Monday 27 May 2019

प्लेटॉनिक लव्ह ..

सदर - नाद-अनाहद
आपण जागृत अजागृत अवस्थेत असतांनाही आपल्या मनाला भावणाऱ्या विषयांशी घट्ट जुळलेले असतो. रोज उल्लेख होत नसला तरी ते मनात सदैव तरळत राहतात आणि अचानक कुणीतरी संथ पाण्याला स्पर्श केल्यावर पाणी डुचमळतं आणि तरंग उठून ते विषय पुन्हा मनःपटलावर येऊन ठाकतात. अमृता -साहिर- इमरोजच्या विषयाएवढाच राधा-कृष्ण-मीरेचा किंवा कृष्ण-राधा-अनय हे विषय माझे अत्यंत आवडते विषय आहेत. रोज रोज बोलावे, वाचावे, लिहावे, चर्चावे असेच. 'एक सुरत दिवानी,एक मूरत दिवानी,एक प्रेम दिवानी,एक दरस दिवानी' हे असो किंवा  'सावरे की बन्सी पुकारे राधा नाम, लोग करे मीरा को यूही बदनाम' हे. अंतर्मनाचा शोध घेणाऱ्या, चिंतन स्तरावर आणून सोडणाऱ्या काही कल्पनातीत भक्तीच्या अनोख्या रूपातील कहाणीच्या अध्यात्मिक अंगाचा शोध घेतांना आत्मपातळीवर प्रेमाच्या अनुभूतीची कंपन अनुभवायला लावणाऱ्या मीरेबद्दल मी पामराने काय लिहावे ... मला तर वाटतं मीरा लिहायची नसते, मीरा संवेदनेच्या तरल स्तरावर, अलगद शिरकाव करून अंतर्मनाच्या खोल तळाशी मिटल्या डोळ्याने ध्यान-साधनेच्या शारीरिक - मानसिक अवस्थेत जाऊन ठिबकत ठिबकत आत आत डोहात साठवायची, जपायची असते. आयुष्याच्या उष्ण-आर्द्र क्षणाच्या, वेदनेच्या शिखरावर, एकलकोंड्या भावनेचा आवेग सुटला कि मनाची सारी कवाडे लावून घेऊन, शांत, स्तब्ध पोकळीतून मीरेला हाक घालायची, हि आतली मीरा डोकावली पाहिजे ... तादात्म्याच्या ताकदीवर पुढ्यात येऊन बसली पाहिजे ... उत्कट प्रेमाच्या अनुभूतीवर निराकार प्रेमाच्या प्रतिकृतीचा अनुभव घ्यायचा असेल तर मीरा कळली पाहिजे... असं कधीतरी लिहून ठेवलं होतं ते अश्यावेळी उगाच आठवत राहते.

राधा अन कृष्ण या आवडणाऱ्या संकल्पना, पण आजवर आपण त्यांच्या किशोरवयीन आणि तारुण्यातल्या कथा वाचल्या आहेत. झालेच तर अगदी बालपणीच्याही कथा ऐकल्या वाचल्या आहेत. पण कधी राधा कृष्णाची उतारवयातली कथा वाचली आहे?? .. ती फार रोचक आहे बघा. अरुणा ढेरे यांच्या 'कृष्ण किनारा' पुस्तकात त्यांनी लिहिले आहे, ''आयुष्याच्या उत्तरार्धात राधा कृष्णाला भेटायला येते. कंसवधासाठी गोकुळ सोडल्यानंतर ते भेटलेलेच नसतात. तो प्रसंग फारच सुंदर आहे ... ती अनयबद्दल सांगत असते, तिच्या प्रत्येक सासूरवासाच्या वेळी तोच तिच्या सोबत असतो. कृष्णावरून जेव्हा सासू बोल लावत असते तेव्हा तोच तिला धीर देत असतो ...अनेकदा तिच्या जखमांवर लेपही तो न बोलता लावतो, कोणतीही तक्रार न करता तो सदैव हसत तिच्या सोबत वावरतो ..राधेचा एक क्षणही कृष्णाच्या आठवणी शिवाय जात नसे हे सारं तो आनंदानं सहन करतो'' हे सगळं वाचल्यावर अनयबद्दल आपसूक एक संवेदना जागृत होते सहानुभूती वाटू लागते..

राधा ही अतिशय लोभसवाणी कविकल्पना आहे. माझ्या वाचनात तर आलंय कि कृष्णाविषयीच्या हरिविजय या व्यासरचित ग्रंथात राधा हे पात्र नाहीचेय. पांडुरंग शास्त्री आठवले राधा हे एक रुपक आहे असे मानतात. रा...म्हणजे रास आणि धा...म्हणजे धावणे असे त्यानी सांगितले आहे. पण भागवतात दशमस्कंदात भ्रमरगीतात गोपी आणि राधेच्या रूपाने उद्धवाशी संवाद साधत सगुणभक्ती रुजवण्याच्या व्यासांच्या अल्पशा बीजाचा सूरदास आणि नंतरच्या संत कवीनी त्याचा वटवृक्ष करत नेला कारण त्या विषयीच आकर्षण हे त्यामागचं कारण असावं  ..मधुराभक्तीचा तो कळसाध्यायच म्हणावा लागेल. अनय ...राधेचा नवरा ही तर फार नंतरची भर ...इरावती कर्वे ,दुर्गा भागवत यांनी यावर प्रकाशझोत टाकला आहे ...अरुणा ढेरे यांनी कृष्णकिनारा या त्यांच्या पुस्तकात राधा, कुंती आणि द्रौपदी चित्रणात राधा आणि अनय यांच्या नात्याचे अतिशय सुंदर कंगोरे दाखविले आहेत.

मला वाटतं राधेचं प्रेम एक अनन्यसाधारण प्रेम आहे. यात मिळवणे किंवा कमावणे यापलीकडचा उद्देश अन आशय आहे. Its a platonic love. तिचा कृष्ण शारिरीक बाबतीत जवळ नाही. पण आत्म्याचे मिलन कृष्ण राधेबरोबर आहे तसे ना पुराणात ना इतिहासात सापडू शकेल.. ते एकमेवाद्वितियच.  मला आठवते मी कुठेतरी वाचलं होतं एकदा कृष्ण राधेचे कपडे घालतो आणि तिला प्रेमाचे पुर्णत्व समजावुन देतो. दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात असतांना एकमेकांत इतके विरघळतात कि पुरूषामध्ये स्त्री गुण येणे आणि स्त्रीमध्ये पुरूष गुण येणे हि प्रेमाच्या पुर्णत्वाकडे जाण्याची एक पायरी वाटावी.  राधा मोहन हे प्रेम म्हणजे beyond any kind of gain  शिवाय कृष्ण अलौकिक अनन्यसाधारण पुरूष त्यामुळे राधा शारीरिक दृष्टीने त्याच्याजवळ नसली तरी  आत्मिक पातळीवर ते एकमेकांत विलीन झालेले होते.

राधा-कृष्णा सारख्या दोन पात्रांच्या निरलस निरागस निस्वार्थी प्रेमाच्या प्रतिकांबद्दल आपण अनेकदा ऐकले आहे, पण  मला कृष्णाचं राधावरच्या प्रेमापेक्षाही अनय हे पात्र आणि त्याचं प्रेम निस्वार्थ अतुलनीय आहे असं वाटतं.  इथे अनय आणि इमरोजच्या आयुष्याची घडी का कुणास ठाऊक सारखी आहे असंही वाटत राहतं आणि म्हणून माझं मत असं कि, राधा असणं किंवा अमृता मिळणं फार कठीण नाही पण राधा किंवा अमृता मिळूनही अनय होणं किंवा इमरोज असणं त्यांचं शेवटपर्यंत तसंच टिकून राहणं अतिशय कठीण काम आहे. यांचं असणं अनन्यसाधारण आहे शतकानु शतकात जन्मलेले हे चमत्कार आहेत आणि म्हणून बरेचदा ते आहेत किंवा होऊन गेले हा विश्वास बसत नाही आणि त्यांच्या न पटणाऱ्या अस्तित्वाच्या आड पटणारे कुठलेतरी तर्क सापडतील म्हणून शोधत राहतात अनेकजण आणि त्यातून निर्माण होतात अनेक तर्क अतर्काच्या कहाण्या.

या संदर्भात धर्मवीर भारतीच्या 'कनुप्रिया' संग्रहातल्या रचना मला अतिशय आवडतात. कनुप्रिया म्हणजे कान्हाची प्रिया. यात वर्णनं आहेत राधेची, कृष्णाची, त्यांच्या प्रेमाची अशी अनेक गोष्टींची जी वाचत राहावी वाटतात. यातल्या एका दीर्घ कवितेतल्या काही ओळी ईथे देतेय ...

कौन था वह
जिस ने तुम्हारी बाँहों के आवर्त में
गरिमा से तन कर समय को ललकारा था!
कौन था वह
जिस की अलकों में जगत की समस्त गति
बँध कर पराजित थी!
कौन था वह
जिस के चरम साक्षात्कार का एक गहरा क्षण
सारे इतिहास से बड़ा था, सशक्त था!
कौन था कनु, वह,
तुम्हारी बाँहों में
जो सूरज था, जादू था, दिव्य था, मन्त्र था
अब सिर्फ मैं हूँ, यह तन है, और याद है।
मन्त्र-पढ़े बाण-से छूट गये तुम तो कनु,
शेष रही मैं केवल,
काँपती प्रत्यंचा-सी
अब भी जो बीत गया,
उसी में बसी हुई
अब भी उन बाहों के छलावे में
कसी हुई
जिन रूखी अलकों में
मैं ने समय की गति बाँधी थी -
हाय उन्हीं काले नागपाशों से
दिन-प्रतिदिन, क्षण-प्रतिक्षण बार-बार
डँसी हुई
अब सिर्फ मैं हूँ, यह तन है -
- और संशय है
- बुझी हुई राख में छिपी चिन्गारी-सा
रीते हुए पात्र की आखिरी बूँद-सा
पा कर खो देने की व्यथा-भरी गूँज-सा ......


- रश्मी पदवाड मदनकर 

Thursday 16 May 2019

केमिकल लोचा



काही गोष्टी दिसतात, भिडतात...सरळ आत शिरतात अन् दबकून बसतात तिथंच..सलत राहतात.
तगमग करतात जीवाची. धड आत राहत नाहीत अन बाहेरही पडत नाहीत.
कुठूनही कसंही अगदी गर्दीतूनही अलगद निघून जाता यायला हवं.. काहीही न पाहता, न लावून घेता, न जुळवून-भिनवून घेता, न भिडता ...कुठेच,कुणीच, काहीच अडकून न पडलेलं. स्वच्छ- निर्मळ शरीर मन घेऊन. आयुष्य कसं ना आत बाहेर ट्रान्सपरंट असायला हवं. कसलंच ओझं नसलेलं आयुष्य जगणं अन सोडूनही जाणं सोप्प असतं मग .. असं सगळं कळतं पण वळत मात्र नाहीच.

तो एमबीबीएसचा मुन्नाभाई 'केमिकल लोचा' आहे असं म्हणाला होता तेव्हा ती गम्मत वाटली होती. पण केमिकल लोचा काय असतो ते कळायला लागण्याआत आपल्या डोक्यातच केमिकल लोचा झाला हे लक्षात आले. गम्मतच वाटते कधीकधी, आणि प्रश्नही पडतो.. आपल्यालाच हे असं होतं का? मनात शिरलेले पण नकळत बुद्धीच्या कुठल्याश्या कोपऱ्यात वर्षानुवर्षे अडकून पडलेले, अडगळीतले असे कित्तेक जुने विचार त्याचा गुंता अजून सुटत नसतांना नव्या विचारांच्या धाग्यावर गाठी सोडवण्याचा प्रयत्न करत बसतो आपण. हे काही विचार पुसता आले तर किती बरे ? कोरी करकरकरीत पाटी काळीकभीन्न असली तरी मिळावी ना पुन्हा एकदा.... पुन्हा रेघोट्या ओढता याव्यात आपल्या मनासारख्या. हव्या त्या आकारात-रंगात .. पण असे होते कुठे?

दिवसाच्या कोणत्याही प्रहरी अगदी रात्री बेरात्रीही कुठल्यातरी विचारांचा किडा मनात शिरतो. हळूहळू डोकं वर काढत जातो; त्या किड्याला पाय फुटतात, तो रेंगाळत बुद्धीत प्रवेश करतो. त्या चिवट किड्यातून चिकट स्त्राव स्त्रवू  लागतो तो भटकत राहतो आणि त्या स्रावाचे तार तयार होतात, एकात एक गुंतत जातात आणि त्या एका चिमुकल्या विचाराचे डोक्यात कोळिष्टकं तयार होऊ लागतात. बरं इतक्यावर कुठे सगळं थांबतं ?? त्या कोळिष्टकांवर दुसऱ्या कुठकुठल्या विचारांचे किडे येऊन बसू लागतात, खोल रुतत जातात, गुंतागुंत होते सगळी आणि बुद्धीचा भुगा होतो. विचारांच्याही अनेक छटा असतात नाही ? काही विचार आपले आपल्यालाच आलेले, काही हसवून-रडवून, दुखावून वगैरे कुणीतरी थोपलेले तर काही कल्पनेच्या अवकाशातून बरसलेले. कधी कधी वाटतं... नसतोच आपण शिकलो बिकलो तर, नसतेच पाहिले रंग जगाचे, नसते दुःख मानून घेतले वाईटाचे, आनंदाच्या उकळ्या नसत्या फुटू दिल्या, वेदनेचे कढ थोपवले असते, सौन्दर्य बिंदर्य दृष्टी नसतीच जोपासली कधी ...तर काय बरं बिघडलं असतं? कुठे काय .... बेगडी माणसं जगतातच ना सुखाने? असे मस्त उंच उंच उडतांना पक्षी कुठे करत असतील विचार बिचार..झाडे डोलतातच ना विचाराविना. उन्ह-सावल्यांचा खेळ चालतोच ना ? पाऊस वारा, दिवस रात्र, चंद्र तारे सगळे सगळे युगानुयुगे कायम आहेत. ते कुठे शोधतात बुद्धीला खाद्य? ते कुठे करतात तत्वांचा विचार? आपणच मेले अतिशहाणे...

मानवशरीरातला हा 'बुद्धी' नावाचा प्रकार फार त्रासदायक असतो खरतर. 'अज्ञानात सुख' आहे असं म्हणतात ते उगाच नाही. बुद्धीचा संबंध नेमका कशाशी असतो.. वयाशी असतो का.. कि ज्ञानाशी ? नाही नाही तो अनुभवाशी असावा. माहिती नाही पण फार बुद्धीचा वापर व्हायला लागला कि इतरांना त्याचा कितीसा फायदा होतो माहिती नाही पण ज्याला ती सतत वापरावी लागतेय किंवा ती उगाचच प्रगल्भ झाल्याने छोट्या छोट्या गोष्टीतही डोकं वर काढत आपलीच वापरली जातेय त्या व्यक्तीला मात्र त्याचा सतत त्रास होतो हे तितकेच खरे आहे. फार वैचारिक किंवा तात्विक बित्त्विक असू नये माणसाने ही समज येईपर्यंत त्या टोकाला पोचलेला असतो माणूस आणि या टोकापासून परतीचा मार्ग नाही हे लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अवती भवती होणाऱ्या प्रत्येकच वाईट गोष्टी चटकन निदर्शनात येत असतील, आसपास दिसणाऱ्या अनेक चुकीच्या गोष्टी बदलण्याची जबाबदारी आपलीच आहे असं वाटत असेल. चांगल्या गोष्टी रुजाव्यात म्हणून आपल्याकडून वारंवार प्रयत्न होत असतील. सतत बौद्धिक वैचारिक गोष्टींची ओढ लागली असेल.  वागणे-बोलणे पचत नसेल आणि त्याहून अधिक त्यामुळे मनःस्ताप होऊ लागला असेल. माणसांना पारखायची सवय लागली असेल ... एकटेपणा आवडायला लागला असेल ? कमी बुद्धीक्षमतेची,  बाळबोध विचारांच्या माणसांचं सान्निध्य नकोस व्हायला लागलं असेल. गप्पांहून अधिक पुस्तकं, चित्रपटसारख्या गोष्टीत मन रमायला लागले असेल. शांतता चोहीकडे असूनही जन्माची अस्वस्थता लागून राहिली असेल तर आपण त्या स्टेजला पोचतोय असे समजायला हरकत नाही.

बघा, आताही नेमकं करतोय काय आपण.. विचारांचे 'फुगेच' फुगवत बसलोय...पोकळ विचार निव्वळ हवा असलेले. धावतोय धावतोय आपण कायम धावतोय विचारांच्या मागे... थांबायला हवं. विसावायला हवं जरा वेळ.

(हिंगोलीहून प्रकाशीत होणारे 'दैनिक गाववाला' वृत्तपत्रातील 'नाद-अनाहद' या सदरातला या आठवड्यातला हा माझा दुसरा ललित लेख )

-रश्मी पदवाड मदनकर 





Friday 10 May 2019



सिगरेटच्या टोकावर शिलगावलेल्या 
चिमूटभर निखाऱ्याएवढीच
धग पेटली होती तुझ्या मनात ..
सिगरेट जळायला लागावा तेवढ्याच
वेळाचं नातं तू टिकवू  शकला
ओठावर रेंगाळू शकलास
नंतर धूर काढून टाकावा
शरीरातून, नाकातोंडातून बाहेर
आणि राख द्यावी झटकून
तसेच धुत्कारत गेलास
नात्यातल्या संवेदना, हळवे क्षण
आठवणी वगैरे ..

पण सिगारेट पिऊन झाल्यावर
तू भिरकावलेलं ते उष्टं थोटूक
मी धरून ठेवलंय अजून
ते जळतंय..धूर सोडतंय..
संपत चाललंय .. चटका बसतोय .

आणि हे सतत नजरेसमोर दिसणारं चित्र
माझी वेदना कायम ठेवतंय
तू या चित्रालाच चुरगाळून फेकून तरी दे
तरीही आठवणीत उरलीच मी जरा
तर .. एक कर
तू माझीही सिगरेट कर
पेटवून घे , झुरके घे .. जळू दे
राख कर.. धुरात उडवून लाव
थोटूक उरेलच तरीही ..
 धरून ठेवू नको ..फेकून दे ..
मातीच होऊन जाऊ दे...

मातीच होऊन जाऊ दे !

- रश्मी पदवाड मदनकर 


गेले द्यायचे राहून ...


बारा, साडेबारा झाले असतील. थंडीच्या दुपारच्या उबदार सोनजर्द उन्हासारखा आजचा दिवस तिला हवाहवासा उगवला होता. कोपऱ्यातल्या रेडिओत मंद आवाजात किशोरींची रागदारी सुरु होती 'अवघा रंग एक झाला...', शब्द वातावरणात भरून राहिले होते. गुणगुणतच आभानं पुन्हा एकदा आरशात वाकून पाहिलं. साडीच्या निऱ्या नीट केल्या. खांद्यावर घेतलेला पदर एकेरी करत हातावर पसरून घेतला. हातातल्या कंगनाची किणकिण झाली. कानातले डूल हळूच हलले, डोळ्यांची लकलक अन ओठांवर स्मित पसरलं. आज तिच्या मनभर चांदणं फुललं होतं. ती आरशाजवळ अगदी जवळ आली हाताने केस नीटशे करीत अगदी पुढ्यात दिसणाऱ्या पांढऱ्या केसांना उगाच लपवण्याचा प्रयत्न केला ...आणि आपण हे काय वेडे चाळे करतोय म्हणून परत तिचे तिलाच हसायला आले.


जसजशी वेळ जवळ यायला लागली तिला अधिक बेचैन व्हायला लागले, आज जणू तिचा चातक झाला होता. ती पुन्हा पुन्हा जाऊन डायनिंगवरची जेवणाची भांडी नीट करू लागली. फ्लॉवरपॉटमधल्या निशिगंध फुलांना पुन्हा रचून ठेवू लागली. लक्ष सारं दाराकडे लागून होतं. आज सारं सारं त्याच्या आवडीचं असावं याची विशेष काळजी तिनं घेतली होती, त्याला आवडतात म्हणून निशिगंधाची फुलं फुलदाणीत सजवली होती. त्याच्यासाठी म्हणून पुरणपोळी अन पुडाची वडी तयार होती. त्याच्या आवडीच्या लिंबूरंगाची सुती साडी नेसली होती. खूप वर्षांनी तो येणार होता, जवळ जवळ २० वर्षांनी. तिच्या हृदयाचे ठोके वाऱ्याच्या गतीने धडकत होते. वारंवार नजर घड्याळीकडे जात होती. तिची अस्वस्थता तिच्याच लक्षात आली आणि ती पुटपुटली

'काय हे विभा, वयाच्या पन्नाशीत नवतरुणीसारखी काय वागतीयेस. गेले अगं तुझे ते दिवस सावर स्वतःला' तिला उगाच हसायला आलं. तिनं स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. सोफ्यावर बसत पुढ्यात ठेवलेलं मासिक हातात घेत ती ते चाळत बसली. पण मन लागेना .. खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या अंगणात सांडलेल्या अर्धमरगळल्या पिवळ्या-पांढऱ्या चाफे फुलांकडे पाहत तंद्री लागली आणि विचारांच्या आवर्तनात मागले २५ वर्ष भरभर सरकत गेले...

'आपली अवस्था या चाफ्याहून वेगळी नाही. पूर्ण फ़ुलण्याआत आयुष्यात वादळ घोंगावत आलं, नाही सावरून धरता आलं आपल्याला सगळं एकत्र आणि अखेर गळूनच पडलं सारं.. न धड फुलता आलं न पूर्ण वाळून, चुरगाळून जाता आलं. फक्त विस्कळत गेलं सगळं...'


बाहेरच्या ओसरीवर त्याच्या पावलांचा आभास ..दाराची बेल वाजली... तंद्री भंगली. डबडबलेल्या डोळ्याच्या कडा पुसत शांतपणे साडी सावरत ती दाराकडे चालत गेली.

एक लांब श्वास .. दाराची कडी उघडली.


काही मिनिटं गेली तशीच ....एकमेकांकडे पाहत, हृदयाची धाकधूक सांभाळत.

व्याकूळ हालचाली सावरत ..दोघंही भानावर आलीत.

''ये आत'' ती

तो आत येऊन बसला. अवखळत-संकोचत.

तिनं पाणी आणलं. पुढ्यात ठेवलं. अन समोरच्या सोफ्यावर बसली.

संपूर्ण घरात एक निरव शांतता कोंदून राहिल्याचा भास.

''कसायेस ?'' ती

''ठीक....तू?''

''बरीये ! कुठे होतास एवढे दिवस ?''


काही सेकंड अशीच .. त्याची नजर शून्यात , एक निश्वास टाकत तो म्हणाला

''हरवलो होतो ...''

ती .... साश्रू निशब्द

काही क्षण पुन्हा शांतता..


बराच वेळ तसाच गेला... शांत..स्तब्ध


त्याने संकोचत प्याला उचलला घटाघटा पाणी प्यायला अन पुन्हा ठेवून दिला

त्यानं एकदाही तिच्या डोळ्यात डोळे घालून पहिले नाही. ती मात्र त्याच्याकडे टक लावून पाहत होती.


पूर्वीचे राजबिंडे स्वरूप लोप पावले होते ....डावीकडे झुकती त्याच्या ओठांची हास्यरेषा आठवली तिला, डाव्या गालावर खळी पडायची..डोळ्याची चमक आणि गालातली खळी एक प्रसन्न मुद्रा परावर्तित व्हायची. बघत राहावं वाटायचं, वाटायचं हे स्मित असंच राहावं कायम आणि आपण हरवले जावं या मुद्रेच्या गावात आयुष्यभर. जगण्याचं रसरशीत बेफाम वेड, व्यसनात जगणं आणि नंतर जगण्याचंच व्यसन करत गेलेला हा, असं बेबंद वागणं ह्याला कुठल्या मार्गावर घेऊन गेलंय, कि आपल्या अपेक्षांच्या ओझ्यानं अन नंतर वियोगानं विखुरलाय हा? रणरणत्या उन्हात भटकून भटकून पार रुक्ष होऊन त्वचा काळवंडली जावी तशी त्याच्या तनामनाची अवस्था झाली होती. याचं असं तुकड्या तुकड्यात बोलणं, नजरेला नजर न देणं.. डोक्यावर भूतकाळातल्या स्मृतीचं प्रगाढ ओझं घेऊन हा ओढतोय जगणं बहुदा ..




तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं...




खालच्या मानेने टेबलवर उगाचच रेघोट्या ओढत काही क्षण भयंकर शांततेत गेले... पापण्यांआड पाण्याच्या लाटांवर लवलवणा-या बिंबाकडे एकटक पहात हरवली ती, तो पुढ्यात असूनही तिचं मन त्याच्या भूतकाळातल्या प्रतिमेभोवताल पिंगा घालत होतं. पुन्हा विचारांची आवर्तनं

'हे काय झालंय याच? एकेकाळी ह्याच्या राजसी रुपावरच तर भाळलो होतो आपण? त्याचं बहारदार बोलणं, चालण्यातली ढब, गोरंपान रुबाबदार रूप सगळं सगळं आपलं व्हावं अगदी हक्काचं म्हणून घरी झगडलो होतो. अतिशय सुसंस्कृत घराणेशाहीतून वाढलेली आपण त्याच्या अगदीच साधारण निम्नवर्गीय घरात जायला तयार झालो होतो... नाही किंबहुना आसुसलो होतो. आपलाच तर निर्णय होता ह्याच्याशी लग्न करण्याचा. किती स्वप्न होतीत आपली संसाराची, जोडी-गोडीच्या आयुष्याची. पण काच फुटायला अन स्वप्न तुटायला कितीसा वेळ लागतो ... संसार मोडायलाही तेवढाच वेळ लागला... यालाही असेल का त्या संसार मोडण्याचे दुःख, ह्याच्या मनाचा काहीच थांग लागत नाही..अजूनही तसाच..आत्ममग्न.'




एक सुस्कारा.. आसपास नीरव शांतता, तिनं त्याच्याकडे पाहिले... सोफ्याला टेकून डोकं मागे रेटून वर छताकडे पाहत तो कुठल्या विचारांच्या हिंदोळ्यावर होता कुणास ठाऊक. दोघं आपापल्या विचारात गढली होती. कुठल्या क्षणी नीटनेटक्या संसाराची घडी चुरगळायला लागली कुठला होता तो घातक क्षण जेव्हा एकमेकांची साथ सोडत दोघांनाही पायउतार व्हावे लागले. ती आठवत राहिली. पुन्हा तिच्या विचारांचे चक्र गरगर फिरत राहिले.




'हा असाच आहे ..होता, समजायला वेळच लागला आपल्याला. लग्नाआधी उमेदीच्या काळात याच्या ज्या ज्या गोष्टी आकर्षक वाटल्या त्याच संसार करताना खटकत राहिल्या. संसार दोघांचा नव्हताच तो. हा असूनही कुठं होता .. मी एकटीनंच तर निभावत होते. आयुष्याचा मोठ्ठा प्रवास एकटीनं पार करणं जिकीरीचंच नव्हतं का? पलीकडे, त्या टोकाला पोहोचायचं असतं सगळे खाचखळगे पार करत ... साथ नको ? फक्त प्रेम आहे म्हणून कसा ओढायचा एकटीनं रहाटगाडा? चूक झाली होती आपण दोन ग्रहावरची दोन नक्षत्र काय सिद्ध करायला एकत्र आलो होतो कोण जाणे ... पण अपयशी झालो ना रे...

चूक करण्यासाठी काही क्षण पुरतात, पण ती चूक पेलत राहावी लागते सबंध आयुष्य !! इकडे हा वाहवतच चालला होता. आशेचे एक एक दार बंद होतांना दिसत होते....खूप खूप तडजोडी करूनही, खूप प्रयत्न करूनही हा सुधारू शकेल असे वाटले नाही. अंशू झाल्यावर तर याच्या वाईट वागण्याची सावली देखील तिच्यावर पडू द्यायची नव्हती. खूप संधी दिल्या आपण, पण याला नव्हतेच जमत सुधारायचे. दिवसेंदिवस परिस्थिती अधिकाधिक हाताबाहेर जाऊ लागली, नाही निभावता आले आपल्याला. मन मारून, इच्छा आकांक्षा दडपून, मनाची दारं घट्ट बंद करून आतल्या आत हुंदके देत बसण्याचा, क्षणोक्षणी पराभूत होऊन जगण्याचा कंटाळा आला होता, त्याच्या निम्नस्तरीय वागण्या बोलण्याच्या तऱ्हा, वाहवत गेलेल्या, व्यसन जडलेल्या, कर्जाने पिचलेल्या ह्याला मग एक दिवस सोडूनच देण्याचा निर्णय घेतला. नाती-गोती, घरदार सगळं सोडून नोकरीच्या भरवशावर फक्त अंशुला सोबत घेऊन पुण्यातून मुंबईत दाखल झालों आपण...त्यानंतर नाहीच वळून पहिले कधी... हो आठवण येत नव्हती असे नाही, पण कशालाच काही अर्थ राहिलेला नसताना त्याच्या अश्या अर्थहीन क्षुल्लक कृतींची मीच आवर्जून दखल घेण्याला अन त्यात ताटकळत पडण्याला काहीच अर्थ नव्हता. पुन्हा पुन्हा नव्यानं जखमी होऊन पुन्हा पुन्हा त्याच्या कुंपणाच्या आत निमुट परतायची ताकद संपली होती माझी. आणि मग माझ्या आयुष्यातला तुझा अध्याय मी कायमचा बंद करून टाकला.' तिच्या मनात विचारांचे वावटळ सुरूच होते, डोळ्यातून अश्रू वाहू लागले..



पण, आज त्याच्याकडे पाहून तिचे मन कारुण्याने भरून गेले होते... ह्याला असे एकट्याला सोडून देण्यापेक्षा ह्याला सावरायला हवं होतं का आपण? ह्याच्या या परिस्थितीला आपणच कारणीभूत आहोत का?' खूप कंठ दाटून आला तिचा...



तो अजूनही आढ्यावरचा गरगरता पंखा पाहत, कुठल्याश्या विचारात मग्न होऊन बसला होता.



डोळ्यातले पाणी लपवायला ती उठली डायनिंग जवळ जाऊन उभी राहिली...


''चल जेवून घेऊया, भूक लागली असेल ना तुला ?''


''नाही भूक नाहीये अजून, तुला पाहून भूकच गेली माझी'' तो तिच्याकडे बघत अवखळत बोलला.


''पण मला लागलीय ना तुला बघून भूक... आज..ये आधी जेवून घेऊ मग बसुया निवांत बोलत.'' ती त्याच्या डोळ्यात बघत.


अन्न गरम करायला म्हणून ती आत गेली. तो जागचा उठला. घर न्याहाळू लागला. फुलदाणीतल्या निशिगंधाला स्पर्श केला. बाजूला ठेवलेल्या अंशू अन आभाच्या फोटोकडे एकटक बघत राहिला. फार बदललं होतं सारंच, अंशू तर तिच्या आईसारखीच सुंदर आत्मविश्वासाने भरलेली दिसत होती. एवढ्याश्या वयात मिळवलेल्या अनेकानेक यशाची आभा तिच्या चेहेऱ्यावर स्पष्टच दिसत होती.. अंशू अन आभा सोडली तर निशिगंधाच्या फुलांचाही त्याला विसर पडला होता.

पाण्याने भरलेला जार तिने डायनिंगला आणून ठेवला त्या आवाजाने त्याची तंद्री भंगली. अन तो हात धुवायला वॉशरूमकडे वळला.

..........


व्यसनं, कर्ज ह्यानं पिंजून जनावरासारखं वागणं घरातली चिडचिड, आभा-अंशुवर हात उचलणं .. भुतकाळातील हे सगळं आठवून दिवाकर भावुक झाला होता. हा त्रास टाकून आभा निघतानाचा तो दिवस ते क्षण दिवाकरच्या नजरेसमोर उभे राहिले. तिचं हवं नको ते सारं सामान तीनं भावाच्या मदतीनं आधीच पाठवून दिल होत. जायच्या दिवशी देवाला हात जोडून एक बॅग हाती घेऊन अंशुला घेऊन ती निघाली होती. रेल्वे स्थानकावर आभा पुढे पुढे चालत होती आणि दिवाकर पावणे चार वर्षाच्या अंशुला छातीशी घट्ट पकडून आभाला थांबवण्याचा प्रयत्न करत तिच्या मागे मागे. गाडी प्लॅटफॉर्मवर येऊन उभी राहिली. दिवाकरने अंशूचे पटापट पापे घेतले अन आभाला ऐकायला जाईल या भाषेत म्हणाला


''तुझा बाबा तुला लवकरच घ्यायला येणार आहे..पण तोवर आईला त्रास देऊ नको बाळा, मी आजवर दिला तो त्रासच फार झालाय तिला '' आभानं वळूनही पाहिलं नाही..आणि गाडी अंतर वाढवत दूर निघून गेली.



त्याचे हे शेवटचे वाक्य मात्र आयुष्यभर अखंड त्रास देत राहिले आभाला. त्या दिवसानंतर तो कुठे आहे, कसा आहे ह्याची साधी विचारपूसही तिनं केली नाही. उलट कुणीच त्याचा विषय काढू नये कारण त्यामुळे अंशुला आठवण येऊन त्रास होऊ नये.. आणि तिला स्वतःलाही एकट्यानं खंबीर उभं राहता यावं म्हणून ती झटत राहिली.


''मी निघून गेल्यावर काय केलंस रे, कधी पुन्हा लग्न करावं नाही वाटलं? '' आभाच्या प्रश्नानं त्याची तंद्री तुटली.


एक लांब सुस्कारा .. ''तू गेल्यावर तुला परत आणायला म्हणून सगळं सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होतो, दारू सोडून दिली.. कर्ज मात्र माझी पाठ सोडत नव्हते खूप गुंतत चाललो होतो. तुझ्या परत येण्याच्याही साऱ्या आशा नाहीत जमा झाल्या. मी आतल्या आत खंगत होतो. मग एक दिवस त्वेषात येऊन ते घर, शहर सारं सोडून निघून गेलो.. भटकत राहिलो पाय आणि मन नेईल तिकडे.. तुम्हा दोघींचा शोध घेत वणवण झाली जीवाची. नाहीच भेटल्या तुम्ही कुठेच; हळू हळू जीव तुटणं बंद होऊ लागलं, आपले हक्काचे जिवाभावाचे कोणीच नाही, आपण एकटेच उरलोय या विक्राळ जगात हे मान्यच करून टाकलं होतं. खूप भिरभिरलो, टक्के टोणपे खाल्ले, हाल-अपेष्ठा सहन केल्या आणि तेच सारं मग अंगवळणी पडलं.'' हे सगळं सांगतांना दिवाकरची नजर अंगणात विखुरलेल्या पाचोळ्यांकडे लागली होती. आभाचे डोळे मात्र पूर्णवेळ पाझरत राहिले.



पुन्हा दोघात शांतता ..


आभाचे मन पुन्हा भूतकाळाच्या हिंदोळ्यावर सवार झाले 'हे काय करून बसलो आपण .. ह्यानं त्या त्या वेळी अगदी आपल्या कोवळ्या वयात, उमेदीच्या काळात केलेल्या अनेक चुका नव्हे गुन्हाच, आपण माफ करू शकलो असतो का ? ह्याचा संसार न मोडता सहन करत आपल्याला जगता आले असते का असे प्रश्न ती स्वतःलाच विचारत राहिली .. मनात आले नाही नाही नसतेच झाले सहन, आणि का म्हणून सहन करायचे. फक्त आपण प्रेम केले होते याच्यावर म्हणून ? पण आपण सहन करत राहिलो असतो तर सुधारला असता का हा? ... आशूच्या असण्यानं आपल्या जगण्याला एक ध्येय तरी होतं.. पण आपल्या जाण्यामुळे फाटका झालेला संसार आणि वणवण झालेल्या जगण्याने पार नासवून टाकलं एका आयुष्याला' विचार करतच तिनं पदर डोळ्याला लावला.


''तुला नाही आली कधी आठवण ?''


दिवाकरांच्या प्रश्नानं ती जरा बावचळली, स्वतःला सांभाळत स्मित करत बोलती झाली.


''आठवण...अनेकदा यायची..माझ्यासाठी नव्हे पण अंशूसाठी. मी तिचा बाबा हिरावून घेतलाय हे तिच्या डोळ्यात दिसायचे; पहिले पहिले अनेक वर्ष तेच शल्य टोचत राहिलं. तिचा कुठलाही गुन्हा नसताना ती शिक्षा भोगतेयं ह्याचं दडपण असायचं सतत.. पण नंतर जसजशी मोठी होत गेली हळूहळू स्वीकारत गेली परिस्थिती .. पण मला न सांगता ती तुझा शोध घेत असते हे पाहिलंय मी ... आठवण अश्या सहज पुसल्या जात नाहीत रे. त्रासदायकच असतात त्या. ''


झोपाळ्यावर बसून गप्पा मारता मारता संध्याकाळ होत आली. तांबड फुटलं होतं. सूर्य कलायला लागला होता.



दिवाकर आता खूप शांत झालेला जाणवत होता. त्याच्या श्वासाची गती शांत झाली होती. आभाच्या मनात त्याच्याविषयीची करुणा, माया, ममता, प्रेम, जिव्हाळा सगळं एकत्र दाटून आलं होतं. आपल्या जाण्यानं ह्याच्या आयुष्याची झालेली वाताहत आपण भरून काढायची .. निदान आयुष्याच्या उत्तरायणात तरी सोबत करायची असा निश्चय करून तीने त्याचा हात थोपटला, केसात हात फिरवला अन ती चहा करायला म्हणून आत निघून गेली.



चहाचे कप हातात घेऊन परत आली तेव्हा दिवाकर तयारीत बसला होता..अगदी शांत चित्तानं त्यानं आभाच्या हातातला चहाचा कप घेतला. आभाच्या मनाची मात्र घालमेल चालू झाली. चहा घेऊन झाल्यावर दिवाकरने आभाचे दोन्ही हात हातात घेतले. ''माझ्या पूर्वीच्या सगळ्या चुकांना माफ कर आभा..माझ्यासाठी नव्हे तर तुझ्यासाठीच. तुम्ही दोघी आनंदात आहात हे बघूनच मी भरून पावलोय. तुझ्यासोबत मनाजोगता संसार करण्याची इच्छा अखेरपर्यंत अपुरी राहिल, ही खंत शेवटपर्यंत पाठ सोडणार नाही...पण....आता ती सवय नाही राहिली " दोन थेंब घरंगळून तिच्या हातांवर सांडले.



आणि मग तिच्यासारखाच तो निघून गेला ....



रश्मी पदवाड मदनकर
15.11.2018


















Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...