Posts

Showing posts from August, 2023
डोळ्यात हरवल्या माझ्या पेंगुळल्या साऱ्या रात्री  स्पर्शातुन उठते काहूर पोचण्यास गात्री गात्री  श्वासात कोरल्या गेल्या व्याकूळ मनाच्या गाठी  आठवता गहिवर येतो त्या धुंद क्षणांच्या भेटी  ही ओढ अनामिक दाटे मोहरून येते काया  देहात असा दरवळतो तू मोहक अत्तर फाया  का नाव तुझे घेताना ओथंबुन श्रावण येतो  सावळा मेघ भिरभिरतो देहावरती कोसळतो  हे सौख्य असे नात्याचे की नुसते आभासाचे  मी भान हरपुनी आहे की बघते स्वप्न सुखाचे  पोचल्या कश्या ना हाका का साद न पडली कानी  मी व्याकुळ आहे इकडे का तुझ्या न आले ध्यानी  ©रश्मी पदवाड मदनकर विधाता वृत्त