महेंद्रसिंग धोनीचा 'कॅण्डी क्रश' खेळतानाचा व्हिडीओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला आणि तासाभरात कॅण्डी क्रशचे ऍप्लिकेशन 30 लाख लोकांनी डाउनलोड केल्याची बातमी पसरली. बघता बघता बातमीचीही बातमी झाली आणि सोशल मीडियाचे सगळे प्लॅटफॉर्म धोनीच्या फोटो, व्हिडिओ आणि बातम्यांनी ओसंडून वाहू लागले. त्यानंतर उलट सुलट चर्चाही रंगल्या. काहींच्या मते धोनी विमान सफरीच्या फावल्या वेळेत कँडी क्रश खेळताना कॅमेरात कैद होणं हा निव्वळ योगायोग होता आणि त्याची ही नैसर्गिक आवड लोकांना आवडली; तर काहींच्या मते ही हेतुपुरस्सर केलेली कँडी क्रश ॲपची जाहिरात होती आणि त्यासाठी सगळं वातावरण प्लॅन केलं गेलं होतं. विषय धोनीचं कँडी क्रश खेळणं हे सहज होतं की हेतुपुरस्सर हा नाहीच आहे, विषय खरंतर त्या पलीकडचा आणि जरा गंभीर असा आहे. धोनी त्याच्या फावल्या वेळात खेळतो म्हणून तासाभरात ३० लाख लोकांनी एखादा गेम डाऊनलोड करून घेणं हा आकडाच जरा अचंबित करणारा आहे. एखाद्या सेलिब्रिटीच्या वागण्याचा, आवडीनिवडीचा संपूर्ण समाजावर केवढा मोठा प्रभाव असतो ह्याचे हे जिवंत उदाहरण. ह्याची जाणीव आणि त्याबाबतची आवश्यक संवेदनशीलता किती सेलिब...