अनुष्काने विराटला उद्देशून लिहिलेल्या पत्राचा हा अनुवाद. दोन हजार चौदा सालचा तो दिवस मला नीट आठवतो. त्यादिवशी तू मला सांगितलंस की एम. एस. निवृत्त होतोय आणि त्याच्या जागी तुला कप्तान केलं गेलंय. मला आठवतं. त्या दिवशी काही वेळानंतर एम एस, तू आणि मी मिळून खूप गप्पा मारल्या. एम. एस विनोदाने म्हणाला की याची दाढी आता कशी पटापट पांढरी होऊ लागते बघच तू. आपण सगळेच यावर खळाळून हसलो होतो. त्या दिवसापासून आजवर मी नुसती तुझी दाढीच पांढरी होताना नाही पाहिली. मी तुझी वाढ होताना पाहिली. आश्चर्य वाटावे अशी वाढ. भोवतालच्या अवकाशातच नव्हे तर तुझ्या आतूनही तुला वाढताना मी पाहिलं. खरंय. भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कप्तान या नात्याने तुझा झालेला विकास पाहून आणि तुझ्या नेतृत्वाखाली तुझ्या संघाने गाजवलेले कर्तृत्व पाहून मला खूप अभिमान वाटतोय पण स्वतःवर काम करून स्वतःचा जो आंतरिक विकास तू घडवून आणला आहेस त्याचा मला कितीतरी जास्त अभिमान वाटतोय. 2014 साली आपण खूपच तरुण आणि भाबडे होतो. वाटायचं, हेतू चांगला असला, सकारात्मक हिंमत दाखवली आणि इरादा पक्का असला की झालं. माणूस सहजच पुढे जा...