

तो वेडा असावा . सगळे तसंच सांगत होते..वेडाच असणार. कारण त्याचे कपडे मळलेले. फाटलेले सुद्धा असतील. त्याची दाढी राठ वाढलेली आणि केस सुद्धा लांब-राठ. आंघोळ नसणारच करत कधी. शहाणी माणसं असं थोडीच करतात? छान छान कपडे घालून, पावडर लावून बाहेर पडतात. चेहेऱ्यावर सदाच स्मित घेऊन वावरत असतात. हे जग म्हणजे एक धर्मशाळा आहे. येथे रोज माणसे येतात जातात येणारी लोकं एकसुरी जगतात. धावत राहतात मिळेल त्या वाटेने. समजूतदारपणे वाट्याला आलेलं जगणं सोसणं आणि तरीही हसत जगत राहणं ह्यालाच शहाणपण म्हणत असावेत. या चाकोरीबाहेरचे उर्वरित वेडेच तर असतात ना सगळे.


त्याच्यासमोरून हजारो माणसं येत-जात असतील. कुणी गाडीतून, कुणी पायी.. कुणी घासत रडत, कुणी थकुन चूर, कुणी हसत खिदळत! कुणीच त्याची दखल घेत नसतील का? कुणी दखल घ्यावं असं तोही काही करत नसावा. त्याला जगाशी संबंध नाहीये. तो कुणाच्याच मागे फिरत नाही. कुठल्याही शिक्क्याची, नावाची, प्राज्ञेची, नोंदीची, दखलीची कणभरही गरज नाकारणारं त्याचं अद्भुत अफाट तरिही क्षुल्लक अस्तित्व! तो जगतोय त्याच बेदखल राजेपण अन कुठेही सोडून जाता येण्यासारखे स्वनिर्मित सार्वभौम साम्राज्य!
आणि आम्ही ..आम्ही हिंडतोय त्याला शोधत, आमच्या जिज्ञासा तृष्णेच्या अपेक्षा त्याच्यावर सोपवून आमची प्रश्नांकित कुतुहलं सोडवण्यास आतुर.

का करतोय तो असं? काय घडलं असेल त्याच्यासोबत नेमकं? त्याच्या अनेक चित्रांपैकी एका चित्रावर कन्नड भाषेतल्या काही ओळी रेखाटलेल्या. काटोलच्या नृत्य शिक्षिका पी पद्मा यांच्या मदतीने त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. तर धक्काच बसला. बऱ्याच गोष्टी असंबंध, पण एका वाक्यावर मात्र आपसूकच लक्ष केंद्रित झालं 'तुझ्या केसांच्या आंबाड्यात मी मोगऱ्याचा गजरा माळतोय' असे रोमँटिक शब्द त्याने का रेखाटले असतील? त्याच्या मनातल्या कल्पना असतील कि खरंच प्रेमभंग झाल्याने मनावर आघात होऊन भूतकाळ विसरून भरकटला असेल तो. कि मग मुद्दामच सगळं मागचं मागे टाकत, बंधनाचे सगळेच पाश सोडून, दुःखाच्या खुणा खणून काढून विरक्ती उगवायला निघालाय तो. विचारांना किती किती फाटे फुटू लागले.

मला मंगेश डबरालच्या ओळी आठवल्या...

''पागल होने का कोई नियम नहीं है
इसलिए तमाम पागल अपने अद्वितीय तरीके से पागल होते हैं
वे भूल चुके होते हैं कि पागल होने से
बचे रहने के कई नियम हैं..
..''


या मानसिक अवस्थेतून बाहेर पडणे आवश्यक वाटू लागले. तर्काचे तारे कुठवर तोडणार. त्याच्या बैठकीच्या आसपास विचारपूस केली. काही तरुण मंडळींनी त्याला रोजच पाहत असल्याच सांगितलं. त्यातील कित्तेक जण त्याला पोटासाठी लागणारे अन्न कधीतरी पुरवायचे. जातायेता त्याला रोज पाहणाऱ्या, जवळच गर्ल्स होस्टेलवर राहणाऱ्या परप्रांतीय धनलक्ष्मी सीलम आणि हुमैरा भेटल्या. कुठल्यातरी आघातानं त्याचं मानसिक संतुलन बिघडलं असावं., असं त्यांना वाटतं . पण यश अग्रवाल म्हणाला तो वेडा वाटत नाही आत्ममग्न मात्र आहे. प्रत्येकाचं विश्लेषण वेगळं. त्याचं स्वतःचं विश्लेषण आणखी वेगळं असेल कदाचित! विश्लेषणाचा विषय आला म्हणून मानसोपचारतज्ज्ञ प्रा. राजा आकाश यांना विचारणा केली त्याच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणून त्याने काढलेले चित्र, चुरगाळलेले कागदं आणि एकूणच अवस्थेचे काही फोटो त्यांना पाठवले. हा 'डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर'चा रुग्ण आहे. हा राजा आकाश यांचा निर्वाळा. एखाद्या आघातानं किंवा अचानक उद्भवलेल्या मानसिक आजारानं विस्मृती येऊन तो भरकटला असावा. तो काढत असलेले चित्र वास्तवदर्शी किंवा काल्पनिकही असू शकतात, असही ते म्हणतात. अशा अवलियांच्या वर्तनाचं कोडं बऱ्याचदा सुटत नसतं. अशी माणसं प्रश्नांसारखी उद्भवतात आणि मागं आणखी प्रश्नचिन्ह सोडून निघून जातात.

तोही नाहीसा झाला अचानक. त्याचं सिंहासन तिथंच टाकून. झाडावर प्रदर्शित केलेली चित्रंही नेली नाहीत त्यानं सोबत. कधी भेटलाच परत तर मिळतीलही काही प्रश्नांची उत्तर... पण त्याच्या वेदनेचा जरासाही अदमास येण्याची असोशी छळत राहणार कदाचित. वेडी माणसं स्वतःला नि जगाला छळतात तशी. 
मानसी गढे तिच्या कवितेत मांडते तशी ...

''गडद होत जाणार्‍या अंधाराच्या नसानसांत
भळभळणार्‍या, ठसठसणार्‍या अदृष्य चिघळट जखमेसारखे...
चौकातल्या नागड्या भिकार्‍याच्या कंबरेवर फडफडणार्‍या एकमेव चिंधीत गुंडाळून ठेवलेल्या
विश्वातल्या समस्त भंपक लज्जेसारखे...
.एक दु:ख हवे माणसाला... कायम...
त्याच्याच पायाशी घुटमळणार्‍या... त्याच्याच काळ्या सावलीसारखे!
''







रश्मी पदवाड मदनकर
१२/०१/२०१७





(सकाळ १३ जान. १७ ला मुख्यांकात प्रकाशित झालेली बातमी)

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...