Thursday 22 August 2019

रूपाताई कुलकर्णी-बोधी


काही माणसांचा जन्म कुठल्यातरी कारणासाठी घडून आलेला असतो. त्यांच्या जीवितकार्यासाठी नियतीशी जन्माआधीच ठरलेला करार असावा यावर विश्वास बसावा इतके एखाद्याचे आयुष्य कार्याशी करार असल्यागत प्रामाणिक पुढे सरकत राहतं त्यांच्या हातून आयुष्याला पुरून उरणारी महत्कार्य होत जातात. आणि हे कार्य वाचतांना किंवा ऐकतांना पुढल्या पिढीचा नियतीवरचा विश्वास फिका पडतो कारण या माणसांच्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीवर नियतीही भाळलेली दिसते आणि आपला त्यांच्या कर्तृत्वावरचा विश्वास अधिक प्रगाढ होत जातो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे वाईट वाटणार नाही असा माणूस विरळाच पण या घटनांसाठी संवेदनशील होत परिस्थितीशी तह करत, वंचितांच्या आयुष्याची नवी घडी बसवण्याचे मनसुबे रचवत,  अक्ख्या समाजातच मन्वंतर घडवून आणण्याच्या आर्त तळमळीने अग्निकुंडात उडी किती जण घेत असतील? 

'एखादा विचार दीर्घकाळ दुर्लक्षित राहिला म्हणून महत्वाचा नसतो असे नाही, निव्वळ बहुमताच्या जोरावर  त्याला डावलण्याची युक्ती कोणीतरी वापरते आणि मग तीच वहिवाट बनून जाते' असे रूपाताई म्हणतात पण मग अश्या या धगधगत्या जगाच्या उंबरठ्यावरून बाहेर पडत एकल वाट चोखाळणाऱ्या, नवस्त्रीवादाची संकल्पना आणि पुनर्मांडणी करणाऱ्या रूपाताई कुलकर्णी म्हणूनच तर जगावेगळ्या ठरतात. केवळ एखाद्या आयुष्याचे नाही तर एका पिढीच्या अर्ध्या लोकसंख्येची यातना त्यांनी जगासमोर करुणेने मांडली आणि ती बदलून आणण्याच्या आंतरउर्मीने संघर्ष करण्याची प्रमाथी ताकद मिळवून तळपत्या वाटेने चालत पेटते पलितेच पदरी ओढून घेत राहिल्या पण हा मार्ग मात्र कधीच बदलला नाही.  

रुपाताई जन्मभूमीने आणि कर्मभूमीनेही तश्या नागपूरच्याच, कार्यक्षेत्र मात्र विदर्भापर्यंतच्या व्याप्तीचं. ८० च्या दशकात स्त्री चळवळीतल्या मुख्य सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आजही रुपाताईंचे नाव अग्रगण्य आहे. वडील अप्पासाहेब हे त्याकाळचे डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते. आईचे नाव प्रमिला नोकरीपेशा हळव्या मनाची स्त्री, सर्व त्यांना बाई म्हणत. व्यक्ती आणि समाज यांच्यामधले नाते सूक्ष्मांतिसूक्ष्म जिवंत धाग्यांनी विणले गेलेले असते तसेच जाणीव आणि आत्मभान हे आंतरिक आणि बाह्य अशा अनेक घटकांमधून आकाराला येत असते तसेच झाले. सतत घरात होणाऱ्या चर्चा, मैत्री परीवारातली संगत, बौद्धिक, वैचारिक वातावरणात घडलेल्या जडणघडणेने फार लहान वयात त्यांची सामाजिक जाण जागृत झाली होती. आज गेल्या ४० वर्षांपासून त्या स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत. विशेषतः असंघटित महिला कष्टकऱ्यांची संघटनबांधणी आणि त्यांच्या हक्कांसाठीचा लढा त्या अविश्रांत देतायेत. मोलकरणींच्या समस्यांबाबत काहीतरी करायला हवे ही ठिणगी मनात कधी अन कशी पेटली या प्रश्नांवर त्या कातर हळव्या होतात आणि या सर्व चळवळींची त्यांच्या आयुष्यातली पहीली खरी नायिका असणाऱ्या लक्ष्मीचा किस्सा सांगू लागतात ...  

तो ६६-६७ चा काळ होता रूपाताई नुकतंच हिस्लॉप महाविद्यालयात नोकरीला लागल्या होत्या वय होते २१ वर्ष. त्यांच्याघरी नियमित येणारी मोलकरीण होती तुळसाबाई पण हिच्याशिवाय पंच्याहत्तरीतली पाठीतून वाकलेली, पार थकलेली जक्ख म्हातारी लक्ष्मी खूप दुरून फुटाळावरून रवीनगरपर्यंत चालत यायची, व्हरांड्यात येऊन बसून राहायची. 'बाई पालव दे' अशी हाक घालायची, मग बाई (आई) तिला बसायला बारदान द्यायची, पोटभर खायला द्यायची, चहा-पाणी द्यायची, कपडे द्यायची. त्या साऱ्याची परतफेड म्हणून लक्ष्मी अंगण झाडून द्यायची, कधी तांदूळ निवडून द्यायची, रुपाताईंना प्रेमाने बोलावून डोक्यात तेल लावून द्यायची, काळजीनं विचारपूस करायची. लक्ष्मीशी हळूहळू ममत्वेचे, जिव्हाळ्याचे नाते होत गेले. महाविद्यालयातून परत आले कि तिचे व्हरांड्यात बसून दिसणे सवयीचे होत गेले. एक दिवस मात्र अचानक लक्ष्मी येईनाशी झाली.. खूप दिवस गेले. एकदा तिच्या शोधात तिची झोपडी असणाऱ्या वस्तीत रूपाताई गेल्यावर कळले कि म्हातारपणामुळे इतक्या दूर चालत येणे जमत नाही म्हणून नजीकच्या रस्त्यावर-देवळात ती भीक मागून उदरनिर्वाह करते .. पुढे कधीतरी कळले ती आता या जगातच राहिली नाहीये. या प्रसंगाने रूपाताईंच्या मनावर प्रखर परिणाम केला. स्वतःचा गुजराण करणंही कठीण असणाऱ्या या स्त्रियांच्या एकलकोंड्या आयुष्याचे कसे धिंडवडे उडतात हे पाहणे असह्य होऊन त्यांनी या महिलांसाठी काहीतरी करायचे ठरवले आणि हि चळवळ उभी राहिली. नंतर ग्रुप चळवळी सुरु झाल्या पण या सर्वांच्या सुरु होण्यामागे 'लक्ष्मी' ही नायिका होती असे रूपाताई निक्षून सांगत राहतात. 

मोलकरणीची संघटना बांधल्यानंतर रवीनगर सोडून टिळक नगरला राहायला आल्यानंतर रीतसर आणि जोमाने या चळवळीचे काम सुरु झाले होते. त्यावेळी त्या नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागात प्राध्यापिका होत्या. कॉलेज संपले कि कधीच सरळ घरी न जाता या कामकरी महिलांच्या वेगवेगळ्या भागातल्या वस्तीत जायच्या तिथल्या स्थितीचे, त्या महिलांच्या जगण्याचे अवलोकन करायच्या; त्यांच्या अडचणी-समस्या समजून घ्यायच्या. मग टिळक नगरच्या मैदानात बैठक व्हायच्या त्या समस्यांवर किंवा त्यांच्या गरजांवर तोडगे शोधले जायचे. या वेळपर्यंत मोलकरणींना ह्यांची ओळख पटू लागली होती. त्यांच्या गोटात रुपाताईंचा आदर वाढू लागला होता. या महिला स्वतःहून समस्या घेऊन ताईंपर्यंत पोचू लागल्या होत्या. 

हा सर्व संघर्ष चालू असताना कुठल्या मुख्य अडचणी येत असतील हा प्रश्न माझ्या मनात रुंजी घालत होता, वाटलं शासनापासून प्रशासनापर्यंत अडचणींची जंत्री लागेल. या कामामध्ये तोंड द्याव्या लागणाऱ्या माणसांच्या यादीत नामवंतांची नावे समोर येतील; पण असे झाले नाही. या सर्व प्रश्नांचे उत्तर एकंच होते 'मध्यम वर्गीय लोकांची मानसिकता'.. अरेच्छा ! हे कसे ? माझा प्रश्न ... उत्तरादाखल रूपाताई एक किस्सा सांगत्या झाल्या..

अजनीनजीकच्या झोपडपट्टी वस्तीतली एक म्हातारी मोलकरीण जवळच्याच सुखवस्तू एरियातल्या एका इमारतीत कामाला जात असे. आजीला मदत म्हणून १२ वर्षांची चिमुकली नातही सोबत जात असे. एकदा मालकिणीचा कुठलासा दागिना गहाळ झाला. मागचा पुढला कुठलाही विचार न करता मालकिणीने नातीवर आळ घेतला.. पोलिसांनीही सख्तीने विचारपूस केली. ह्याचा परिणाम त्या चिमुकलीवर असा काही झाला कि तिने झोपडीबाहेरच्या छोट्या मोरीमध्ये स्वतःला जाळून घेतले..नंतर तो दागिना मालकिणीला घरच्याच कुठल्या सदस्याजवळ सापडला... ती निष्पाप पोर मात्र जीवानिशी गेली...हा एक प्रसंग..दुसरा.. एकदा मालकिणीच्या घराबाहेर उघड्या मोरीवर काम करणाऱ्या एका मोलकरणीवर रस्त्याने जाणाऱ्या ट्रकने भिंत तोडून गाडी चढवली. तिचाही जागीच मृत्यू झाला. अश्या घटनांमध्ये विशेषतः चोरीच्या घटनांमध्ये अनेकदा पोलीस प्रशासनांमार्फतही या मोलकरणींना मदत करायची सोडून उलट त्याच लोकांना, त्यांच्या घरच्यांना जास्तीत जास्त त्रास होईल असे घडत राहते. त्यांच्या घरची झाडाझडती होते त्यांचे जगण्यासाठी महत्प्रयासाने जमवलेले सामान फेकफाक केले जाते, नासधूस होते, सगळं काही विस्कटतं. या विरुद्ध आवाज उठवला की या मध्यम वर्गाला मात्र त्रास होतो. चमडी बचाओ प्रवृत्ती बाहेर येते. या गरीब महीलांना सहकार्य करायचे सोडून विरोधासाठी मात्र हे संघटित होऊ लागतात. त्याकाळी तरुण भारतात रूपाताई विरुद्ध जवळपास शंभरेक पत्र आली असतील. त्यातले अनेक त्यांच्यावर वैयक्तिक ताशेरे ओढणारी, नको ते आरोप करणारी पत्र देखील असायची. हा काळ खूपच मानसिक त्रासाचा होता.    

या देशाचा सर्वात मोठा रोग म्हणजे गरिबी! स्वातंत्र्य, सुरक्षा आणि प्रतिष्ठा हे या देशातील प्रत्येक नागरिकाचे हक्क आहेत. फार मोठ्या प्रमाणात सामान्य भारतीय स्त्री या तिन्ही हक्कांपासून वंचित आहे. उदा. मोलकरणी, बांधकाम मजूर स्त्रिया, कचरा चिवडणाऱ्या, भंगार वेचणाऱ्या महिला ! केस गोळा करणाऱ्या महिलांच्या झोपड्यांसमोर तर माणसा माणसांच्या उंचीचे ढीग लागलेले असतात. त्या केसांच्याच ढिगावर तिथली मुलं खेळतांना दिसतात. वस्तित दूरवर घाणीचे साम्राज्य असते. रोगाचा प्रादुर्भाव सगळीकडे पसरलेला असतो. या सगळ्या महिलांना कशाचेच संरक्षण नसते. यांच्या आरोग्याची कोणी दखल घेत नाही. कुठली घटना झालीच तर कुणीच जबाबदारीही घेत नाही. सरकार दरबारी कसले धोरण यांच्या बाजूने नाही. प्रशासनाला यांच्याबद्दल कुठलीच आपुलकी नाही. ह्यांना अतिशय वाईट वागणूक दिली जाते. यांच्या कामाचे स्वरूप पाहता आरोग्याच्या अनेक समस्या ह्यांना असू शकतात याकडे कुणाचेच लक्ष नाही. ह्यांच्या मुलांना शिक्षण नाही, त्यामुळे भविष्याची काहीच तरतूद नाही. यासगळ्यांचा विचार करता या महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर, स्त्रीरोग कँसर तपासणी, आपतग्रस्त महिला सेल, भरोसा सेल सारख्या पोलीस खात्याची मदत घेऊन त्यांच्यावर होणाऱ्या हिंसेच्या समस्या सोडवणे अश्या अनेक प्रकारची मदत रूपाताईंची संघटना आजतागायत करत राहिली. आपत्कालीन प्रसंगी हि माणसे राहत असणाऱ्या जागी मदत पुरवणे फार महत्वाचे असते. त्या सांगतात २००६ चा काळ होता त्यावेळी पूर आला होता. कुंभार टोळी वस्तीत तेथील माणसांच्या मदतीला गेले असतांना अचानक अंगात ताप भरून आला.. नंतर तपासणीत लक्षात आले चिकन गुनिया झाला होता. पुढला बराच काळ शारीरिक वेदनांचा गेला. अश्या अनेक समस्यांशी त्या झुंजत राहिल्या. पण थांबल्या कधीच नाही.. नागपूरातल्या अनेक वस्तींवर वंचीतांच्या मुलांकरीता ओसरीवरच्या शाळा सुरू केल्या..नावही तेच ठेवलं 'ओसरी'. या महिलांच्या हक्कासाठी संघटनेने अनेक आंदोलनं केलीत. अतिक्रमण विभागाविरुद्ध 'चुल्हा जलाओ आंदोलन, सर्व स्तरातील विस्कळीत कामगारांना एका छत्रछायेत आणा हे सांगणारं छत्री आंदोलन, रेल रोको/रास्ता रोको आंदोलन. २०११ ते २०१४ या काळात 'घरगुती कामगार कल्याणकारी बोर्ड' स्थापन करण्यात आले त्यात सदस्य म्हणून काम करीत असतांना अनेक धोरणं पास करवून घेऊन राबवली गेलीत. त्यानंतर मात्र तो बोर्डच सरकारने बरखास्त केला ही खंत रूपाताईंना आजही सतावते. 

या चळवळीच्या काळातच वर्ष १९९२ मध्ये रुपताईंनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. समाजात पितृसत्ताकता, वर्ग, जात, धर्म आणि भांडवली दमनयंत्रणातुन होणारे अन्याय, ज्यातून लैंगिकतेचे ढाचे प्रस्थापित झाले, आणि स्त्रियांमध्ये असमान सत्तासंबंधातल्या उतरंडी रचल्या गेल्या ..धार्मिक विद्वेषाच्या विखारी वातावरणात होरपळत घडत जाणाऱ्या बाईच्या जगण्याकडे कुणाचे लक्ष क्वचितच गेलेले दिसते. अश्यात स्वतःतील प्रतिकारी जाणीव प्रत्ययाला येऊन रुपाताईंनी त्यांचा स्वतःचा मार्गच बदलला. लोकांनी त्यांना 'बोधी' अशी पदवी बहाल केली. त्याच वर्षी 'दलितमित्र' हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. पुढे बौद्ध धम्माचा, संविधानाचा, बाबासाहेबांच्या थिअरीचा त्यांनी अभ्यास केला. स्त्री-स्वातंत्र्याची बुद्ध विचारांच्या अंगाने मांडणी करणारे थेरीगाथांचे संशोधन केले. अनेक वैचारिक पुस्तकं, समीक्षात्मक ग्रंथ प्रकाशित केले. विविध वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन केले. त्यांचे सगळे लेखनच क्रांतिकारी उर्जेने भारलेले आहे. 39 वर्ष त्यांनी संस्कृतचे अध्यापन केले. रुपाताईंना सावित्रीबाई फुले पुरस्कार, कुसुमताई चौधरी महिला कल्याणी पुरस्कार, इंडियन मर्चंट चेंबर प्लॅटिनम ज्युबिली आणि महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार इ. पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  

रूपाताईंचे वय आज जवळजवळ ७० वर्ष. लग्न करून स्वतःचा संसार मांडून चार माणसांचे घर चालवण्यापेक्षा या लाखो महिलांच्या कुटुंबालाच आपले मानून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आणण्यास झटणाऱ्या रूपाताई आजही त्यांचे सणवार, त्यांच्या मुलांचे वाढदिवस या महिलांच्या घरी जाऊन साजरा करतात. पांढरपेशा लोकांमध्ये त्यांचे मन लागत नाही. मी सहज त्यांना विचारले ''रूपाताई एवढ्या मोठ्या संख्येच्या महिलांमध्ये तुम्ही वावरता..या अशिक्षित बायकांना जगण्याचे कायदे कदाचित माहिती नसणार.. तुमच्या लढ्याची जाणीव त्यांना असेल नसेल त्या कधी पावतीही देत नसतील, सभ्यता-दाक्षिण्य न समजणाऱ्या या गटाच्या  वागण्याचा कधी त्रास झाला नाही का??'' त्यावर रूपाताई गोड हसतात, म्हणतात ''या सगळ्या असंघटित कामगार महिला अशिक्षित असतीलही पण असभ्य कधीच नसतात. त्यांच्या सान्निध्यात आपणच अनेक गोष्टी शिकत राहतो, इतर सुखी वर्गापेक्षा या वर्गाची सोबत जास्त समाधानकारक आहे'' असे त्या सहज शैलीत सांगत राहतात.       

गेल्या तीस वर्षांच्या प्रवासात कितीतरी कार्यकर्ते, अनेक महिला जुळत गेल्या आणि १ लाख सदस्यांचे हे संघटन आजमितीस सुदृढपणे उभे झाले आहे. यातल्या अनेक महिला आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने, स्वबळावर जगतात आहेत. त्यातल्या कितीतरी व्यासपीठावरून हक्कांची मागणी करायला, आपल्या समस्या ठासून सांगायलाही शिकल्या आहेत. त्या म्हणतात हा लढा शेवटपर्यंत कायम राहणार आहे. ६० वर्षांच्या पार असलेल्या कामगार महिलांसाठी पेन्शन योजनेत तरतूद असावी, समता, स्वतंत्रता, एकोपा समाजात रुजावयास हवे. असंघटित कामगारांच्या  निदान अन्न-वस्त्र-निवारा-आरोग्य या प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्यात. मूलगामी उपाययोजना, पॉलिसी योजना लागू व्हाव्या. मुख्यतः बजेटमध्ये यांच्यासाठी महत्वपूर्ण वाटा असावा ह्या प्रखर मागण्या आहेत. परंतु नेमके आंदोलन कोणत्या तत्वांवर आधारित आहे हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. 

स्त्रीसशक्तीकरणाच्या ज्या नऊ सूत्रांवर प्रामाणिकपणे व्यावहारिक तत्वांवर हे आंदोलन चालवण्याचे, यशस्वी करण्याचे प्रयत्न होतायेत ते खालीलप्रमाणें 
१.पारंपरिक श्रमविभागणीला छेद देणे. स्त्रियांना समान हक्क मिळवण्यासाठी संधी देणे. 
२.गृहिणींनाही अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध करून देणे. 
३. श्रमिक महिलांसाठी उत्पादक श्रमाचा मान राखून समान कामाला समान दाम देणे. 
४. श्रमिक स्त्रियांसाठी स्वतंत्र आरोग्य धोरण आखणे 
५.मुलींची शाळागळती थांबवणे     
 ६. पुरुषप्रधान व्यवस्था व पितृसत्ताक मूल्यांचा सातत्याने विरोध करणे
७. पुरुष व आजची तरुण पिढी यांच्यात स्त्री विषयक दृष्टिकोनात वैचारिक बदल घडवून आणणे 
८. मुलींच्या वाढीसाठीचे निकष बदलणे 
९. स्त्रियांची पुरुषावलंबी मानसिकता बदलणे. आत्मविश्वास वाढवणे. 
हे व असे ग्राउंडलेव्हलवर  काम करतांना स्त्रीचळवळीला उपयुक्त असे अनेक मुद्दे एकत्र करून व्यापक पातळीवर 'नवस्त्रीवाद' घडवून आणण्याचा प्रयत्न ही संघटना रुपाताईंच्या मार्गदर्शनात गेली कित्तेक वर्ष करतेच आहे. संघटनेचे सचिव श्री विलास भोंगाडे शिवाय सुरेखा डोंगरे, छाया चवळे, सुभद्रा धकाते, छाया सोमकुंवर, कांता मडामे, वंदना फुले, ममता पाल, सुजाता भोंगाडे, सरीता,सुहास, ज्योती ही सगळी मंडळी या संघटनेची शिलेदार आहेत.  

कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरणानुसार जगण्याचे येणारे आत्मभान काळाच्या त्या त्या बिंदूवर महत्वाचे होत असते. काहींचे थोडे अपुरे, अप्पलपोटे आणि काही वेळा मतलबी होते आणि काही संवेदनशील माणसांची जगण्याची तऱ्हा त्यामुळे बदलते. `जग बदल घालुनी घाव, गेले सांगून मला भीमराव’ असे म्हणत समाज बदलायला पदर बांधून उठलेल्या या रणरागिणीचा लढाऊ बाणा आंबेडकरी आणि बुद्धवादी विचारांच्या मुशीतून तयार झालेल्या रूपाताईंसारख्या लढाऊ आयुष्याचे आकलन करण्यात माझी बौद्धिक झेप कदाचित कमी पडेल. पण रुपाताईंनी मांडलेल्या या नव्या भूमिका, एक नवी विजिगीषु परंपरा आणि परिवर्तनाच्या लढयातून स्त्रियांना देऊ केलेले स्वत:च्या स्त्री पणाचे क्षमतेचे ओजस्वी भान अख्या समाजाला यापुढेही प्रेरणादायी ठरणार आहे हे निश्चित.

- मुलाखत आणि शब्दांकन - रश्मी पदवाड मदनकर 



(महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव करणारे कॉफीटेबल बुक नुकतेच महिला सक्षमीकरण आणि लहान मुलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या पुण्यातील ‘ग्रॅव्हीटस फाउंडेशन’ Gravittus Foundation या सामाजिक संस्थेनं प्रकाशित केलं. आपल्याला अश्या एखाद्या गौरवास्पद उपक्रमाचा भाग होता यावे याहून मोठा आनंद काय असेल. या कॉफीटेबल पुस्तकात मला वरिष्ठ समाजसेविका 'रूपाताई कुलकर्णी-बोधी' यांच्यावर लेख लिहिण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने अनेकदा त्यांच्याशी भेटी झाल्या, समाधान देणाऱ्या चर्चा घडून आल्या. खरतर त्यांच्या कामाबद्दल बरीचशी माहिती होतीच पण त्यांच्या जवळ येण्याची, त्यांच्या कामाचे स्वरूप जाणून घेण्याची, त्यांना जवळून ओळखण्याची संधी मला या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. याकाळात रुपाताईंबद्दल भरपूर वाचन केलं .. त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांपासून ते त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपर्यंत सगळं चाळून काढलं... इतकं करूनही त्यांच्या कार्याला कितपत न्याय देता आला ही माझी मला शंका आहेच. तरीही हा छोटासा प्रवास प्रगल्भ करणारा आणि अतिशय समाधान देणारा ठरला हे मात्र निश्चित.. रूपाताई तुमच्यावर लेख लिहितांना तुमच्यासोबत असतांना तुमच्यावर प्रश्नांची भडीमार करतांना, खूप किस्से ऐकावे वाटताहेत म्हणून तुम्हाला सतत बोलते ठेवतांना, माझ्या जिज्ञासा शमवतांना तुम्ही न थकता मला साथ दिलीत, मी छान लिहू शकेन म्हणून सतत प्रोत्साहन दिले.. प्रेम जिव्हाळा दिलात त्याबद्दल मी सदैव तुमच्या ऋणातच राहू इच्छिते.
या कामासाठी माझे नाव सुचवणारे, माझ्यावर विश्वास दाखवणारे मा. श्रीपाद अपराजितShripad Vinayak Aparajit सर, याकाळात मी सतत तुम्हाला त्रास दिला खूप खूप चर्चा आणि माझी बडबड पण तुम्ही ते मोठ्या मनाने समजून घेतलंत. कामाच्या व्यापात दिलेली वेळ निघून जाऊनही मला पुरेसा वेळ देत माझ्याकडून हे नोबल कार्य घडवून आणलं.. त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. नव्याने मैत्री झाली असूनही अजिबात नवीन न वाटणारी सखी मेघा शिंपी Megha Shimpi, हिने पुस्तकाच्या निर्मितीपासून प्रकाशनाच्या आयोजनापर्यंत घेतलेले कष्ट आणि त्यातून निर्माण झालेली ही सुंदर कलाकृती सगळंच वाखान्यासारखं. तुझे खूप अभिनंदन आणि धन्यवाद सखे.
एखादा लेख सरते शेवटी निव्वळ लेख उरत नाही..खूप काही पदरी पाडून जाणारा ठरतो तसाच हा ठरला. खूप दिवसापासून हे सगळं सांगायचं होतं.. सगळ्यांचे आभार मानायचे होते, उशीर झाला... पण हरकत नाही भावना कायम राहणार आहेत.)

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...