Tuesday 12 December 2017

सोन्यासारखा जीव !!

भर दुपारची वेळ..अंगाची काहिली उन्ह मी म्हणतांना , .पाणी पाणी जीव होतांना
 काळवंडलेली-कृश पारो...  कळकट मळकट परकर पोलकं, डोईवर भोकं पडलेली ठिगळ लागलेली ओढणी. पाठीवर घर घेऊन बिन चपलेची डांबरी काळ्या तापलेल्या रस्त्यावरून फिरतांना खपाटीला लागलेल्या पोटाच्या खाचेतल्या विरलेल्या झोळीत गाढ झोपलेलं पिटुकलं बाळ घेऊन दुकानाच्या दारादारात  पसरलेल्या मातीत चुंबकाच्या साहाय्याने कण कण शोधणारी....
हातातल्या चुंबकाला वाया गेलेले सोन्याचे काही कण लागतील म्हणून सोनाराच्या दुकानासमोरून माती चिवडणाऱ्या पारोला कोण सांगेल झोळीतला चिमुकला सोन्यासारखा लेकरू नकळत चिवडला जातोय ... कणाकणाने माती होऊन वाया जातोय ते.


Wednesday 6 December 2017

आमच्या संवेदना न मरो ...


नागपुरातील अनेक सिग्नल्सवर, रेल्वे स्थानकांवर, मंदिरात, लहान-मोठा ताजबाग अश्या कित्तेक ठिकाणी लहान मुले भिक मागताना आढळतात. ऊन-पाऊस-गारवा कुठल्याही वातावरणात उघडे-नागडे, उपाशी-तापाशी, पिंजारलेले केस, जखमा जखमा झालेले अंग..वेदनेने-दुःखाने पिचलेले किंवा मग त्यापलीकडे गेलेले. कुणाचे आहेत, कुठून आले कुठे गेले ह्याचा कुणाला थांग पत्ता नसतो. त्यातील बरीच मुले हि माफिया लोकांनी गरीब वस्तीतून भिक मागण्यासाठी अपहरण केलेली किंवा परराज्यातून पळवून आणलेली, स्वतः पळून आलेली असतात. या मुलांच्या संरक्षण आणि उत्तम नागरिक बनण्याच्या हक्काबद्दल सरकार, प्रशासन काही करणार आहे का?? कि रस्त्यावरच्या मोकाट श्वानांसारखी यांच्या आयुष्याला काहीच किंमत नाही?
कित्तेक आई-बाबा याच रस्त्याने रात्रंदिवस प्रवास करीत असतील. यांच्या कुणाच्याच मनाला हे सारे प्रसंग कधीच खटकत नसतील का? आम्ही कोडग्या मनांनी उघड्या डोळ्यांनी हा तमाशा पाहत राहणार आहोत.. पाहतो आहोत. आमच्या संवेदना न मरो हीच प्रार्थना .. 




#बच्चेबचाओ #SaveChildBeggars

#बच्चेबचाओ #SaveChildBeggars
गेल्या १०-१२ दिवसांपासून फेसबुक अकाउंट डिऍक्टिव्हेट केले होते... त्या दिवशी अस्वस्थ होऊन ज्या कारणाने गेले आज त्याच कारणाने परत आले. एखाद्या दिवशी मन खूप उद्विग्न करणार काहीतरी नजरेत पडतं आणि सगळंच कसं फोल वाटायला लागतं....बाराएक दिवसाआधीची गोष्ट असेल रोज ऑफिसला जाण्याच्या वाटेत व्हरायटी चौक नावाचा प्रशस्त चौक लागतो. चौकाच्याच बाजूला मोठ्ठ 'मुख्य' पोलीस स्टेशनही आहे. ७ वर्षाच्या मुलीचा खांद्यापासून ढोपरापर्यंत पूर्ण कट झालेला हात दाखवत पंधराएक वर्षाचा मुलगा पुढे आला, हिला औषधाला पैसे द्या म्हणाला. रक्ताळलेला पूर्ण फाटून फाकलेला हात बघून फार कसनुसं झालं. हातात येईल ती दहा-वीसची एक नोट त्या पोराच्या हातात ठेवली आणि सिग्नल सुटताच निघून गेले त्या दिवसभर तो लाललाल हात नजरेसमोर येत राहिला. काय झालं असेल.. का झालं असेल? अनेक तर्कवितर्काचे सत्र मनातच रंगत राहिले. पण झाला असेल अपघात काहीतरी म्हणून मग संध्याकाळपर्यंत सगळं विस्मरणात गेलं. झाला गेला दिवस निवळला. त्यानंतरच्या चौथ्या दिवशी पुन्हा ६ वर्षांच्या नाजुकश्या मुलीचा पूर्णतः भाजलेला हात पुढे करत ८-९ वर्षांचा मुलगा पुढे आला. त्या एवढ्याश्या चिमुकलीचा हात इतका भाजला होता जणू उकळत्या तेलात तळून काढलाय. जीव कळवळला, माझा मुलगा डोळ्यासमोर आला. भोवळ यायची बाकी राहिली. त्या पोराला बोलले चल दवाखान्यात हीच्यावर उपचार करू तर भरभर चालत रस्ता ओलांडून निघून गेला. मी सरळ गाडी पोलीस स्टेशनात घेतली. आत जाऊन रीतसर तक्रार नोंदवली... दिवसभर मन लागलं नाही इतक्या इतक्या चिमुकल्या मुलींसोबत काय होतंय, हे इतकं बाहेर दिसतंय तर एकट्यात आत काय काय होत असेल विचार करून डोक्याचा भुगा. आत आत खूप गहिवरून येत होतं, चलबिचल चलबिचल होत राहिली. स्वतःच स्वतःचा राग आला. बाहेर हे सगळं असं काय काय चाललंय आणि आपण काय करतोय? आभासी जगात दाखवल्या जाणाऱ्या कित्तेक गुडी गुडी गोष्टींना सत्य मानून आनंदात जगतोय. डोळे झाकल्याने सत्य बदलणार आहे का? डोळ्यावरची झापड काढायला हवीय .. आणि त्याच दिवशी फेसबुक मधून परांगदा झाले...जरा अलिप्त व्हावं वाटत होतं. रोज इथे येऊन एकमेकांचे तोंडभरून कौतुक करणाऱ्या अनेक मित्रांपैकी ८-१० मित्रांशिवाय ते फारसे कुणाला कळलेही नाही .. किती बिझी झालोय आपण. आपल्या बाजूचा रोज दिसणारा माणूस एकदिवस असा नाहीसा होतो आणि आपल्याला पत्ताही लागू नये. मागे असेच चित्रपट सृष्टीतल्या कुठल्याश्या निर्मात्याने सुसाईट नोट टाकली फेसबुकवर .. त्यानं काय लिहिलंय, किती दुःख किती अस्वस्थता त्या लेखातून झळकते आहे याचा जराही लवलेश लावून न घेता नेटिझन्स त्या पोस्टला लाईक करत सुटले. कित्येकांनी गमतीच्या प्रतिक्रियाही दिल्या ...त्याला खरं सांत्वन हवं होतं- कुणाचे तरी आधाराचे शब्द हवे होते. चुकीचं करायला थांबवणारी साथ हवी होती, तेव्हाच नेमके हे जग किती तकलादू, इथले लोकंच कसे आभासी आणि इथे मिळणारी सोबत किती फसवी आहे याची प्रकर्षाने जाणीव होऊन व्यथित होऊन त्याने आत्महत्याचे पाऊल शेवटी उचललेच. आत्ता आत्ताच इथे पोस्ट टाकणारा त्याच्याशी घडलेल्या गोष्टी इतक्या तळमळीने शेअर करणारा, कॉमेंट मधून तटतटून भांडणारा, रोजच दिसणारा,हाकेच्या अंतरावर जाणवणारा आपल्या मित्र यादीतला इसम आत्ता बघता बघता स्वतःला जीवे मारतो, निघून जातो आणि आपण काहीच करू शकत नाही हे सत्य नंतर कित्येकांच्या पचनी पडले नाही.. पण त्यानं काही झालेही नाही. अजून आपण तिथेच गरगर फिरतोय स्वतःतच गुरफटले गेलो आहे. यापलीकडे काय घडतंय याच्याशी काडीमात्र घेणेदेणे नाही. जगबुडी होईपर्यंत आम्ही असेच घाणीच्या बैलासारखे फिरत राहणार आहोत का ? .... असो
तर मी तक्रार नोंदवल्या नंतर ऑफिसला जाता येता या चौकात आवर्जून लक्ष देणं सुरु होतं .. पूर्ण १२ दिवस लहान मुलं तर सोडा साधे दुसरे भिकारीही दिसले नाही.. वाटलं चला आपल्या तक्रारीने काहीतरी सकारात्मक फरक पडला असावा, चिमुकल्यांना पोलिसांनी या घाणीतून काढले असावे..पण तसे नव्हते..आज सकाळी पुन्हा अगदी 5-6 वर्षांची नवी पोर हात पूर्ण लदलद जळालेल्या अवस्थेत पुढ्यात आली. पोलीस स्टेशनला जाऊन मी पुन्हा जरा हिसका दिला ... त्याचा उपयोग पुन्हा ४ दिवस होईलही, पण अश्या किती चिमुकल्या नरकयातना भोगत राहणार आहे हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. मी एकटीने तरी काय करावे हवे तसे उत्तर सापडतच नाहीये. म्हणून मग परत येऊन हे तुम्हा सगळ्यांना सांगावं वाटलं .. वाटलंच कुणाला जरा आपल्या कोषातून बाहेर येऊन कुठेतरी काहीतरी यासाठी करावं तर, कुणी सांगावे... बिचाऱ्या अत्याचार होणाऱ्या चिमुकल्यांना चुकून माखून मदत व्हायची.... आणखी काय ?


Friday 24 November 2017

बाप



#बाप गेला कि मुलांना बाप खूप खूप आठवू लागतो ..
तो खरा बापमाणूस असेल तर आठवतोच ... पण
आयुष्यभर स्वतःच्याच विश्वात जगलेला बाप असला कि जास्तच आठवतो.
बापानं आयुष्यभर न देऊ केलेलं प्रेम
बालपणात बापानं घ्यावयाची.. न घेतलेली काळजी
गरजेच्या वेळी भासलेली बापाची उणीव
संकटात न मिळालेला बापाचा सहारा  ...
एकटेपणात न मिळालेली आधाराची साथ
आणि बाप म्हणून डोक्यावर कधीच न ठेवलेला हात

बाप गेला कि हे अधिकच गडद होत जातं...खूप आठवतो न मिळालेला हक्काचा बाप

प्रेम आधार सगळं बाहेर शोधता येतं..  ..बाहेर मिळत नाही तो ..'बाप'
बापाला ऑप्शन नसतं... बाप असला तरी आणि गेला तरी बाप मिळत नाही दुसरा.
अख्या जन्मात बापाचं प्रेम न मिळणं आयुष्यभऱ्याचं मोठं दुःख होऊन बसतं
बाप गेल्यावर ते अधिकच सलत राहतं....जन्मभर

बाप्पांनो आपल्या विश्वात हरवू नका ... मुलांचा बाप हिरावू नका
मुलांना वेळ द्या, प्रेम द्या.... त्यांना त्यांच्या हक्काचा बाप द्या.

#बाबांचीआठवण :(


Friday 17 November 2017

कथांची व्यथा..


तू आखुन दिलेली लक्ष्मणरेषा लांघता येत नाही
 आणि अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा मांडताही येत नाही

मनात खूप दाटल्याहेत तुला सांगावयाच्या गोष्टी
कोंबल्या गेल्या आहेत..काचताहेत
न बोलताच गिळून टाकलेले किती हुंदके .. कित्तेक शब्द
पचतही नाही आणि ओकवतही नाही.
अडकले आहेत मनात-बुद्धीत, घश्यातही
आत आत चर्वण करीत राहिले ... तरी
त्यांना कंठ फुटत नाही
अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा आता मांडताही येत नाही

आपणच जन्म घातलेले त्या कथेतले काही पात्र
त्या पात्रांना स्वप्नांचे क्षितिज दाखवून आपणच वाढीस लावले होते
त्यांना पंख फुटाण्याआत तू भिरकावून लावलेस अन निघून गेलास
ते भटकताहेत अनवाणी - तडफडताहेत
तुझ्या येण्याच्या वाटेवर जीव अडकलाय त्यांचा
त्यांना मुक्ती हवीय रे ...
कसं सांगू त्यांचे हाल आताशा बघवत नाही
अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा आता मांडताही येत नाही


आता मलाही वाटू लागलंय
तू यावंसंच एकदा ... फक्त एकदा
ये अन स्पर्शाने पुनर्जीवित कर त्यां स्वप्नांना
स्वप्नातील विरक्त पात्रांना
अन तृप्ततेचा श्वास देऊन पुन्हा समाधानाने मरणाला मार्ग मोकळा करून दे
ये अन मोक्ष मिळवून दे त्यांना
मरगळ आलेल्या शब्दांना तुझ्या स्पर्शाने जिवंत कर
एकटंच भटकणाऱ्या त्या तप्त उसस्यांचा दाह शांत कर
वाट पाहून दमलेल्या डोळ्यांना ओठांची उब दे  आणि
शांतवून त्या दीर्घ रात्रींना अखंड निज दे ..

तू आखुन दिलेली लक्ष्मणरेषा लांघयचीय रे एकदा
अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा संपवायचीय कायमची

सांग... येशील ?







अंतर

मागे गेलेल्या काळाच्या कुठल्याश्या त्या क्षणी
एकाच जागी उभे असूनही वाढत गेले अंतर तुझ्या माझ्यातले
कुठल्याश्या एका नात्याने जुळले असूनही
पायापासून जमिनीवर पसरत गेलेल्या
लांबच लांब होत जाणाऱ्या सावल्यांसारखे
लांब होत राहिलो आपण .. वेगवेगळे होत गेलो ..
सोबतीने चालत असूनही सोबत नसणारे
दोन वेगवेगळ्या समांतर मार्गाने पुढे चालत राहायचं
आलेला दिवस ढकलायचा
नाते जपतोय कि ओढतोय आपण ..

कुठला क्षण होता तो दोघांच्या मध्ये लांब आडवी रेष ओढणारा
रेषेइतकेही अंतर निर्माण व्हावे अशी परिस्थिती निर्माण व्हावी हे प्राक्तन का यावे
तुला नाही वाटत का खंत कशाचीच
ती रेष पुसायलाही किती लांबचा प्रवास करत मागे चालत जायला लागणार आहे
हातातला सुटलेला हात धरायला परतीच्या रस्त्यावरही सोबत चालायला लागणार आहे
दोघांचीही तयारी हवी पार केलेला प्रवास सोडून द्यायची
प्रवास महत्वाचा कि साथ हे दोघांच्याही बाबतीत सारखेही असायला हवे
साथ महत्वाची असेल तरच आलो त्या रस्त्याने पुन्हा सोसवत निघण्याची तयारी करता येईल

हे सगळं करत आलोच त्या मध्याला तर ... ?
सोडला होतास हातातून हात तो क्षण खोडून टाकता येईल का रे
पुन्हा धरून हातात हात ... नवा प्रवास सुरु करता येईल
कि फार वेळ झालाय.. रस्ता सुटलाय .. आणि आशाही
तूच सांग
आहे तसंच पोकळ राहणारेय का आयुष्यच जगणं ?
सोबत असणार आहोत का कधी कि फक्त दिसत राहणार आहोत
आणि तुही त्यातच समाधानी आहेस ??


Tuesday 14 November 2017

उदात्तीकरण भाग - २ - सोशल मीडिया आणि असहिष्णुता




काही दिवसांआधी सोशल नेटवर्किंग वरून फिरणारी एक व्हिडीओक्लिप घरोघरी दारोदारी चर्चेचा विषय ठरली होती. ''अभ्यास घेतांना शुल्लक प्रश्नासाठी मारणारी आई'' (ती आईच होती का? असा प्रश्न विचारू नये ते गृहीतच  धरायचं आहे).....तर, फार फार बिचाऱ्या मुलाला (मूल बिचारं होतं का? :O  अहो काय विचारताय .. हा काय प्रश्न झाला होय ? मूल बिचारच असतं...सरळमार्गी, आईचं सगळं सगळं ऐकणारं, अजिबात बदमाशी न करणारं, खोड्या-बिड्या नावालाही न करणारं अन अजिबात जराही शिक्षा करण्यास पात्र नसलेलं असंच मूल ते होतं असंच गृहीत धरायचंच आहे) मारणारी  हि आई फार फार 'क्रूर' होती (दोन चापट्यात हे कसं कळालं हे विचारूच नये .. ते पण गृहीत धरायचंच आहे)  तर अश्या बिचाऱ्या मुलाच्या क्रूर आईची कहाणी शिव्यांच्या वाखोलीत गावभर-शहरभर-जगभर पसरली. .. त्या आईचा थाटात शालजोडतला उदो उदो झाला सगळीकडे...त्या एकट्या बिचाऱ्या लेकरासाठी कित्तिजन कळवळले वगैरे ... आणि मला काय काय आठवलं म्हणून सांगू (हो हो मी पण पाषाणहृदयीच आहे ... हळहळ व्यक्त नाही केली म्हणून ना .. बरं... मानलं) तर प्रथम कोण आठवली सांगू ...
.
श्यामची आई आठवते ? श्याम पोहायला जात नाही, माळ्यावर लपून बसतो म्हणून शिंपटी शिंपटीने बडव बडव बडवून काढणारी श्यामची आई...पोहऱ्यात उडी घेतली नाहीस तर घरात येऊ नकोस असं सांगणारी आई. बडवणाऱ्या आया असतात का नाही त्या तर चेटकिणी असतात. तेव्हा सोशल मीडिया असता तर काय कहर झाला असता.. आणि असा बडवतांनाच व्हिडीओ वायरल झाला असता तर श्यामचा कधीच साने गुरुजी झाला नसता.


माझी आई फार शिकलेली नव्हती, पण शिकले नाही कि आयुष्यात काय काय कसोटींना तोंड द्यावं लागतं हे अनुभवानं जाणून होती. म्हणून आम्ही भावंडांनी खूप शिकावं यासाठी आयुष्यभर खस्ता खाऊन ती प्रयत्न करीत राहिली. आमचे अभ्यासातून लक्ष उडतंय असं लक्षात आलं कि ती तिच्या परीने नवनवे फंडे वापरीत असे. आयुष्यभर कधी कधी कुठे कुठे कमी शिक्षणाचा त्रास झाला. शिक्षण घेतले असते तर आकांक्षा कश्या पुऱ्या करता आल्या असत्या हे सतत बडबडत याच्या त्याच्या उदाहरणाने सांगत असायची. आमच्या शिक्षणासाठी, अभ्यासासाठी लागणाऱ्या सगळ्या तडजोडी करायला ती तयार असे. अट एकच..अभ्यास करा, खूप शिका मोठे व्हा. यात कुठे उणीव दिसली कि प्रसंगी बेदम मारायचीही. लहानपणी आम्ही आईच्या हातचा भरपूर मार खाल्लाय, एकदा तर सगळी तयारी झाल्यावर शाळेत जात नाही म्हंटलं म्हणून भरलेली वॉटरबॅग पाठीत हाणली होती. भावाला शिक्षणापेक्षा खेळात जास्त रस. तो बॉल-बॅटमिंटनचा चॅम्पियन होता.
प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि कॉम्पिटिशन एवढाच त्याला कळायचं, अभ्यासात अजिबात रस नसायचा. खेळण्यात तो इतका दंग राहायचा कि परीक्षेच्या दिवसातही तासंतास रॅकेट रिपेअर करत बसायचा, स्वतःची तर स्वतःची मित्रांचीही रॅकेट घरी आणून ठेवायचा. घरात पसारा करून गावभऱ्याच्या रॅकेट शिवत (रिपेअर) बसायचा. एकदा निकाल अत्यंत वाईट आला आणि आईने त्याच्याच हातची रॅकेट घेऊन त्याच्या पाठीत हाणली. आईचा बेत लक्षात आल्याने त्याने वेळेत पळ काढला होता म्हणून अर्धी पाठीत बसली अन खाडकन रॅकेट तुटली. होय, लोखंडी दांडा असलेली रॅकेट तुटली. आता हे सगळं आठवून आम्ही खूप हसतो....पण हे दिवस आयुष्यात आले नसते तर ?? आईने आमचा अभ्यास आमचं शिक्षण इतकं गांभीर्यानं घेतलाच नसतं तर ??
आज आम्ही आहोत तिथे असतो ?...खरं सांगू नसतो...कधीच नसतो.
आता कधी कधी असं वाटत तेव्हा सोशल मीडिया असता तर काय झालं असतं ? आईचा हा एक एक शॉट कॅमेरात कैद करून फेसबुक ट्विटरवर पडला असता तर. माझी आई डाकीण, आतंकवादी, राक्षसीण काय काय ठरली असती ? लोकांनी तिला भरचौकात फाशी द्यायची मागणी केली असती. एवढच काय हजारो लोकांनी हजारदा तिला शाब्दिक फाशी देऊन, प्रचंड हेळसांड करून मेल्याहून मेल करून सोडल असतं. आमच्या लहानपणी हे घडलं असतं तर मग पुढे आम्ही घडलो असतो का ?
माझे आजोबा भिक्षुकी करायचे. घरी ६ भावंडं आणि परिस्थिती अतिशय दरिद्री, दयनीय. भिक्षुकी करून आलेल्या शेर-दोन शेर तांदळात ८ जणांचं कुटुंब दोन वेळचं पोट भरायचे. माझे बाबा तर म्हणे लहानपणी बकरीच्या उसन्या ताकावर जगले. तेव्हा अशीच दयनीय परिस्थिती पुढे आपल्या मुलांची होऊ नये म्हणून त्यांनी खूप शिकावं हि आजीची इच्छा होती. तसे आजोबा फार देवभोळे होते पण आमची आजी मात्र त्यावेळी ४ वर्ग शिकलेली आणि स्वभावाने जरा जाळ मिरचीच. शिक्षणाचे महत्व प्रचंड होते तिला. तेव्हा त्या काळातही अत्यंत हलाखीच्या  परिस्थितीतही चार मुली आणि दोन मुलं या सगळ्यांनी शिकावं म्हणून तिने कडक शिस्तीत राहून प्रयत्न केले. बाबा सांगतात अभ्यास करायचे नाही म्हणून कंबरेला दोरखंड बांधून काका आणि बाबांना आजीने कितीदा विहिरीत सोडले होते. नाकातोंडात पाणी गेल्यावर अभ्यास करायचे कबुल केल्यावरच ती बाहेर काढायची. अश्याच कडक शिस्त मुलींनाही. रात्र रात्र बसून कंदिलाच्या उजेडात अभ्यास करावा लागे. आजीचा धाकच तास होता.  या भावंडांनी पुढे समाजाला, कुटुंबाला अभिमान वाटावा असे कितीतरी सृजन घडवून आणले. अनेक समाजाभिमुख कार्य केले. इतका मार खाऊनही या सर्वांनाच त्यांच्या आईवर प्रचंड प्रेम आहे.

काय होतंय आपल्याला ?? सहज हाताशी व्यक्त होण्याची माध्यम आहेत म्हणून नको तिथे व्यक्त व्हायला लागलोय आणि व्यक्त होण्याची गरज आहे तिथे बोबडी वळवून गप्प बसतोय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवंय म्हणतांना नेमकी अभिव्यक्ती काय याची भूल पडत चाललीय. सद्सद विवेक बुद्धीचा अकाल पडतोय आणि या सोशल मीडियावर दाटीवाटीने चालणाऱ्या गर्दीचा भाग व्हायला आमची सगळी धडपड चाललीय का असं दिसायला लागत?

व्यक्त व्हायला काहीच हरकत नाही. वैचारिक वाद विवादाचे वारे वाहत राहायलाही हरकत नाही पण, आपण व्यक्त झाल्यानंतर त्या विचारांचा फक्त आजच्या बौद्धिक गटाच्या विचारांच्या स्पंदनावर परिणाम होत नाही याचे दूरगामी परिणाम उद्याच्या पिढीवर नकळत घडत असतात याचा साधा आपण विचारही करतांना दिसत नाही.

(क्रमशः)

Monday 13 November 2017

कुणीतरी लिहीत असतं..
मन रितं करायला, मोकळं व्हायला..कल्पकता म्हणून . आवड म्हणून..कलाकृती साकारायला वगैरे वगैरे
असा तो/ती लिहीत असते
स्पष्ट किंवा पुसटसं.. पारदर्शक किंवा गूढ असं..
उत्सुकता शमवणारं किंवा प्रचंड वाढवणारं..
लिहिणारा लिहीत जातो आतलं आतलं खंदून काढत जातो
वाचकाच्या मनात ते भरत राहतं .. आत आत खोलात शिरत राहतं
हा लिहून मोकळा.. तो वाचून गंभीर, स्तब्ध, भावुक वगैरे
म्हणजे काय, पैसे खर्च करून एखाद्या चांगल्या लेखकाचे पुस्तक घ्यायचे आणि आपण आपले बसायचे खिसा मोकळा आणि कंठ भरून घेऊन .. भावुक बिऊक होऊन

हे चांगले लेखक बिखक ना वाइट असतात फार ...

Friday 10 November 2017

पत्र - ५ आतल्यामास्तरीणबाई - नात्यांचा गुंता


परवा सुवर्णा भेटली मार्केटमध्ये, सुवर्णा हो .. ती नाही का फेसबुकवर फेमस असलेली. चारेक हजारतरी मित्र असतील तिचे. तशी लिहितेही भन्नाटच...साऱ्या जगावर सूड उगवणारं.. फोटो कसले छान छान टाकते. दिवसाला कित्ती पोस्ट आणि कित्ती कित्ती फोटो. किती लोकं निव्वळ तिच्या वॉलवर पडलेली असतात...कित्येकांना तिच्याशी नाते जोडावे वाटते कित्येकांना मैत्री करावी. तिला भेटायची ओढ जशी सर्वांना तशी मलाही होतीच जरा .. तशी तिची माझी हि पहिलीच भेट...पण  भेटून जरा दचकायला झालं...बोलणंही उदासवाणं वाटलं तिचं.. एकटी होती ती फार एकटी ... ४००० मित्र असणारी गर्दीत वावरणारी व्यक्ती इतकी एकाकी ....

विचार करून करून रात्रभर झोपच लागली नाही आणि पहाटे पहाटे मास्तरीण बाई आल्याचं मग भेटायला.

सखे,

माणसं सोबत दिसणं आणि माणसं आपली असणं यात फार फरक आहे राणी. गोतावळ्यात दिसणारी सगळी माणसं आपली असतातच असे नाही.....आणि या गोतावळ्यात न दिसणारी आपली नसतातच असेही नाही. आपल्या अवती भोवती दिसणारी माणसं मनाने किती जवळ असतात आपल्या याचा अंदाज त्यांच्या बाह्य रुपावरुन लावताच येत नाही....गर्दीतली माणसं हरवलेली असतात कुठेतरी, कशाच्यातरी तरी शोधात, कुणाच्यातरी विचारात.. गर्दीच्या ठिकाणीही एकटी झालेली असतात. एकट्यातली माणसं मात्र गर्दी शोधतात. कुणाचीतरी सोबत शोधत हिंडत असतात.  आपली माणसं गोतावळा घेऊन येत नाही, दूर असतील कुठेतरी, तरी मनानं सदैव सोबत असतात. त्यांचं अस्तित्व हवेसारखं भोवताल घुटमळत असतं सदैव. न सांगता न बोलताही एकमेकांच्या मनाची स्थिती समजून घेऊ शकतात. सोबत नसूनही साथ देणारी अन सोबत असूनही भरकटलेली, हि सगळीही माणसेच असतात गं. नातं दिसत नाही आणि भासत ही नाही ते अनुभवावं लागतं. बघ विचार कर - शरीरानं दूर राहूनही आपल्या खूप जवळचा असा आपला एखादा मित्र तिथे शरीरानं कुणाच्यातरी जवळ असेलच ना , तिथे असूनही तिथे नसेल... अगदी असेच इथेही .. गोतावळ्यातली सगळी माणसं भरकटून कुणाच्या तरी अस्तित्वाभोवती घुटमळत असतात. असतात तिथं नसतातच ते. नसतात तिथेही असू शकतात. खरतर माणसं माणसांना भेटतच नसतात. मन मनाला भेटत असतं.  ते तसं भेटलं पाहिजे तरच माणूस आपला होतो. एखादा क्षणभराच्या भेटीतही आपला वाटतो, नाहीतर वर्षानुवर्ष सोबत राहणारेही कधीच मनाने एक झालेले नसतात. म्हणून गोतावळ्यात दिसणारी माणसेही एकटी असू शकतात आणि एकटी राहणारी व्यक्तीही भावनांच्या सुंदर नात्यांच्या हिंदोळ्यावर आनंदाची अनुभूती घेत जगू शकते.

आयुष्याच्या वळणांवर जेव्हा आपलं स्वतःच अस्तित्वही बोचू लागतं... तेव्हा आपल्याला अलगद सावरतं आणि सहज समजून घेतं ते खरं नातं ती खरी मैत्री असते. हा सगळा असा गुंताच असतो नात्यांचा. हा खरतर नेणिवेतून झालेला जाणिवांचा खेळ असतो. पण .. पण आपल्याला दिसेल तेच सत्य वाटत असतं, इथेच तर आपण फसतो. जी चांगली माणसं आहेत ती आपली असायलाच पाहिजे हा आग्रह धरून लोकं आपली होत नसतात...जी आपली आहेत पूर्ण मनानी, तीच खरी चांगली माणसं असतात..ती तेवढी मूठभरच जपता आली पाहिजे, जपली पाहिजेत.  गोतावळ्यात असलीत किंवा नसलीत तरीही.. मग अश्या गोतावळातल्या कित्तेक सुवर्णा एकट्या भासल्या त्याचं नवल वाटणार नाही तुला. हा करता आलं तर एवढं कर. त्यांच्याशी मनाचं नातं जोड...बघ जमतंय का? 


तुझ्याच

#आतल्यामास्तरीणबाई

Wednesday 8 November 2017

हळूच स्फुरते कविता .. !


अश्रूंचा सागर आटला कि
कंठात हुंदका दाटला कि
सुखाचा सदरा फाटला कि
हळूच स्फुरते कविता बिविता

हळवं कातर मन ढवळून
आतलं आतलं हलवून बिलऊन
वेदनेचा बांध फुटला कि
हळूच स्फुरते कविता बिविता

मनाची घालमेल थांबली कि
विरहाची दुःखे लांबली कि
तगमग तगमग वाढली कि
हळूच स्फुरते कविता बिविता

जगणं बिगण फुलवून
नितळ भावना खुलवून
शब्द शब्द कुरवाळले कि
हळूच स्फुरते कविता बिविता

गर्द आभाळ निवून जावा
पाऊस थोडा पिऊन घ्यावा
मृदगंध पसरून वीरला कि
हळूच स्फुरते कविता बिविता ..




Rashmi M.


  

Monday 23 October 2017

मुक्ती ..



दुसरा वरीस उजाडला, यंदाच्या पारी दगा देणार न्हाई, कारल्याचा वेल लगलगून भरून येईन अन मागच्या वक्ताचं समदा गाऱ्हाना धुतला जाईन .. म्हणून मुक्तानं आस सोडली नोहोती ..

गेल्या वक्ताले सोयाबीन कहाडला अन् बजार झाल्यावर माहेराहून धनधान धाडला, तवा माह्या बाबानं शेतातल्या माळावरच्या  कारल्याच्या जराश्याक बियाबी धाडल्या व्हत्या. पुरा ऐवज कपाटात कोंबून ठेवताले कारल्याच्या बियावरून 'भिक्कार माहेर' म्हनूनस्यान वाकडं तोंड दाखवू दाखवू सासूबाईन मले केवढाला दुषना लावला होता. मामंजींनंत बाप्पा, सप्पा बिया देल्त्या टाकून पडवीतल्या कोपऱ्यात....जाता जाता पच्च्चकन! पिचकारी मारली तंबाकूची टमरेटवर, आन खाकरत निंगून गेलते चकाट्या हाकाले ...

तिच्या डोळ्यात भस्सकन पानीच आलन  ... पहासाठी व्हतच कोण ? गडी तं गेल्ता सहरात..नोकरीपाण्याचा बंदोबस्त कराले.

अर्ध्या रातचाले तिनं जाऊन बिया वेचल्यान अन पदराले गाठ बांधून ठेवून देल्त्या. समदी रात्र इचाराचाच भूत सवार रायला तिच्या डोस्क्यावर. गावचा हिरवाकंच मळा, कारल्याचा चौफेर साजरा मांडव, घराचं मोकड-ढाकळं आंगण आन बिनमायच्या लेकीचा सुखाचा संसार पाहाची मरमर करणाऱ्या बाबाची लडिवाड, मायाडू  कुशी आठवूनशान  लगीत रडाले आलं तिले. उशी ओली होत राहाली रात्रभर. सकायची कामं पटकानी आटपून.. मामंजींच्या तब्बेतीले  चांगली र्हातील असं समजावून, मुक्तानं माडीवर नेऊन पदरातल्या बिया भरल्या डोळ्यानंच पेरल्या व्हत्या. पैला पैला कोंब फुटला तवा मुक्ताच्या आनंदाले पारावर उरला नोहता, खतपाणी घालू घालू खूप मनाभावानं वेल पोसलान तिनं, थो वेलबी बहरून खोवलेल्या खुंट्यावरून जास्वदांच्या झाडाचा सहारा घेत कपडे वाळवाच्या तारेवर मांडवागत पसरू पाहे. लुसलुशीत नाजूक तरारल्या वेलीवर इवले इवले पिवळट साजरे फुलंबी दिसू लागली. आता उगवन ते माहेराच्या गोडव्याचे कारले साऱ्यायले भाजी करून खाऊ घालाची अन समद्याची तडतडणारी तोंड यका घावात बंद कराची, मुक्तानं स्वप्नातले मोनोरे बांधूनशान ठोवले होते ...

पण का झालं कोणजाणे सासरच्या कडू शब्दांईनं घायाड झालेल्या बेच्चार्या माहेरच्या बिया रूसल्यान का काजाने? गेल्या सालात दोन चार बारके कारले उगवले आन तोडण्यालायक होण्याआत पिवळेलाल होऊन वाळूनबी गेलथे ...पानायलेबी गळती लागली. वेल फळत न्हाई म्हनूनस्यान साऱ्यायच्या डोळ्यात खुपू लागला व्हता. येता जाता सासूबाई नीरे टोमने मारे, राहू राहू माहेराच्या नावानं कल्ला करें .याच्या त्याच्यावरून गाऱ्हाणी बोलून चवताडून सोडे... मामंजी तर तोंड फुगवून बसले व्हते. त्यायले तिच्या हातचं गोडधोडबी ग्वाड लागना झाला , सदानकदा तोंडावर बाराच वाजले र्हाये. मुक्ताची मोठी घुसमट होये मंग, पण त्या ना उगवलेल्या कारल्यापायी वेलीले किती परेशानी सहानं पडतेत याचं दुःख कसं का जाने मुक्ताच्या जिव्हारी लगीत लागून र्हाये ...

कसबसं वरीस निंघाला .. वेल वाळून निथळूनबी गेला. वर्षभर मुक्ताचा नशीबबी फळफळला न्हाई. पावसाचा जोर जरासक कमी झाला तसा यंदाच्या बरसलेबी वापस वेल हिरवळून आला. मुक्ताच्या आशेचा दिवा वापस उजडू लागला. पण, या सालालेबी घुमून घात केलाच तिच्यावाल्या नशिबानं, तिनं लावलेली कार्ल्याईची आस फुलता फुलता काऊनतं गळूनच पडायले लागले . सासूबाईंच्या तोंडचा पट्टा आजूकच फाश्ट धावू लागला...माहेरच्या माणसाइची आब्रू त बाप्पा अता वेसीपातूर येऊन पोचली ...बापाच्या नावाची इज्जत चिंध्यावानी टरटर फाडायले कोणालेच कई नई वाटे. मुक्ताले हे सहन झालाच नाही...तिच्या अंदरच अंदर कोंडल्या हुंद्क्याचा अन दाबल्या संतापाचा उद्रेक व्हाल लागला. यक डाव असाच तिचा डोका सरकला आन ते भरभर माडीवर गेली,  ऐसपैस पसरलेला वेल सरंसरं वढून काहाडू लागली. वोढला, तोडला, उपडला. वरपला ... खुंटीवरून, जास्वदांवरून, मांडवातून वरबाडून वरबाडुन काहाढला, मुक्त करून टाकला ... शवटची वेदना. वेलीच्या निरंतर दुःखाचा अंत झाला व्हता. न उगवणाऱ्या कारल्याच्या दुषणातून वेलीले कायमची मुक्ती मिळाली व्हती ..... मुक्ता नावाले तिनं वाईस खरंर्रर्रर्र करून दावला.

पन मंग तिची सोताची यंदाच्या बरसलेबी न उजवलेली कूस तितकी नशीबवान काहून नोहोती त कामालुम?  ...वेलीचं आनं तिचं नसीब देवादिकान यकाच लेखणीनं लिवलं व्हतं का काजाने ? ..  रोज रोजच्या वांझोट्या दुषणातून मुक्त कराले तिच्या उदरात मुक्ता अजून जन्मालेे याची होती ... पुढच्या वक्ताची आशा तिनं या वक्तालेबी सोडली नोहोती ...



रश्मी पदवाड मदनकर
rashmi.aum15@gmail.com




Monday 2 October 2017

झुंडीची झुंझ आणि जात-धर्माच्या अस्मिता !!



धार्मिक अस्मितेची गोंदणं आम्ही आणखी किती वर्ष स्वतःच्या मेंदूवर गोंदून घेणार आहोत हा न सुटणार प्रश्न मला मागल्या काही आठवड्यापासून जरा जास्तच भेडसावू लागला आहे. शिक्षणानं माणसाच्या विचारांची कुंपण अधिक खुली व्हायला हवी, बऱ्या वाईटाचे धडे मिळाल्याने मन मोठी होऊन संवेदनेच्या जाणिवा जागृत व्हायला हव्या खरतर. पण होतंय काहीतरी विपरीतच. शिक्षणानं वैचारिक ब्लॉकेज खुलली नाहीच पण वेगवेगळ्या अस्मितेच्या नावाखाली आम्ही स्वतःला अधिकच जखडून घेतो आहोत, भोवतालची कुंपण शिथिल करायची सोडून ती अधिक करकचून बांधून घेतो आहोत आणि एवढे कमी कि काय त्याचा अभिमानही बाळगत हिंडतो आहोत. जातीच्या जाचातून बाहेर पडण्यासाठी 'लिबरल' हा शब्दप्रयोग बुद्धिवंतांमध्ये फेमस झाला होता. लिबरल म्हणजेच उदारमतवादी, पण आजच्या मतवाद्यांमध्ये खरंच तेवढं विचारांचं औदार्य आहे का हा संशोधनाचा वेगळाच विषय ठरेल. तर लिबरल होता होता आम्ही कधी संकुचित विचारधारेच्या विळख्यात अडकलो कळलेच नाही आणि त्याचे परिणाम बघून भोगुनही आम्ही आमच्यात बदल करून घ्यायला तयार नाही. मागल्या आठवड्यात समूहानं घडवून आणलेल्या धार्मिकतेच्या दांभिकतेचं प्रदर्शन मांडणाऱ्या, सामाजिकतेची सांस्कृतिक चौकट मोडणाऱ्या, एकांगी धर्मांध धारणांचे प्राबल्य अधोरेखित करणाऱ्या कितीतरी घटना घडल्या, अन संवेदनशील मनाला हेलावून गेल्या. व्यक्ती आणि समाज यांच्यामधले नात्याच्या नि:पाताच्या कृतिकार्यक्रमाचे हे जिवंत उदाहरण ठरावे. पहिले उदाहरण होते बाबा रामरहीम यांनी धर्मांध अनुयायांचे देशभर विणलेले जाळे. ज्याचा उपयोग या तथाकथित अध्यात्मिक बाबाने त्याला हवा तसा करून घेतला. दुसरे मराठी विनोदी अभिनेते भाऊ कदमांना गणपती बसवल्याने धमकी देणाऱ्या तथाकथित धर्मांध समाजाचे. तिसरी घटना मुस्लिम महिलांनी दाखल केलेली तीन तलाक विषयीची याचिका मेनी करण्यात आली. तोंडी तलाक देण्यावर बंदी घालण्यात आली आणि मुस्लिम लॉ बोर्डाच्या तसेच धर्माच्याठेकेदारांच्या तंबूत खळबळ माजली. या धार्मिक आणि जातीय अस्मितेची घुसळण गल्ली ते दिल्लीपर्यंत सामाजिक समीकरणांची उदाहरण म्हणून मांडली जाताहेत आणि सोशल मीडियावरून तथाकथित विचारवंत त्याचे समर्थनही करताहेत हि शोकांतिका आहे.

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम गुरमीत सिंग यांना बलात्कार प्रकरणी १५ वर्षानंतर दोषी ठरविण्यात आले, राम रहीम यांच्यावर त्यांच्या आश्रमातील दोन साध्वींवर १५ वर्षांपूर्वी बलात्कार केल्याच्या आरोपाखाली हा खटला होता. ४०० पुरुष अनुयायांची जबरदस्तीने नसबंदी केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. पंचकुला येथील सीबीआय न्यायालयाने हा निर्णय दिला आणि त्यांना दोन आरोपांसाठी १०-१० असे एकंदर २० वर्षांची शिक्षा झाली. आरोप सिद्ध होणं आणि त्यासाठी शिक्षा मिळणं हा भाग मोठा नाही तो तर लोकशाहीचा प्राण आहे पण त्यानंतर जे काही घडले ते समजण्यापलीकडचे होते. बाबा रहीम यांना धर्मगुरू मानणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी १-२ नाहीतर तब्बल ३०० लोकांचा जीव जाईपर्यंत दंगली घडवून आणल्या, आपले धार्मिक गुरु आपल्याला कशाचे मार्गदर्शन करीत आहेत आणि त्यामुळे आपण कोणत्या मार्गाला लागतो आहे हे समजण्याइतकेही भान आजच्या धर्म अनुयायींनमध्ये राहू नये? हिंसा घडवून निष्पापांचे बळी घेणे कोणत्या धर्माची शिकवण असू शकते ?

एकीकडे जात भेदभावाने पिडला गेलेला म्हणून मागास राहिलेला आणि गरिबीचे, बेरोजगारीचे चटके खावे लागले असे छाती ठोकून सांगणारा समाज, स्वधर्मानं हक्क नाकारला म्हणून जन्म घेतलेल्या धर्माचं लेबल काढून फेकणारा आणि हक्कानं जगता यावं यासाठी दुसरा धर्म अभिमानानं स्वीकारणारा समाज. जातिव्यवस्थेच्या अपुऱ्या, एकांगी व चुकीच्या आकलनामुळे कोंडी झालेला जाणवतो आहे. विचारांच्या पातळीवरील हे अपुरेपण जेव्हा आपल्याच समाजातील बांधवांची पुन्हा धर्माच्या नावाने घुसमट करत असेल मनासारखे जगण्याचा अधिकार हिरावून घेत, ज्या  कट्टरतावादामुळे संघर्ष निर्माण झाला होता तीच आत्मसात करून जातीतून बहिष्कृत करण्याच्या धमक्या देत असेल तर ? जातिलढे हे कायमच प्रतिगामी असतात आणि त्यातून ‘जातीयवाद’च वाढतो हे आमच्या लक्षात कसे येत नाही. भाऊ कदम यांनी घरी गणपती बसवला म्हणून नवबौद्ध समाजाच्या तथाकथित धर्मरक्षकांनी त्यांना धर्मातून/समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी दिली. भाऊ कदमांकडून त्यांनी बळजबरीने जाहीर माफीनामा देखील लिहून घेतला. बहिष्काराच्या धाकाने भाऊंनी सुद्धा तो लिहून दिला. आंबेडकरी विचारांचे पाईक म्हणवून घेणारे, संविधानाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना भाऊच्या गणपतीने दुराभिमान कसा निर्माण झाला? मूलभूत हक्कांना पारखा राहिल्यानेच संघर्ष उभा करावा लागलेल्या समाजातल्या माणसांना आपल्याच सारख्या एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा विसर पडावा..त्याचे व्यक्ती स्वातंत्र्य नाकारून थेट बहिष्कार टाकावा हा कट्टरतावाद नव्हे? नवबौद्धधम्माचे जातीकरण होणार असेल तर पुन्हा बाहेर पडायला केलेला संघर्ष फोल ठरून एकाच जातीत स्वतःलाच बंदिस्त करून घेणारा अंतर्भेदी जातकर्मी धर्म काय कामाचा?

तिकडे तिसऱ्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयानं 'तीन तलाक' मताधिक्यानं घटनाबाह्य ठरवून या पद्धतीवर बंदी आणल्यानंतर या निर्णयावर समाजातील अनेक स्थरांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळालं.  मुस्लिम महिला शायरा बानो यांनी मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुस्लिम पर्सनल लॉचा हवाला देत मुस्लिम कट्टरपंथांनी या याचिकेस जोमाने विरोधही दर्शविला होता. देशातील धर्ममार्तंड आजही महिलांना धर्मशक्तीच्या जोरावर आपल्या दहशतीखाली आणण्याचा व त्याद्वारे धर्मच्छल करण्याच्या प्रयत्नात आहेत. मुस्लिम महिलांना समान न्याय हक्क प्राप्त व्हावा, असा लढा उभा राहिल्याने ‘इस्लाम खतरे मे है ।’ अशी आवईही मुस्लिम धर्मगुरुंनी उठविली. अगदी काळ पर्वाची घटना , अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीत मुस्लिम तरुणांकडून एका वृत्त वाहिनीच्या महिला प्रतिनिधीला आणि मीडियासमोर येऊन उघडपणे न्यायालयाच्या निर्णयाचं समर्थन करत 'तीन तलाक' पद्धतीवर टीका करणाऱ्या सुशिक्षित तरुणींना कॅमेऱ्यासमोर बोलण्यास टोळक्यानं येऊन शिवीगाळ, धक्काबुक्की करत विरोध केला... आणि हा सगळा प्रकार युनिव्हर्सिटीच्या परिसरातच घडत होता...समता विघातक, कर्मठ धर्मांध वैचारिक प्रवाह एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडेही भौतिक मानसिकरीतीने परावर्तित होतो आहे हे किती दुःखद आहे.

आधुनिकतेच्या नावाखाली आणि वातावरणात धार्मिक भेदभावाच्या राजकारणामुळे सर्वच जात-धर्माच्या दुर्बळांच्या शोषणाच्या नवनव्या कहाण्या तयार होतायत. जातीजातींच्या अस्मितेखाली सद्सदबुद्धीनं विचार करण्याची  मानसिकता बळी पडत जातेय आणि वैचारिक स्पंदने भरडली जाताहेत, पण यासर्वांवर विचार करायला आमच्याकडे वेळ कुठे आहे? आम्ही व्यस्त आहोत स्वकर्तृत्वावर मिळवलेल्या यशावर नव्हे तर जन्मानं मोफत मिळालेल्या जात धर्मानं आलेल्या गुर्मीत हुकुमी एकाधिकारशाही मिळावी म्हणून झुंडीने प्रहार करायला. हीच झुंडीची झुंझ एखाद्या सकारात्मक बाबीसाठी झाली तर .... विचार करून बघा.

रश्मी पदवाड मदनकर - नागपूर 
rashmi.aum15@gmail.com


(दैनिक तरुण भारत नागपूरच्या रविवारीय विशेष पुरवणीत तसेच ऑनलाईन दैनिक प्रकाशन अक्षरनामात प्रकाशित झालेला लेख 
https://www.facebook.com/aksharnama/posts/1848332138811196 )

Thursday 21 September 2017

मला ना एकदा नदी व्हायचंय..!!







मला ना एकदा नदी व्हायचंय.. !!


प्रवाही. अवखळ तरीही निस्सीह, शांत. संयमी..जन्मापासून हजारो मैल प्रवास करत न थकता न दमता चैतन्याचे तुषार उडवत.. मार्गात येणाऱ्या मोह माया त्यागत.. एखाद्या ऋषीकन्येचा संयत तेजस्वी भाव लेवून, जुनाच वेष धारूण, वेग आवेगही पांघरून. एकाच दिशेनं, जुन्याच वळणानं लयबद्ध ताल धरत, डोंगर दर्या कपारी पार करत, एखाद्या रणरागिणीप्रमाणे खोल दरीत स्वतःला झोकून देऊनही पुन्हा निश्चयाने कणखर होणारी. अविश्रांत धावत प्रवाहात स्वतःला सामावून घेत अधीक प्रगल्भ होत असोशीनं वाहत राहणारी. सदैव त्याच जागी भेटुनही तीथे न साठणारी रोज दिसणारी तरीही नवी भासणारी..लावण्य सुंदरी...भर दिवसा तळपत्या सुर्याची किरणं आत आत शोषून घेणारी..संध्याकाळी तांबड्यात न्हावून निघणारी अन चंद्राची शितल काया अंगभर लपेटून दिवसभराचा दाह शमवून घेणारी..पिढ्यांच्या रितीभाती..प्रथा परंपरांना मोठ्या मनानं पोटात घालून मायेचा डोंगर पेलणारी..गर्भातल्या जिवांना अंगाखांद्यावर खेळवत.. जागवणारी-जगवणारी ममतामयी मानीनी..सर्व विश्वाचा रंग तिच्यात येऊन मिसळूनही ती तीचा रंग मात्र बदलत नाही. रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा म्हणत ती नित्य नवे गीत गात जाते. मोठ्या दिमाखात डौलात खुळखुळ करत वाहत राहते.


ती कुणाचसाठी थांबत नाही.. ऋतू बदलतात, काळ बदलतो..पिढ्या न पिढ्या ती अखंड अविरत पुढे पुढे धावत राहते निरंतर.. तीच्या प्रवाहात येतो तो तीचा होतो..ती सामावून घेते स्वतःत सगळ्यांना..तिचा एकसुरात-एकलयीत येणार आवाज अध्यात्मिक तादात्मतेची अनुभूती देणारा. जणू वर्षानुवर्षे साधना करणारी एखादी तपस्विनी मंत्रोचारात मग्न आहे. हेच अध्यात्माचे तेज अंगांगावर लेवून.. ओजस्वी, निर्मळ, शीतल काया लपेटून तारुण्याने मुसमुसलेली, ताजीतवानी तरीही मातृत्वाचा शेला चढवून प्रवासाचा टप्पा गाठत मार्गक्रमण करणारी.

तीच्या मार्गातील गाववेशीतल्या, प्राणी-पक्षांची, पांथस्थाची तृष्णा भागवणारी, रानोवनी..कडीकपारी मळा फुलवत नेणारी सर्जनशीलतेच्या सर्व सिमा लांघून मायेच्या शिडकाव्यानं गरिबाचं शेत समृद्ध करित झुलणारी..कुठलाही अभीनिवेश न आणता सृजन करणारी ..जीवनदायिनी..


मला ना एकदा नदी व्हायचंय....सागराला भेटण्याच्या असोशीने मजल दरमजल प्रवास करत, हजारो मैलाची झुंज. संघर्ष पेलत शिणलेली, रापलेली, सोललेली काया विरघळून टाकायचीय. दमला भागला जीव मुठीत घेऊन शेवटच्या आवेगानं सागराच्या कुशीत स्वतःला झोकून द्यायचंय.स्वतःचं अस्तित्व पेरत आले तरी त्याच्यात सामावून हरवून जायचंय, होती नव्हती ओळख पुसून टाकून, प्रवासातल्या सगळ्या जखमांच्या दुखऱ्या खपल्या आणि अंगावर गोंदलेल्या अनुभवाच्या कथा विसर्जित करून उरलेले अस्तित्व विरून जाईपर्यंत त्याच्या अंतःकरणात तल्लीन व्हायचंय..सरीतेचा सागर व्हायचंय ..

मला ना एकदा नदी व्हायचंय.... !!


रश्मी पदवाड मदनकर
rashmi.aum15@gmail.com

२१/०९/२०१७

Tuesday 19 September 2017

आतल्यामास्तरीणबाई ... पत्र - 3

#आतल्यामास्तरीणबाई
आतल्या मास्तरीण बाई - रश्मी पदवाड मदनकर
पत्र - 3
होऊन जाऊ दे ..
परवा दुपारी फोन आला मावशींचा, म्हणाली 'अगं पुरणपोळी केलीय, आवडते ना तुला, म्हणून खास फोन केला. संध्याकाळी ये जेवायला'. मी बाहेरगावी होते. नाही येऊ शकणार बोलले तिला. त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली. पण फोन ठेवतांना ती जरा नाराजीतच म्हणाली 'बघ तुला कळत नाहीये तू अत्यंत चविष्ट अस काहीतरी मिस करतेय.' मी निव्वळ हसले. मावशी स्वयंपाक छानच करते हे नाकारता येणारच नाही, पण आज तिला मला बोलवावं का वाटलं बरं, स्वतःचच असं कौतुक करावं वाटलं. खरच पन्नास वर्षांच्या आयुष्यातील या वेळी तिने केलेलं पुरण सर्वोत्कृष्ट असेल? की उगाच मग स्वतःचीच पाठ थोपटणं ....
अरेरेरे हे एवढं आलंच मनात अन मास्तरीण बाई जाग्या झाल्या ....
**********************************
सोन्या
आयुष्य जगतांना आपण अनेक आवडत्या गोष्टी वेचत पुढे जात असतो. पाहिलेल्या, रुचलेल्या, स्पर्शलेल्या बाबी अंगात भिनवत असतो. एखाद्याचे अंगीभूत गुण नाही आत्मसात करता आले तरी त्यांच निदान तोंडभरून कौतुक करीत असतो. एखाद्या छंदाने नाद नाहीच सोडला तर ते मिळवायला, आत्मसात करायला आयुष्याचा कित्तेक काळ खर्ची घालतो. स्वतःला त्या त्या तंत्रात फिट बसवायला, परफेक्ट व्हायला मग जीवाचे रान करतो. कधीतरी पोचतो तिथवर. इतके कष्ट करून मिळवलेल्या आपल्याच एखाद्या गुणाचं आपण स्वतःच कौतुक केलं तर तो गुन्हा का ठरावा?
तुला आठवतं, मागल्या महिन्यात एका सांगीतिक कार्यक्रमात गेलेलो आपण. गायिका एकेक बंदिश गात होती. आणि आपण आरोह, अवरोह, पकड, आलापात धुंद होत होतो. तिनं असं काही तिच्या स्वरात, आवाजात गुंतवून ठेवलं कि कशा कशाचंच भान नव्हतं. प्रत्येक आलापाला तोंडून 'वाह' बाहेर पडायचं आणि ते अगदी सहज घडायचं. कौतुक करायची वेळ आलीच तर कुठला तुकडा वगळावा आणि कुठल्याचे तोंडभरून कौतुक करावे हा प्रश्नच पडला असता..नाही?. गाणी संपली आणि गायिकेला व्यासपीठावर बोलण्याचे आमंत्रण आले. शेवटच्या संबोधनात तिनं तिच्याच घेतलेल्या कुठल्याश्याय गीताच्या विशिष्ट आलापाचं मनमोकळं कौतुक केलं आणि तू अवाक झालीस ... का? तिन गायलेलं तिनं आवडून घ्यायचं नाही असा नियमबियम आहे की काय गं?
आपण एखाद्या कलेचा आस्वाद घेतांना त्याच्या कलेची इतर कलाकारांशी तुलना करीत असतो...परंतु कलाकार स्वतः त्याच्या कलेची तुलना हीत्याच्याच आधीच्या निर्मितीशी करीत असतो.....ज्या दिवशी त्याला त्याच्या पूर्वीच्या सर्व सादरीकरणाहून एखाद्या क्षणी उत्तुंग आनंद, समाधानाची जाणीव होते त्यावेळी त्याने त्याच्या नजरेतल्या त्या उत्कृष्ट कलाकृतीला 'वाह' दिलीच तर त्यात गैर काय?
एखादा क्षण त्या कलाकाराच्या गुणांची परीक्षा घेणारा ठरतो गज़लकाराचा शेर, कवितेचा काव्यार्थ, लेखकाचा अन्वयार्थ आणि चित्रकाराला अभिप्रेत भावार्थ हा उत्तम रीतीने रसिकांपर्यंत पोहचला पाहिजे हा मुख्य उद्देश असतो. रसिकांच्या दृष्टीने कलेचे सादरीकरण व्हावे हा ध्यास असतो अनेकदा हि परीक्षा त्याने यशस्वीपणे पार केलेली असते. पण स्वानंदाचा, आत्मतृप्तीचा एखादाच क्षण उद्भवतो तो क्षण आत्तापर्यंतच्या सर्व क्षणांच्याही दोन पावले पुढे झेपावलेला असतो...आत्मिक समाधानाची अनुभूती प्राप्त होते.
आतापर्यंतच्या कालावधीत आपल्याच कलागुणांची आपल्याच तुलनेतली उत्कृष्टता आपण आत्ताच गाठू शकलो आहोत हे त्या कलाकाराशिवाय कुणाला बरे माहित असणार ...एखादा आलाप आळवतांना त्याचे हरपलेले भान किंवा लागलेली तंद्री आपण बघू शकतो, अनुभवू शकत नाही....एखाद्या चित्रकाराला एखादे चित्र काढतांना आलेली आनंदाची परिमिती आपल्या उघड्या डोळ्यांना दिसणाऱ्या दृष्याहून वेगळी, कल्पनेच्या पलीकडची असू शकते. कुणीतरी बनवलेला एखादा पदार्थ, एखादं काव्य, एखादी कथा त्यांच्या त्यांच्या लेखी त्यांच्या त्यांच्या आयुष्याचा मुकुटमणी ठरतोच. त्या पदार्थाहून चविष्ट, त्या चीत्राहून सुंदर आणि त्या गीताहून श्रवणीय इतरांना बरच काही मिळेल एरवी, तुलनेने फार उल्लेखनीयही वाटणार नाही कारण आपण फक्त पदार्थ चाखलाय, चित्र पाहिलंय, गाणं ऐकलंय पण ज्यांनी ते प्रत्यक्ष प्रसवलय, सृजन केलंय, अनुभवलंय त्यांना येणारी अनुभूती काही और आहे. त्या क्षणाची प्रचीती खास आहे. आणि म्हणून तो क्षण कौतुकास पात्रही आहे.
मग अश्या आत्मिक तृप्तीच्या अनुभूतीची परिमिती गाठलेल्या त्या खास वेळेचं आपण स्वतःच मनभरून कौतुक केलंच तर बिघडलंय कुठं ??
होऊन जाऊ दे ...

तुझ्याच
आतल्यामास्तरीणबाई

Sunday 27 August 2017

जाणिवांची रात्र !

आसमंतभर पसरून वाट बघत राहिली,
दमली अन अखेर कलली संध्याकाळ
दिवसभर मनभर साठलेली उन्हं
उतरणीला तळमळत राहिली
पश्चिमेला फुटलेल्या तांबड्यात
न्हाऊन निघण्याची इच्छा विरली काळोखात
दिवेलागणीला तेवत राहण्याचे स्वप्नही
भंगत गेले संध्यासमयी.

अन अंधारून आले सारे ...
दिन दिन रात्र रात्र पालटत राहिले
 पुढे चंद्रही कले कलेने आवस होत गेला

 नेणिवेचा एक कोपरा उजळावा म्हणून जाणीव झाली
अन् कित्तेक भावनांची अशीच रात्र होत गेली ??

रश्मी मदनकर






निरंतर वाचन सुरू असतं..मिळेल तिथे मिळेल तसं, दिवसभरात कितीतरी विषय वाचनात येतात..एखादा प्रगल्भ विषय भावनिक स्पंदनं निर्माण करतो. एखादा संवेदनशील लेख अंतर्बाह्य हलवून जातो. एखाद वाक्यातली कोटीही विचार करायला भाग पाडते... एखादी कथा अंतर्मुख करते. एखादी कविता घोळत राहते मनात. त्यातून अनेक विषय सुचत जातात..आतल्या आत वैचारिक आंदोलनं..लाटांवर लाटा..आवर्तनं.. एकावर एक गाळ साचतो, अख्खा लेख तयार होतो..आतल्या आतच घुसमटत राहतो.. .. काठाशी येतो..बाहेर पडायला तडफडत राहतो...तगमग तळमळ !!!!!

वेळ हवा असतो एकांत हवा असतो..उतरवून टाकायचं असतं सारं शब्दात, मोकळं व्हायचं असतं...नाही जमत...दिवसभरात धावधाव धावून दमून भागून शिणलो कि लेखणीशीच हक्कानं प्रतारणा करता येते.


लेखणी रूसत नाही ...लेखणी समजून घेते.
विचार मात्र हटखोर असतात. आपण हात टेकले की सुचलेले विचार मान टाकतात...
मग पुन्हा नवा दिवस उगवतो, नवे वाचन सुरू होते.... नवे मनाचे मांडे मांडले जातात .. पुन्हा खेळ सुरु होतो.


काही विषय काही विचार लिखाण होण्याआधीच असे संपुष्टात येतात...कत्तल होतात...गाडले जातात.


'अभिव्यक्ती स्वातंत्र्य एक मिथ' आहेय .....


रश्मी मदनकर / १५.०८.२०१७

Thursday 24 August 2017

पत्र - १ - आतल्या मास्तरीण बाई


जीवाचा आकांत होतो कधी कधी. नेमकं काय हवंय आपल्याला हेच कळत नाही. सगळं असूनही अस्वस्थता पिच्छा का सोडत नसेल बरं ? प्रश्न आलाच होता डोक्यात कि आतल्या मास्तरीण बाई येऊन ठाकल्या. अलगद हसल्या अन बसल्याच सांगायला, म्हणाल्या  :



मने..
प्रश्न जगायचं कसं हा असतो आणि आपण अगदी जन्म झाल्यापासून जिवंत कसं राहायचं हेच शिकत असतो. जगायचं कसं हे शिकलोच नाही तर जिवंत राहण्याला अर्थच काय ?? नुसतच तगत राहायचं ..मरण ढकलत राहायचं पुढे पुढे? ... कि मग समरसून जगायचं मरण येईपर्यंत न धास्तावला न थांबता ...
आयुष्यात काही गोष्टी फार उशिरा कळतात ... अगदी आपल्या स्वतःच्या बाबतीतल्याही
आपल्याला नेमकं काय आवडतं, काय आवडत नाही, काय केलं कि आनंद मिळतो हे आधीच स्पष्ट कळलं तर सगळं कसं निवडून घेता येईल ना गं? खर सांगू ते कळतही पण पोटापाण्यासाठीच्या गरजेपोटी पैशांच्या मागे धावायच्या स्पर्धेत आपण इतके अडकतो कि, पोटाच्या भूकेपेक्षाही मनाची भूक खूप खोल आणि मोठी असते ह्याचा थांबून कधी विचारच करत नाही. पोटाला फार फार काय लागतं? पोटाची खळगी भरेल एवढं दोन वेळचं जेवण मिळालं कि झालं...ते भागतं ग कसंही,कुठेही ... मनाची खळगी मात्र इतकी सहज भरत नाही.  वास्तविक जगण्यासाठी अंतर्मनाचं समाधान, आत्म्याची तृप्ती जास्त महत्वाची हे कित्येकांना शेवटपर्यंत कळतंच नाही गं, किंवा ज्यांना कळतं तोपर्यंत फार उशीर झालेला असतो.
मनाचं समाधान, सुख, आनंद, यश वगैरे सगळ्यांची मोजपट्टी-फुटपट्टी 'पैसा' हाच नसतो ना, पैसा साध्य नाहीये गं.  ते माध्यम असू शकतं फारफार तर एखाद दोन साध्य गाठता येईलही या माध्यमाने, पण सगळी साध्य गाठायला एकच माध्यम नाही ना लागत. वेगवेगळ्या गंतव्याला जायला वेगवेगळे मार्ग असतात अगं,  आपण एकाच माध्यमात गुंतून पडतो..साध्य देतो कोपऱ्यात ढकलून..माध्यम मिळवेपर्यंत साध्य काय होतं हे देखील विसरतो....मग सगळंच मुसळ्यात जातं ना राणी. अल्टिमेटली आपला हेतू काय आहे .. आपल्याला हवं ते कशासाठी मिळवायचंय ? मनाचा आनंद, समाधान, तृप्तीच ना ? आपण मिळवतोय काय 'पैसा'  ...
सगळं जवळ असूनही हि जी अस्वस्थता आहे ना .. हि तीच आहे ? सगळं जवळ असलेलं हवं होतं का आपल्याला हा कधी विचारच केला नाही ? जे हवं होतं त्यासाठी प्रयत्न केला का या प्रश्नाला उत्तर नाही ना तुझ्याकडे.
अस्वस्थता या न मिळालेल्या प्रश्नांची आहे.. उत्तर शोध आणि उपायही .. मी आहेच पाठीशी.

तुझ्याच
आतल्या मास्तरीण बाई

पत्र - 2 - आतल्या मास्तरीण बाई

आज सहज मोकळीक मिळाली म्हणून माझ्या आवडत्या खिडकीत येऊन बसले..खुश होते पण एकांत हवा होता, तंद्री लागली. चिंतन करता करता अनेक प्रश्नांची सरबत्तीच सुरु झाली आणि माझ्याच प्रश्नांच्या गुंत्यात मी गुंतत गेले..थोडी असहज होऊ लागले. अस्वस्थता वाढली. असे व्हावे आणि आतल्या मास्तरीण बाई अवतरणार नाही असे होणे नव्हतेच..त्या आल्या अन न लिहिलेले एक पत्र माझ्या हातात ठेवले.
****************************************


ए वेडे,
एखादा काळ मधून मधून येत असतो आयुष्यात जेव्हा गोतावळा नकोसा होतो. स्व-सहवास आवडायला लागतो. काही गुंते, काही बोचके असतात साठलेले त्यांना जरा मोकळा श्वास घेऊ द्यावा असं जाणवायला लागतं. मग आपण सारं या ओढून घेतलेल्या एकांतात उकलून पुढ्यात मांडून बसतो. कधी कधी या गाठोड्यातून किती प्रश्न बाहेर पडतात ना? कधीचे, कुठले-कुठले पत्ता नसतो. गाठोड्यातून पुढ्यात आणि पुढून मनात आलेले हे प्रश्न कुणा कुणाला विचारावे असं वाटत राहतं. पण फक्त विचारावं वाटतं, म्हणजे मला असे प्रश्न पडतात, पडू शकतात ही अशी माहिती म्हणून पुढल्याला द्यावी वाटते. प्रश्नांना अपेक्षित अशी उत्तर नकोच असतात. हाच तो प्रश्नांचा साठलेला गुंता-बोचका असतो ज्याच्या जवळ असण्याचाच मनाला आधार वाटत राहतो.
काही प्रश्न अनुत्तरीतच राहावीत असे का वाटत असावे..माहिती? त्या प्रश्नांवर सतत विचार करत राहणे त्यांना घोकत राहणे किंवा माझ्याकडे ही न सोडवता न साठवता येणारे प्रश्न आहेत..सलणारे पण तरीही गोड वाटणारे ही बाबच सुखद वगैरे वाटत असते. मनालाही खेळ लागतो गं - विरंगुळा. चुरगाळून कोड्याचा कागद फेकायचा आणि पुन्हा पुन्हा उचलून वाचायचा, पुन्हा कोडं सुटत नाही म्हणून पुन्हा फेकायचा असा गमतीदार खेळ खेळल्यासारखे आपणंच आपल्या मनाशी खेळत असतो. खोल एखाद्या जखमेच्या वेदना बराच काळ सहन करत राहिलो की त्या दुखण्याचीही सवय होते. त्या वेदनेचे भांडवल आपसूक आपल्या हातून होत जाते. नकळत चढलेली खपली नखाने कोरून आपण काढत राहतो. जखम भळभळत राहते. जखम होण्यापेक्षाही ती जखम बसल्यावर मधून मधून उमलणाऱ्या जखमेची आठवण अधिक वेदनादायी होत जाते. होतं ना गं असं? बरेचदा. खरं सांगू साथ कोण कशी देतंय याहून अधिक कुणीतरी साथ देतंय हे महत्वाचं होऊन बसतं. ती सोबत सुखद का दुःखद हा भाग काळासोबत गौण होत जातो आपल्या लेखी. हेच कारण असेल बहुदा. असू दे ना असेल काहीही कारण. पण असं होतं मात्र नक्की. काही प्रश्नांची उत्तरं माहिती असतात पण ती आपण आपल्याच हाताने हळूच बाजूला कोपऱ्यात सरकवून देतो, सगळ्यांच्या नकळत अगदी आपल्याही, आणि त्या प्रश्नाला प्रश्नच राहू देण्यात परम सुख मानतो. कारण उत्तरानंतर प्रश्न प्रश्न उरणार नसतो, तो उत्तर बनून भुर्रकन उडणार असतो. ते नको असतं आपल्याला. काही प्रश्नांना तर काही उत्तरांना आपणच आपले गृहीत धरून बसलेले असतो. हे जे काही आहे ते आपले आपल्यालाही अनपेक्षितच असतं. जे काही अपेक्षे अनपेक्षेच्या पलीकडचं घडत असतं ते इतकं सुंदर असतं की अनुत्तरित प्रश्नांची डोक्यावर चढलेली झिंग उतरूच नये असं वाटत राहते.
असो …
तर कधी कधी प्रश्नांचीच परीक्षा घ्यावी वाटते ती अशी..त्यात गैर तरी काय ?
तुझ्याच
आतल्या मास्तरीणबाई




Saturday 12 August 2017

(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं)

कथा हा एक प्रवास असतो. सुरूवातीपासून शेवटपर्यंतचा. मधल्या काळात जे घडते ते कथानक असते. प्रत्येक लेखकाची लेखनशैली वेगळी असते, असावी. कथेची मांडणी कशी करावी, कशी असावी? या बद्धल रूढ नियम नाहित. कथा सहजगत्या उलगडत गेली तर ती वाचकांपर्यंत लवकर पोहचते. काही कथा वेगळ्या धाटणीच्या असतात, त्या पहिल्या वाचनात लवकर कळत नाहीत. त्यामधील ओळीमागचं, न लिहलेलंही समजून घ्यावं लागतं, काही जागा वाचकांसाठी सोडायच्या असतात. वाचकांना त्यांच्या आकलनाप्रमाणे त्यात रंग भरता येतात. एकच कथा अनेक वाचकांना वेगवेगळी अनुभूती देत असते. आकाशातल्या ढगांचे आकार प्रत्येकाला वेगळे दिसतात, तसंच हे.

कथा लेखन हे उस्फुर्त अंत:प्रवाही असावे. शब्दांचा कच्चा माल घेवून कथेची इमारत जरूर उभी राहू  शकते पण ती साहित्यकृती होवू शकत नाही. इकडची वीट तिकडे, तिकडचा दगड इकडे करून कथेचा तोल सावरला जाईलही पण ते शब्दांचे बांधकामच !

एका तंद्रीत कविता सुचते. एका तल्लीनतेत चित्रकार रेषांचे फटकारे मारत चित्राला जिवंत करत असतो. समाधी अवस्थेत जावून मुर्तीकार छिन्नी हाथोड्याने मुर्ती घडवत असतो. लेखनाचेही तसेच आहे. ठरवून लेखन होत नाही, ते आपोआप व्हावे लागते. लेखन हे अपत्य जन्मासारखे असते, लेखक त्याला फक्त जन्म देवू शकतो, ते कसले जन्माला येईल हे लेखकाच्याही हातात नसते.

लेखकाने लिहित जावे, वाचकांनी वाचत जावे, समिक्षकांनी त्याचे रसग्रहण करावे. वाचकांना काय आवडेल, काय आवडणार नाही ? याचा विचार लेखकाने लिहताना करू नये, लिहून मोकळे व्हावे. लिहण्याची वेळ साधावी. पुढचे वाचकांवर सोपवावे. वाचकानूनय सर्वात धोकेदायक ! मागणी तसा पुरवठा करत बसलो तर आपण यशस्वी उद्योजक नक्की होवू पण साहित्यिक होवू शकणार नाही. भले भले लेखक लोकप्रिय झालेले आहेत, त्यांची वाचक संख्या अफाट आहे तरी त्यांना साहित्यिक म्हणून ओळख नाही !

आपल्याला लेखक व्हायचेय की साहित्यिक याचा विचार करणे गरजेचे आहे !

लेखक :  संजन मोरे

Monday 10 July 2017

काही फ़ाइल्स काही फोल्डर्स अलबत स्मृतीत सेव झालेले असतात. कधीपासून ..कुठून कुठून त्याचा पत्ता नसतो. अगदी गच्च चिकटून बसलेल्या आठवणी, कधी सांधलेले कधी भंगलेली स्वप्न, कधी अनुभूती देणाऱ्या कधी खोल जखमा खणून गेलेल्या घटना, अस्तित्वाच्या जाणीवा कोरत गेलेली माणसे, आयुष्य ढवळून काढणारे विचार, कधी मांडून कधी कोंडून ठेवणाऱ्या रिती, प्रयत्न करूनही पुसली न जाणारी नावं, गोंगाटातही वाजत राहणारे आवाज, स्मृतीत चलचित्रासारखी दिसत राहणारी काही स्थळं, एकांतातले सुस्कारे, घुस्मटलेले आवंढे, मागे सुटलेले हवेहवेसे क्षण .... निवांत वेळ, एकांत आणि एक क्लिक.. गाणी सुरु होतात काही गोष्टी लगेच कनेक्ट होऊ लागतात. गीतातल्या एखाद्या शब्दाने खपली पडते तर एखाद्या ओळीने विस्मरणात गेलेला माणूस आठवणीत जागा होतो…एखाद्या आलापात आपण भूतकाळाचा प्रवास करून येतो..… गाण्याची एखादी अर्थपूर्ण ओळ कानी पडते अन लगेच मनात काहीतरी हलतं. शब्द आत आत उतरत जातात अन सगळंच विस्कटत जातं... रोजची घातलेली घडी निसटते. आपण वाहवत जातो त्या तेव्हाच्या जगात त्या क्षणात. एक एक सूर स्पर्शत जातो, तन्मयतेचा षड्ज लागतो. जुने भास होऊ लागतात तरल संवेदना जागृत होतात आणि गाण्याला असणारे आपल्या खऱ्या आयुष्याचे भूतकाळातले संदर्भच मग त्या गाण्याची ओळख होऊन बसतात. हे संदर्भ खूप अवघड अवस्था निर्माण करतात हवेहवेसे तरीही त्रासदायक...
काही आठवणी मुठीत गच्च आवळाव्या वाटतात आणि तळव्याला चटका साहवतही नाही.
अशी आठवणींशी चिकटून बसलेली गाणी आलीच अचानक समोर तर, जीवाची घालमेल होते, न सांगता न कोंडता येणारी. कधीतरी ऐकता ऐकता बंद करावी वाटतात अन कधी मुद्दाम शोधून ऐकावी वाटतात.… गाणी एकतर सगळं काही आठवायला भाग पाडतात किंवा हीच सगळं विसरायला मदत करतात.
काही गाणी हि अशी काळजाचा ठाव घेणारी असतात...



Tuesday 4 July 2017

तिघींची घोडदौड साकारतेय 'वूमनविश्व'ची वाटचाल

प्रत्येक पिढीत होणारी स्थित्यंतरे ही त्या-त्या जनुकांवर प्रभाव टाकणारी असतात. आजच्या पिढीच्या अपेक्षा अन्‌ आकांक्षा बदलत्या परिस्थितीवर अवलंबून असतात. अन्‌ याच अनुषंगाने व्यक्तिमत्व घडत असतात. परिस्थिती, बदलत जाणारे वातावरण आणि त्यानुसार घडत जाणारी माणसे उमलत्या पिढीच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत असतात. आजच्या तरुणाईपुढे अमर्याद संधी, तेवढीच स्पर्धेमुळे निर्माण झालेली आव्हाने आहेत. ती पार पाडायला वेळ मात्र मर्यादित. मग निव्वळ धक्कातंत्र सुरु असतं. एकमेकांशी तुलना करून मार्क्‍स आणि ग्रेडच्या गणिती
चक्रव्युव्हात गरगर फिरत राहणं. वयाच्या एका टप्प्यापर्यंत आपल्याला नेमके काय करायचे आहे, हे सुद्धा ठाम माहिती नसणारे किशोरवयीन मुलं-मुली पालकांनी बोट दाखवल त्या दिशेने प्रवाहात वाहत राहणं, एवढच पसंत करतात. आपल्याला नेमकं काय आवडतं, आपल्या सांस्कृतिक गरजा काय हे कळेस्तोवर पाणी डोक्‍यावरून गेलेलं असतं. मग काय..? आहे त्यात समाधान मानून केवळ तडजोड करत जगणे इतकंच काय ते हाती उरतं. आपण
कोणत्या विषयाचे शिक्षण घेतोय तेवढेच फोकस करून त्यातच करीअर करायचे एवढेच चौकटीतले ध्येय राखून आजच्या तरुणाईची पळापळ चालू आहे. छंद जोपासणे, कला-साहित्याची आवड, सामाजिक बांधिलकी या गोष्टी यांच्या गावीही नसतात असे म्हणण्यापेक्षा असे म्हणूया कि तेवढा विचार करण्यासाठीचा विसावा सुद्धा त्यांना मिळत नाही. आणखी एक आजच्या काळात काळजीचा ठरलेला विषय म्हणजे कालची पिढी व्यसनात तर आजची पिढी इंटरनेटच्या जाळ्यात फसून स्वतःचे करिअर वाया घालवते आहे, अशी बोंब सर्वत्र होताना दिसते. तरुण
पिढीत वाढत जाणारे सोशल नेटवर्किंगचे फॅड हा आजच्या पॅरेंटिंग विषयाचा महत्वाचा मुद्दा ठरतो आहे. पण या सगळ्या "ड्रॉबॅक' समजल्या जाणाऱ्या अडचणींनाच प्रयत्नांची किनार देऊन यशाचे गणित मांडणाऱ्या तीन तरुणींची ही यशोगाथा आजच्या पिढीला खरंच प्रेरणादायी ठरणारी आहे.

आजची पिढी प्रॅक्‍टिकल आहे ती सहजासहजी भावनाविवश होत नाही असे म्हणतात. याचा अर्थ त्यांना संवेदना नाहीत असा नाही. पण वेळेचा अभाव हेच एकमेव कारण. पण या तिघींच्या बाबतीत मात्र हा अभावही सपशेल फसला. कॉलेजातून शिक्षण घेत असतानाच आजू-बाजूला दिसणाऱ्या समस्या उघड्या डोळ्यांनी पाहण्याची सवय लागली. जाणिवा जागृत होईपर्यंत दृष्टिकोन बदलत गेला आणि आहे ती परिस्थिती पाहून नुसतं कळवळत बसण्यापेक्षा काहीतरी केले पाहिजे, हा विश्वास ठाम होत गेला. महिलांवर होणारे अत्याचार हा एवढाच मुद्दा नव्हता खरतर. तर त्यांच्या समस्यांना त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे, सोडवण्याचे माध्यम निर्माण करून छोट्या छोट्या हाताने फुल ना फुलाची पाकळी बनून हा जगन्नाथाचा रथ ओढण्यास भागीदार व्हावे ही भावना हे ध्येय त्यापाठी होते.

कोण आहेत या तरुणी? कनक वाईकर, वर्षा गायकवाड आणि श्रुती गुप्ता अशी या तीन मैत्रिणींची नावे. परभणीसारख्या छोट्या शहरातून शिक्षण घेऊन मुंबईसारख्या शहरात एका स्टार्टअप मध्ये ग्राफीक डीझायनर म्हणून नोकरी करणारी कनक सांगते की आजुबाजूला बघताना अनेक कलागुण आणि क्षमता असणाऱ्या स्त्रिया निव्वळ मार्ग सापडत नाही म्हणून मार्गदर्शनाअभावी मागे पडतात. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करतांना मला असे लक्षात आले कि याच साहाय्याने आपल्याला काहीतरी करता येण्यासारखे आहे. या कामाचा अनुभव आणि अनेक वर्षांपासून असलेली इच्छाशक्ती या बळावर हा आत्मविश्वास निर्माण झाला होता. समविचारी मैत्रिणी वर्षा आणि श्रुती या दोघींनाही हि कल्पना अतिशय आवडली आणि 'वूमनविश्व' हे संकेतस्थळ साकाराला आले. श्रुती सॉफ्टवेअर इंजिनिअर असून बंगरूळ येथे एका स्टार्टअप कंपनीत जॉब करते. वूमनविश्वची संपूर्ण तांत्रिक बाजू सांभाळण्याची महत्वाची जबाबदारी ती पार पडते आहे. वर्षा कन्टेन्ट रायटर आणि एडिटर म्हणून यशस्वी करिअर सांभाळून ऍडव्हेंचर, ट्रेकिंग, फोटोग्राफी हे तिचे छंदही जोपासते हे सगळे करून वूमनविश्वची संपादकीय जबाबदारी मोठ्या खुबीने पार पाडते.

अनेक भाषांमध्ये अनेक पद्धतीचे वेबसाईट असले तरी खास आपल्या मराठी भाषेत विविध विषयांना घेऊन विशेषतः महिलांसाठी त्यांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने निर्माण केलेले पोर्टल हा पहिलाच प्रयत्न आहे. वूमनविश्वतून महिलांसाठी उर्मी जागवणारे त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या देश विदेशातील महिलांच्या संघर्षातून यशाकडे नेणाऱ्या लेखाच्या श्रुंखलेतून सुरु झालेला हा प्रवास आता महिलांच्या समुपदेशनाच्या दृष्टीनेही खुला करण्यात आला आहे. ज्याद्वारे त्या त्यांच्या सामाजिक समस्या, आरोग्याविषयी विचारणा, कायद्याचे ज्ञान तसेच करिअर संबंधी नवे पर्याय या  माध्यमातून संबंधित विषय तज्ज्ञांकडून जाणून घेऊ शकतात. लेख प्रकाशनाशिवाय हल्लीच वूमनविश्वने ग्राउंड ऍक्टिव्हिटी देखील सुरु केल्या आहेत. बहुलिंगी माणसांच्या जगण्यातले कंगोरे समजून घेण्यासारखे चाकोरीबाहेरची कार्यक्रमाचे आयोजन, 'वूमनस्पेशल ऍडव्हेंचर कॅम्प' सारखे उपक्रम, कँसर जागृती सारखी मोहीम वूमनविश्वाच्या माध्यमातून पार पाडली जाते आहे. याशिवाय पुढे महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी नवे मार्ग निर्माण करण्याचे प्रयत्न या तिघींनी सुरु केलेले आहेत.
'वूमनविश्व' या संकेतस्थळाला विदेशातील वाचकांपासून ते देशातील अगदी गाव-खेड्यातील वाचकांचा मिळणार प्रतिसाद स्तंभित करणारा आहे.
वूमनविश्व साकारण्याचा उद्देश सर्वांगीण विकासातून महिलांचे सक्षमीकरण हे असल्याने तसेच महिला हाच  कामाचा केंद्रबिंदू असल्याने विविध लेखक-वाचक, समाजसेवक, तज्ज्ञ मंडळी अश्या सर्व स्तरातील चांगल्या माणसांचे पाठबळ संचित म्हणून आमच्याकडे गोळा होते आहे. या सगळ्यांच्या आधाराने पुढे मराठेतर भाषांमध्ये आमच्या कामाचा विस्तार वाढवून महिलांच्या विकासासाठी जास्तीत जास्त दारे उघडण्याचा प्रयत्न आम्ही सतत करत राहू. असे आत्मविश्वासाने ठामपणे त्या बोलतात.



Friday 23 June 2017

शब्दांचे पसारे !

एकांतातल्या शब्दांना कंठ असतो
त्या शब्दांना डोळे असतात ओघळणारे
त्या शब्दांना मन असते. भावनाही असतात 

पण मिळत नाहीत ते कान
त्यांना ध्येय असते पण गंतव्य नसते...
ज्यांना ऐकवायचे त्यांच्या पर्यंत जायचे रस्ते नसतात
दारं बंद करून टाकली असतात सगळीच
म्हणून तर ते एकांतात फुटतात
धुसफुसतात... मुसमुसतात, क्वचित किंचाळतातही

कंठातून बाहेर पडले कि त्यांचे प्राक्तन त्यांना कुठवर घेऊन जाईल सांगता येत नाही
असं म्हणतात, शब्दांना मरण नाही. ते हवेत विरत नाहीत, पाण्यात विरघळत नाहीत
अवकाशाच्या पोकळीत तरंगत राहतात ...
भटकत राहतात एकांतातल्या शब्दांच्या आरोळ्या
कुठवर ??
ऐकून घेणारे कान अन समजून घेणारे मन मिळत नाही तोवर

ज्या शब्दांना आस मिळते त्यांची वाफ होते ...
पाऊस होऊन बरसते, मातीत विरते
उरलेल्यांचे दगड होतात.. कुणी ग्रह म्हणतात .. कुणी तारे
न काढता न गिळता आलेले आवंढेच तर असतात सारे

जिकडे तिकडे शब्दांचेच पसारे  !!!

रश्मी पदवाड मदनकर
23.6.17






Saturday 17 June 2017

“SMITA AND I” : Deepti Naval


सतत धावपळीच्या आयुष्यात असणाऱ्या ह्या दोन्ही अभिनेत्री एकदा विमानतळlवर एकमेकींना भेटल्या, दीप्ती स्मिताला म्हणाली हे काय आयुष्य आहे सतत धावपळ , आयुष्य जगण्याची काही दुसरी रीत असली पाहिजे
स्मिता थोडा विचार करून ठामपणे म्हणाली "नाही"
त्यावर दीप्ती नवल ने केलेली ही इंग्रजी कविता


“SMITA AND I” : Deepti Naval

Always on the run
Chasing our dreams
We met each time
At baggage claims
VIP lounges
Check- in counters
Stood a while together
Among gaping crowds
Spoke, unspoken words
Yearning to share
Yet afraid, afraid
Of ourselves
All around us
People cheering, leering
And we, like spectacles
Amidst all the madness
Trying to live a moment
Of truth
A glance, a touch
A feeling to hold on to
And move on…
The last time we sat together
Waiting for a flight
I remember I’d said,
‘There must be another way
Of living this life!’
For a long time
You remained silent
Then,
Without blinking
Without turning
Said,
‘There isn’t’
Today
You are gone, and
I’m still running…
Still trying
To prove you wrong


Prashant Patil यांच्या FB भिंती वरून...

Saturday 3 June 2017

मी आहे ना सांग?’

कुठेतरी  वाचलेली एक सुंदर कविता

मी आहे ना सांग?’
मुग्धमानसी |

’आताच दमू नकोस फार
जायचं आहे लांब’ म्हण
एकदा तरी हात धरून
मला ’थोडं थांब’ म्हण...

माझं गुर्‍हाळ तक्रारिंचं
कुरकुर करु लागलं की
जवळ बसवून मला फक्त
’ऐकतो मी तू सांग’ म्हण...

कधी चिडेन जगावरती
कावून जाईन, त्रासून जाईन
हसून माझी धग सोसून
’जगाच्या नानाची टांग’ म्हण...

कधी माझ्या डोळ्यांमधून
निसटून जाईल काहितरी
तेही पकडून शिताफीनं
’याचा पत्ता सांग’ म्हण...

मी हसताना उधाणलेले
मी रडताना गहिवरलेले
अश्रू माझे टिपून ठेव अन्
’जपून ठेवलंय वाण’ म्हण...

मोठेपण सोसणार नाही
पायांत त्राण उरणार नाही
तेंव्हा कुशीत घेऊन मला
’बाळ माझी छान’ म्हण...

फार काही मागत नाही
माझी तहान भागत नाही
हरलेच कधी मी तर हसून
’मी आहे ना सांग?’ म्हण...

Tuesday 30 May 2017

आयुष्यच एक कोडं आहे. कधीही न उलगडणारं. किंवा उलगडतांनाच अधिक गुंतत जाणारं.. आयुष्यभर चाललेली सगळी वनवन कशासाठी असते सांगू ...कशाचातरी शोध...कशाचा, कशासाठी..माहीती नाही..अस्वस्थता सतत..रात्रंदिवस.. कुठेतरी आत आत एक भिती समांतर ...जी दोरी पकडून पुढे सरकतोय त्याचं शेवटचं टोक लागलंच नाही तर...सापडलोच नाही आपणच आपल्याला..तर?? प्रश्नाला उत्तर हवंय हे शंभर टक्के माहीती आहे..पण प्रश्न काय आहे हेच कळले नाही तर....उत्तरं शोधता येतात पण प्रश्नच हरवली तर??अंधारात चाचपडतोय आपण...स्वतःला शोधतोय...आपण ओळखतो का स्वतःला..जाणतो?? होय..हा उगाचाच confidence
 

स्वतःला स्वतःचे नेमके चित्र साकारता येत नाही..हे चित्र शोधण्याचा प्रयत्न मग आतबाहेर सुरु होतो... आरश्यातल्या प्रतिमा न्याहाळत स्व चा शोध लागत नाही....आपल्या आवडीतून-निवडीतून आपणच आपल्याला उमगतो काय...कुठेतरी झळकतो काय ..हे बघण्याचा प्रयत्न चालू असतो.... बरेचदा आपल्या अस्तित्वाचे अंश अंश सापडत जातात.....पण आपल्याला हवा असलेला नेमका 'मी' सापडायची कवायत मात्र जन्मभर संपत नाही.....त्याचा कानोसा ऐकायला येतो आणि आभास तेवढे होत राहतात......हे आभास अलगद चिमटीत पकडावेे त्याचे रंग बोटांवर उतरले की ते एखाद्या कुपीत भरावे.. जपून ठेवावेत....अंश अंश जोडून आकार घडवून त्यात कुपीतले रंग भरून कधीतरी 'मी' पूर्ण झालेच तर कोणी सांगावे ??

Wednesday 10 May 2017

झेंडा...

..(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं)

2004 मध्ये काही महिने योगेशच्या(माझे पती) नोकरीनिमित्त इंग्लडमधील शेफील्डमध्ये राहत होतो तेव्हाची गोष्ट.
योगेशची बाॅस पॅट 40 वर्षाची झाली म्हणून पार्टी होती. चाळीशीचे विशेष कौतुक पहिल्यांदाच इतके पाहिले.
          आम्ही सहा जण ह्या छोट्याश्या पार्टीसाठी एकत्र आलो. पॅटचा पार्टनर एरिक(तिकडे पार्टनर असतो हे नवे ज्ञान) तिच्यासोबत होता.त्याची नव्याने ओळख झाली आणि अजून एक इंग्रज जोडी ...

      माझे वय तेव्हा साधारण 26/27 . हा एरिक त्या दिवशी माझ्या आयुष्याला मोठी कलाटणी देऊन गेला..आयुष्यात जागोजागी अनेक लोक भेटतात ,काही ना काही देऊन जातात..
पॅटने त्या दिवशी शिकवले..चाळीशीतही कसं मस्त तरुण जगायचं!आयुष्यातील प्रत्येक टप्पा स्वीकारताना बहरत लहरत जगायचं. हि जोडी आवडली मला .
   
टेबलवर  रंगलेल्या गप्पांच्या ओघात  मी एरिकला विचारले कि -तो काय काम करतो ?
ह्या प्रश्नाचे जे उत्तर मिळाले त्याने मला खडबडून शुध्दीत आणले
 तो म्हणाला, "मी स्टेशनवर झेंडा दाखवतो"....

मी आणि योगेश नि:शब्द, कारण  पॅट योगेशच्या ऑफिस मधे उच्चपदस्थ अधिकारी.
 योगेश  शांत बसला पण माझी जिज्ञासा म्हणा किंवा भोचकपणा. ..मला शांत राहू देईना. "पृच्छकेन सदा भाव्यम" अर्थात : प्रश्न विचारत रहा".

मी पुढे परत विचारले,"सुरवातीपासून तिथेच आहेस का? "

नव-याचा जळजळीत कटाक्ष...माझे दुर्लक्ष ...

पण हा पठ्ठ्या तर खूष झाला अजूनच ,ह्या प्रश्नाने.

म्हणाला, "Nope, मीही software कंपनीमध्ये अधिकारी होतो ,चाळीसाव्या वाढदिवसापर्यंत....
वयाच्या 20 ते 40  पर्यत वीस वर्षे खूप काम केले ...
पैसे साठवले फिक्स केले..
आणि आता मी माझे जुने स्वप्न जगतोय....

" स्वप्न म्हणजे?"मी

"मी लहानपणी जेव्हा जेव्हा स्टेशनवर यायचो माझ्या माॅम बरोबर तेव्हा मला  हा सिग्नलमॅन फार भुरळ घालायचा..वाटायचे किती lucky आहे हा अख्खी ट्रेन थांबवू  शकतो आणि त्याच्या हातातले दोन झेंडे मला रात्री स्वप्नातही दिसायचे. मग मोठा होताना हा सिग्नलमॅन मागे राहिला. मी ही चारचौघांसारखा खूप शिकलो. .
Executive post  वर आलो आणि routine मधे अडकलो.
पण चाळिसाव्या वाढदिवसाला शांत मनाने ठरवले..आता ह्या बिग मॅन एरिक ने small kid एरीकचे स्वप्न पूर्ण  करायचे...
आणि  दुस-या दिवसापासून स्टेशनवर रुजू झालो ते माझे आवडते लाल हिरवे झेंडे हातात घेतले.
मी त्या क्षणाच्या आजही प्रेमात आहे..."
एरीक मस्त छोट्याश्या एरीकसारखा हसला ,मग मोठ्या माणसासारखा बीअर रिचवू लागला.

   
पार्टी संपली..मी आणि योगेश घरी आलो तेव्हा दोघेही एरीकच्या प्रेमात पडलो होतो. भूतकाळात  मागे टाकलेले,हरवलेले,विसरलेले आपापले  हिरवे,लाल झेंडे आठवले...माझी डायरीत राहिलेली कविता...अर्ध्या वाटेवर राहिलेलं गाणे..योगेशची एखादे वाद्य शिकण्याची
अपूर्ण इच्छा..बरंच काही.....

          आज तो नवा गुरु प्रेरणा देऊन गेला....
*1. पुढील काही वर्षे झटून काम करण्यासाठी* ;

*2.महत्वाकांक्षा  आणि पैसा ह्यांच्या हव्यासात न हरवण्यासाठी;*

*3.हातात चाळीशीनंतर  घेण्याचा आवडत्या रंगाचा झेंडा शोधण्यासाठी...*

         मी ही माझा चाळीसाव्या वाढदिवसाला माझा आवडता झेंडा हातात घेतलाय कवितेचा..
गाण्याचा....जगण्याचा..

*तुम्ही शोधलाय का तुमचा लाडका  झेंडा??*
☄☄☄☄☄☄☄☄☄

Friday 5 May 2017

शितल तुझं चुकलंच..निषेध तुझ्या निर्णयाचा




21 वर्षाच्या तरूण मुलीनं आत्महत्या करावी आणि आपण तीला 'बिचारी' ठरवून सरकारला दोष देऊन चर्चा घडवून आणाव्या..तिची एक प्रतिमा तयार करावी मग सहानुभूती, प्रसीद्धी....आणि काय काय.. पुन्हा एकदा आत्महत्यांचे उदात्तीकरण करतोय आपण.....कोणी कितीही चुकीचं असलं तरी आत्महत्या करणं समर्थनीय कसं असू शकतं.. तरूण वयात संघर्ष न करता कल्टी मारणं कसकाय पटतं राव...तरूण वय, अंगात रग असताना गरीब बापाचा हातभार बनून मेहनत करून त्याचे पांग फेडणं जास्त यथोचीत ठरले नसते काय?? 'लग्न' हा जिवनमरणाचा प्रश्न आहे काय ?? आयुष्याच्या कसोटींना तोंड देण्याचे सोडून मरण जवळ करणं जास्त सोपा मार्ग निवडणं नाहीये का ? हा असा पळपुटेपणा आदर्श ठरवायचा का??


सरकार लाख चुकीचे असेल..समाज वाईट असेल नाहीतर रूढी चूकीच्या असतील पण यातलं काहीच 'आत्महत्या'करण्यापेक्षा चूक असू शकत नाही..आपण कशाचं समर्थन करतोय?? हे असं चुकीचं करूनही जन्मभर न मिळालेली सहानुभूती, प्रतीष्ठा..प्रसिद्धी आपल्याकडून त्यांना मिळणार असेल तर आणखी तरूण त्याकडे आकर्षित नाही होणार का??चूकीला चुक न म्हणता त्यांना 'बिचारे' पालूपद लावून सोशल मिडीया गाजवणारे आपण आणखी लोकांना हे करायला प्रवृत्तच करत नाहीयोत का??

काहीतरी चुकतंय राव....
सरकारचं चुकत आहेच पण त्यांच अन आपलंही.. काहीतरी चूकतंय खरं ..


मुलाच्या सुस्थितीतल्या केवळ तोकड्या झाल्या म्हणून कित्तेक दिवसापासून आटाळ्यावर ठेवून दिलेल्या चपला, सॅंडल, बूट वगैरे गेल्या महिन्याभरापासून बाहेर काढून, स्वच्छ करून ठेवल्या आहेत. रोज एक-दोन जोड पॉलिथिनमध्ये डिक्कीत टाकून घेऊन जायच्या आणि जाता-येता निखाऱ्यासारख्या धगधगत्या उन्हात पाय भाजत चालणारी गरजू मुलं दिसली कि त्यांना द्यायच्या असं ठरवलं होतं. गम्मत अशी कि फक्त एक जोड देता आला आतापर्यंत. तेव्हापासून म्हणजे जवळ जवळ मागल्या 12 दिवसांपासून रोज वेगवेगळ्या रस्त्याने जाऊनही गरजू मुलं दिसत नाहीत. जी दिसतात त्यांच्या पायात पायताणं असतात. पण हि मुलं शोधण्याच्या नादात रस्त्यावरून चालत जाणाऱ्या जरा हलाकीची परिस्थितीत दिसणाऱ्या सगळ्या माणसांच्या पायाकडे आपसूक लक्ष जाऊ लागले आहे. यात भरदुपारी सामानाचा भारा, भाजीच्या टोपल्या डोक्यावरून वाहून नेणाऱ्या खेड्यातल्या बायका, ढोरं चरायला घेऊन जाणारे गुराखी, रोडसाईड्ला बसलेली काही विक्षिप्त मंडळी, हमाल, रिक्षा चालक अशी मोठी (अगदी शब्दशः मोठी) माणसेच विनाचप्पल या आग ओकणाऱ्या उन्हात भरदुपारी पाय भाजत चालताना दिसतायेत.मन चरचरतं पाहून. त्यातल्या त्यात मुलं दिसत नाहीयेत हि जरा समाधानाची बाब असू शकते.

यात काही गोष्टी लक्षात येतात,

>> पालक असतील तर परिस्थिती काहीही अगदी कशीही असली, आणि त्यासाठी काहीही करावे लागले तरी ते करून मुलांच्या निदान बेसिक गरजा आई-वडील पुरवतातच.

>> पालक नसलेली मुलं अशी बेवारस फिरतांना फारशी दिसत नाही ती कुठल्याश्या संस्थेत खितपत किंवा सुस्थितीत पडलेली असतात.

>> चौकाचौकात किंवा मंदिराबाहेर भीक मागताना दिसणाऱ्या मुलांना तुम्ही काहीही दिलं तरी उपयोगाचं नाही. कारण एकतर त्या गोष्टी ते वापरतच नाहीत कारण त्यांच्या तश्या कुपोषित आणि गरीब दिसण्यावरच त्यांची कमाई असते आणि तरीही तुम्ही दिलेच आग्रहाने तर ते विकून पैसे मिळवले जातात.

इथे आपला गरजूवंतांना मदत करण्याचा उद्देश पूर्ण होत नाही.

लहान मुलांपेक्षाही मोठ्यांनाच अश्या मदतीची जास्त गरज आहे हे आपल्या लक्षातही येत नाही.कारण त्यांना गृहीतच धरण्याची रीत आहे. गेल्या काही दिवसापासून ते मला प्रकर्षानं जाणवलं आहे. प्रचंड कष्ट उपसून कुटुंबासाठी राबणारी हि मंडळी स्वतःकडून आणि इतरांकडूनही उपेक्षित राहते. म्हणूनच गाडीच्या डिक्कीत मोठ्यांच्या टाकून दिलेल्या सुस्थितीतल्या चपलांसाठी वेगळी जागा करून घेतली आहे. रखरखत्या उन्हात भाजणाऱ्या पायांना जुन्या चपलांचाही दिलासा फार असतो. देणाऱ्याला प्रचंड समाधान लाभतं. करून बघाच


Rashmi / 22.04.17

Monday 27 March 2017

बघ जमतंय का?



नुसताच वरवर चाचपडतोस
चेहेऱ्यावरच्या खाणाखुणांत भाव शोधतोस
रीतभात जपून भौतिकाचे पडसाद उमटलेला
मुखवटा असतो रे चेहेरा
हा दिसणारा चेहेरा विसरावा लागेल
अंतःकरण वाचावं लागेल
जोखीम तर आहेच ... पत्करावी लागेल
बघ जमतंय का ?

खरे भाव समजायचेत तर
आत्म्याच्या गर्भाला स्पर्षाव लागेल
मनाच्या अथांग अंधाऱ्या डोहात
खोल खोल उतरावं लागेल
स्वतःला विसरून माझ्यात सख्या रे
अलगद हरवावं लागेल

जोखीम तर आहेच ... पत्करावी लागेल
बघ जमतंय का ?


आत असतील काही अडगळी जपलेल्या
जुन्या जखमांचे व्रण, दुखऱ्या भावनांचे पापुद्रे ठसठसणारे
ओले ओघळते ... जराश्या धक्क्याने भळभळणारे
जाणिवांचा डोह खंगाळून काढून 
घट्ट जीर्ण दार उघडाव लागेल
आत्मीयतेची फुंकर घालत हळुवार जीव ओतावा लागेल
हळवे मन जिंकावे लागेल... 

जोखीम तर आहेच ... पत्करावी लागेल
बघ जमतंय का ?

काठावर बसून नुसतेच न्याहाळण्यापेक्षा
अंतःकरणाच्या गाभ्यात भावना शोधल्या तरच
दिसतील .. तुझ्यात गुंततील
भावभावनांच्या कल्लोळातही मग
तुझ्याच मनात घर करतील
पण ते होण्यासाठी ..घडवून आणण्यासाठी

जोखीम तर आहेच ... पत्करावी लागेल
बघ जमतंय का?

(C) रश्मी मदनकर
२८/०३/१७ - १:४४am










Saturday 18 March 2017

जातांना तो म्हणाला..
'तुला मोकळं केलंय, जा जग तुझं जिनं … तू तुझं बघून घे'
ती थांबली गहिवरली, मुसमुसली
सावरून, डोळ्यातले अश्रु आवरून दोन्ही हाताचे तळवे समोर धरून
म्हणाली " हे हात बघतोस ? तुझ्या हाती दिले तेव्हा तू घट्ट धरलेस तुझ्या मुठीत…. अन ओढून घेतलेस मिठीत
ती मुठ म्हणजे माझं जग होतं आणि ती मिठी म्हणजेच जगणं …तुझ्यावर प्रेम कमी होऊ नये हि काळजी घेणं हेच एवढ्या वर्षात 'मी माझं बघणं'
मुठ सोडलीस मिठी तोडलीस तरी तुलाही मोकळं होता येणार नाही ……
माझ्याशिवाय तुला सख्या रे बघ जगताच येणार नाही

Sunday 12 March 2017

उसे आईलाइनर पसंद था, मुझे काजल।
वो फ्रेंच टोस्ट और कॉफी पे मरती थी, और मैं अदरक की चाय पे।
उसे नाइट क्लब पसंद थे, मुझे रात की शांत सड़कें।
शांत लोग मरे हुए लगते थे उसे, मुझे शांत रहकर उसे सुनना पसंद था।
लेखक बोरिंग लगते थे उसे, पर मुझे मिनटों देखा करती जब मैं लिखता।
वो न्यूयॉर्क के टाइम्स स्कवायर, इस्तांबुल के ग्रैंड बाजार में शॉपिंग के सपने देखती थी, मैं असम के चाय के बागानों में खोना चाहता था।
मसूरी के लाल डिब्बे में बैठकर सूरज डूबना देखना चाहता था।
उसकी बातों में महँगे शहर थे, और मेरा तो पूरा शहर ही वो।

न मैंने उसे बदलना चाहा न उसने मुझे। एक अरसा हुआ दोनों को रिश्ते से आगे बढ़े। कुछ दिन पहले उनके साथ रहने वाली एक दोस्त से पता चला, वो अब शांत रहने लगी है, लिखने लगी है, मसूरी भी घूम आई, लाल डिब्बे पर अँधेरे तक बैठी रही। आधी रात को अचानक से उनका मन अब चाय पीने को करता है।

और मैं......
मैं भी अब अक्सर कॉफी पी लेता हूँ किसी महँगी जगह बैठकर। 😊

(Poet - Bhaskar (Not sure))
बुज़ुर्गों के कमरे से होता हुआ
सीढ़ियों से गुज़र के ,
दबे पाँव छत पे चला आया था मैं ,
मैं आया था  तुमको जगाने
चलो भाग जायें ,
अंधेरा है और सारा घर सो रहा है,
अभी वक़्त है
सुबह की पहली गाड़ी का वक़्त हो रहा है !!
अभी पिछले स्टेशन से छूटी नहीं है !
वहाँ से जो छूटेगी तो गार्ड इक लम्बी सी कूक देगा !!
इसी मुँह अंधेरे में गाँव के "टी-टी"से बचते बचाते ,
दोशालों की बुकल में चेहरे छुपाये
निकल जायेंगे हम
मगर तुम
बड़ी मीठी सी नींद में सो रही थीं,दबी सी
हँसी थी लबों के किनारे पे महकी हुई ,
गले पे इक उधड़ा हुआ ताँगा कुर्ती से निकला हुआ,
साँस छू छू के बस कँपकपाये चला जा रहा था ,
तर्बे साँसों की बजती हुई हल्की हल्की,
हवा जैसे सन्तूर के तार पर मींढ लेती हुई,
बहुत देर तक मैं सुनता रहा
बहुत देर तक अपने होंठों को आँखों पर रख के
तुम्हारे किसी ख़्वाब को प्यार करता रहा मैं,
नहीं जागीं तुम
और मेरी जगाने की हिम्मत नहीं हो सकी लौट आया !!
सीढ़ियों से उतर के बुज़ुर्गों के कमरे से होता हुआ
मुझे क्या पता था कि मामू के घर से उसी रोज़ ,
वह तुमको ले जायेंगे
तुम्हें छोड़कर
ज़िन्दगी इक अलग मोड़ मुड़ जायेगी !!

गुलज़ार

किताबें झाँकती हैं...

किताबें झाँकती हैं बंद आलमारी के शीशों से
बड़ी हसरत से तकती हैं
महीनों अब मुलाकातें नहीं होती
जो शामें उनकी सोहबत में कटा करती थीं
अब अक्सर गुज़र जाती है कम्प्यूटर के पर्दों पर
बड़ी बेचैन रहती हैं क़िताबें
उन्हें अब नींद में चलने की आदत हो गई है
जो कदरें वो सुनाती थी कि जिनके
जो रिश्ते वो सुनाती थी वो सारे उधरे-उधरे हैं
कोई सफा पलटता हूँ तो इक सिसकी निकलती है
कई लफ्ज़ों के मानी गिर पड़े हैं
बिना पत्तों के सूखे टुंड लगते हैं वो अल्फ़ाज़
जिनपर अब कोई मानी नहीं उगते
जबां पर जो ज़ायका आता था जो सफ़ा पलटने का
अब ऊँगली क्लिक करने से बस झपकी गुजरती है
किताबों से जो ज़ाती राब्ता था, वो कट गया है
कभी सीने पर रखकर लेट जाते थे
कभी गोदी में लेते थे
कभी घुटनों को अपने रिहल की सूरत बनाकर
नीम सजदे में पढ़ा करते थे, छूते थे जबीं से
वो सारा इल्म तो मिलता रहेगा आइंदा भी
मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल
और महके हुए रुक्के
किताबें मँगाने, गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे
उनका क्या होगा
वो शायद अब नही होंगे!!

*गुलजार*🍃

Thursday 9 March 2017

आओ की कोई ख्वॉब बुने...!

शेखर पाटिल यांचा एक आवडलेला लेख...

***************************

आज साहिरचा जन्मदिवस. आपले आयुष्य समृध्द करणार्‍यांपैकी हा एक. कविता आणि गीत या दोन्ही प्रकारांमध्ये समान ताकदीने सृजन करणारा अन् याहूनही महत्वाची बाब म्हणजे आयुष्य आपल्याच धुंदीत जगणारा एक मनस्वी, कलंदर.

उर्दूतील ‘तरक्कीपसंद’ अर्थात प्रगतीशील लेखकांच्या चळवळीत साहिरचे नाव कधी काळी आघाडीवर होते. अर्थात विचारांमधील मार्क्सवाद हा त्याच्या सृजनात नक्कीच उमटला तरी तो पोथिनिष्ठ नव्हता. प्रचारकी थाटाचे काव्य कधी त्याने स्त्रवले नाही.  मात्र ‘जला दो इसे, फुंक डालो ये दुनिया...’ सारख्या जळजळीत शब्दांत शोषितांविषयीचा कळवळा त्याच्याइतक्या समर्थपणे कुणी मांडलाही नाही. त्याने जीवनाचे विविध रंग आपल्या सृजनातून इतक्या कुशलतेने चित्रीत केलेय की कुणीही थक्क झाल्याशिवाय राहत नाही. गुरूदत्त हे हिंदी सिनेसृष्टीला पडलेले एक स्वप्न होते. त्यांच्या यशात साहिरचा वाटा कुणी नाकारू शकणार नाही.

साहिरच्या जन्मदिवसालाच ‘जागतिक महिला दिवस’ असल्याचा योगायोगही किती अफलातून आहे बघा. पुरूषाच्या जीवनात स्त्री ही माता, भगिनी, प्रेयसी, सहचारिणी आदी विविध रूपांमध्ये येत असते. साहिरच्या काव्यात ही रूपे अत्यंत विलोभनीय स्वरूपात आली आहेत. याला त्याच्या आयुष्यातील घटनांचीही किनार आहे. अत्यंत खडतर स्थितीत साहिरला त्याच्या आईने वाढवले, शिकवले. याचमुळे आपल्या जमीनदार बापाविषयी त्याच्या मनात कायमची अढी तर राहिलीच पण तो मातृभक्त बनला. आईची त्याने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सेवा केली. प्रेयसी म्हणूनही त्याच्या आयुष्यात अनेक महिला आल्या. एके काळी अनेक स्त्रीयांसोबची त्याची मैत्री गावगप्पांना आमंत्रण देणारी ठरली. मात्र खरे प्रेम मिळविण्यात तो अपयशी ठरला. साहिरवर जीवापाड प्रेम करणार्‍या अमृता प्रितम यांनी आपल्या या नात्याला विलक्षण हळूवारपणे जगासमोर मांडले आहे. कुणी महिला आपल्या अयशस्वी प्रेमाला इतक्या आसुसलेपणाने दर्शवत नाही. मात्र हा बंडखोरपणा अमृताजींकडे होता. दुर्दैवाने एका सुंदर वळणावर हे नाते संपले. यानंतर साहिरचे नाव गायिका सुधा मल्होत्रा यांच्याशी जुळले. खरं तर हे त्याचे एकतर्फी प्रेम होते. सुधा मल्होत्रा यांनी कधी याला प्रतिसादही दिला नाही. हीच व्यथा जणू काही त्यांच्या ‘जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला...’ या गीतातून व्यक्त झाली.

मेरे ख्वाबों के झरोकों को सजाने वाली
तेरे ख्वाबों में कहीं मेरा गुज़र है कि नही
पूछकर अपनी निगाहों से बतादे मुझको
मेरी रातों की मुक़द्दर में सहर है कि नही

या प्रश्‍नाचे उत्तरही कदाचित साहिरला आयुष्यात कधी मिळाले नाही. हे वैफल्य त्याने सृजन, सिगरेट आणि मद्यात विसरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. याचमुळे तो तसा अकालीच गेला.

साहिरची एक नितांतसुंदर कविता ही कविच्या मनोदशेचे समर्थ चित्रण करणारी आहे. यातील-

आओ कि कोई ख़्वाब बुने कल के वास्ते
वरना ये रात आज के संगीन दौर की
डस लेगी जान-ओ-दिल को कुछ ऐसे कि जान-ओ-दिल
ता-उम्र फिर न कोई हसीं ख़्वाब बुन सकें

या प्रारंभीच्या ओळी भयाण वास्तवावर मात करण्यासाठी संवेदनशील मनाची धडपड व्यक्त करणार्‍या नव्हेत काय? अर्थात प्रत्येक जण आपापल्या परीने उज्ज्वल उद्याची आस बाळगत स्वप्नांची साथसंगत करतच असतो. नेमकी हीच बाब साहिरच्या शब्दस्पर्शाने अजरामर झाली आहे.

आज साहिर जाऊन ३५ वर्षे झाली असली तरी मानवी मुल्यांचा जयघोष करणारे त्याचे काव्य आजही टवटवीत वाटते. ते काळाच्या कठोर कसोटीवर टिकणारे ठरले आहे. खुद्द साहिरने ‘कभी कभी’त ‘मै पल दो पल का शायर हू’ म्हणत सृजनाच्या क्षणभंगुरतेची कबुली दिली होती. मात्र काळ बदलला...वेळ बदलली...समाजमुल्येही बदललेत तरी साहिरची सर कुणाला नाही हीच त्याची महत्ता.

आज जागतिक महिला दिनानिमित्त साहिरची अत्यंत गाजलेली कविता-

औरत ने जनम दिया मर्दों को,
मर्दों ने उसे बाजार दिया
जब जी चाहा कुचला मसला,
जब जी चाहा धुत्कार दिया॥

तुलती है कहीं दीनारों में,
बिकती है कहीं बाजारों में
नंगी नचवाई जाती है,
ऐय्याशों के दरबारों में
ये वो बेइज्जत चीज है जो,
बंट जाती है इज्जतदारों में ॥

मर्दों के लिये हर जुल्म रवां,
औरत के लिये रोना भी खता
मर्दों के लिये लाखों सेजें,
औरत के लिये बस एक चिता
मर्दों के लिये हर ऐश का हक,
औरत के लिये जीना भी सजा॥

जिन होठों ने इनको प्यार किया,
उन होठों का व्यापार किया
जिस कोख में इनका जिस्म ढला,
उस कोख का कारोबार किया
जिस तन से उगे कोपल बन कर,
उस तन को जलील-ओ-खार किया ॥

मर्दों ने बनायी जो रस्में,
उनको हक का फरमान कहा
औरत के जिन्दा जल जाने को,
कुर्बानी और बलिदान कहा
किस्मत के बदले रोटी दी,
उसको भी एहसान कहा ॥

संसार की हर एक बेशर्मी,
गुर्बत की गोद में पलती है
चकलों में ही आ के रुकती है,
फाकों में जो राह निकलती है
मर्दों की हवस है जो अक्सर,
औरत के पाप में ढलती है ॥

औरत संसार की किस्मत है,
फिर भी तकदीर की हेती है
अवतार पैगंबर जनती है,
फिर भी शैतान की बेटी है
ये वो बदकिस्मत मां है जो,
बेटों की सेज पे लेटी ॥

औरत ने जनम दिया मर्दों को,
मर्दों ने उसे बाजार दिया
जब जी चाहा कुचला मसला,
जब जी चाहा धुत्कार दिया ॥

Monday 13 February 2017

खुणा

सख्या
तू येतोस ... तुझे सळसळणारे चैतन्य शिंपत फिरतोस
उत्साहाच्या चंदेरी सुमनांची पखरण करतोस
मनमोकळे हसतो ... जीव गुंतवत रमतो
अन मन भरण्या आत निघून जातो
जातांना तुझ्या येण्याच्या सगळ्या खुणा वेचून नेतोस

तुझ्या असण्याच्या खुणा मात्र तिथेच सांडून जातोस
तुझ्या असण्यात माझ्या गुंतण्याच्या खुणा लपत नाहीत
आणि ... तू येऊन गेल्याचा अंदाजही लोकांचा मग चुकत नाही. 

कुंपण



माझ्या क्षितिजात चंद्राची शीतल काया तेवत असते
अंगणात चंदनफुलांचा शिंपावा 
गार गंधित वाऱ्याची झुळूक तुला स्पर्शाला हवी असते
म्हणून तू  दुपारचे उन्ह अंगभर लपेटून
रात्री भेटायला येतोस

मला तू पौर्णिमा म्हणतोस

उन्हात कोरड्या करपून गेलेल्या
तुझ्या भावनांना माझ्या ओलाव्याची उब हवी असते
तुझा हात हाती घेते
पदराची सावली तुझ्या डोक्यावर धरते
तू शांत होत हळव्या कुशीत विसावतो

मला तू माया म्हणतोस...

तुझे बाळबोध उमाळे कुशीत रिचवताना
माझ्या मातृत्वाचा पान्हा फूटतो
तू तुझे उदरभरण करून घेतोस
तृप्तीची ढेकर देऊन
कुशीतच गाढ झोपी जातो.....

तू मला पूर्णा संबोधतो...

पुन्हा उजाडतं... तुला उडायचं असतं
दूर गगनात तुझ्या स्वप्नांचं क्षितिज गाठायचं असतं
तुझ्या पंखांवर मी माझं आभाळ धरते
झेप घेऊन थकलास कि तुला विश्रांतीला
पंखांखाली ओंजळही सरकवते

तू मला धारिणी म्हणतोस....

जगणं-जागवणं, रुजवणं - निभावणं.
तुला देत राहते अखंड  ...
तुझे तप्त उन्ह मनभर गोंदून
रापल्या जीवाचा दाह सोसून कोंडून घेते आत
वरवरच्या कायेवर चंदनाचा लेप देते... शृंगार करते
रात्री तुझ्या गरजेची शीतलता दिवसभर पेरत जाते.

 मला तू स्वरूपा पुकारतो...

माझे हे नभव्यापी मन मात्र तू जिंकावस असं वाटत असतं
तेही तुला देऊन टाकता येतं खरतर ...पण
ते तूच घराच्या चौकटीत कुठल्याश्या कुपीत नाही का बंदिस्त करून ठेवलय
आठवतं ?

मग मीच स्वतःला कुंपण म्हणते...





रश्मी पदवाड मदनकर
१२/०२/२०१७

Friday 3 February 2017

प्रजासत्ताक आणि स्त्रीस्वातंत्र्य


प्रजासत्ताक दिन जवळ आलाय. १९५० पासून देशात अधिकार आणि कर्तव्य याशिवाय स्वातंत्र्य या विषयांवर प्रचंड उहापोह होत आलाय. अनेक आंदोलनं, संघर्ष उलथापालथी याच काही कारणास्तव घडत गेले.. संपूर्ण स्वातंत्र्य हि अजूनही एक कल्पनाच वाटते. स्वातंत्र्याची संकल्पना स्पष्ट झाली तर इतर अनेक प्रश्नांना आपोआप वाचा फुटू शकेल पण स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचे उत्तर कधीच स्पष्ट देता आलेले नाही. आपलं आत-बाहेर असलेलं अमर्याद अस्तित्व आणि ते मुक्तपणे स्वीकारण्याची अन तसेच वागण्याची आपली ताकद म्हणजे खरे स्वातंत्र्य असे माझे स्पष्टच मत आहे.  व्यक्तिस्वातंत्र्याचा विषय पुढे आला म्हणून स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला. सहज शब्दकोश उचलून बघितला. स्वतंत्रता, स्वयंशासन, स्वयंपूर्णता, आत्मनिर्भरता, मुक्तता, सोडवणूक, खुलेपणा, स्वैरता, मुभा, सूट... बाप रे बाप! एकूण २५-३० शब्द ह्या एकाच शब्दाला ‘पर्यायी’ म्हणून दिलेले आहेत. स्त्रियांच्या दृष्टीने पाहायला गेले कि यातला कुठला शब्द तिच्या अनुषंगाने चपखल बसतो हे व्यक्तिसापेक्ष असू शकेल कदाचित प्रतिनिधिकहि असू शकेल. सामाजिक चौकटीच्या साच्यात घालुन आपलं अस्तित्व आपण आकारात आणु पहातो,त्याला मर्यादित करु पहातो आणि मग स्वातंत्र्याच्या कल्पना सुद्धा मर्यादित होत जातात, त्यांनाही भिंती येत जातात. प्रत्येकाची असामान्यत्वाची व्याख्या बहुधा वेगळी आणि सतत बदलत रहाणारी असते.हे झालं व्यक्तिमत्व स्वातंत्र्याविषयी.

 सामाजिक स्वातंत्र्याचा विचार केल्यास स्त्रीही शिक्षणानं स्वावलंबी बनते आणि आर्थिक स्वावलंबन जिला लाभतं तिच्यावर  इतरांना फारसा अन्याय करता येत नाही. शिवाय निर्णयाचं स्वातंत्र्यही या दोन कारणाने हळूहळू मिळू लागतं. स्वत:च्या भविष्याचा विचार करता येतो. पण सर्वप्रथम हे तिला स्वतःला समजायला हवंय ती जाणीव होणे गरजेचे आहे कारण शेवटी  स्वातंत्र्य हा समजून घेण्याचा नाही तर निश्चितच अनुभवण्याचा विषय आहे. महिलांचं स्वातंत्र्य हा वादाचा मुद्दा असला तरी ही सुसंस्कृत समाजाची गरज आहे आणि विकासाची पहीली अट सुद्धा आहे. भारतीय राज्यघटनेत कुठेही स्त्री-स्वातंत्र्य असा शब्द आलेला नाही.  पण एक नागरिक, एक व्यक्ती म्हणून प्रत्येक स्त्रीला सर्व स्वातंत्र्ये पुरुषांच्या बरोबरीने उपभोगता येऊ शकतात. असे असूनही स्त्री अधिकारांची गळचेपी होत राहिली आहे यात शंका नाहीच. देश स्वातंत्र्याच्या ६७ व्य वर्षात पदार्पण करतांना देशाच्या स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करतांना स्त्रियांच्या स्वतंत्र अधिकारांची चर्चा दुय्यम ठरावी हि अर्ध्या जगाची शोकांतिका आहे. अर्ध्या जीवांवर अन्याय आहे. लोकशाहीने स्त्रीला माणूस म्हणून स्वीकारल्याचे कुठेही दिसत नाही. ही गोष्ट भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे हे ताठ मानेने सांगणार्‍या आम्हा भारतीयांचीही शोकांतिका आहे. 

लोकशाहीत श्रद्धा, मूल्य, विश्वास यांचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला बहाल करण्यात आले. परंतु या सैद्धांतिक चौकटीलाच नाकारून छेद देण्याचे प्रयत्न आजही होतांना दिसत आहे. आजही महिला कौटुंबिक अत्याचार, हुंडाबळी, लैंगिक शोषण, अँसिडहल्ले, बलात्कार इत्यादींची बळी ठरत आहे. भारत स्वतंत्र झाला असे म्हणतांना सामाजिक अन सांस्कृतिक बेडगी रूढी परंपरेच्या, बिनबुडाच्या नीतिमत्तेच्या पारतंत्र्यातून तिची सुटका अद्यापही झालेली नाही. अर्धे जग पारतंत्र्य उपभोगत असतांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याचा खोटा आव कुठल्याही समाजाला कुठल्याही देशाला आणता येणार नाही. भविष्यात खऱ्या स्वातंत्र्याचा पायवा रचण्याची सुरुवात आतातरी व्हावयास हवी हीच या ६७ व्या प्रजासत्ताकदिनी शुभेच्छा !!

चौकट :-
 राज्यघटनेतील कलम १४ नुसार स्त्री-पुरुष यांना समान हक्क प्रदान करण्यात आले आहेत. घटनेच्या कलम ३१ (घ) नुसार स्त्री आणि पुरुषास समान कामाबद्दल समान वेतनाचा अधिकार दिला आहे. राज्यघटनेच्या कलम ३०० (क) अ नुसार स्त्री किंवा पुरुषाला संपत्तीच्या हक्कांपासून वंचित करता येणार नाही, असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र आजही वडिलोपार्जित संपत्तीचे हिस्से करताना कुटुंबातील मुलांना जास्त हिस्सा व मुलींना कमी हिस्सा देण्याचे प्रकार घडतच असतात. घटस्फोटित, विधवा महिलांनाही या जाचाला सामोरे जावे लागते. वस्तुत: वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलाबरोबर मुलीचाही समान हक्क असतो, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये दिला होता. तो निकाल त्याचवर्षीपासून लागू झाल्याने त्या वर्षाआधीच्या संपत्तीवाटप प्रकरणांसाठी हा निकाल लागू होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयानेच स्पष्ट केले होते. वडिलोपार्जित संपत्ती व्यतिरिक्त विवाहित स्त्रीला पोटगीच्या रूपातही स्थावर वा जंगम मालमत्ता मिळत असते. पोटगीच्या रूपाने स्त्रीला मिळालेल्या मालमत्तेवर आयुष्यभर तिचाच अधिकार असेल. ही मालमत्ता आपल्या मृत्यूनंतर कोणाला द्यावी याचा निर्णय ती मृत्युपत्रात तशी नोंद करून घेऊ शकते. स्त्रीला पोटगीरूपात मिळालेल्या मालमत्तेवर तिच्या मृत्यूनंतरही सासरच्या मंडळींना हक्क सांगता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. हिंदू विवाह कायद्यातील तरतुदीप्रमाणे नवऱ्याने आपल्या पत्नीचा प्रतिपाळ करणे बंधनकारक असून, पतीच्या मालमत्तेत तिचाही वाटा असतो. तो नाकारणे हे कायदाबाह्य आहे. स्त्रीधन असो वा पोटगीरूपात मिळालेल्या मालमत्तेवरील स्त्रीचा अधिकार या दोन्ही बाबींबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेले दोन्ही स्वतंत्र निकाल हिंदू स्त्रीला तिचे हक्क शाबित करण्यासाठी महत्त्वाचे ठरतील. तलाक किंवा पतीने केलेल्या दुसऱ्या लग्नामुळे मुस्लिम महिलांशी होत असलेल्या भेदभावाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक जनहित याचिका स्वत:हून दाखल करून घेतली. राज्यघटनेने हमी देऊनही मुस्लिम महिलांना भेदभावाला सामोरे जावे लागत असेल तर ते अयोग्य आहे, असेही मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. या जनहित याचिकेच्या तीन आठवड्यानंतर होणाऱ्या सुनावणीत न्यायालय जी काही भूमिका घेईल ती महत्त्वाची ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या उपरोक्त निकालांमुळे स्त्रीच्या हक्कांबाबत अधिक जागृती होण्यास साहाय्यच होईल याबाबत शंकाच नाही. 




रश्मी पदवाड मदनकर
23/01/2017

(नागपूर सकाळ 'मी' पुरवणीत प्रकाशित लेख)

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...