एका जिव्हाळ्याच्या लेखिकेबद्दल…


माझ्या अत्यंत आवडत्या लेखिका अरुणा ढेरे ह्यांनी त्यांच्या ‘प्रेमातून प्रेमाकडे’ या अनोख्या मैत्रीच्या नात्यांवर आधारित पुस्तकात लिहिलेली अर्पणपत्रिका मला खूप भावली होती. त्यात त्या लिहितात..

“मैत्र

जे होतं आणि आता नाही

त्याला स्मरून

आणि

जे आहे, असण्याचं आश्वासन आहे

त्याचा हात धरून...”

बस्स... इतकंच. पण एवढ्याशा तीन-साडेतीन ओळी आयुष्याचं मोठं तत्त्वज्ञान सांगून जातात. काही माणसं काळाच्या ओघात मागे पडतात, काही नाती विरून जातात; पण त्यांची आठवण मनात कायम राहते. आणि त्याचवेळी, अजूनही सोबत असणाऱ्या, “आहोत” असं शांत ठामपणे सांगणाऱ्या हातांची किंमतही या ओळी शिकवतात.

त्यांचं “काळोख आणि पाणी” हे आणखी एक अंतर्मुख करणारं पुस्तक; हे माझ्या अतिशय आवडत्या पुस्तकांपैकी एक. महाभारतातील व्यक्तिरेखा, त्यांच्या भावना, त्यांच्या निर्णयांमागचे कारण आणि त्यातून निर्माण झालेल्या अनेक अपरिचित कथा या पुस्तकात अतिशय सुंदर पद्धतीने मांडल्या आहेत. “जे महाभारतात नाही ते जगात नाही” असे म्हणतात, त्याची प्रचिती हे पुस्तक वाचताना येते. गंगा, भीष्म, गांधारी, कुंती, द्रौपदी अशा अनेक व्यक्तिरेखा नव्या दृष्टीने समोर येतात. विशेष म्हणजे, या व्यक्तिरेखा केवळ पौराणिक वाटत नाहीत, तर आपल्या आसपासच्या माणसांसारख्या वाटू लागतात. विशेष करून “कुंतीचा नातू” ही कथा मनाला खूप भिडते, आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देते. द्रौपदीचेही अनेक पैलू या पुस्तकात उलगडत जातात... स्त्री म्हणून, पत्नी म्हणून, आदिमाता म्हणून. अरुणा ढेरे यांची भाषा खूप सुंदर, साधी आणि भावस्पर्शी आहे. पुस्तक वाचताना अनेक ठिकाणी आपण विचारात हरवून जातो. महाभारत फक्त युद्ध नाही, तर मानवी स्वभावाचा आरसा आहे, याची हे पुस्तक पुन्हा जाणीव करून देते. वाचनाची आवड असणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी हे पुस्तक जरूर वाचावे असेच वाटते.

अरुणा ढेरे लिखित “भगव्या वाटा” हे पुस्तक तर भारतीय स्त्री संतांच्या विलक्षण आध्यात्मिक प्रवासाचा मागोवा घेणारं संवेदनशील आणि अभ्यासपूर्ण लिखाण आहे. संसार, समाजाचे बंधन, परंपरा आणि वैयक्तिक वेदना यांवर मात करत आत्मशोधाच्या मार्गावर निघालेल्या अनेक स्त्रियांच्या कथा या पुस्तकात भेटतात. उपनिषदकालीन विदुषी स्त्रियांपासून ते बुद्धकालीन भिक्खुणी, लल्ला, अक्कमहादेवी, मीरा, मुक्ताई, कान्होपात्रा अशा अनेक संतस्त्रियांचे जीवन अरुणा ढेरे यांनी अत्यंत जिवंतपणे उभं केलं आहे. या स्त्रिया केवळ धार्मिक व्यक्ती नव्हत्या, तर स्वतःचा मार्ग स्वतः निवडण्याचं धाडस करणाऱ्या स्वतंत्र विचारांच्या स्त्रिया होत्या. त्यांचा संघर्ष, त्यांची साधना, त्यांचं वैराग्य आणि अंतर्मनातील ओढ यांचं सुंदर चित्रण या पुस्तकात दिसतं. त्यामुळे “भगव्या वाटा” हे संतचरित्रांचं पुस्तक असलं तरी ते स्त्रीच्या आत्मशोधाचा आणि अंतःप्रवासाचा भावस्पर्शी दस्तऐवज अधिक बनतं हे निश्चित.

अरुणा ढेरे यांचे “कृष्ण किनारा” वाचताना तर महाभारतातील स्त्री पात्रांच्या भावविश्वात हरवून जायला होतं. राधा, कुंती आणि द्रौपदी... या तीन स्त्रियांभोवती उलगडत जाणारं हे पुस्तक म्हणजे केवळ पौराणिक व्यक्तिरेखांचं वर्णन नाही, तर त्यांच्या मनाचा, त्यांच्या वेदनेचा, त्यागाचा आणि कृष्णाशी असलेल्या अदृश्य नात्याचा घेतलेला शोध आहे. शतकानुशतकं काळाच्या प्रवाहातून चालत आलेल्या या स्त्रिया आजही आपल्याला जवळच्या वाटतात. कारण त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, प्रेम, अपूर्णता, समर्पण आणि अंतर्मनातील घालमेल आजच्या स्त्रीलाही कुठेतरी स्पर्शून जाते. राधेचं निस्सीम प्रेम, कुंतीचं आयुष्यभराचं सोसणं आणि द्रौपदीची ज्वाला... या तिन्ही स्त्रिया वेगळ्या असल्या तरी त्यांच्या आयुष्यात एक समान धागा आहे, तो म्हणजे सतत देत राहण्याचा.

अरुणा ढेरे यांची लेखणी या स्त्रियांकडे केवळ पौराणिक नजरेने पाहत नाही, तर अत्यंत संवेदनशील आणि समजूतदार दृष्टीने त्यांना समजून घेते. त्यामुळे पुस्तक वाचताना आपणही त्यांच्या भावविश्वात शिरत जातो. प्रस्तावनेपासूनच हे पुस्तक मनाची पकड घेतं. शब्दांमधून कृष्णाचा एक वेगळाच किनारा उलगडत जातो आणि मग सुरू होते एक वैचारिक यात्रा. कधी मन अस्वस्थ होतं, कधी खोल शांत होतं, तर कधी स्वतःच्या आयुष्याकडे नव्याने पाहायला भाग पाडतं. महाभारतातील या स्त्रिया केवळ इतिहासात किंवा कथांमध्ये राहत नाहीत; त्या आपल्या विचारांत, संवेदनांत आणि जगण्याच्या प्रश्नांत येऊन उभ्या राहतात. “कृष्ण किनारा” हे असंच मनात बराच काळ रेंगाळणारं पुस्तक आहे.

अरुणा ढेरे यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५७ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे एम.ए. आणि पीएच.डी.पर्यंतचे संपूर्ण शिक्षण पुण्यातच झाले. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, भारतीय संस्कृती आणि प्राचीन साहित्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या त्या कन्या. त्यामुळे बालपणापासूनच त्यांना समृद्ध साहित्यिक आणि वैचारिक वातावरण लाभले. घरभर जमिनीपासून छतापर्यंत रचलेली पुस्तकं, साहित्यिकांची ये-जा, चर्चांचं वातावरण आणि शब्दांवरचं प्रेम यामध्येच त्यांचं बालपण घडलं. अरुणा ढेरे यांनी कथा, कादंबरी, कविता, ललित लेख, संशोधनपर लेखन, समीक्षा अशा अनेक साहित्यप्रकारांत विपुल लेखन केलं आहे. सहा कवितासंग्रह, कादंबऱ्या, कथासंग्रह, ललित लेखसंग्रह आणि अभ्यासपूर्ण पुस्तकांमधून त्यांनी मराठी साहित्य अधिक समृद्ध केलं. त्यांच्या लेखनात स्त्रीमन, लोकसंस्कृती, पुराणकथा, संतसाहित्य आणि मानवी नात्यांचा अत्यंत संवेदनशील वेध दिसतो.

माझ्यासाठी अरुणा ढेरे या फक्त मोठ्या लेखिका नाहीत, तर मनाच्या खूप जवळच्या लेखिका आहेत. त्यांचं प्रत्येक पुस्तक वाचताना असं वाटतं, कुणीतरी आपल्या मनातलं, आपल्या न बोललेल्या भावना शब्दांत मांडतंय. त्यांच्या लिखाणात खूप शांतपणा आहे, माया आहे, समजून घेणं आहे. काही ओळी तर इतक्या आतपर्यंत भिडतात की बराच वेळ मन त्याच विचारांत हरवून जातं. त्यांची पुस्तकं वाचणं म्हणजे फक्त कथा वाचणं नाही, तर स्वतःलाच पुन्हा भेटण्यासारखं वाटतं. काही पुस्तकं संपतात… पण अरुणा ढेरे यांचे शब्द मात्र मनात खूप काळ राहतात.

या निमित्ताने माझ्या आवडत्या लेखिकेबद्दल लिहिण्याची संधी दिली त्याबद्दल अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेचे मनःपूर्वक आभार मानते,, आणि अरुण ढेरे यांच्या एका कवितेसह लेखाचे समारोप करते. 


घे स्वत:ला जवळ ... (जावे जन्माकडे संग्रहातून) 


वाढवणाऱ्या बांगड्यांचे तुकडे वेचून

काचकमळं करण्याचं वय मागे पडलं

की पार बदलून जातो काळाचा चेहरा.

अबोध राहात नाही हसणं

निरर्थाला भुलून भुलून फुलून येत नाही गाणं

आणि दिसेनाशा होतात हळूहळू पंख असलेल्या गोष्टी

रडू नको बाई, रडू नको


ठाऊक आहे, एके काळी झिपऱ्या उडवणारा

चटोर आनंदाचा वारा कसा मागे लागतो आता

गरम धुळीची कडेलोट गरगर होऊन

आणि मनाची भरली कळशी सांभाळत

तापल्या भुईवरून धापत चालताना

कोवळे पाय कसे जातात पार सोलवटून

आठवतं मलाही,आठवतं बाई


सुखाच्या लहान लहान मिरवणुका

अगदी वाजत गाजत ये जा करायच्या

आणि मन कसं तोरण बांधल्या दारासारखं,

अबीर गुलालानं माखून जाव्या नाचणभिंगऱ्या पोरी

तशा आपल्या स्वप्नांच्या बाहुल्या भोवती

आणि आता हळूहळू आपलंच ते जग होत जातंय पारखं

पिचल्या बांगडीसारखं रुपतं आता आयुष्य

हे एक तुला ठाऊक की मलाही


आणि सांजेच्या गडदमिट्ट दिशांनी

गेल्या वर्षांचा अंधार भुतासारखा भीती दाखवतो

तेव्हा सैरावैरा होतात उरलेल्या आशाही

नको आता रडू, पूस डोळे


तसं मधाचं पोळं लागण्याचं भाग्य एखाद्या फांदीचं

पण नंतरचा पेटता जाळ आणि माशांची तडफड बघताना 

काळीठिक्कर होत जाण्याचं दैवही तिचंच

हे समजून घे बाई आणि डोळे पूस

हलक्या हातानं काढ उपसून जिवाला सलणारी तुसं

आणि घे स्वत:ला जवळ की जगात दुसरं कुणीच नाही त्याचं....!!! 


- अरुणा ढेरे


*लेख - रश्मी पदवाड मदनकर*






Comments

Popular posts from this blog

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

राधा-अनय