कुछ घर उम्रभर साथ चलते हैं....
'पॅकर्स अँड मूव्हर्स'चा ट्रक दुपारीच निघून गेला. घरातलं आवश्यक सामान काळजीपूर्वक बांधून, पेट्यांमध्ये बंद करून, तो मुंबईहून नागपूर शहराच्या रस्त्याला लागला. उरलेल्या काही वस्तू कुणाकुणाला द्यायच्या होत्या, काहींची निरवानिरव बाकी होती. त्यामुळे आम्ही अजून काही तास त्या घरात थांबलो. ट्रेन रात्रीची होती. घाई नव्हती. एकेक खोली रिकामी होत गेली तसं घराचं रूप बदलत गेलं. भिंती तिथल्याच होत्या, खिडक्या त्याच होत्या, पण त्यांच्यावरचा आपलेपणाचा हात निसटत चालला होता. घर जणू हळूहळू घरपण उतरवून ठेवत होतं. सगळं आटोपलं. शेवटचं कुलूप लावण्याआधी आम्ही एकदा घरभर नजर फिरवली. तेव्हा नवरा सहज म्हणाला, "सगळं घेतलंय ना? काही राहिलं तर नाही?" मी क्षणभर काहीच बोलले नाही. काय सांगणार होते त्याला? सामान म्हणजेच सगळं नसतं ना... या घरात एक कोपरा आहे. अगदी साधासुधा. कुठल्याही आगंतुकाच्या नजरेत न भरणारा. पण माझ्यासाठी तो घराचा आत्माच जणू. त्या कोपऱ्यात बसून कितीतरी संध्याकाळ पाहिल्या आहेत. उगवता चंद्र, मावळता सूर्य, हवेची झुळूक, पावसाच्या सरी, मृदगंध, पाखरांची किलबिल, कुणाचातरी निरोप, कुणाकुणाची प्र...