Saturday 23 March 2019

भरजरी कविता ..



ऐक ना...

तू तुझ्या आकांक्षाचे सगळे धागेदोरे वापरून

सहज कलेने नक्षीदार सौंदर्य विणून

तलम आलंकारिक शब्दांना एकात एक गुंफूण

भरजरी कविता तयार केली होतीस

आठवतं ?

ती मला दाखवायला आणलीस

आणि गप्पांच्या ओघात

माझ्या ड्रेसींगजवळ तशीच विसरून गेलास


मी उचलून हातात घेतली तेव्हा

मखमली पोताची तुझी कविता

ओढ लावू लागली..

सहज अंगावर ओढून पाहीली

खुप आवडली, राहवलं नाही

म्हणून मग नेसूनच घेतली

तुझी कविता चापूनचोपून बसवताना

माझ्या तनामनाशी संधान साधत राहीली

कवितेच्या सौंदर्याचं प्रतिबिंब अंगोपांगी उतरले होते

अंग अंग निखरून आले होते ..


आता 'माझ्यावर कविता लिहीना रे' असा हट्ट करणार नाहीये मी...

तू केलेली कविताच माझ्यावर लपेटून घेणार आहे.

मग 'तुला कोण जास्त आवडतं सांग मी का कविता ?'

या माझ्या प्रश्नावर तूला संभ्रमात पडायला होणार नाही..

कारण ती न मी आता एक व्हायचे ठरवले आहे

एकमेकीत तल्लीन होऊन तादात्म पावायचे ठरवले आहे.


सांग तुझी प्रत्येक कविता भरजरी करशील ?

मला नेसायला देशील ?




रश्मी पदवाड मदनकर
5 ऑक्टोबर 18

Tuesday 19 March 2019

दोन ध्रुवावर दोघे आपण !




तुला नसेल आठवत .. आपल्या त्या तेव्हाच्या घरासमोर एक छोटी बाग होती. एक छोटासा रस्ता जायचा गेट समोरून तो ओलांडला कि लगेच बाग. बागेच्या प्रवेशालाच शाल्मली होती - सावरीचं झाड. डिसेंबर उलटला कि पूर्ण निष्पर्ण झालेलं झाड हळूहळू बहरायला लागायचं. जानेवारीमध्ये हिला कळ्या यायला सुरुवात व्हायची आणि वसंत ऋतू येण्याआधी संपूर्ण झाड फुलांनी लगडलेलं असायचं आणि तळाशी फुलांची पखरण. संपूर्ण निष्पर्ण झाडावर फुललेली आणि रखरखलेल्या कोरड्या जमिनीवर ही मोठी मोठी गडद गुलाबी फुले निवांत पहुडलेली पाहणे हा एक नयनरम्य सोहळाच तर असायचा. काटेसावरीची गडद गुलाबी ही फुले मोठी, जाड, पाचच पाकळ्यांची, खूप सारे पुंकेसर असलेली केवढी नेत्राकर्षक दिसायची. फुलं खाण्यासाठी खारुताई नि फुलांमधून मध गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या पक्ष्यांची मांदियाळीच या झाडावर जमा व्हायची. त्यांच्या श्वासांची आणि हालचालींची सूक्ष्म स्वपनदानही मला जाणवायची हा निसर्ग निर्मितीचा सोहळा अनुभवणं म्हणजे आनंदाचं उधाण असायचं रे, हे नांदते विश्व पाहण्याचा नादच लागला होता. तुझ्या व्यस्ततेमुळे मला भासत असलेली तुझी उणीव या ऋतूत जरा मंदवायची. कारण माझं संपूर्ण लक्ष या झाडाकडे लागलेलं असायचं. तेवढा काळ तुला दिलासा मिळायचा खरा, पण तुझी रसिकता याबाबत जरा खुजीच असल्याने, माझं सतत त्या खिडकीत लागलेलं ध्यान नंतर नंतर तुला अस्वस्थ करीत राहायचं.


तुझी माझी समान असणारी आवड म्हणजे सकाळी सकाळी एकत्र बसून चहा घेत गप्पा मारणं. आताशा अनेक महिने ती आवड पूर्ण होत नाही.. मला वाटतं तुला त्याचं फारसं काहीच वाटतं नाही; मला मात्र दिवसेंदिवस या गोष्टी सतावत राहतात. मग माझी आपली तुझ्या मागे सततची भुणभुण. हि भुणभुण अति झाली की तू आपला काढायचा एखादा दिवस, एखादी सकाळ..माझ्यासाठी म्हणून. तो दिवस निघून गेला की परत वाट पाहत राहणे माझ्या नशिबी लागलेलं.... या दिवसांत मात्र नवीनच घडायचं. तुझ्यासाठी माझी तगमग फार काळ दिसत नाही असे लक्षात येऊन तू अस्वस्थ व्हायचा आणि माझ्या उठण्याच्या वेळेत लवकर उठून स्वयंपाक खोलीत काम करतांना किंवा बाल्कनीत झाडांना मी पाणी देत असताना माझ्या भोवताल घुटमळत राहायचास. मला दिसायचं ते, मज्जाही वाटायची पण.. खरतर या दिवसात माझी ओढ वाटली गेलेली असायची. असे कसे-बसे दोन महिने निघायचे. या ऋतूच्या शेवटच्या दोन महिन्यात शाल्मलीला फुलं कमी होऊन लांब सडसडीत भुऱ्या शेंगा यायच्या. त्या फुटून त्यातून सावरीचा सुंदर मुलायम हलका कापूस वा-यावर तरंगत राहायचा. केवढं सुंदर दृश्य असायचं ते. भरदुपारी किंवा अगदी पहाटे इतरत्र पूर्ण शांतता असतांना स्वयंपाक खोलीच्या खिडकीतून त्या शेंगांच्या तटतटण्याचा मंद आवाज माझ्या कानी यायचा आणि मी नकळत हातचे काम सोडून लगबगत त्या खिडकीशी यायची. नुकतच गर्भवनेतून बाहेर पडलेली, बंधनातून मोकळी झालेली सावरी दोन्ही हात पसरून, चेहेरा उंच करत, उरात लांब श्वास भरून घेत स्वातंत्र्य उपभोगत मजेत उडत असल्याचे दिसायचे. आतून हर्ष दाटून यायचा .. काय सांगू काय फीलिंग असायचं ते. एकदा हे सगळं तुला सांगायचा प्रयत्न केला होता .. तेव्हा ''श्या, एवढ्या दूर कधी स्पंदनाचा अन त्या शेंगा तडकल्याचा आवाज येतो का वेडाबाई'' म्हणत तू निघून गेला होतास..मग तू मला वेड्यात काढशील म्हणून मी अनेक गोष्टी नाहीच सांगितल्या तुला पुढे.

अश्याच दिवसात एका सकाळी चहाचे मग घेऊन आपण बाल्कनीत बसलो होतो. मंद वारा वाहत होता .. वातावरणात पसरलेला मोगरा अन शाल्मलीचा मोहवून टाकणारा सुगंध मनाला उभारी देत होता. तेवढ्यात कूठूनशी सावरी आली उडत. छताशी लगट करत, मग भिंतीवर रेंगाळत बाल्कनीतल्या मोगऱ्यावर येऊन बसली. मी मग्न होऊन तिला न्याहाळत होते .. आणि तू मला. तुझ्याकडे लक्ष गेले तेव्हा मी जरा बावचळले. तू सोबत असतांना नकोच असे करायला म्हणून जरा गिल्टच आले. तुझ्याकडे पाहून हसले आणि म्हणाले 'तुला नाही ना रे आवडत मला आवडतं ते ते सगळं?' तेव्हा माझा हात तू हातात धरलास आणि म्हणाला ''मला तू फार फार आवडतेस, फुलं, पक्षी, वारा, झाडं आणि हि सावरी कि काय म्हणतात असं काय काय वसलंय तुझ्या मनात, माझ्यासकट या साऱ्यांना मनात घेऊन तू सुख पेरते आहेस म्हणून तर हे घरकुल आनंदानं डोलतय म्हणूनच या साऱ्यांसह मी तुला मनात घट्ट धरून ठेवलंय.. तूच माझी शाल्मली अन तूच तर माझी सावरी आहेस.''

त्या दिवसभर सावरीचा बहर अधिकच गडद झालेला जाणवत होता ...


- रश्मी पदवाड मदनकर 


Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...