Posts

Showing posts from March, 2018
हे बघ ऐक,  फक्त निभवायचंय म्हणून येऊ नकोस, निभावाव लागतं म्हणून निभावणारे नाईलाज आणि कुचंबणेला त्रासून परत फिरतात.. तेव्हा तू जा ..  जिथे कुठे तुझ्या मनाचं समाधान असेल, जिथे प्रेमाची आस असेल तू जा.  मी नाही घालणार हाक तुला ..  पण काळाच्या ओघात आलीच आठवण तर .. माझ्या प्रेमाची जाणीव झालीच प्रखर तर  विश्वासाच्या सोबतीची गरज तीव्र होईल .. अन डोळे ओथंबून वाहू लागतील ...तेव्हा  तेव्हाच ये परत ..  साथ निभवायचीय म्हणून येऊ नकोस  प्रेम जगवायचंय म्हणून ये ,,,  इतकंच ..

ऊन्हाचं झाड !

Image
हे असं होतं.. ऑफीसमधून रोज रोज अंधार पडल्यावर बाहेर पडताना एकच दृष्य दिसतं; ऑफीसदारातलं झाड अंधार लपेटून झाकोळून घेत असतं स्वतःला. काळ्या, करड्या, वाळक्या फांद्यांचं अंधार लपेटलेलं काळकभीन्न झाड.. कधी फार लक्ष जात नाही त्याकडे..कधी गेलच तर अंधाराचं झाड स्वतःला गडद करून घेतं अधिक... अंधाराचं काय ते अपृप.. कलता दिवस पाहणं नसतच नशिबी..पण कधीतरी उतरणीचं ऊन पाहायची, अनुभवायची उर्मी होते.. नाहीच जमत..पण एखाद्यावेळी अंधार दाटण्याआधी निश्चयानं बाहेर पडावंच तर ऊन असं खोडसाळ होत राहतं, ऑफीसदारातल्या झाडाचा आडोसा घेत लपंडाव मांडतं.... झाडही आखडून वाकोल्या दाखवत अंगभर उन्ह पांघरून घेतं अन स्वर्णरंगानं तेजाळून निघतं...सायंकाळचा फारसा अनुभव नसणारया मला मग ते उन्हाचंच झाड वाटू लागतं.. आत कालवाकालव होते.. माझ्या आतली सायंकाळ गहीवरून येते, अचानक जोम चढतो, आतला अंधार मी ओढून काढते, घडी घालते अन गाडीच्या डीक्कीत टाकून देते...मनातल्या पेरलेल्या आशांना मग पालवी फुटू लागते.. मी झाडाजवळ येते तांबडं पिवळं उन उन तोडून गोळा करते..एकात एक घालून मोठी लांब शाल विणते अन आतबाहेर पांघरून घेते..गाडी सुरू करून रस्त्य...

प्रिय कविता ..

Image
प्रिय कविते ! एक दिवस अचानक तू भेटलीस, आणि आयुष्य पालटलं. रुक्ष, कोरड्या रखरखत्या मातीवर कुणीतरी पाणी घालावं, घालत राहावं आणि एकदिवस आत आत गाडल्या गेलेल्या एखाद्या पेराला पालवी फुटू लागावी तसेच काहीसे होऊ लागले. भरकटलेल्या सुन्न पायवाटेवर भेटलीस तू मला आणि हात धरून शब्दालंकाराने शृंगारलेल्या मखमली, रेशमी, तलम भावस्पर्शाच्या स्वप्नील दुनियेत घेऊन आलीस. कविते ... तू प्रसवलंयस मला खरं सांगू मी नाही तुला जन्म घातला, तुझ्या येण्यानं माझ्यातल्या कवियित्रीचा जन्म झालाय. मी नाही तुला नाव दिलं..तूच मला नाव मिळवून दिलंस. मी नाही ओळख तुझी तूच माझी ओळख झालीयेस. मी नाही ठरवत तू कसं असावस, तू असतेच मुळी अस्तित्वात फक्त तुझे स्वरूप एकत्र तेवढे बांधायचे असते. मग तूच ठरवतेस तुझी शैली..तुझा छंद-बंध, आणि ते कुणी कागदावर उतरवावे हि निवडही तुझीच असते. मी नाही तू निवडतेस मला ..आईच्या वात्सल्याने माझा हात धरतेस, गिरवायला लावतेस आणि तुला हवी तशी काळे निळे वस्त्र लेवून अवतरत जाते कागदावर. एखाद्या अप्सरेने प्रगट व्हावे तितकेच चमत्कारिक असते तुझे पूर्ण रूप. तुझ्या प्रगटीकरणात मी तर फक्त निमित्तमात्र. ...
ऋतू कोवळा येऊन जाता आठवतो तू ऋतू सोहळा आटपतांना आठवतो तू सहा ऋतूंच्या स्मरणांच्याही पडता गाठी ऋतूत एक होऊन ऋतू मग आठवतो तू उधळून देता इंद्रधनुचे रंग नभाशी तांबडं फुटता आकाशी बघ आठवतो तू पाऊस धारा खिडकी मधुनी ओघळताना तुषार उडता गाली अलगद आठवतो तू ... तू आठवता मनात भरते घन व्याकुळ नजरेमध्ये ओल दाटता आठवतो तू   ... रश्मी मदनकर १३.०३.१८ 
Image
काय चक्रावून टाकणारे योगायोग असतात बघा.. काल रात्रभर झोप लागली नाही म्हणून पहाटे 3.30 च्या सुमारास टीव्ही लावून बसले. झी सिनेमावर खुदा गवाह लागला होता... बर्याच वर्षाआधी पाहीलेला हा सिनेमा पाहूया जरावेळ म्हणून तोच लावून बसले. आई आणि मुलगी अश्या दुहेरी भुमिकाही काय खुबीने निभावल्या आहेत श्रीदेवीने हीच्यासारखी अभीनेत्री पुन्हा होणे नाही हा विचार करतच शेवटाला सिनेमा पोचला..काबूलवरून हिंदूस्थानला वेड लागलेल्या श्रीदेवीला आणलं जाईल आणि ती खलनायकांच्या तावडीत सापडेल...तीच्यावर होण ारे अत्याचार सकाळी सकाळी बघू नये उगाच मूड जाईल म्हणून तीचा सिनेमातला अब्बूजान- बादशाह खान म्हणजे अमिताभबरोबरचा एक सुंदर सिन तीची प्रगल्भ देखणी छबी डोळ्यात साठवून काहीतरी वेगळे बघायला चानल बदलले ...न्युजचानल लावलं, जनरल बातम्या चालू होत्या.. 5 एक मिनीटातच तीच्या मरणाची बातमी येऊ लागली..आधी धस्सकन झालं.मग वाटलं शक्यच नाही आतातर आपण हीला पाहत होतो. कालच तीचा मुलीबरोबर रॅम्पवर चालताना.. मुलीला दटावताना वायरल झालेला व्हीडीओ पाहण्यात आला होता तेव्हा किती ग्रेसफुल दिसत होती. मुलीपेक्षाही तीचंच आकर्षण ...