Saturday 25 July 2015

 

मध्ये व्हाटस्आप वर एक विनोद वाचलेला.

' भलाई कर और दरिया में डाल या फिर कुछ भी कर और फेसबुक पर डाल' 

खरतर विनोदच. पण होतंय असंच ना हल्ली , मानूया कि सोशल नेट्वर्किंग च्या माध्यमाने डोक्यातलं सगळं मांडायला मन हलकं करायला एक छान मंच मिळालाय. कल्पनेतले रंग शिंपडायला केन्वास मिळालाय पण म्हणून रंगबिंग सोडून, काहीतरी छान लिहायचं सोडून उठसूट कुणावरतरी तुटून का पडतो आपण. नात्यांमध्ये तुटलेले बंध साहवत नाही म्हणून एकटेपणा घालवायला येतात कित्तेकजण मग इथल्या लोकांनाही तोडत का सुटतात. एकतर तोडायला नाहीतर सनसनी पसरून लोकांना लाईक अन कॉमेंटसाठी जोडायला हाच हेतू…  आपण काय बोलतोय, कशासाठी बोलतोय यातून काय साध्य होणार आहे कशाकशाच भान नसतं. राजकारणाला किती मनावर घेतोय आपण? यापूर्वी परिस्थिती फार काही वेगळी नव्हती पण आपल्या रोजच्या जीवनावर खरच एवढा प्रभाव होता का राजकारणाचा? आपल्या आयुष्यात एवढी खळबळ माजायची का? दिवसरात्र वैचारिक-बौद्धिक खल मांडत बसायचो का आपण? आणि यासर्वातून निर्माण होणारे मानसिक-भावनिक त्रास व्हायचे का इतके? हल्लीतर सोशल नेट्वर्किंग साईट्सवर धुमाकूळ माजलाय अस वाटायला लागलंय. काहीतरी चांगलं वाचायला यायचं म्हटलं तरी त्रास होतो हल्ली. सतत रागराग, तिरस्कार, राजकारण.  अचानक जाती-पातीची जळमटं तर प्रत्येकाच्या भिंतीवर वाढू लागली आहेत. प्रत्येकाच्या धार्मिक अस्मिता अचानक जाग्या झाल्या आहेत. जातीचे मेळावे काय भरतात इथे आणि इथेच आंदोलनही व्हायला लागलीत. इंग्रजांनी आम्हाला एकात्मतेचे नकळत धडे शिकवले होते, बाहेरच्यांशी लढायला आम्ही जात-धर्म विसरून एक झालो होतो आणि आज देशात एकात्मता, बंधूभाव कायम राहणे प्रगतीबरोबर निकोप समाज निर्मितीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असतांना आम्ही सुशिक्षित होऊनही सुसंकृतीच्या पलीकडे जातोय, धर्माच्या नावाखाली आमच्याच घरात आमच्याच लोकांशी वैर घेत सुटतोय. ज्या गोष्टींचा उपयोग एकमेकांशी अधिक जवळ येण्यासाठी व्हायला हवा होता त्याचा उपयोग स्वतःला अधिक बुद्धिवादी सिद्ध करण्याच्या नादात नुसताच दुरावा वाढवत नाहीये तर कडवटपणा पसरवण्यास जबाबदार ठरत चालले आहे.    
         
काय कमाल आहे नाही....इथे जिकडे तिकडे ज्याला पाहावे तो दुसऱ्याला शिकवायला निघालाय. काय चूक, किती चूक, काय करायला हवं, काय करायला नको . कोण चुकीचा, कसा चुकीचा? गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या सगळ्या विषयात अन देश सोडून विदेशापर्यंत सगळ्या घटनात, वातावरणाविषयी, परिस्थितीबद्दल, वागणुकीबद्दल... संस्कारापासून ते शिक्षणापर्यंत तर राजकारणापासून धर्मकारणापर्यंत सर्व क्षेत्रात प्रत्येक गोष्टीत लोक नाक खुपसून हुशारी पाजळायला लागलेत. इतकं शहाणपण इतकी हुशारी आणि इतक तत्वज्ञान प्रत्येकात अचानक कुठून आलं? बरं सगळेच इतके 'शहाणे' झालेत तरी देशाची नैतिकता इतकी का खालावतेय मग?? राजकारण्यांपासून ते सामान्यांपर्यंत कोणी कुणाशी कसे वागावे ह्याचे ज्ञान प्रत्येकात येऊनही एकमेकांविषयीची दरी इतकी का वाढतेय? स्वतःला बुद्धिवादी सिद्ध करण्याच्या नादात सर्वच मूर्ख का ठरताहेत...अन मरमर करत आयुष्यभर आनंदाच्या मागे धावणारा माणूस हल्ली स्वतःच स्वतःसाठी दुःख का ओढवून घेत आहे ?  

हा सगळाच संशोधनाचा विषय आहे ... नाही ?        

Thursday 23 July 2015

सखे … !

बयो … अगं
हुंदका अलबत गिळायचा नाही
सुख सुख मागून मिळायचे नाही
मनास टाचून असंख्य धागे
मनातला मेघ काही विरायचा नाही

मनातल्या मनात कुढायचं नसतं
डोळ्यातल्या पाण्यानं भिजायचं नसतं
मुक्याने एकांत जगतांनाही
गर्दीत अलगद शिरायचं असतं

स्वप्नांचे रंग पुसायचे नाही
उगाच हळहळायचे नाही
क्षितीज देऊन स्वप्नांना...मग
पुन्हा मागे बघायचे नाही

रीत जगाची विसरून बघ
ओंजळीत घे सारे ढग
आनंदाची गाणी गा
तुझ्याच मनासारखे जग ...

सखे …
तू तुझ्याच मनासारखे जग



(C) रश्मी
  २४/०७/१५








Tuesday 21 July 2015

स्वगत - आठवणींचे क्षण




तसा स्वतःसाठी म्हणून खास असा वेळ काढणं कठीण असतं जरा,पण स्व-संवाद किंवा चिंतन हा प्रगल्भ होण्याचा उत्तम मार्ग आहे . मनातल्या मनात, मनात येणाऱ्या विचारांचा मनाच्या साक्षीने असा मनोवेध घेता येतो अन रोज स्वतःच्याच बदलत्या विचारांचा आलेख अनुभवता येतो. तुम्ही घेतलाय कधी असा अनुभव ? आपल्याला काय हवंय ? काय आवडतं ? कधी काय नको असतं? काय समोर दिसलं कि गालात हसू खुलतं … कशानं चटकन मूड जातो … अश्या एकनाअनेक प्रश्नांची उत्तर शोधलीय का कधी ? कधी स्वतःच्याच समीप होऊन पाहिलंय ?

सुरेश भट म्हणतात

'मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो.'

तसे बरेचदा मला माझ्याच प्रश्नांनी भन्नावून सोडलंय. मुळात जिज्ञासू प्रवृत्ती आणि सतत काहीतरी शिकण्याची, काहीतरी छान मिळवत राहण्याची हौस. मी माझ्याच जिज्ञासा शमवत शमवत दमते कधी कधी. सतत माझीच माझ्याशी होड लागलीय असं जाणवतं कधी. प्रत्येक विषयाबद्दल कसकाय आपल्याला ओढ असते… प्रत्येक कलेबद्दल आसक्ती कशी… कश्याही आणि कोणत्याही निसर्गदत्त सौंदर्याच आकर्षण का वाटतं? हे माझेच मलाच पडलेले प्रश्न आणि मी अजूनही उत्तर शोधत हिंडतेय. पण ह्याच प्रवृत्तीनं जगण्यातलं खरं मर्म कळलं. आयुष्यात घडणाऱ्या घटनांकडे, भेटणाऱ्या माणसांकडे अन येणाऱ्या अनुभवांकडे पाहण्याची वेगळी नजर, विरळा दृष्टीकोन प्राप्त झाला. आपल्याला भेटणारा प्रत्येक माणूस काहीतरी शिकवायलाच आयुष्यात येत असतो. आपण कसे जगावे, कसे असावे ह्याचा एखादा तरी धडा तो देऊन निघून जातो किंवा मग कसे जगू नये, कसे असू नये…  कसे वागू नये हे तरी शिकवून जातो. आयुष्यातल्या काही गोष्टी खूप हव्या हव्या वाटतात पण त्या हाती आल्यात कि आपण उगाच हिरा समजून कोळश्यापाठी लागण्यात आयुष्याचा वेळ खर्ची घातला अस वाटून जातं आणि काही मात्र गमावल्यावर आपण काहीतरी प्रेशिअस अस गमावलंय ह्याची जाणीव सतत होत राहते. म्हणून जे जवळ आहे ते निसटण्याआधी जपलं पाहिजे.  

एखाद्या कपाटाचे अनेक कप्पे असावे तसे मनाचेही हे असे असंख्य कप्पे असतात अन नाही म्हणता म्हणता त्यात हा असा विचारांचा, होकारांचा-नकारांचा, आठवणींचा, साठवणींचा पसारा जमत जातो. तो वर्षानुवर्ष असाच पडला असतो अडगळीत. कुठेतरी कोपऱ्यात दडून, एकाखाली एक दबून…  पुढेही दिवसेंदिवस त्यावर अनेकानेक विचारांचा, घटनांचा, माणसांचा, स्मृतींचा दांडगा भार येऊन पडत राहतो अन कळत नकळत आपण आपले ते आधीचे सर्व प्राणप्रिय जुने भास-आभास, जाणीवा, भावना, नाती-मैत्री त्यातील बंध, ते सहवास त्यांना आपण त्या त्या वेळी दिलेले श्वास, ते जपण्यासाठी केलेली धडपड, ती विरून गेल्यावर अखंड अनुभवलेली निराशा, काही सुखद क्षण, आनंदाच्या अनुभूती आणि बरच काही … सगळं सगळं नव्या ओझ्याखाली ढकलत जातो. ते जाउन पडतात मग अडगळीच्या खोलात. ते कुठेतरी आत दडलेले असतात, संपलेले मात्र नसतात. तसही म्हणतात ना या इथे कशालाही अंत नाही, सगळं शाश्वत आहे. जे जे घडून गेलंय ते संपत नाही पुन्हा पुन्हा इतिहास स्वतःला वेगवेगळ्या रुपात जागृत करत असतो. असे म्हणतात आवाज सुद्धा या पृथ्वी तलावर युगानुयुगे फिरत राहतात.….आणि आठवणी तर, आठवणी माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत पिच्छा पुरवतात .… कधीतरी दाटून भरलेले कपाट आवरायला घेतले अन धक्का लागला कि कसा कपड्यांचा ढीग असा भस्सकन अंगावर येउन पडतो अन आपण डुंबून जातो मग त्या पसाऱ्यात. त्यात एखादी जुनी वस्तू सापडते अन आपण हरवत जातो त्या त्या क्षणात कितीतरी वेळ.  तसेच असते या आठवणींचे देखील. एखाद्याच जुन्या आठवणीला चुकून धक्का लागावा अन सगळ्याच साठवणीतल्या त्या आठवणी मग अश्या अंगावर धावून यायला लागतात.. एक धक्का, एक चिमटा अगदी अगदी एक अलगदसा स्पर्शही पुरतो मग सगळं ओसंडायला ….

 पाऊस पडायला लागला कि  मैत्रिणींबरोबर एकत्र धमाल केलेला एखादा जुना पाऊस असाच स्मृतीपटलावर येऊन टिचकी मारून जातो. अन मग सगळेच क्षण भरभर सरकू लागतात सगळ्यांचे एका पानात जेवण,एकाच कपातला चहा अर्धा अर्धा, हसतांना तीच टाळी रडतांना तोच खांदा, ते लटके रुसवे फुगवे, तो राग आणि भांडण …चोरून पाहिलेला सिनेमा   मैत्रीचे दिवस जसे कसे असतात  सुखद असतात. नाही ?? चेहेऱ्यावर उडणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी अचानक कधीतरी समुद्रकिनारी हातात हात धरून प्रेमात तुडुंब बुडालेली एखादी सायंकाळ आठवते. तो खट्याळ कटाक्ष तो हळुवार स्पर्श आणि मग अश्या जागृत होणाऱ्या आठवणीनी सगळीच संध्याकाळ शांत क्लांत होत जाते. कित्ती काय काय शिकवत असतात न क्षण…. काही क्षण जगणं असह्य करणारे अन काही जगण्यासाठीचं सगळं अर्क एका क्षणात देऊन जाणारे. काही क्षण आयुष्यभरासाठी पुरेपूर जीवनामृत पुरवून निघून गेलेले असतात.

क्रमशः     

                         

Tuesday 14 July 2015

Stories By Rabindranath Tagore .... on Epic !!

दिवसभराचे काम पाहता २४ तास कमी पडतात एक दिवस निदान ३६ तासांचा हवा अस वाटतं. अश्यात कमी पडलेल्या २४ तासात टीव्हीवर चालणाऱ्या फाल्तू सिरिअल बघणे म्हणजे काहीतरी चांगले गमावनेच नव्हे तर काहीतरी वाईट मिळवणे सुद्धा ठरते. त्यामुळे मी बातम्या आणि काही गायनाच्या किंवा हलक्या फुलक्या विनोदी सिरिअल सोडल्या तर शक्यतोर टीव्ही बघतच नाही. आणि म्हणून कुठे कोणत्या चानलवर काय चालू आहे वगैरे (अति)ज्ञान नसतच कधी. हा रोजचा तसा अनुभव पण गेल्या दोन दिवसापासून आजारी आहे. बाहेर येणेजाणे बंद. ऑफिस नाही किंवा घरकामहि नाही. मुलगा काळजी म्हणून स्वतःच स्वतः आवरून घेतोय. नवराही कामात भरून मदत करतोय. अश्यावेळी विश्रांती झाल्यावर मिळणाऱ्या निवांत वेळेत काय करावं म्हणून टीव्ही वर काहीतरी शोधत होते.काहीतरी म्हणजे रोज २४/७ दाखवतात तसलं नाही. काहीतरी छान दर्जेदार...आपल्या टेस्टच

आणि मिळालेच ...

नवे सुरु झालेले 'एपिक' नावाचे चानल. त्यावर सगळंच्या सगळं युनिक अन दर्जेदार असतं. आपल्या इतिहासाशी आपल्या परंपरेशी आपल्या पूर्वजांशी जुळलेली आपली पाळं -मूळं ते दाखवतात. अगदी सगळे विषय हाताळतात हा गेल्या दोन दिवसाचा अनुभव. पण मी विशेष आकर्षित झाली ती ' Stories By Rabindranath Tagore ' या सिरीजने. रवींद्रनाथ टागोर यांच्या कथा मनाच्या ठाव घेणाऱ्या आहेत. त्यांची 'काबुलीवाला' कथा लहानपणी वाचलेली अजूनही लक्षात आहे जशीच्या तशी. त्यांच्या लिखाणाचा करावा तेवढा  अभ्यास कमीच आणि कौतुक करावं म्हणलं तर लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं.... त्यांच लिखाण म्हणजे एक भूलभुलैया आहे त्यात रमत जाऊ तितके अडकत जातो आपण. पण त्यासाठी पूर्वी ते वाचायला लागायचे. पण 'एपिक' ने आपल्याला ते अनुभवण्याची संधी उपलब्ध करवून दिली आहे. आतापर्यंत तीनेक एपिसोड पाहीले आणि तिन्हीच्या प्रेमात पडले. कमालीचे निर्देशन, बंगाली परंपरांनी-सौंदर्याने नटलेल्या कथा, अप्रतिम लोकेशन, कथा मांडणी आणि बरंच काही ... इतके सुंदर कलाविष्कार अनुभवण्यास मिळण ह्याला नशीब लागतं.

ज्यांना खरच काहीतरी चांगलं सौंदर्य-बुद्धी-कलेशी समांतर शुद्ध हिंदीत असणारं, अप्रतिम बांधणी असलेल्या कथांची यथोचित मांडणी बघायची इच्छा असेल तर नक्की बघा ' Stories By Rabindranath Tagore ' एपिक चानलवर.                               

Friday 10 July 2015

काही फ़ाइल्स काही फोल्डर्स अलबत स्मृतीत सेव झालेले असतात. अगदी गच्च चिकटून बसलेल्या आठवणी काही घटना, काही माणसे, काही विचार, काही रिती, काही नावे, काही आवाज, काही स्थळ आणि बरच काही. एक क्लिक आणि काही गोष्टी लगेच कनेक्ट होऊ लागतात. एखाद्या शब्दाने जखम ताजी होते तर एखाद्या गंधाने विस्मरणात गेलेला माणूस मनात जागा होतो …… एखादे गाणे कानावर पडते अन लगेच मनात काहीतरी हलतं. शब्द आत आत उतरत जातात अन सगळंच विस्कटत जातं. रोजची घातलेली घडी निसटते. आपण वाहवत जातो त्या तेव्हाच्या जगात त्या क्षणात. गाण्याची एक एक ओळ स्पर्शत जाते, जुने भास होऊ लागतात तरल संवेदना जागृत होतात आणि गाण्याला असणारे आपल्या खऱ्या आयुष्याचे संदर्भच मग त्या गाण्याची ओळख होऊन बसतात. हे संदर्भ खूप अवघड अवस्था निर्माण करतात हवेहवेसे तरीही त्रासदायक. काही आठवणी मुठीत गच्च आवळाव्या पण वाटतात आणि तळव्याला चटका साहवतही नाही.
आणि अश्या आठवणींशी चिकटून बसतात … कधीतरी ऐकता ऐकता दूर लोटावी वाटतात अन कधी मुद्दाम शोधून ऐकावी वाटतात.… काही गाणी हि अशी काळजाचा ठाव घेणारी ठरतात.

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...