कायांतर - तिसऱ्या अस्तित्वाची संघर्षकहाणी !



सुप्रसिद्ध लेखिका रश्मी पदवाड मदनकर यांची ''कायांतर'' ही तृतीयपंथीय नायिकेच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. समाजात अनेकदा जाणीवपूर्वक दुर्लक्षित राहणाऱ्या, दुभंगलेल्या आणि वेदनांनी भरलेल्या अशा एका जीवविश्वाचं तपशीलवार आणि हृदयस्पर्शी चित्रण लेखिकेने चरित्रात्मक कादंबरीच्या आकृतिबंधातून अत्यंत कुशलतेने केलं आहे. मिताक्षरी, संयमी आणि नेमक्या शैलीत त्यांनी हा चौकटीबाहेरचा विषय मोठ्या संवेदनशीलतेने हाताळला आहे. विशेष म्हणजे, अशा नाजूक आणि गुंतागुंतीच्या वास्तवाचं चित्रण करताना बीभत्सता किंवा अश्लीलतेचा स्पर्शही होऊ न देता त्यांनी अनुभवविश्वाचं सशक्त आणि प्रभावी दर्शन घडवलं आहे. त्यामुळे ही कादंबरी केवळ एका व्यक्तीची कथा राहत नाही, तर उपेक्षित अस्तित्वाच्या संघर्षाची आणि आत्मशोधाची व्यापक कहाणी बनते.

या संदर्भात ज्योत्स्ना देवधर यांची ''कुँवरनी'' (१९७१) ही कादंबरी आठवते. तसेच विदुषी दुर्गा भागवत यांच्या ''पैस'' (१९८८) या संग्रहातील ''जोगवा'' हा लेखही स्मरणात येतो. तृतीयपंथीयांच्या उपेक्षित, समाजाच्या कडेला फेकल्या गेलेल्या आणि सतत होरपळत राहणाऱ्या जगण्याचं वास्तव त्यांनी अत्यंत सूक्ष्मतेने उलगडून दाखवलं आहे. वैशाखाच्या तळपत्या दुपारी मुंबईच्या जीवघेण्या गर्दीतून बसने प्रवास करताना त्यांना डोक्यावर देवीच्या मूर्तीचा कलश घेऊन नाचणारा एक जोगती दिसतो...ना पूर्ण पुरुष, ना स्त्री; शरीरात सौष्ठव नाही, पण अंगावर नियतीचा भार. देवीचं प्रतीक म्हणून नाचणाऱ्या त्या उंच, बेंगरुळ्या जोगत्याकडे आणि त्याच्याकडे पाहणाऱ्या गर्दीच्या चेहऱ्यांवर उमटलेले अनामिक, अनाकलनीय भाव पाहताना दुर्गाबाई विस्मित होतात. त्या क्षणी केवळ एका व्यक्तीचं नव्हे, तर संपूर्ण उपेक्षित अस्तित्वाचं एक जिवंत, वेदनामय चित्र त्यांच्या संवेदनशील नजरेसमोर उभं राहतं.

कायांतर या कादंबरीची नायिका आंचल हिचं आयुष्य, तिची स्वप्नं, तिची झुंज आणि तिच्या व्यक्तिमत्त्वात दडलेली अदम्य जिद्द, अंतरीची उर्मी, माणुसकी आणि माया यांचा विलक्षण प्रवास या कादंबरीत उलगडतो. तिच्या वैयक्तिक जगण्याबरोबरच संपूर्ण तृतीयपंथीय समुदायाच्या वेदना, संघर्ष आणि अस्तित्वाच्या लढ्यालाही ही कादंबरी आवाज देते. हा सारा अनुभव कथानकाच्या नेमक्या आणि सुसंगत चौकटीत रेखाटण्याचं कसब लेखिकेने समर्थपणे साधलं आहे. अनेक दिशांनी भरकटण्याची शक्यता असलेल्या या गुंतागुंतीच्या विषयाचा तोल सांभाळणं सहज नव्हतं; पण लेखिकेने तो अत्यंत संवेदनशीलतेने आणि नेमकेपणाने पेलला आहे.

कादंबरीत लेखिकेने अश्विन अर्थात पुढे आंचल होणाऱ्या नायिकेच्या बालपणातील अत्यंत कष्टमय आणि वेदनादायी दिवस जिवंतपणे रंगवले आहेत. इतर मुलांपेक्षा वेगळं शरीर, मुलाला न शोभतील असे कोमल आणि भावपूर्ण मन, वेगळे हावभाव आणि हालचाली यामुळे अगदी सहाव्या-सातव्या वर्षापासूनच तो घरच्यांना जणू एखादी ब्याद वाटू लागतो. त्याचं अस्तित्वच आई-वडिलांना नकोसं झालेलं असतं. वडील बाहेरख्याली आणि व्यसनाधीन, तर सावत्र आई त्याच्या कुवतीबाहेरची कामं त्याच्यावर लादत राहणारी. घरात माया नाही, समजून घेणं नाही; फक्त उपेक्षा, राग आणि छळ. या असह्य वातावरणाला कंटाळून अश्विन घरातून पळून जातो. पण नियतीच्या या कठीण वळणावर त्याला एक दुर्मिळ सुस्वभावी पोलीस भेटतो, जो त्याची काळजी घेत त्याला पुन्हा घरी पोहोचवतो. हा प्रसंग अश्विनच्या आयुष्यातील असुरक्षितता आणि समाजातल्या क्वचितच भेटणाऱ्या माणुसकीचा स्पर्श दोन्ही एकाच वेळी दाखवून जातो.

कादंबरीच्या दुसऱ्या प्रकरणापासून ते शेवटच्या अठ्ठावन्नाव्या प्रकरणापर्यंत, म्हणजेच पृष्ठ २८ ते ३३५ पर्यंत आंचलच्या जीवनाच्या अनवट, वेदनामय आणि खडतर वाटा उलगडत जातात. हा प्रवास वाचताना वाचक अस्वस्थ होतो, अंतर्मुख होतो. अवघ्या अकराव्या वर्षी आईवडील त्याला अंगावरच्या कपड्यांनिशी घराबाहेर काढतात; इतकंच नव्हे तर त्याचं अन्नपाणीही बंद करतात. रक्ताच्या नात्यांनीच पाठ फिरवलेली ही क्रूरता मनाला चटका लावते.

पोटाची खळगी भरण्यासाठी तो स्वयंपाकाची छोटीमोठी कामं करू लागतो. याच काळात नईमभाईच्या निमित्ताने शहरातल्या काही ठिकाणी त्याला त्याच्याच जातकुळीचे, त्याच्यासारख्याच दुःखाने पोळलेले पण मायेचा हात देणारे साथी भेटतात. रक्ताची नाती तुटली की आयुष्य नव्या नात्यांना जागा करून देतं, याची जाणीव या टप्प्यावर प्रकर्षाने होते. हळूहळू मुलीच्या वेशात त्याचं नटणं, मुरडणं सुरू होतं आणि अश्विनच्या व्यक्तिमत्त्वात दडलेली ‘आंचल’ आकार घेऊ लागते. हा बदल केवळ बाह्य रूपाचा नसून, स्वतःच्या अस्तित्वाला स्वीकारण्याच्या प्रवासाची ती सुरुवात ठरते.

अशफाकभाईच्या निमित्ताने अश्विनच्या आयुष्यात खतीजा येते कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर पेलणारी, मायाळू आणि मधाळ बोलणारी स्त्री. किन्नर समुदायाचं व्यवस्थापन करणारी खतीजा त्याला दिल्लीला घेऊन जाते आणि बहिणीच्या मायेने जगण्याचा नवा मार्ग दाखवते. मुलाच्या शरीरात मुलीचं मन घेऊन जन्मलेल्या अश्विनसमोर लैंगिक अपंगत्वाचं कठोर वास्तव उभं ठाकतं. वडील पांडुरंग आणि पंजाबी आई गीता यांचं हे दुर्दैवी मूल पुढे ‘आंचल’ बनतं. किन्नरांच्या जगण्यात टिकून राहण्यासाठी लागणारे हावभाव, बोलण्याची ढब, जगण्याचे मार्ग, व्यवसायाचे पैलू; हे सगळं ती वेगवेगळ्या गुरूंकडून शिकत जाते. घराकडे परतीचे रस्ते कायमचे बंद झाल्यावर आंचल भारतीय किन्नर समुदायाचा एक भाग म्हणून ते हेटाळणीचं, उपेक्षेचं आणि संघर्षाचं आयुष्य स्वीकारते.

दिल्ली, बंगलोर आणि मुंबईसारख्या शहरांतलं तिचं जगणं, त्या जगण्याचे तपशील, त्यातली वेदना, तडफड आणि संघर्ष यांचं कथन लेखिकेने अत्यंत बारकाईने केलं आहे. प्रसंग उभे करण्याची आणि दृश्यांना जिवंत करण्याची ताकद त्यांच्या लेखनात आहे. किन्नरांच्या सामूहिक मानसिकतेत दडलेली अस्वस्थता, त्यांच्या वागण्यातून उमटणारी वेदना आणि समाजाकडून मिळणाऱ्या नकाराचं ओझं त्यांनी प्रभावीपणे व्यक्त केलं आहे. ना पूर्ण मुलगा, ना पूर्ण मुलगी... या मधल्या अर्धवट, अधांतरी अवस्थेत अडकलेलं अस्तित्व हीच या कादंबरीची मध्यवर्ती वेदना आहे. आणि हाच तिचा खरा गाभा आहे.

कायापालट करूनही समाजाकडून डावललं जाणं, सतत पाणउतारा होणं, केलेल्या कामाचं श्रेय नाकारलं जाणं, या रोजच्या मरणासारख्या अनुभवांनी आंचल खचून जात नाही. उलट त्यातूनच तिच्यातली माणुसकी अधिक गहिरी होत जाते. हॉस्पिटलजवळच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेलं एक निराधार बाळ ती घरी आणते. प्रेमाने त्याचं संगोपन करते. ‘महालक्ष्मी’ नाव देऊन त्या मुलीला स्वतःच्या पोटीच्या लेकरासारखं जपत, आईची माया देत वाढवते. शोभाम्माच्या मदतीने तिचं संगोपन अधिक काळजीपूर्वक करत, मोठ्या घरच्या मुलांच्या शाळेत तिला प्रवेश मिळवून देण्यातही आंचल यशस्वी ठरते. समाजाने तिचं पालकत्व मान्य केलं नाही तरी, आईपणाच्या भूमिकेत ती पूर्णत्वाने उभी राहते. या टप्प्यावर आंचल केवळ स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणारी राहत नाही, तर दुसऱ्या एका जीवाचं भविष्य घडवणारी ठरते.

सारथी ट्रस्टमध्ये ट्रान्सजेंडर अ‍ॅक्टिव्हिस्ट म्हणून काम करत असतानाच आंचल महाराष्ट्रातील एका सौंदर्यस्पर्धेत विजेती ठरते आणि सौंदर्यसाम्राज्ञीचा मान मिळवते. आयुष्याने वारंवार नाकारलेल्या या व्यक्तीला इथे मान्यता मिळते; पण या यशाच्या क्षणीही तिच्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तींपैकी कोणीच त्या सोहळ्यात तिच्या पाठीशी उभं नसणं ही तिच्या एकटेपणाची आणि आतल्या वेदनेची तीव्र जाणीव करून देणारी बाब ठरते.

अशी ही आंचलची कथनीय जीवनकहाणी मिताक्षरी शब्दांकनामुळे विशेष लक्षवेधी ठरते. मोठ्या वयाच्या माणसांनाही झेपणार नाहीत असे कष्ट तिच्या वाट्याला येतात. आई-वडील आणि आप्तेष्ट यांच्याकडून मिळालेलं परकेपण, अश्विन ते आंचल या प्रवासातील खडतर भूतकाळ, श्वास घेण्यासाठी आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेला तिचा अखंड संघर्ष वाचकाला अस्वस्थ करतो. आंचलची कथा करुणेला स्पर्श करणारी असली तरी ती भावविवश होत नाही; पाल्हाळिकही होत नाही. तिच्यात एक संयमित ताकद आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळ्या ठरवलेल्या समूहाशी जोडल्या गेलेल्या एका व्यक्तीचं जगणं या कादंबरीतून वाचकाला एका अनोळखी, दुर्लक्षित आणि वेगळ्या विश्वात घेऊन जातं.

मोजकी पण ठसठशीत पात्रं, त्यांची चिवट-जिवट वृत्ती, कठीण आणि काटेरी वाटेतून स्वतःचा मार्ग शोधत जगणारी आंचल, तिच्या आयुष्यात येणारी स्थित्यंतरे आणि त्यातून घडत जाणारं तिचं व्यक्तिमत्त्व... हे सारं लेखिकेने अत्यंत संवेदनशीलतेने आणि बारकाईने टिपलं आहे. त्यामुळे ही कादंबरी केवळ एका व्यक्तीची जीवनकहाणी राहत नाही, तर उपेक्षित अस्तित्वाच्या संघर्षाचं एक जिवंत दस्तऐवज बनते.

आज प्रसारमाध्यमांवर सतत चालणारा कोलाहल, मतभेदांचं उग्र आणि अनेकदा असंस्कृत प्रदर्शन, तसेच वाढता विसंवाद यामुळे सामाजिक संबंध अधिक गुंतागुंतीचे आणि ताणलेले झाले आहेत. अशा काळात तंत्रबद्ध मनोरंजनाच्या मर्यादित चौकटीत न अडकता, सामाजिक भान जपत वैचारिक साहित्यनिर्मिती करणं दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललं आहे. अशा वेळी एका जटिल, नाजूक आणि अनेक स्तरांनी व्यापलेल्या समस्येचा समतोल राखत लेखिकेने घेतलेला सर्जनशील शोध विशेष नोंद घेण्याजोगा आहे.

अश्विनचं ‘आंचल’मध्ये होत जाणारं कायांतर, त्यातली स्थित्यंतरे, मनोव्यापार आणि अस्तित्वाच्या शोधाची ही प्रक्रिया लेखिकेने अत्यंत संवेदनशीलतेने, पण तितक्याच तटस्थतेने शब्दबद्ध केली आहे. भावनिक अतिरेक टाळत वास्तवाच्या मुळाशी जाण्याची त्यांची ताकद या कादंबरीत प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे हे कथन केवळ एका व्यक्तीच्या जीवनप्रवासापुरतं मर्यादित राहत नाही, तर एका संपूर्ण उपेक्षित समुदायाच्या वेदना, संघर्ष आणि आत्मसन्मानाच्या शोधाचं व्यापक चित्र उभं करतं. लेखिकेची ही शब्दांना अनुभवाचं रूप देण्याची क्षमता वाचकांना निश्चितच जाणवेल, असा विश्वास वाटतो.



****************** 

पुस्तक - कायांतर

लेखिका -  रश्मी पदवाड-मदनकर 

विषय - तृतीयपंथी वास्तवावर आधारित. 

प्रकाशक - पद्मगंधा प्रकाशन, पुणे

पृष्ठ ३३७

संपर्क - 7720001132




डॉ सौ प्रज्ञा आपटे

व्याख्याता, संशोधक, लेखिका

Comments

Popular posts from this blog

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

राधा-अनय