आईपण कसं स्वार्थी असतं ना ..
तसंतर पुर्वीपासूनच आपल्या काही सवयी असतात त्या हळूहळू स्वभाव होत जातात. जित्याची खोड म्हणतात तशा. रस्त्यानं जाताना मध्येच पडलेले दगड उचलून कडेनं फेकून येणं. शाळेत जाणारी मुलं रस्ता क्राॅस करायचा प्रयत्न करताना दिसली की थांबून रस्ता क्राॅस करून देणं. आपल्या येण्याजाण्याच्या रस्त्यात कुणी गरजू दिसलं तर वाटेत शक्य असेल तिथपर्यंत लिफ्ट देऊन सोडणं. अपघात झालेला दिसला की थांबून मदत करणं मी कित्तेकदा भर उन्हात माझी पाण्याची बाटली किंवा कुणी भणंग दिसलं तर डबाही देऊन देते गरजुला.. उन्हाळ्यासाठी चपला अन हीवाळ्यासाठी स्वेटर वर्षभर गोळा करत राहते. पुर्वी हे स्वानंदासाठी असायचं.. मनात स्वार्थाचा लवलेशही नसायचा. पण लेक जसजसा मोठा होतोय पदरा बाहेर वावरू लागला आहे तेव्हापासूनच ह्याचा मोबदला मिळावा असं वाटू लागलंय आणि ह्याची जाणीव झाली तेव्हापासून वाईटही वाटतंय पण 'आई' असण्याची भावना जागृत होते अन स्वतःच स्वतःला माफ करून घेते. हल्ली रस्यात मध्ये पडलेले दगड बाजुला करताना वाटतं माझा लेकही कधीतरी या रस्त्याने जाणार आहे. त्याच्या सायकलीखाली असा कुठला दगड येऊ नये. तो पोचण्याआधीच क...