Posts

Showing posts with the label सामाजिक

सभ्यतेचा मुखवटा आणि सोशल मीडियावरील विद्रूप चेहरे...

Image
  आपण स्वतःला प्रगत, सुशिक्षित आणि आधुनिक समाजाचा भाग समजतो. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि विकासाच्या गप्पा मारतो. पण सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीच्या पेहरावावर, शरीरयष्टीवर, त्वचेच्या रंगावर किंवा तिच्या लैंगिक ओळखीवर होणाऱ्या टिप्पण्या वाचल्या की या सभ्यतेचा मुखवटा किती पातळ आहे, याची जाणीव होते. मतभेद असणे स्वाभाविक आहे. एखाद्या व्यक्तीच्या विचारांशी, भूमिकेशी किंवा कृतीशी असहमती व्यक्त करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र असहमती व्यक्त करताना व्यक्तीचा अपमान करणे, तिच्या शरीराची टिंगल करणे किंवा तिच्या अस्तित्वालाच कमी लेखणे ही विकृती आहे. दुर्दैवाने सोशल मीडियाने अशा विकृत विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. विशेषतः एलजीबीटी समुदायातील व्यक्तींविषयी अनेकांच्या मनात आजही गैरसमज आणि पूर्वग्रह आहेत. समाजाने आखून दिलेल्या चौकटीत जे बसत नाहीत, त्यांना हिणवण्याचा जणू काही परवाना मिळाल्यासारखे अनेक जण वागतात. पण "सामान्य" कोण आणि "असामान्य" कोण, हे ठरवण्याचा अधिकार कोणाला दिला आहे? एखाद्या व्यक्तीचा पोशाख, तिची ओळख किंवा तिची जीवनशैली हे तिच्या माणूसपणाचे मोज...

नसरापूर घटनेच्या निमित्ताने...

  ज्या दिवशी ही घटना घडली, अगदी त्याच दिवशी माझी अडीच वर्षांची भाची दिवसभर राहायला घरी आली होती, सोबत दहा वर्षांची मोठी भाची. आमचा अक्खा दिवस या चिमुकल्यांचे चैतन्याने भरलेले वावरणे, त्यांचा खळाळता आनंद पाहण्यात गेला. खेळता खेळता या देवाच्या फ़ुलपाखरांना टेबलाचा कोपराही लागू नये, जरा खरचटूही नये म्हणून केवढं जपत होतो आम्ही. इतक्या नाजूक. इतक्या कोवळ्या की आयुष्यात त्यांना जराशीही इजा पोहोचू नये...त्यांचा आनंद चिमूटभरही कमी होऊ नये, त्यांच्या वाट्याला सदैव भली माणसे यावीत असं वाटत राहिलं. आणि म्हणूनच त्याच दिवशी घडलेली ती घटना फारच जिव्हारी लागली. गेल्या महिनाभर झालेल्या घटनांनी खूप उदास, खूप अस्वस्थ वाटतं आहे… एवढं की सगळं सोडून कुठेतरी दूर पळून जावं असं मनात येतं. या कुठल्या जगात राहतो आहे आपण ? हे जग आपल्यासाठी नाहीच, किंवा आपणच इथे राहण्याच्या लायकीचे नाहीयोत.. पण प्रश्न असा की जावं तरी कुठे? जिकडे पाहावं तिकडे माणसं… आणि त्यांच्या मनातल्या विचारांची-विकारांची गुंतागुंत... जितकी माणसे तितक्या वृत्तीच नाही; तर तितक्या विकृती. त्या विचारांना, त्या मानसिकतेला बदलणं आता जणू अशक...

साहित्यिक नकाशावर हरवलेली ओळख : वैदर्भीय स्त्री साहित्यिक !

Image
'नागपूर' हे केवळ भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेले शहर नाही, तर ते संस्कृती, शिक्षण आणि साहित्य यांचेही एक समृद्ध केंद्र आहे. “सारस्वतांचे माहेर” ही ओळख नागपूरने केवळ नावापुरती मिळवलेली नाही, तर अनेक प्रतिभावान साहित्यिकांच्या कार्यातून ती सतत सिद्ध होत आली आहे. या भूमीने घडवलेले लेखक, कवी, विचारवंत यांनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले असून भारतीय साहित्याची पत जागतिक स्तरावर उंचावण्याचे कार्यही केले आहे. नागपूरची सांस्कृतिक परंपरा अत्यंत वैविध्यपूर्ण आणि समृद्ध आहे. शिक्षणसंस्था, वाचनसंस्कृती, नाट्यसंस्कृती आणि विविध साहित्यिक उपक्रम यांच्या माध्यमातून येथे साहित्याची चळवळ नेहमीच जिवंत राहिली आहे. या वातावरणात घडलेल्या लेखकांनी केवळ शब्दांची मांडणी केली नाही, तर समाजाच्या वेदना, संघर्ष, आशा आणि बदल यांचे जिवंत चित्रण आपल्या लेखणीतून साकारले. विशेषतः, या सारस्वत भूमीने दिलेल्या स्त्री लेखकांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. पारंपरिक चौकटी मोडत, सामाजिक कुप्रथांना आव्हान देत आणि स्वतःचा स्वतंत्र आवाज निर्माण करत या लेखिकांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या ल...

संघर्ष, स्वाभिमान आणि मानवतेच्या वाटा - तृतीयपंथी समुदाय

Image
आपण आपल्याच विश्वात इतके मश्गुल असतो की या दुनियेत आपल्यासारखीच दिसणारी; पण नियतीनं वेगळा बेत आखला म्हणून संघर्षमय आणि नाईलाजास्तव सामान्यांपेक्षा वेगळं आयुष्य जगण्यास भाग असणारी अनेक माणसे आहेत याकडे आपले लक्षही नसते किंवा लक्ष असले तरी अंगाला-मनाला काहीही लावून न घेता बिनदिक्कत झापडे पांघरून आपल्याला निघून जाता येते. पण अशी झापडं सगळ्यांनाच लावता येत नाही; अगदी त्यांनाही नाही ज्यांना स्वतःच मदतीची गरज असते; आपलीच झोळी फाटली असतांना ती उरलेली लक्तरं घेऊन इतर गरजुंच्या मदतीसाठी पुढे येतात. नागपूर शहराच्या वर्दळीमध्ये अनेक समाजघटक आपापल्या संघर्षांसह जगत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा, पण दुर्लक्षित समाजघटक म्हणजे तृतीयपंथी समुदाय. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेले हे लोक आजही स्वतःच्या अस्तित्वासाठी, सन्मानासाठी आणि समान हक्कांसाठी झुंज देत आहेत. आपल्या समाजाने स्त्री आणि पुरुष अशा दोन ठराविक चौकटी उभ्या केल्या; मात्र त्या चौकटीत न मावणाऱ्या तृतीयपंथीयांकडे अनेकदा संशय आणि उपेक्षेच्या नजरेने पाहिले गेले. शिक्षण, नोकरी, निवारा आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत हक्कांसाठीही त्यांना सतत सं...

आपल्या संवेदना न मरो...

  शताब्दी चौकात दोनदोनच्या जोडीत त्या चौघी आळीपाळीने दिसत राहतात . पहिली जोडी आहे १३ - १४ वर्ष वयाची आणि दुसऱ्या दोघी असाव्यात २२ - २५ तल्या . विशेष म्हणजे चौघींजवळ चार बाळ आहेत .. अगदी छप्पर फाड के दिलंय बघा त्यांना देवाने . ही बाळं झोळीत निपचित पडलेली असतात किंवा कडेवर रडत , पेंगत बसलेली असतात , उन्हातान्हात , पावसात , धुळीत . दुसऱ्या १३ - १४ वर्ष वयाच्या ज्या दोघी आहेत . त्या स्वतःच किशोरी असताना त्यांच्याजवळ प्रत्येकी एकेक चिमुकलं असतं . सिग्नल लागला की त्या पुढे येतात , काच ठोठावतात . तुम्ही ' ये किसका बच्चा उठाकर घुमते हो ' असं विचारलं की त्या ' मेरा बच्चा है ' असं सांगतात आणि तुम्ही पुढला प्र श्न विचारण्याच्याआत भरभर चौक सिग्नल ओलांडून निघून जातात . मग पुढले काही दिवस गुडूप होतात . दिसत नाहीत ... मग पुन्हा येतात . पुन्हा झोळीत बाळं ; तीच का नवी …? माहिती नाही . प्रश्र्न असा की प्रत्येकीकडे एक या दराने असे किती चिमुकले असतात यांच्याकडे .. इतक्या ठोक भावाने कुठे मिळतात इतकी लहान मुले ? एका चौकात इतकी तर शहरात किती ? आणि राज्यात ? देशात ?   ही मुले जरा मोठी झ...

वेड्यांच्या दुनियेतली शहाणी माणसे -

शहाण्या माणसांच्या गजबजाटात काही चेहरे असे असतात, जे पहिल्या नजरेत “वेडे” वाटतात. विस्कटलेले केस, मळकट कपडे, असंबद्ध बडबड, तटस्थ नजरा; आपण त्यांना एका क्षणात वेडे ठरवून मोकळे होतो. पण कधी थांबून त्यांच्या जगण्याच्या पायवाटा शोधल्या, त्यांच्या कथा ऐकल्या तर लक्षात येतं की वेडेपणाच्या आवरणाखाली काही विलक्षण शहाणपण जपलेलं असतं. या शहाण्या दुनियेत जी माणसं वेडी ठरवली जातात, तीच कधी कधी आपल्याला माणूसपणाचा आरसा दाखवतात. त्यांच्या अस्ताव्यस्त रूपामागे लपलेला असतो स्वाभिमान, कर्तव्याची जाणीव, नात्यांनी दिलेल्या जखमा आणि तरीही जगण्याची हट्टाग्रही ओढ... हे सगळं आपल्याला विचार करायला भाग पाडते.  मनोविकार जडलेल्या आणि समाजाने वेड्या ठरवलेल्या माणसांना समाजाने अव्हेरली असली; तरीही त्यांच्यात माणुसकीची, विचारांची, चांगुलपणाची लव अखंड धगधगत असते. कुणी स्वच्छतेला आपला धर्म मानून झाडू हातात घेऊन रस्ते झाडतो; कुणी शब्दांविना शांतपणे उपाशीपोटी बसूनही आत्मसन्मान जपतो; कुणी भूतकाळाच्या चुकांची शिक्षा स्वतःलाच देत, तीन विटांच्या चुलीवर आपलं आयुष्य पुनःपुन्हा पेटवत राहते. त्यांच्याकडे मोठमोठ्या पदव्या न...

हिजाबपलीकडचा लढा : इराणमधील स्त्रियांचा विद्रोह

Image
कालच्या इराणमधील घडलेल्या युद्ध घटनेच्या जवळजवळ महिनाभरापूर्वी तरुण भारत आकांक्षा पुरवणीसाठी लिहिलेली ही कव्हर स्टोरी... युद्ध, हिंसा किंवा हत्या यांच्या विरोधात आपले संस्कार असले तरी, कुणासाठी दया दाखवावी याचेही भान आपल्याला असले पाहिजे... हजारो माणसांचा जीव घेणाऱ्या एका क्रूर माणसासाठी आपला जीव तुटत असेल, तेव्हा त्या हजारो माणसांच्या अत्याचारात आपण त्याच्यासोबत होतो हा त्याचा अर्थ असतो.. असे असेल तर आपण स्वतःची तपासणी आधी केली पाहिजे... इराणची सत्ता नेस्तनाबूत होण्याआधी इराणची परिस्थिती काय होती हे समजून घेतले पाहिजे... ***********  इंट्रो - जग फक्त मथळे स्क्रोल करत पुढे सरकत असताना, इराणच्या अंधारात एक अमानुष नरसंहार घडतो आहे. महिनोन्‌महिने चालू असलेल्या आंदोलनांवर सरकारने केवळ लाठीचार्ज किंवा अटकपुरते न थांबता थेट रक्तरंजित दडपशाहीचा मार्ग निवडला आहे. इंटरनेट बंदीच्या भिंतीआड हजारो लोकांचे आवाज दडपवले जाताहेत, गुदमरले जाताहेत, छायाचित्रे आणि व्हिडीओ बाहेर येणे थांबवले गेले आहे... म्हणूनच आतापर्यंत जगाला जे दिसत होते, ते फक्त “हिमनगाचा टोक” होते. आता जे सत्य हळूहळू समोर येते आहे...