Friday 24 November 2017

बाप



#बाप गेला कि मुलांना बाप खूप खूप आठवू लागतो ..
तो खरा बापमाणूस असेल तर आठवतोच ... पण
आयुष्यभर स्वतःच्याच विश्वात जगलेला बाप असला कि जास्तच आठवतो.
बापानं आयुष्यभर न देऊ केलेलं प्रेम
बालपणात बापानं घ्यावयाची.. न घेतलेली काळजी
गरजेच्या वेळी भासलेली बापाची उणीव
संकटात न मिळालेला बापाचा सहारा  ...
एकटेपणात न मिळालेली आधाराची साथ
आणि बाप म्हणून डोक्यावर कधीच न ठेवलेला हात

बाप गेला कि हे अधिकच गडद होत जातं...खूप आठवतो न मिळालेला हक्काचा बाप

प्रेम आधार सगळं बाहेर शोधता येतं..  ..बाहेर मिळत नाही तो ..'बाप'
बापाला ऑप्शन नसतं... बाप असला तरी आणि गेला तरी बाप मिळत नाही दुसरा.
अख्या जन्मात बापाचं प्रेम न मिळणं आयुष्यभऱ्याचं मोठं दुःख होऊन बसतं
बाप गेल्यावर ते अधिकच सलत राहतं....जन्मभर

बाप्पांनो आपल्या विश्वात हरवू नका ... मुलांचा बाप हिरावू नका
मुलांना वेळ द्या, प्रेम द्या.... त्यांना त्यांच्या हक्काचा बाप द्या.

#बाबांचीआठवण :(


Friday 17 November 2017

कथांची व्यथा..


तू आखुन दिलेली लक्ष्मणरेषा लांघता येत नाही
 आणि अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा मांडताही येत नाही

मनात खूप दाटल्याहेत तुला सांगावयाच्या गोष्टी
कोंबल्या गेल्या आहेत..काचताहेत
न बोलताच गिळून टाकलेले किती हुंदके .. कित्तेक शब्द
पचतही नाही आणि ओकवतही नाही.
अडकले आहेत मनात-बुद्धीत, घश्यातही
आत आत चर्वण करीत राहिले ... तरी
त्यांना कंठ फुटत नाही
अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा आता मांडताही येत नाही

आपणच जन्म घातलेले त्या कथेतले काही पात्र
त्या पात्रांना स्वप्नांचे क्षितिज दाखवून आपणच वाढीस लावले होते
त्यांना पंख फुटाण्याआत तू भिरकावून लावलेस अन निघून गेलास
ते भटकताहेत अनवाणी - तडफडताहेत
तुझ्या येण्याच्या वाटेवर जीव अडकलाय त्यांचा
त्यांना मुक्ती हवीय रे ...
कसं सांगू त्यांचे हाल आताशा बघवत नाही
अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा आता मांडताही येत नाही


आता मलाही वाटू लागलंय
तू यावंसंच एकदा ... फक्त एकदा
ये अन स्पर्शाने पुनर्जीवित कर त्यां स्वप्नांना
स्वप्नातील विरक्त पात्रांना
अन तृप्ततेचा श्वास देऊन पुन्हा समाधानाने मरणाला मार्ग मोकळा करून दे
ये अन मोक्ष मिळवून दे त्यांना
मरगळ आलेल्या शब्दांना तुझ्या स्पर्शाने जिवंत कर
एकटंच भटकणाऱ्या त्या तप्त उसस्यांचा दाह शांत कर
वाट पाहून दमलेल्या डोळ्यांना ओठांची उब दे  आणि
शांतवून त्या दीर्घ रात्रींना अखंड निज दे ..

तू आखुन दिलेली लक्ष्मणरेषा लांघयचीय रे एकदा
अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा संपवायचीय कायमची

सांग... येशील ?







अंतर

मागे गेलेल्या काळाच्या कुठल्याश्या त्या क्षणी
एकाच जागी उभे असूनही वाढत गेले अंतर तुझ्या माझ्यातले
कुठल्याश्या एका नात्याने जुळले असूनही
पायापासून जमिनीवर पसरत गेलेल्या
लांबच लांब होत जाणाऱ्या सावल्यांसारखे
लांब होत राहिलो आपण .. वेगवेगळे होत गेलो ..
सोबतीने चालत असूनही सोबत नसणारे
दोन वेगवेगळ्या समांतर मार्गाने पुढे चालत राहायचं
आलेला दिवस ढकलायचा
नाते जपतोय कि ओढतोय आपण ..

कुठला क्षण होता तो दोघांच्या मध्ये लांब आडवी रेष ओढणारा
रेषेइतकेही अंतर निर्माण व्हावे अशी परिस्थिती निर्माण व्हावी हे प्राक्तन का यावे
तुला नाही वाटत का खंत कशाचीच
ती रेष पुसायलाही किती लांबचा प्रवास करत मागे चालत जायला लागणार आहे
हातातला सुटलेला हात धरायला परतीच्या रस्त्यावरही सोबत चालायला लागणार आहे
दोघांचीही तयारी हवी पार केलेला प्रवास सोडून द्यायची
प्रवास महत्वाचा कि साथ हे दोघांच्याही बाबतीत सारखेही असायला हवे
साथ महत्वाची असेल तरच आलो त्या रस्त्याने पुन्हा सोसवत निघण्याची तयारी करता येईल

हे सगळं करत आलोच त्या मध्याला तर ... ?
सोडला होतास हातातून हात तो क्षण खोडून टाकता येईल का रे
पुन्हा धरून हातात हात ... नवा प्रवास सुरु करता येईल
कि फार वेळ झालाय.. रस्ता सुटलाय .. आणि आशाही
तूच सांग
आहे तसंच पोकळ राहणारेय का आयुष्यच जगणं ?
सोबत असणार आहोत का कधी कि फक्त दिसत राहणार आहोत
आणि तुही त्यातच समाधानी आहेस ??


Tuesday 14 November 2017

उदात्तीकरण भाग - २ - सोशल मीडिया आणि असहिष्णुता




काही दिवसांआधी सोशल नेटवर्किंग वरून फिरणारी एक व्हिडीओक्लिप घरोघरी दारोदारी चर्चेचा विषय ठरली होती. ''अभ्यास घेतांना शुल्लक प्रश्नासाठी मारणारी आई'' (ती आईच होती का? असा प्रश्न विचारू नये ते गृहीतच  धरायचं आहे).....तर, फार फार बिचाऱ्या मुलाला (मूल बिचारं होतं का? :O  अहो काय विचारताय .. हा काय प्रश्न झाला होय ? मूल बिचारच असतं...सरळमार्गी, आईचं सगळं सगळं ऐकणारं, अजिबात बदमाशी न करणारं, खोड्या-बिड्या नावालाही न करणारं अन अजिबात जराही शिक्षा करण्यास पात्र नसलेलं असंच मूल ते होतं असंच गृहीत धरायचंच आहे) मारणारी  हि आई फार फार 'क्रूर' होती (दोन चापट्यात हे कसं कळालं हे विचारूच नये .. ते पण गृहीत धरायचंच आहे)  तर अश्या बिचाऱ्या मुलाच्या क्रूर आईची कहाणी शिव्यांच्या वाखोलीत गावभर-शहरभर-जगभर पसरली. .. त्या आईचा थाटात शालजोडतला उदो उदो झाला सगळीकडे...त्या एकट्या बिचाऱ्या लेकरासाठी कित्तिजन कळवळले वगैरे ... आणि मला काय काय आठवलं म्हणून सांगू (हो हो मी पण पाषाणहृदयीच आहे ... हळहळ व्यक्त नाही केली म्हणून ना .. बरं... मानलं) तर प्रथम कोण आठवली सांगू ...
.
श्यामची आई आठवते ? श्याम पोहायला जात नाही, माळ्यावर लपून बसतो म्हणून शिंपटी शिंपटीने बडव बडव बडवून काढणारी श्यामची आई...पोहऱ्यात उडी घेतली नाहीस तर घरात येऊ नकोस असं सांगणारी आई. बडवणाऱ्या आया असतात का नाही त्या तर चेटकिणी असतात. तेव्हा सोशल मीडिया असता तर काय कहर झाला असता.. आणि असा बडवतांनाच व्हिडीओ वायरल झाला असता तर श्यामचा कधीच साने गुरुजी झाला नसता.


माझी आई फार शिकलेली नव्हती, पण शिकले नाही कि आयुष्यात काय काय कसोटींना तोंड द्यावं लागतं हे अनुभवानं जाणून होती. म्हणून आम्ही भावंडांनी खूप शिकावं यासाठी आयुष्यभर खस्ता खाऊन ती प्रयत्न करीत राहिली. आमचे अभ्यासातून लक्ष उडतंय असं लक्षात आलं कि ती तिच्या परीने नवनवे फंडे वापरीत असे. आयुष्यभर कधी कधी कुठे कुठे कमी शिक्षणाचा त्रास झाला. शिक्षण घेतले असते तर आकांक्षा कश्या पुऱ्या करता आल्या असत्या हे सतत बडबडत याच्या त्याच्या उदाहरणाने सांगत असायची. आमच्या शिक्षणासाठी, अभ्यासासाठी लागणाऱ्या सगळ्या तडजोडी करायला ती तयार असे. अट एकच..अभ्यास करा, खूप शिका मोठे व्हा. यात कुठे उणीव दिसली कि प्रसंगी बेदम मारायचीही. लहानपणी आम्ही आईच्या हातचा भरपूर मार खाल्लाय, एकदा तर सगळी तयारी झाल्यावर शाळेत जात नाही म्हंटलं म्हणून भरलेली वॉटरबॅग पाठीत हाणली होती. भावाला शिक्षणापेक्षा खेळात जास्त रस. तो बॉल-बॅटमिंटनचा चॅम्पियन होता.
प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि कॉम्पिटिशन एवढाच त्याला कळायचं, अभ्यासात अजिबात रस नसायचा. खेळण्यात तो इतका दंग राहायचा कि परीक्षेच्या दिवसातही तासंतास रॅकेट रिपेअर करत बसायचा, स्वतःची तर स्वतःची मित्रांचीही रॅकेट घरी आणून ठेवायचा. घरात पसारा करून गावभऱ्याच्या रॅकेट शिवत (रिपेअर) बसायचा. एकदा निकाल अत्यंत वाईट आला आणि आईने त्याच्याच हातची रॅकेट घेऊन त्याच्या पाठीत हाणली. आईचा बेत लक्षात आल्याने त्याने वेळेत पळ काढला होता म्हणून अर्धी पाठीत बसली अन खाडकन रॅकेट तुटली. होय, लोखंडी दांडा असलेली रॅकेट तुटली. आता हे सगळं आठवून आम्ही खूप हसतो....पण हे दिवस आयुष्यात आले नसते तर ?? आईने आमचा अभ्यास आमचं शिक्षण इतकं गांभीर्यानं घेतलाच नसतं तर ??
आज आम्ही आहोत तिथे असतो ?...खरं सांगू नसतो...कधीच नसतो.
आता कधी कधी असं वाटत तेव्हा सोशल मीडिया असता तर काय झालं असतं ? आईचा हा एक एक शॉट कॅमेरात कैद करून फेसबुक ट्विटरवर पडला असता तर. माझी आई डाकीण, आतंकवादी, राक्षसीण काय काय ठरली असती ? लोकांनी तिला भरचौकात फाशी द्यायची मागणी केली असती. एवढच काय हजारो लोकांनी हजारदा तिला शाब्दिक फाशी देऊन, प्रचंड हेळसांड करून मेल्याहून मेल करून सोडल असतं. आमच्या लहानपणी हे घडलं असतं तर मग पुढे आम्ही घडलो असतो का ?
माझे आजोबा भिक्षुकी करायचे. घरी ६ भावंडं आणि परिस्थिती अतिशय दरिद्री, दयनीय. भिक्षुकी करून आलेल्या शेर-दोन शेर तांदळात ८ जणांचं कुटुंब दोन वेळचं पोट भरायचे. माझे बाबा तर म्हणे लहानपणी बकरीच्या उसन्या ताकावर जगले. तेव्हा अशीच दयनीय परिस्थिती पुढे आपल्या मुलांची होऊ नये म्हणून त्यांनी खूप शिकावं हि आजीची इच्छा होती. तसे आजोबा फार देवभोळे होते पण आमची आजी मात्र त्यावेळी ४ वर्ग शिकलेली आणि स्वभावाने जरा जाळ मिरचीच. शिक्षणाचे महत्व प्रचंड होते तिला. तेव्हा त्या काळातही अत्यंत हलाखीच्या  परिस्थितीतही चार मुली आणि दोन मुलं या सगळ्यांनी शिकावं म्हणून तिने कडक शिस्तीत राहून प्रयत्न केले. बाबा सांगतात अभ्यास करायचे नाही म्हणून कंबरेला दोरखंड बांधून काका आणि बाबांना आजीने कितीदा विहिरीत सोडले होते. नाकातोंडात पाणी गेल्यावर अभ्यास करायचे कबुल केल्यावरच ती बाहेर काढायची. अश्याच कडक शिस्त मुलींनाही. रात्र रात्र बसून कंदिलाच्या उजेडात अभ्यास करावा लागे. आजीचा धाकच तास होता.  या भावंडांनी पुढे समाजाला, कुटुंबाला अभिमान वाटावा असे कितीतरी सृजन घडवून आणले. अनेक समाजाभिमुख कार्य केले. इतका मार खाऊनही या सर्वांनाच त्यांच्या आईवर प्रचंड प्रेम आहे.

काय होतंय आपल्याला ?? सहज हाताशी व्यक्त होण्याची माध्यम आहेत म्हणून नको तिथे व्यक्त व्हायला लागलोय आणि व्यक्त होण्याची गरज आहे तिथे बोबडी वळवून गप्प बसतोय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवंय म्हणतांना नेमकी अभिव्यक्ती काय याची भूल पडत चाललीय. सद्सद विवेक बुद्धीचा अकाल पडतोय आणि या सोशल मीडियावर दाटीवाटीने चालणाऱ्या गर्दीचा भाग व्हायला आमची सगळी धडपड चाललीय का असं दिसायला लागत?

व्यक्त व्हायला काहीच हरकत नाही. वैचारिक वाद विवादाचे वारे वाहत राहायलाही हरकत नाही पण, आपण व्यक्त झाल्यानंतर त्या विचारांचा फक्त आजच्या बौद्धिक गटाच्या विचारांच्या स्पंदनावर परिणाम होत नाही याचे दूरगामी परिणाम उद्याच्या पिढीवर नकळत घडत असतात याचा साधा आपण विचारही करतांना दिसत नाही.

(क्रमशः)

Monday 13 November 2017

कुणीतरी लिहीत असतं..
मन रितं करायला, मोकळं व्हायला..कल्पकता म्हणून . आवड म्हणून..कलाकृती साकारायला वगैरे वगैरे
असा तो/ती लिहीत असते
स्पष्ट किंवा पुसटसं.. पारदर्शक किंवा गूढ असं..
उत्सुकता शमवणारं किंवा प्रचंड वाढवणारं..
लिहिणारा लिहीत जातो आतलं आतलं खंदून काढत जातो
वाचकाच्या मनात ते भरत राहतं .. आत आत खोलात शिरत राहतं
हा लिहून मोकळा.. तो वाचून गंभीर, स्तब्ध, भावुक वगैरे
म्हणजे काय, पैसे खर्च करून एखाद्या चांगल्या लेखकाचे पुस्तक घ्यायचे आणि आपण आपले बसायचे खिसा मोकळा आणि कंठ भरून घेऊन .. भावुक बिऊक होऊन

हे चांगले लेखक बिखक ना वाइट असतात फार ...

Friday 10 November 2017

पत्र - ५ आतल्यामास्तरीणबाई - नात्यांचा गुंता


परवा सुवर्णा भेटली मार्केटमध्ये, सुवर्णा हो .. ती नाही का फेसबुकवर फेमस असलेली. चारेक हजारतरी मित्र असतील तिचे. तशी लिहितेही भन्नाटच...साऱ्या जगावर सूड उगवणारं.. फोटो कसले छान छान टाकते. दिवसाला कित्ती पोस्ट आणि कित्ती कित्ती फोटो. किती लोकं निव्वळ तिच्या वॉलवर पडलेली असतात...कित्येकांना तिच्याशी नाते जोडावे वाटते कित्येकांना मैत्री करावी. तिला भेटायची ओढ जशी सर्वांना तशी मलाही होतीच जरा .. तशी तिची माझी हि पहिलीच भेट...पण  भेटून जरा दचकायला झालं...बोलणंही उदासवाणं वाटलं तिचं.. एकटी होती ती फार एकटी ... ४००० मित्र असणारी गर्दीत वावरणारी व्यक्ती इतकी एकाकी ....

विचार करून करून रात्रभर झोपच लागली नाही आणि पहाटे पहाटे मास्तरीण बाई आल्याचं मग भेटायला.

सखे,

माणसं सोबत दिसणं आणि माणसं आपली असणं यात फार फरक आहे राणी. गोतावळ्यात दिसणारी सगळी माणसं आपली असतातच असे नाही.....आणि या गोतावळ्यात न दिसणारी आपली नसतातच असेही नाही. आपल्या अवती भोवती दिसणारी माणसं मनाने किती जवळ असतात आपल्या याचा अंदाज त्यांच्या बाह्य रुपावरुन लावताच येत नाही....गर्दीतली माणसं हरवलेली असतात कुठेतरी, कशाच्यातरी तरी शोधात, कुणाच्यातरी विचारात.. गर्दीच्या ठिकाणीही एकटी झालेली असतात. एकट्यातली माणसं मात्र गर्दी शोधतात. कुणाचीतरी सोबत शोधत हिंडत असतात.  आपली माणसं गोतावळा घेऊन येत नाही, दूर असतील कुठेतरी, तरी मनानं सदैव सोबत असतात. त्यांचं अस्तित्व हवेसारखं भोवताल घुटमळत असतं सदैव. न सांगता न बोलताही एकमेकांच्या मनाची स्थिती समजून घेऊ शकतात. सोबत नसूनही साथ देणारी अन सोबत असूनही भरकटलेली, हि सगळीही माणसेच असतात गं. नातं दिसत नाही आणि भासत ही नाही ते अनुभवावं लागतं. बघ विचार कर - शरीरानं दूर राहूनही आपल्या खूप जवळचा असा आपला एखादा मित्र तिथे शरीरानं कुणाच्यातरी जवळ असेलच ना , तिथे असूनही तिथे नसेल... अगदी असेच इथेही .. गोतावळ्यातली सगळी माणसं भरकटून कुणाच्या तरी अस्तित्वाभोवती घुटमळत असतात. असतात तिथं नसतातच ते. नसतात तिथेही असू शकतात. खरतर माणसं माणसांना भेटतच नसतात. मन मनाला भेटत असतं.  ते तसं भेटलं पाहिजे तरच माणूस आपला होतो. एखादा क्षणभराच्या भेटीतही आपला वाटतो, नाहीतर वर्षानुवर्ष सोबत राहणारेही कधीच मनाने एक झालेले नसतात. म्हणून गोतावळ्यात दिसणारी माणसेही एकटी असू शकतात आणि एकटी राहणारी व्यक्तीही भावनांच्या सुंदर नात्यांच्या हिंदोळ्यावर आनंदाची अनुभूती घेत जगू शकते.

आयुष्याच्या वळणांवर जेव्हा आपलं स्वतःच अस्तित्वही बोचू लागतं... तेव्हा आपल्याला अलगद सावरतं आणि सहज समजून घेतं ते खरं नातं ती खरी मैत्री असते. हा सगळा असा गुंताच असतो नात्यांचा. हा खरतर नेणिवेतून झालेला जाणिवांचा खेळ असतो. पण .. पण आपल्याला दिसेल तेच सत्य वाटत असतं, इथेच तर आपण फसतो. जी चांगली माणसं आहेत ती आपली असायलाच पाहिजे हा आग्रह धरून लोकं आपली होत नसतात...जी आपली आहेत पूर्ण मनानी, तीच खरी चांगली माणसं असतात..ती तेवढी मूठभरच जपता आली पाहिजे, जपली पाहिजेत.  गोतावळ्यात असलीत किंवा नसलीत तरीही.. मग अश्या गोतावळातल्या कित्तेक सुवर्णा एकट्या भासल्या त्याचं नवल वाटणार नाही तुला. हा करता आलं तर एवढं कर. त्यांच्याशी मनाचं नातं जोड...बघ जमतंय का? 


तुझ्याच

#आतल्यामास्तरीणबाई

Wednesday 8 November 2017

हळूच स्फुरते कविता .. !


अश्रूंचा सागर आटला कि
कंठात हुंदका दाटला कि
सुखाचा सदरा फाटला कि
हळूच स्फुरते कविता बिविता

हळवं कातर मन ढवळून
आतलं आतलं हलवून बिलऊन
वेदनेचा बांध फुटला कि
हळूच स्फुरते कविता बिविता

मनाची घालमेल थांबली कि
विरहाची दुःखे लांबली कि
तगमग तगमग वाढली कि
हळूच स्फुरते कविता बिविता

जगणं बिगण फुलवून
नितळ भावना खुलवून
शब्द शब्द कुरवाळले कि
हळूच स्फुरते कविता बिविता

गर्द आभाळ निवून जावा
पाऊस थोडा पिऊन घ्यावा
मृदगंध पसरून वीरला कि
हळूच स्फुरते कविता बिविता ..




Rashmi M.


  

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...