Sunday 21 April 2019



मनाला मनाचा कुठे थांग आहे
जिवाला दिलासा कसा सांग आहे

कुणाला असे भान जगण्यास येथे
जयाचे तयाच्या पगी टांग आहे

नसे भावना आज नाती फुकाची
दगड पूजन्या देवळी रांग आहे

तुझी प्रीत चढते नशा ही गुलाबी
जशी साथ ऐसी जणू भांग आहे

कसे सांग विसरू ग आई दिले तू
न फेडू शकत मी असे पांग आहे


तुझे वागणे मुखवट्याआड वाटे
मला वाटते फार नाट्यांग आहे


-रश्मी पदवाड मदनकर 

Saturday 20 April 2019



मुळातून येऊन पुन्हा मुळाकडे जाण्याची ओढ संवेदनशील माणसांना खुणावत असली पाहिजे. निव्वळ मुळाकडे परत जाणे हा इतका उथळ विषय नाही. ह्या विषयाची व्याप्तीच अत्यंत खोल आणि गंभीर अशी आहे. सगळ्यांना आकलन होईल असा हा विषयही नाही.. पण तरीही या गोष्टीच आकर्षण मात्र अनंत काळापासून आहे ह्याची अनेक उदाहरणं दिसतात. मुळापर्यंत म्हणजे शुन्याकडे, जेथून निर्मिती झाली तेथवर म्हणजे त्या अनुभवाच्या अवस्थेपर्यंत जाणे असे काहीतरी किंवा त्याहून अधिक गहिरे वगैरे.


"कथाकार दि.बा मोकाशी यांची 'जरा जाऊन येतो' नावाची एक कथा आहे. या कथेतील नायक गणेश ओक कुटुंब वत्सल असूनही एकदिवस अचानकपणे नाहीसा होतो. मग सर्व संबंधित मंडळी त्याचा अटीतटीने शोध घेतात. पण त्याचा शोध लागत नाही. खरंतर अवतीभोवतीच्या यंत्रप्रधान-अर्थनिष्ठ, एकसुरी, चाकोरीबद्ध जीवनाला कंटाळून त्यातून सुटण्यासाठी, तुटलेपणातून वाचण्यासाठी काही क्षण गणेश 'औदुंबराला' जाउन आला असतो.


औदुंबराला गणेशला गर्भाशयातील शांतता लाभते. निर्भर प्रसन्नता, अतीव शांतता, आणि स्वतःतल्या माणसाची ओळख त्याला तिथेच मिळते. चिरंतर प्रसन्नतेच्या शांततेचा ठेवाही त्याला तिथेच गवसतो. जीवनाचा जो मूलाधार आहे तिकडे जाण्याची गणेश ओकची धडपड आहे. आपण कुठून आलो, ती माता कशी होती: आपली मुळं कुठली ? हे तपासण्याचा गणेश ओक चा प्रयत्न आहे."


एक इंग्रजी चित्रपट पाहिला होता ''The Curious Case of Benjamin Button'' एरिक रॉथ ह्यांची स्टोरी असलेला हा चित्रपट डेव्हिड फिंशर यांच्या निर्देशनात तयार झालेला जीवनाचा उलट प्रवास दर्शवणारा होता. म्हणजे चित्रपटाचा हिरो जन्म घेतो तेव्हा म्हाताऱ्या अवस्थेत असतो आणि जसजसे दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष सरकत जातात त्याचा प्रवास अत्यंत संघर्षाने म्हातारपणातून तरुण, मग किशोर नंतर बालपणाकडे सरकत जाऊन मुळापर्यंत येऊन विरून जाण्यापर्यंतचा होतो. ह्या चित्रपटाची निव्वळ कल्पनाही सुचणं किती रोमांचकारी असेल हा विचार मला तेव्हाही येऊन गेला.


बेन्जामिनचा जन्म होतो तेव्हा तो म्हाताऱ्या अवस्थेत आणि म्हातारपणातील सर्व रोगांना घेऊन झालेला असतो.. त्याचे जगणे अतिशय संघर्षात सुरु असते मात्र आयुष्याचा प्रवास उलट्या दिशेने होत असतो. तो ७ वर्षांचा असतांना त्याची अवस्था ७० वर्षांएवढी असते तेव्हा त्याची भेट पहिल्यांदा डेजी विलियम फुलर सोबत होते तेव्हा ती ७ वर्षांची असते. कुणीही मैत्री करीत नसलेल्या बेंजामीनशी डेजीची चांगली मैत्री होते आणि ती डेजीच्या बालवयापासून ते म्हातारपणापर्यंत आणि बेन्जामिनच्या म्हातारपणापासून ते बालपणापर्यंत अशी शेवटपर्यंत कायम राहते. त्यांच्या आयुष्यात एक काळ असाही येतो जेव्हा ती दोघेही ४० वर्ष वयाची असतात. हा अत्यंत आनंदाचा काळ असतो याच काळात त्यांच्या मुलीचाही जन्म होतो.


या चित्रपटात बेन्जामिनची भूमिका ७ अभिनेत्यांनी केली आहे पण मुख्य भूमिका ब्रॅड पिटने निभावली. ब्रॅडच्या अभिनयाने वाढत्या वयातून बालपणाकडे जाणाऱ्या कल्पनेपलीकडील पात्राला जिवंत केलेच परंतु प्रेम ग्रेग केनन नावाच्या मेकअप आर्टिस्टने मेकअपद्वारा विद्रुपता आणि विचित्रता उभारून आणून या पात्रात अक्षरशः जीव ओतला. त्यासाठी त्याला ऑस्कर अवॉर्डही मिळाला होता.


आपण चमत्कारांवर विश्वास ठेवत नसलो तरी प्रत्येक कलाकृती ही कुणाच्यातरी कल्पनेतून किंवा विचारांतून साकारलेली असते. अशी कल्पना का सुचत असावी ? तर जगण्याचे सगळे अनुभव घेऊन झाले कि मुळाशी असणारी शांतता, सुख, समाधान पटायला लागतात, हवेहवे वाटायला लागतात. ते सुखाचे क्षण आठवून पुन्हा त्या अनुभूतींकडे परत जाण्याची ओढ निर्माण होणं साहजिक आहे.








- रश्मी पदवाड मदनकर 

Wednesday 10 April 2019

आयुष्याच्या एखाद्या वळणावर भेटतो तो ...




आजा मै हवाओ में बिठा के ले चलूं .. तू हि तो मेरी दोस्त है ..

आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर येतोच तो आयुष्यात.. दुरून तुमची तगमग बघत अस्वस्थ होतो नकळत मदतीला धावून येतो. आधाराचा हात देतो, रुसलेले हसू परत खुलवतो, तुम्हाला अलगद त्या तात्पुरत्या आलेल्या कष्टातून संकटातून बाहेर काढतो अन हळूहळू पुन्हा आयुष्यातून नाहीसाही होतो. त्याचं आपल्या आयुष्यात तेवढंच औचित्य असतं. आयुष्यातून निघाला तरी आठवणीतून, मनातून मात्र निघू शकत नाही.. आयुष्य जगण्याचे अनेक धडे शिकवून, आयुष्याला नवे आयाम देऊन गेला असतो..मनात कायमची जागा ठेवून गेला असतो.

तो ..'प्रेमरोग'च्या मनोरमाला भेटलेल्या देवधरसारखा असतो..नियतीच्या नाकावर टिच्चून, प्रस्थापितांच्या हुकूमास न जुमानता मनोरमाच्या पाठीशी भक्कम उभा राहणारा.. किंवा 'सदमा'च्या सोमप्रकाशसारखाही  बालिशपणावरही निरपेक्ष निरलस प्रेम करणारा, सुरक्षा देणारा.  'इंग्लिश विंग्लिश'च्या शशीला अनोळख्या नवख्या देशात भेटलेल्या विंसेंट सारखा असतो तो कधी... तिच्या भांबावलेल्या आयुष्याला मार्गावर आणून सोडणारा, तिच्या दुर्गुणांना दुर्लक्षित करून तिच्या गुणांवर भाळणारा .. एखादा राजू 'गाईड' मिस नलीनीला रोझी मार्को होईपर्यंतच्या प्रवासात शिढीसारखा साथ देतो..तिचे स्वप्न साकार करतो आणि स्वतः मात्र भणंग आयुष्य जगायला निघून जातो.. झिलमीलला भेटलेल्या 'बर्फी'सारखाही असतो एखादा ठार वेडेपणालाही जिव्हाळ्याने सावरून घेणारा, एखादा 'अलबेला' टोनी सोनियाला गाईड म्हणून भेटतो आणि आयुष्यात खऱ्या जगण्याचा प्रवास घडवून आणतो तसा किंवा आनंदात असलेल्या गीतला दुःखी होऊन भेटलेल्या पण गीत दुःखात असताना तिला शोधून काढून आनंद वाटणारया 'जब वी मेट'च्या आदीत्यसारखा..... किंवा अंधारात कंदील लावायला येणाऱ्या विधवा राधेवर मौन प्रेम करणारया आणि काळानं ओढून आणलेल्या तिच्या अंधाऱ्या आयुष्यात मूठभर क्षण उजेडाचे देऊ करणाऱ्या 'शोले' च्या जय सारखा .. किंवा 'टायटॅनिक'च्या कडूगोड़ प्रवासात मरेस्तोवर साथ देणाऱ्या जॅक सारखा. कुणी अमृताचा इमरोज होतो, कुणी सावळ्याची राधा ..द्रौपदिचा सखा कृष्ण बनून किंवा सीतेला सोडवणारा बजरंग बनून .. तो असतोच कुठल्यातरी रूपात तिच्या अवतीभोवती.



अशी किती लोकं असतात ज्यांना असे कुठलेसे मित्र मिळतात. जे तुमच्या मैत्रीसाठी, तुमच्या थोड्या वेळेसाठी तुमच्या सोबतीसाठी, तुमच्या चेहेऱ्यावर एक हसू फुलवायला म्हणून जीव ओवाळून टाकतात. तुम्ही कुठेही असा त्याचं अस्तित्व तुमच्या भोवताल तुम्हाला जाणवत राहतं. तुमची एक हाक आणि तो हाजीर .. असे होत असेल तर तुमच्यासारखे तुम्हीच नशीबवान असता. आयुष्यात तुम्ही कितीही गोतावळ्यात राहत असले तरी शेवटी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात येणारे अपडाउन्स तुमचे तुम्हालाच झेलावे लागतात, भोगावे लागतात. इतर लोकं केवळ त्याची कल्पनाच करू शकतात. पण हे आयुष्यात अचानक चालून आलेले संकट निभावून नेतांना कुणाचातरी भरभक्कम आधार हवा असतो, मैत्रीची साथ हवी असते. आपण तळपत्या उन्हातून, काटेरी मार्गावरून किंवा अंधाऱ्या भुयारातून चालत असताना कुणीतरी कुठलीही अपेक्षा न ठेवता फक्त आपली सोबत म्हणून शेजारी चालत राहतंय, खाच खळग्यात अडखळलो कि मदतीला हात पुढे करतो ही जाणीवही किती सुंदर असते. या नात्याला काय नाव असतं माहिती नाही पण अशी सोबत मिळायला नशीब लागते मात्र. काही प्रेमकथा किंवा मैत्रीकथा खूप जेनुइन खूप निरागस असतात. काही विशिष्ट काळापुरत्या, विशिष्ट उद्देशासाठी जन्माला येतात आणि तो उद्देश संपला कि संपुष्टातही येतात. म्हणजे साथ सुटते कथा मात्र संपलेली नसते. ती आठवणीत आयुष्यभर तशीच भरभक्कम आधार देत राहते. तुही तो मेरी दोस्त है म्हणत ...

- रश्मी पदवाड मदनकर 






Monday 8 April 2019

कालजयी कुमारगंधर्व

(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं)

कालजयी कुमारगंधर्व
रियाज
लेखिका - स्वाती हुद्दार

इंदुर उज्जैन रस्त्यावर वसलेलं टुमदार देवास. कलेची आराधना करणाऱ्या कलावंतांच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं आणि म्हणूनच देवाचं वास्तव्य असलेलं देवास. नर्मदेच्या सुजलाम प्रवाहानं माळव्यातल्या भुमीच्या या तुकड्याला सुफलाम केलं. देवासच्या भुमीला संगीताची मोठी परंपरा लाभली आहे. प्रसिद्ध संगीतकार बंदे अली, शेवटचे मोठे बीनकार बाबूखॉं , संगीत सम्राट खॉंसाहेब रजब अली खॉं, पुढे कुमार गंधर्व. आणि असे कितीतरी संगीतज्ज्ञ या भुमीनं दिले.
चामुंडा टेकडीकडे जाणाऱ्या उतारावरचं एक सुरेल घर भानुकुल. नित्य संगीत आराधनेत रमलेलं. ऋतूचक्राची जाणीव करून देणारी घराभोवतीची वृक्षराजीही स्वरांच्या घोसांनी लगडलेली. त्या वृक्षांवरच्या पक्ष्यांचा चिवचिवाटही एखाद्या बंदीशीसारखा. भानुकुलमधल्या बंगईच्या पितळी कड्यांची किणकिणही सुरेलच. एखादी रागिणी छेडल्यासारखी. कारण साक्षात सात स्वरांचं वास्तव्य या घरात होतं.
30 जानेवारी 1948 एका गंधर्वाची पावलं देवासच्या भुमीला लागली आणि ही भुमी अधिकच संगीतमय झाली.
8 एप्रिल 1924 रोजी बेळगाव इथं जन्मलेला शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली हा यक्ष संगीत साधनेसाठी मुंबईला येतो काय आणि पुढे प्रकृतीच्या कारणानं माळव्याच्या भुमीत रुजतो काय. सारंच अचंबित, अनाकलनीय. या गंधर्वाची पाच वर्षांची मुक साधनाही देवासच्या भुमीनं अनुभवली. इथल्या पोषक, स्वास्थ्यवर्धक वातावरणानं या गंधर्वाला जपलं आणि चमत्कार झाला. नव्या उमेदीनं, नव्या ताकदीनं ते स्वरपुंज वातावरणात घुमू लागले आणि त्यांनी अवघं संगीत अवकाश आपल्या कवेत घेतलं.
अवघ्या नऊ वर्षांच्या शिवपुत्राचं गाणं ऐकून बेळगावच्या स्वामीजींच्या मुखातून उद्गार बाहेर पडले अरे हा तर साक्षात कुमार गंधर्व. हे बिरुद कुमारांबरोबर कायम राहिलं. कुमार गंधर्व या व्यक्‍तिचं शारीरिक वय वाढत गेलं. त्याच्या स्वरांचं, गाण्याचं वय मात्र त्याच्या नावाप्रमाणं कायम कुमारच राहिल. चिरतरुण राहिल. ते स्वर नित्यनुतन संगीत प्रसवत राहिले.
साल 1935. अलाहाबादच्या संगीत परिषदेत हे स्वर गुंजले आणि उस्ताद फैयाज खान, कुंदनलाल सहगल सारख्या संगीत क्षेत्रातील दिग्गजांना त्यांनी अवाक केलं. त्यावेळी त्या स्वरांचं वय होतं अवघं नऊ वर्षांचं. त्यानंतर कोलकत्त्याला संपन्न झालेली गांधर्व महाविद्यालय मंडळाची परिषद. पंडीत विनायकराव पटवर्धन, पंडीत नारायणराव व्यास, पंडीत शंकरराव व्यास, प्रो. बी. आर देवधरांसारख्या संगीतज्ज्ञांची उपस्थिती. 10 वर्षांच्या त्या गंधर्वानं पिया बिना नाही आवत चैन ही झिंझोटीतली ठुमरी छेडली आणि सगळी सभा देहभान विसरली. एका रात्रीत वयाच्या केवळ दहाव्या वर्षी कुमार गंधर्व हे नाव राष्ट्रीय गायक म्हणून नावारुपाला आलं. 1936 मध्ये कुमारजी मुंबईत देवधरांच्या स्कूल ऑफ इंडियन म्युजिक मध्ये दाखल झाले आणि या हिऱ्याला पैलू पडायला लागले. या स्वरांनी भारतवर्षाला वेड लावलं.
साल 1947. या स्वरांना ग्रहणानं ग्रासलं. निदान झालं राजयक्षमा. कोरड्या हवेसाठी निवड झाली देवासची. चार-पाच वर्षांचा अज्ञातवास. स्वर मुक झाले. आत मात्र संगीत सुरुच होतं. अधिकाधिक बहरत होतं. माळव्याचं लोकसंगीत , कबीर, मीरा, सूरदास, तुलसीदास, निर्गुणी भजन, अहिमोहिनी, मालवती, मघवा, लगनगंधार, सहेली, तोडी, संजारी, मधसुरजा, निंदियारी, भवमतभैरव अशा नवनवीन रागरागिणी, अनेक नव्या बंदिशी, असं अगणित अनंत मनात उमलत होतं, आकारत होतं.
अखेर 1952 साली या स्वरांचं ग्रहण सुटलं. आणि एक नवनवोन्मेषी तप:पुत अनुपम, स्वर्गीय स्वर दशदिशांना व्यापून राहिला.
एक क्रांतीकारी स्वर. एक अपारंपरिक संगीत विचार. स्वतंत्र शैलीचा गायक. संगीत घराण्यांची परंपरा झुगारून देणारा संगीतोपासक. शास्त्रीय संगीताला परंपरेच्या जोखडातून मुक्‍त करून रसिकाभिमुख बनवणारा सरस्वतीचा सच्चा उपासक. चिंतनशील स्वतंत्र प्रतिभेचा गायक. असं बहुआयामी व्यक्‍तिमत्त्व म्हणजे कुमार गंधर्व.
कुमारजींनी चिंतनातून स्वत:ची गायकी जन्माला घातली.
या अवलियावर स्वर प्रसन्न झाले. सगळे स्वर याच्या गळ्यात येऊन बसले आणि लहान मुलांना अंगाखांद्यावर खेळवावं तसा हा या सुरांशी खेळू लागला. शास्त्रीय संगीताचा उगम लोकसंगीतात आहे, असा विश्‍वास असलेल्या कुमार गंधर्वांनी मालवा की लोकधुने हा कार्यक्रम केला. आणि माळव्यातलं लोकसंगीत अक्षर झालं.
कुमारजींनी तंत्रात अडकलेली गायिकी खुली केली. त्यात गोडवा निर्माण केला. रागांमध्ये विविध प्रयोग केले. एकाहून एक सुंदर बंदिशींची रचना केली. अनुपरागविलास हा कुमारजींच्या स्वरचित बंदिशी आणि राग यांच्या स्वरांकनाचा ग्रंथ आहे.
सारंग या रागात बांधलेली ही बंदिश
रुखवातले आया, आया तले आया
बेठा बटमारा तपन करी दूर
अरी ओ बाजी आओ
पियास बुझाले तोरा
व्यातलं लोकजीवन या बंदिशीतून व्यक्‍त होतं.
कबीरांवर कुमारांचं विशेष प्रेम
सुनता है गुरू ज्ञानी हे कुमारांनी गावं. आणि ऐकणाऱ्याची ब्रह्मानंदी टाळी लागावी.
तानपुरे जुळवावेत आणि तासनतास त्या नादब्रह्माच्या आराधनेत तल्लीन व्हावं, ते कुमारांनीच.
प्रिय पत्नी भानुताईंचं निधन झाल्यावर स्मशान घाटावरचं आंब्याचं बहरलेलं झाड पाहून भानुंच्या आठवणीनं व्याकुळ होऊन त्यांच्या चितेच्या साक्षीनं फेर आई मौरा अम्बुवापे ही बंदीश रचावी तिही कुमारांनीच.
भानुकुलसमोरच्या माताजी का रास्तावरून देवीला बळी द्यायला निघालेल्या बकऱ्याच्या केविलवाण्या स्वरातून मधसुरजा राग सुचावा, तोही कुमारांनाच. बचा ले मोरी मां, घरमे ललुवा अकेलो है बिन मोहे ही आर्त बंदीश लिहावी तिही कुमारांनीच.
संगीताबरोबरच कुमारांना साहित्याचीही उत्तम जाण होती. म्हणूनच कुमारांना तुकाराम पेलता आला. तुलसीदास गाता आला. भा. रा तांबेंच्या भावगीतांवर तांबे गीत रजनी सादर करता आली.
भारत सरकारच्या निमंत्रणावरून कुमारजींनी गांधी मल्हार या रागाची निर्मिती केली.
बेळगावच्या कुमारांना कर्नाटकी संगीतापेक्षा हिंदुस्तानी संगीत जवळच वाटलं. रागदारी संगीतातील या गंधर्वाला संतकाव्य, भावकाव्य, लोकसंगीत ठुमरी टप्पा असं काही सुद्धा वर्ज्य नव्हतं. कुमारांनी मला उमजलेले बालगंधर्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाट्यगीतही पेश केली.
संगीतातील घराण्यांचा अट्टाहास कुमारांनी मोडीत काढला. स्वत:च्या ग्वाल्हेर घराण्याचा अभिमान बाळगत असतानाच इतर संगीत घराण्यातील बलस्थानंही त्यांनी आत्मसात केली.
कुमारांनी त्यांच्या प्रत्येक गुरूची विशेषता स्वत:च्या गाण्यात आणली अंजनाबई मालपेकरांकडून पूर्णतेची दृष्टी घेतली. प्रखर सूर घेतला. वाझिद हुसेनकडून बंदिशीची समज आणि ज्ञान घेतलं. राजाभैय्या पुंछवालेकडून अस्सल गाणं घेतलं. पं. ओंकारनाथ ठाकुर, जगन्नाथबुवा, गोविंदराव टेंबे, सिंदे खॉं, रामकृष्णबुवा वझे आणि देवधर या प्रत्येकाची खासियत कुमारांच्या गळ्यात उतरली आणि त्यांचं गाण परिपूर्ण झालं.
अवघं 68 वर्षांचं आयुष्य. एका आयुष्यात कुमारांनी दहा आयुष्यांएवढी संगीताची सेवा केली. कुमारांच्या जीवनाचा रग रग संगीत, कण कण संगीत होता. संगीत हा त्यांचा ध्यास होता आणि श्‍वासही होता, कुमारजींना सम दिसायची. त्यांना स्वर दिसायचे. एखाद्याला परमेश्‍वर दिसावा तसा. मधसुरजा रागाची निर्मिती करणारे कुमार गंधर्व स्वत:च माध्यन्हिचा सूर्य होते. प्रखर आणि तेजस्वी. कुमारजी म्हणजे सळसळत चैतन्य. कुमारजी म्हणजे पौर्णिमेचं चांदणं. कुमारजी म्हणजे स्वरांचा गंगौघ.
कुमारजींसाठी वसंत बापटांनी लिहिलेलं काव्य सादर करते.
एका कुमाराची कहाणी
सकाळच्या उन्हासरिसे एकदा याने काय केले
दिसेल त्या आकाराला सोन्याचे हात दिले
टिंबाटिंबामधे जसे चिंब आपले भरून ठेवले
वडीलधाऱ्या वडांचेही माथे जरा खाली लवले
तेवढ्यामध्ये कोणी तरी कौतुकाची टाळी दिली...
तशी हा सावध झाला,
आपली आपण हाक ऐकून दूर दूर निघून गेला
सूर्योन्मुख सूर्यफूल एकटक तप करते
धरणीवरती पाय रोवून आकाशाचा जप करते
तसा तोही इनामदार उग्र एकाग्र झाला
तेव्हा म्हणे कोणी याला आदराचा मुजरा केला...
तशी हा जो तडक उठला,
ृगजळ पिण्यासाठी रानोमाळ धावत सुटला.
खजुरीच्या बनामधे संध्याकाळची सावली झाला
तेव्हा याच्या देहावरून लमाणांचा तांडा गेला
म्हणे कोणी तरी याच्यासाठी हाय म्हटले...
तशी याने काय केले, कोशासारखे वेढून घेतले कबीराचे सारे शेले
मीरेच्या मंदिरात मारवा होऊन घुमत राहिला
कोणी म्हणतात निगुर्णाच्या डोहाचाही तळ पाहिला...
एवढ्यामध्ये काय घडले,
मंदिरात सनातन डमरू झडले.
कण्यामधल्या मण्यांमधून मल्हाराची नागीण उठली
चंद्राच्या तव्यामध्ये ॐकाराची लाट फुटली
तेव्हा म्हणे जरा कुठे कंठामधली तहान मिटली...
आता तसा कुशल आहे, पण स्वप्नात दचकून उठे
म्हणे माझा सप्तवर्ण श्‍यामकर्ण घोडा कुठे!

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...