Monday 27 April 2020

हिरवे भान -



(वृत्त - महाराष्ट्र वृत्त)

बकुळीखाली निजून आहे
उन्हकेशरी हिरवे भान
मुग्धफुलांची पखरण होता
थरथर झाले सारे रान

पहाटसमयी किलबिल झाली
वनी पसरले गीत अजाण
दवांत न्हाले उन्ह कोवळे
बहकत गेले सारे रान

फांद्यांवरती हिंदोळ्यावर
फुले डोलली पानोपान
अंगांगावर रंग उधळले
बहरून आले सारे रान

श्वासाश्वासा मधे पेरला
गंधगारवा पाऊस छान
माती भिजली अत्तर झाली
मृद्गंधीले सारे रान

थोडी सळसळ थोडी हळहळ
नदीकाठच्या वाटेवरती
पानगळीच्या ऋतुत कातर
अधीर झाले सारे रान ...

©रश्मी

मै तुम्हे फिर मिलूंगी..







खरं सांगू का अमृता तू म्हणजे देहभानापलीकडच्या जगात घेऊन जाणारी एक अवर्णनीय जादू..ती जादू आम्ही सगळ्यांनी कधीतरी अनुभवली आहे किंवा ऐकीव तरी आहे, किंवा पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळावी म्हणून लालसेने किंवा कधीच न अनुभवल्याने एकदा तरी अनुभवायला मिळावी या अपेक्षेने.. जगण्याच्या मूलभूत गरजांच्या पलीकडे, जिथं थांबतात, विसावतात आणि उसळतात आयुष्याचे काही क्षण अश्या आनंदाच्या अनुभूतीच्या ओढीने सतत तुझ्याकडे ओढले जात असतो.


जगण्याचा खूप गुंता होत राहतो अधून मधून. आणि मग त्यापुढला बराच काळ गुंता सोडवण्यात निघून जातो. मनात हे असं काही काहूर माजतं कि, प्रापंचिक आन्हिकं, जबाबदाऱ्या निभावताना वेदना सहन करणाऱ्या भौतिक शरीराची कात भिरकावून द्यावीशी वाटते, कधीकधी तर बाईपण बोजड वाटायला लागतं..वाटतं परंपरेतून, संस्कृतीतून, प्रपंचातून, साचेबद्ध जगण्यातून या रोजरोजच्या धावधावपळीतून एवढंच काय या शरीरातूनही बाहेर पडावं; मोकळं व्हावं आणि दूर दूर जाऊन बघत राहावा आपणच घालून ठेवलेला घाट... जमलंच तर मोडून पाडावा, बंद करून घ्यावे परतीचे सगळे रस्ते.. हा आंतरिक मनाचा कल्लोळ शांतावताना का कुणास ठाऊक तू आठवत राहतेस अमृता प्रीतम .. शेजारी येऊन बसतेस आणि तुझ्या शब्दातलं वाण माझ्या पदरी घालत माझ्या उसवलेल्या मनाचा पोत शिवत बसतेस कधी कवितेने कधी कथेने. तू म्हणाली होतीस आठवतं..
घनघोर अंधेरा छाये जब
कोई राह नज़र ना आये जब
कोई तुमको फिर बहकाये जब
इस बात पे थोड़ी देर तलक
तुम आँखें अपनी बंद करना
और अन्तर्मन की सुन लेना
मुमकिन है हम-तुम झूठ कहें
पर अन्तर्मन सच बोलेगा...


कसं गं कळतं तुला? अजाणता अनुरूपता दोघींच्या जगण्यातल्या बाबी रिलेट का होतात. तू कधीकाळी जगलेले भोगलेले अनुभव माझ्या अनुभूतींना ओळखीचे का वाटतात. वेगवेगळ्या काळात समांतर आयुष्याच्या दोऱ्या पकडून त्याच चढ-उत्तरातून, त्याच खाच-खळग्यातून केला असतो आपण एकसारखाच प्रवास. शब्दांनी सावरलं असतं तेव्हा तुला आणि तेच शब्द आता देत असतात आधार मला. पण तुझ्यासारखं त्या शब्दांना जोजवून आपलंसं करून आतात भिनवणं अजून बाकी असतं..इथेही आयुष्याचा खोल अर्थ समजावत तूच तर येतेस मदतीला ..
ज़िंदगी खेलती है
पर हमउम्रों से...
कविता खेलती है
बराबर के शब्दों से, ख़यालों से
पर अर्थ खेल नहीं बनते
ज़िंदगी बन जाते हैं...
होय या अर्थांचाच तर शोध असतो आयुष्यभर जो संपतच नाही. तुला हि माझी तगमग बरोबर उमगली असते तुझ्याशी असणाऱ्या अंतरिक भावबंधाच्या रेषा फेर धरतात भोवताली आणि तुझे शब्द जगण्याची उभारी देत राहतात. मी समाजाने घातलेल्या कुंपणा अल्याड सतत भान राखत स्वतःच सामान्यत्व मान्य करून स्वीकारून जगू पाहणारी .. आणि तू समाजाचे ओझे झुगारून स्वच्छंद, सामान्य असण्याची सगळी कुंपणं ओलांडून स्वतःच्या अस्तित्वा पल्याड विशेषत्व जागवून स्व-अटींवर जगणारी .. तरी का कोण जाणे तुझ्यात माझ्यात एक समान धागा आहे ज्यानं आपल्यात एक नातं निर्माण केलं आहे..तू सतत पुढ्यात येऊन सांगत राहतेस मला; या अश्या मनासारखे कलंदरी जगण्यासाठी करावे लागणारे त्याग सोप्पे नसतात. कधीतरी माझा कान धरून म्हणतेसही ''बाई गं! दुनियाभऱ्याचं ओझं खांद्यावर लादत, इतरांसाठी झोकून, स्वतःच अस्तित्व विसरणं म्हणजेच बाईपण असतं हि व्याख्या विसर एकदा .. तू ओझ्याखाली राहतेस'' मी नुसतंच हसते ..आणि विचारते.. मग तूच सांग तू कुठे राहतेस ?? तू म्हणतेस ..
आज मैने अपने घर का नम्बर मिटाया है
गली कें माथे पर लगा गली का नाम हटाया है
हर सडक की हर दिशा का नाम पोंछ दिया है …..
गर आपने मुझे कभी तलाश करना है….
तो हर देश के, हर शहर की , हर गली का द्वार खटखटाओ –
यह एक शाप है – एक वर है
और जहां भी स्वतंत्र रूह की झलक पडे
समझना – वह मेरा घर है !!!


मनावर भुरळ घालणाऱ्या तुझ्या शब्दांच्या गावातून प्रवास करतांना मनातून-शरीरातून उसळत्या भावनांच्या लाटा मी अनेकदा अनुभवल्या आहेत. तू आताशा तुझ्या चाहत्यांच्या नसानसात अशी काही भिनली आहेस जणू तू म्हणजे आत्मा आणि आम्ही सारे त्या आत्म्याला फुटलेले लाखो संवेदनांचे धुमारे. तुझ्या शब्दातून मिळणाऱ्या आनंदांच्या ओढीने लिहिण्या-वाचण्यातलं सुख किती निर्मळ आणि चिरंतन असतं कसं सांगू तुला ? स्वत:च अंगावर ओरबाडून घेतलेल्या रोजच्या जगण्यातल्या अनेकविध जखमांवर कधीतरी या सुखाचा मलम लावावा अन जगणं सहज सुलभ करत जावं. यासाठीच तर हा सारा प्रपंच.. तू दिलेल्या शब्दांची साथ म्हणजे हदयी असलेल्या वीनेची तार झंकारल्या सारखीच आहे, त्याचे सुर आत अनेक दिवस गुंजत राहतील अमृता ....
तू मात्र भेटायला येत राहा कारण तू वचन दिले आहेस
 ''मै तुम्हे फिर मिलूंगी ...''


©रश्मी पदवाड मदनकर

Wednesday 22 April 2020

कोण्या एका संध्याकाळी ..


(वृत्त - लवंगलता वृत्त)

कोण्या एका संध्याकाळी 
भलते घडले होते 
रविकिरणांना अलगद कोणी 
हाती धरले होते

हाती धरल्या किरणांना मग 
अर्पण केले कोणी 
नदीकाठच्या कडेकपारी 
उजळत गेले होते

त्या मातीचा गंध पसरला 
गंधित झाला वारा 
रानोमाळी हर्ष दाटला 
रंग पसरले होते

आकाशाशी सलगी केली 
परतून पक्षी गेले 
सांजसावळ्या नभ वेलीवर 
चैत्र कोरले होते

अंधाराच्या पटलावर का 
थरथर झाला चंदा
चांदण ओले कवेत घ्याया 
मन व्याकुळले होते

मिठीत घेण्या दिठीत यावे 
अवघे एकच व्हावे 
शुभ्र फुलांचा शेला ओढत 
नभ पांघरले होते

©रश्मी पदवाड मदनकर

Book Review - सुरेश आकोटकर



सुरेश आकोटकर यांची प्रतिक्रिया आणि केलेल्या काही सुचना. माझ्या शिकण्याच्या प्रवासात या अनुभवी आणि जाणकार माणसांचे शब्द खुप महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत.

मन:पुर्वक धन्यवाद सर ! 🙏🙏 Suresh Akotkar


रश्मी, नमस्कार .


बीट्स अँड बाईट्स वाचलं .द्वादशीवार दादांनी थोडक्यात एकूणच लेखांच्या संदर्भात छान प्रस्तावना लिहिली .आपल्या मनोगतातूनही आपण या लेखांबद्दलची आपली भूमिका मांडली .जगभरातल्या स्त्रियांच्या शोषणाच्या कथा आणि व्यथा आपण अतिशय तळमळीने मांडल्या आहेत .बहुतेक अनुभव मन विषण्ण आणि विदीर्ण करणारे आहेत .आणि हे शोषण थांबावे असे बहुतेक लेखांच्या शेवटी आपण इच्छा व्यक्त केली आहे .परंतु कितीही निर्मळ मनाने आपण या प्रार्थना केल्या तरी पुढील काळात असे घडेल याची शाश्वती नाही .हजारो वर्षापासून हे घडते आहे .आपण अनेक देशातले संहारकतेचे हिंस्र स्वरूप अनेक लेखातून दाखवले आहे , ते आणखी कोणते आणि कसे संहार घडवून आणतील हे सांगणे अशक्य आहे .वाघासारखे हिंस्र पशू पोटासाठी बळी घेतात पण माणूस नावाच्या जातीला लागलेली ही माणसाच्याच हत्येची भयावह भूक कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही .कितीही कायदे आले आणि आजच्या युगात स्त्री कितीही पुढे गेली तरी महिलांवरचे लैंगिक अत्याचार थांबतील असे वाटत नाही .कारण आजही स्त्रीपुरुष म्हणजे नरमादी हीच भावना अशा घटनांतून दृष्टीस पडते .यातून बलात्कार , हत्या , स्त्री विक्री अशा घटना घडून येतात . सकारात्मकतेपेक्षा मानवाला नकारात्मक गोष्टींचे नेहमीच आकर्षण वाटत आले आहे .' ब्याडव्यागन इफेक्ट' मधे मरीनाने माणसाची मानसिकता तपासून पाहण्यासाठी अफलातून प्रयोग केला , त्यांतून हेच सिद्ध होते .एखादे दुष्कृत्य करण्याची संधी मिळाली नाही म्हणून तुम्ही सन्मानाने राहता, अशी संधी मिळाली तर भलेभलेही मागेपुढे पाहणार नाहीत हे आपण प्रकर्षाने मांडले आणि ते खरे आहे .स्त्री कितीही विद्वान असो , शालीन असो तिच्याकडे सगळेच आदर्श महिला म्हणून बघतील हा निव्वळ भ्रम आहे .आपण हे सारे मोठ्या पोटतिडिकेने मांडले आहे .धर्मांधता ही पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे आणि तिला आज भयानक स्वरूप प्राप्त झाले आहे .आपण यासाठी ज्या तथाकथित संतांची आणि त्यांच्या भक्तगणांची उदाहरणे दिली आहेत ती सर्वांना माहीत आहे . आसारामची कृत्ये जगासमोर येऊनही त्यांना पूजणारी माणसे आजही ठायी ठायी आढळून येतात .कुमारी मातांचे प्रश्न आपण मांडले आहेत .त्यालाही समाजच जबाबदार आहे .आजही थोड्या रुपयाच्या वा धनधान्याच्या मोबदल्यात एखादी आदिवासी कन्या भोगायला मिळते .तिची ती पोटाची गरज आहे म्हणून दातृत्वाने पुढे येणाऱ्या व्यक्तींची कमतरता नाही . पण आपली विषयवासना तृप्त करणारेही कमी नाहीत .घरातले एक मूल कुपोषित रहावे हेही पोटातल्या भुकेचे द्योतक आहे . केटीची कहाणी आणि तिचा एकूण संघर्ष वाचताना ' ' अरुणाची गोष्ट' आठवली .केटीला संघर्षाला तोंड देता आले , अरुणा बिचारी आयुष्यभर कोमातच जगली आणि गेली . नादियाची कथाही अशीच चित्तथरारक ! बलुचिस्तानमधील जीवघेणी परिस्थिती सर्वांनाच माहीत आहे .एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या हत्या किंवा एसिड हल्ले यावर आपण विस्तृत लिहिले आहे .हे अत्यंत घृणास्पद असले तरी याला एक दुसरी बाजूसुद्धा आहे .मुलांना स्वतःकडे आकर्षित करणे ,त्याला सर्वस्व अर्पण करणे , त्याच्यावर जिवापाड प्रेम दर्शवणे, ..इतके की त्याला दिनरात तिच्याशिवाय काहीच सुचू नये .तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला आणि वेड्यागत मनोवस्था झालेल्या मुलाच्या या अवस्थेला मुलीही तेवढ्याच जबाबदार आहेत .तू माझी नाही तर कुणाचीच नाही या अवस्थेला पोचल्यावर नीती अनिती या साऱ्या गोष्टीला त्याच्या लेखी काहीही मोल नसते . कौटुंबिक कलहालाही अशीच दुसरीही बाजू आहे .अनेक सुस्वभावी माणसांचे संसार निव्वळ बायकोच्या संशयी स्वभावामुळे मोडले आहेत किंवा कसेबसे सुरू आहेत .ही दुसरी बाजू कदाचित आपणांस पटणार नाही पण मला जे दिसते ते प्रांजळपणे मांडतो आहे. आपण काही आशादायक स्वरूपाचेही स्त्रीचित्रण केले आहे .उच्च पदांवर पोचलेल्या महिला , साकोली भागातल्या महिलांनी उभ्या केलेल्या संघर्षात त्यांना मिळालेले यश, शरबत गुल , सुनंदा मोकाशी आदी लेख सुंदरच ! पत्रावरचा लेखही जुन्या आठवणींना उजाळा देणारा . आत्महत्येचे उदात्तीकरणकरण होत आहे का या विषयावरचा लेख विचार करायला लावणारा आहे . सोशल नेटवर्किंगचा उपयोग कसा व्हावा हेही आपण चांगले मांडले आहे .सोशल मीडिया जेवढा उपयोगाचा तेवढाच अनेक वाईट गोष्टी घडवून आणणारा .आजच्या तरुण पिढीला याचे जबरदस्त व्यसन जडले आहे हे सांगायला नकोच .यातून खूप चांगले शिकण्यासारखे असले तरी यातून मोठ्या प्रमाणावर ज्या अनैतिक गोष्टी चालतात त्याला कुठलाही निर्बंध राहिला नाही .लैंगिकतेचे माणसाला पूर्वापार आकर्षण असले तरी आपण कसे व्यक्त व्हावे हे सांगण्यापलीकडे झाले आहे .भावना उद्दिपित करणारे स्वतःचे फोटो टाकण्यास आपण कसे धजावतो हे कळत नाही . गुलजार , स्मिता पाटील व मुबारक बेगम हे लेख आणखी विस्तृत लिहिता आले असते असे वाटते .या निमित्ताने राखी व गुलजार , स्मिता व राज बब्बर यांचे परस्पर वैवाहिक नाते मांडता आले असते आणि ते पुस्तकातल्या लेखांना आणखी जुळले असते .मुबारक बेगमने उतार वयात अतिशय हालअपेष्टा भोगल्या .शिलाई मशीनवर त्या काम करत होत्या असे ऐकून आहे , पण खरे खोटे माहीत नाही .एके काळी ऐश्वर्य भोगलेल्या माणसाचा पडता काळ त्याला कुठल्या गर्तेत नेईल , नेम नाही . एकूणच आपले लेखन आवडले . आपण पत्रकार म्हणून काम केले आहे , त्याचा अनुभव अनेक लेखांतून प्रत्ययास येतो .काही लेख आणखी विस्तृत करता आले असते .प्रत्येक लेखाच्या शेवटी त्याचे पूर्वप्रकाशन देणे आवश्यक नव्हते , कारण हे लेख त्या त्या काळातील असले तरी त्यात उदघ्रुत केलेली परिस्थिती सर्वकालीन आहे . मुखपृष्ठ खूपच छान, पुस्तकाला साजेसे ! एकूणच आपण मांडलेले विचार , त्या विषयीचे आकलन या सर्व गोष्टी वाचनीय आहेत . या पुस्तकाच्या रूपाने आपण एक उत्कृष्ट वैचारिक ऐवज वाचकांस उपलब्ध करून दिला त्याबद्दल आपले अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !


- सुरेश आकोटकर






Monday 20 April 2020

काही गाण्यांचे किस्से बनतात, काही किस्स्यांची गाणी.



काही गाणी किती मनाचा ठाव घेतात... नाही ? इतके आत आत उतरतात की दिवसाच्या-रात्रीच्या कोणत्याही प्रहरी ते कितींदाही ऐकता येतात आणि फक्त ऐकता येत नाहीत तर त्यात गुंग होऊन तादात्म्य प्राप्तीच्या स्तरापर्यंत जाता येतं. तुम्हाला आलाय कधी असा अनुभव ?? मला आलाय .. येतो आजही कितीदातरी. 
काही गाण्याच्या धून नुसत्या वाजायला लागल्या की आपण वेगळ्याच विश्वात तरंगत पोचतो. अशीच एक धून आहे जॅकी आणि मीनाक्षीच्या हिरो सिनेमातली बासरी (फ्ल्यूट मेलोडी) आठवते ? ह्याच बरोबर त्यातलच 'निंदिया से आई बहार ऐसा मौसम देखा पहेलीबार' या धून लागल्या की आजही मनात काहीतरी कालवाकालव होते. ह्याच्याच उलट काही गाणी आहेत जी ऐकावीच वाटत नाहीत.. ती लागलीत कि तिथून पळून जावंसं वाटतं. अर्थपूर्ण शब्दांची गाणी ही माझी पहिली पसंती, त्यानंतर गायक संगीत किंवा इतर सगळ्या गोष्टी. दिवसभरातला माझा आवडता वेळ कुठला असतो सांगू, ऑफिस संपल्यानंतर ऑफिसमधून निघून घरी पोचेपर्यंतचा ५०-६० मिनिटांचा वेळ. कुठेतरी खूप घाईत पोचायची धावपळ नसते काम संपवून निघाल्याच समाधान असतं म्हणून रिलॅक्स मनानं मी गाणी ऐकत घरी पोचते. गेल्या काळातल्या काही गाण्यांनी माझ्या आयुष्याची खूप जागा व्यापली... वारंवार तीच तीच गाणी ऐकायला मी खूप वेळ दिलाय. ह्या गाण्यांनी माझे जगणे सोपे आनंददायी केले.
''फिर ले आया दिल मजबूर क्या कीजे?
रास आया ना रहना दूर क्या कीजे?''
इतकच ऐकलं कि कान आणि मनही ताब्यात राहत नाही, या गाण्याचे संगीत आपल्याला खेचत पार कुठल्या कुठे घेऊन जातं
''करते है हम आज ये कुबुल क्या कीजे?
हो गयी थी जो हमसे भूल क्या कीजे?
दिल कह रहा उसे मुकम्मल कर भी आओ
वो जो अधुरीसी चाह बाकी है .....!''
अरिजित गायलाय छान पण रेखा भारद्वाजच्या आवाजात ऐकलं कि मात्र भान हरपत जातं..
वारंवार ऐकायला आवडणाऱ्या गाण्यांमध्ये
'तुझ संग बैर लगाया ऐसा तुझ संग बैर लगाया ऐसा
रहा ना मैं फिर अपने जैसा.. मेरा नाम इश्क़, तेरा नाम इश्क़'
किंवा 'ये तेरी और मेरी मोहब्बत हयात है
हर लम्हा इसमें जीना मुक़द्दर की बात है...  तुझे याद कर लिया है आयत की तरह',
 'मै रहू या ना रहू तुम मुझमे कही बाकी रहेना' वझीरचे 'तेरे बिन', यहाँ फिल्मचं 'नाम अदा लिखना' किंवा मग काईटचं 'दिल क्यू ये मेरा शोर करे' अशी अनेक गाणी आहेत. 

असेच आम्ही मुंबईला राहत असतांना 'जब वी मेट' फार गाजला होता. रोज हार्बर लाईनने पनवेल ते अंधेरी पर्यंतचा प्रवास असायचा या काळात गाणी ऐकायला प्रवासातला भरपूर 'मी टाइम' मिळायचा. या काळात ऐकलेले 'आओगे जब तुम ओ साजन अंगांना फुल खिलेंगे' गाण्यानं बुद्धी अन मनाचा इतका ताबा घेतला होता की आजही ''नैना तेरे कजरारे हैं
नैनों पे हम दिल हारे हैं
अनजाने ही तेरे नैनों ने
वादे किए कई सारे हैं
साँसों की ले मद्धम चलें, तोसे कहे
बरसेगा सावन…''
संगीत , शब्द , लय , ताल ऐकले कि ते दिवस, लोकल, प्रवास, तेव्हाच्या घटना, ते क्षण तेव्हाची सोबत असणारी माणसे सगळं सगळं नकळत डोळ्यासमोर उभे राहते खूप व्याकुळ व्हायला होतं. लव आजकलचं
 'यह दूरियाँ.. इन राहों की दूरियाँ
निगाहों की दूरियाँ, हम राहों की दूरियाँ
फ़ना हो सभी दूरियाँ..'
असेल किंवा 'मै जहाँ रहू मै कहीं भी हुं, तेरी याद साथ है' शिवाय '' नहीं सामने ये अलग बात है'' किंवा 'बिन तेरे बिन तेरे बिन तेरे कोई खलीश है हवाओ में बिन तेरे' या दिवसातली कितीतरी गाणी अशीच फार फार वेगळीच अनुभूती देणारी. याच काळात रणबीरचे चित्रपट आले आणि त्याचे अनेक गाणे अश्याच कुठल्याश्या निमित्ताने कुठल्याश्या प्रसंगामुळे मनात घर करू लागले. आम्ही तेव्हा मुंबई सोडणार होतो, मुंबईचे कितीतरी मित्र-मैत्रिणी आम्हाला आमच्या निर्णयापासून फिरविण्याचा प्रयत्न करीत होते. निर्णय घेण्यापासून ते सगळी आवरासावर होण्यास दोनेक महिने लागले असतील. इतकी वर्ष मनाचं घर झालेली मुंबई सोडायची .. जावं तर आवडीचं शहर सोडायचं दुःख आणि आपल्या शहरात आपल्या लोकांजवळ जाऊ नये म्हंटलं तर अडचण. खूप घालमेल होत होती जीवाची अश्यात 
'कैसी तेरी खुदगर्ज़ी, ना धुप चुने ना छांव
कैसी तेरी खुदगर्ज़ी, किसी ठोर टीके ना पाव ,,, रे कबिरा मान जा''
गाणं जावं तिकडे चालू असायचं आणि डोळ्याला धारा लागायच्या. सर्वात जास्त त्रास दिला तो रॉकस्टारच्या गाण्यांनी. या काळापर्यंत रणबीर अत्यंत आवडता कलाकार झाला होता. रॉकस्टार मात्र मुंबईतल्या मित्र मंडळींना आवडला नव्हता. रिव्यू ऐकून आम्हीही तो थिएटरला पाहिला नाही. लोकलच्या प्रवासात डोळे बंद करून आजूबाजूचा चाललेला सगळा गोंधळ विसरून मन शांत करत
  'जब कहीं पे कुछ नहीं, भी नहीं था
वही था, वही था, वही था, वही था
वो जो मुझमें समाया
वो जो तुझमें समाया
मौला वही-वही माया
कुन फायाकुन...'
हे खूप सुकून द्यायचे. त्याहून अधिक 'तुम हो पास मेरे, साथ मेरे हो तुम यूँ, जितना महसूस करूँ तुमको उतना ही पा भी लूँ' ऐकून. या फिल्मच्या सगळ्या गाण्यांच्या  प्रेमात पडून सिनेमा पाहिला आणि इतर सर्व मित्रांना वेडगळ वाटणाऱ्या या सिनेमाच्या मी मात्र प्रचंड प्रेमात पडले तो आजतागायत आहे. काही चित्रपटाचा अंतर्भाव हळूहळू कळू लागतो, मग आपण तो कितींदाही पाहू शकतो इथवर प्रवास जातो आणि नंतर तो आत भिनतो त्यातलाच माझ्यासाठी हा एक.. असाच रणबीर दीपिकाच्या तमाशा सिनेमाबद्दल  -  
'पल भर ठहर जाओ
दिल ये संभल जाए
कैसे तुम्हें रोका करूँ... अगर तुम साथ हो
' हे गाणं मात्र व्हिडिओसह पाहावं. संपूर्ण सिनेमाची समरी या गाण्यातून उलगडतेच पण दोघांच्या सिनेमातल्या पात्रांएवढेच फीलिंग या गाण्यातही उतरवले आहे. ती आर्तता आपल्यापर्यंत पोचल्याशिवाय राहत नाही. 

काही गाण्यांचे किस्से बनतात, काही किस्स्यांची गाणी. काही गाणी पुन्हा त्याच त्याच दुःखात पाडतात तर काही गाणी दुःखातून बाहेर काढण्यास मदत करतात. या गाण्यांमुळे अनेक स्मृती जगवता येतात...जपता साठवता येतात. कधी कधी वाटतं गाणी हा प्रकारचं नसता तर कसे जगलो असतो आपण ? हि कल्पना हे गाण्यांसह जगण्याचे अनुभव घेतल्यानंतर तरी करता येणे शक्यच नाही. माझ्यासाठी तरी गाणी हे इसेन्शिअल गरजांपैकी एक आहे... असणार आहे.  

https://www.youtube.com/watch?v=AAZGOKMs_Fk










Tuesday 14 April 2020

यह कैसी माया है....


दोन दिवसाआधी 'माया मेमसाब' मुद्दाम शोधून काढून अर्ध्या रात्रीपर्यंत पाहत बसले होते. खूप भावभावनांचा विचारांचा कल्लोळ या सिनेमाने पुन्हा एकदा मनात निर्माण केला. मला वाटतं प्रत्येक कलाकाराची ठरली असते तशी प्रत्येक कलाकृतीची देखील एकेक नियती ठरलेली असते. एखाद्या कलाकृतीचा तिच्या चाहत्यांच्या मनातले स्थान-आदर किंवा प्रसिद्धीच्या झोतात कुठवर जाणार कि मग तशीच विरून जाणार, अडगळीत फेकली जाणार हे कुणालाही सांगता येत नाही. एखाद्या कलाकृतीच्या निर्मितीचे उद्देश वेगळे त्याचा आशय वेगळा त्यातून निघणारा अर्थही वेगळा पण रसिकांना गवसलेला किंवा त्यांनी काढलेला अर्थ वेगळा होतो आणि निर्मात्याच्या मनातली कलाकृती लोकांपर्यंत पोचतच नाही. 'माया मेमसाब' बद्दल मला असेच वाटले. फार पूर्वी एकदा ओझरता पाहिला होता कुठे कसा फारसं आठवत नाही. पण त्यातली गाणी गाण्यांचे शब्द खोलवर आत उतरले होते.

खयाल चलते है आगे आगे
मै उनकी छांव में चल रही हूं…
न जाने किस मोमसे बनी हूं
जो कतरा कतरा पिघल रही हुं
मै सहमी रहती हूं नींद में भी
कही कोई ख्वाब डस न जाये…..
मेरे सरहाने जलावो सपने
मुझे जरासी तो नींद आये….

कसले शब्द आहेत किती डेप्थ. पण इतक्या अर्थपूर्ण गाण्यांचा चित्रपट बाजारू का ठरावा ?? हा तेव्हापासून सतावत आलेला प्रश्न. मग पुन्हा पहिला आणि प्रश्नानं अधिकच भन्नावून सोडलं. 'मिर्च मसाला' 'हिरो हिरालाल' सारखे हटके चित्रपट आणि अनेक माहितीपर डाक्युमेंट्रीज बनवणारे केतन मेहता यांच्या निर्देशनात, पंडित सत्यदेव दुबेंसारख्या थिएटर कलावंत दिग्दर्शकाच्या मदतीने बनविलेला, शब्दांचे जादूगार गुलजारसाब त्यांच्या शब्दांना लयीत बसवणारे हृदयनाथ मंगेशकर आणि या लयींना सुरात गाणारे लतादी आणि कुमार शानू, शिवाय दीपा साही, फारूख शेख, राजबब्बर, शाहरुख आणि परेश रावलसारखे कसलेले सिनेकलावंत, संपूर्ण सिनेमाभरच सौन्दर्याचे व्हिज्युअल ट्रीट देणारे सिनिऑटोग्राफर अनुप जोतवानी .. इतकी दिग्गज मातब्बर कलाकार मंडळी निव्वळ शारीर पातळीवरच्या सीग्रेड बाजारू चित्रपटासाठी एकत्र आले असतील ?? की त्यांना यापलीकडे खूप गहेराई असलेलं अनुभूतीच्या पातळीवरचं वेगळं काहीतरी सांगायचं होतं ? ही संवेदनशील बुद्धिवान माणसं निव्वळ इहवादी भूमिका सांगणारा नव्हे तर काहीतरी शाश्वत, चिरंतन सत्य, भोगवादाच्या पलीकडे असणाऱ्या आत्मिक भावनिक पातळीला स्पर्शणारे तत्वज्ञान सांगू इच्छित असावे असे मला उगाचच वाटत राहिले. हा तो काळ होता जेव्हा संस्काराच्या जोखडाला बांधून घेऊन फरफटत चाललेली माणसे डोळ्यावर झापड बांधून चालत असावी म्हणूनच त्यांना अर्थाच्या खोलात डोकावून पाहता आलेच नसावे त्यांच्या आकलनशक्तीला न झेपलेला आणि म्हणून बाजारू ठरून उगाचच बदनाम झाला असावा; आता सिनेमा पाहिल्यावर असे वाटायला खूप वाव मिळाला.


अगदी सुरुवातीच्या एका सिनमध्ये चारू (फारूख शेख) मायाला म्हणतो ''तेरे नीली आँख के भँवर बड़े हसीन हैं, डूब जाने दो मुझे, ये ख़्वाबों की ज़मीन है'' सारा सिनेमाच या गुलजारच्या 'ख़्वाबों की ज़मीन' वर बेतलेला. कोण आहे ही ख्वाबोची माया ? माया म्हणजे निव्वळ तारुण्याने सौन्दर्याने मुसमुसलेली बाई नव्हे...माया हे रूपक आहे..यात ती स्त्री होती तीच्या ऐवजी मोह वाटणारं काहीही असू शकलं असतं का ? ती खरतर फक्त माध्यम होती प्रत्येकात ठासून भरलेल्या मोहमायाचे खरे स्वरूप उघड करणारी. फ्लॉबेर या फ्रेंच लेखकाची ”मादाम बोव्हारी” नावाच्या कादंबरीवर बेतलेला हा सिनेमा असला तरी त्याला भारतीय स्वरूप देतांना दिग्दर्शकाने केलेल्या प्रयत्नांना काही प्रेक्षकांच्या मान्यतांनी अश्लील नाव देऊन त्याकाळात पाणी फेरले हे निश्चित. विदेशी कादंबरी हा पुर्वग्रह ह्याला कारणीभूत असावा. असे असले तरी 'माया मेमसाब'ला एक अजरामर कलाकृती म्हणून स्थापित व्हायला कोणीच रोखूही शकले नाही हे सत्य नाकारता येत नाही.

गुलजारच्या '‘भीगे भीगे मौसम में, क्यूं बरखा प्यासी लगती है, जी तो खुष होता है पर एक उदासी रहती है’' या शब्दांतून माया उलगडू लागते.

''खुद से कहना जाती हूँ मैं
खुद से कहना आई मैं
ऐसा भी तो होता है ना
हल्की सी तनहाई में
तनहाई में तस्वीरों के चेहरे भरते रहना
खुद से बातें करते रहना, बातें करते रहना''

बालपणीच आई गमावलेली, एकटेपणात हरवलेली पण जगण्याची जिजीविशा अशी कि सतत स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलणारी सुखाच्या मागे धावणारी, नीतीनियम, परंपरा झुगारुन प्रेमाच्या शोधात मर्यादा ओलांडणारी माया. 'इस दिल में बसकर देखो तो ये शहर बड़ा पुराना है हर सांस में एक कहानी है हर सांस में अफ़साना है' म्हणत शहर शहर भटकणारी माया..तिचे अनेक रूप आहेत. ज्याने जशी बघावी तशीच दिसते माया... एका ठिकाणी माया स्वतःशीच बोलताना म्हणते, "बहोत थक हार गयी हूं मैं, यह माया मुझें बहोत थकाती है" यावरूनच कळतं माया नुसतंच स्त्रीनाम नाही.

''धूप से छनती छाँव ओट में भरना चाहूँ, आँख से छानते सपने होंठ से चखना चाहूँ'' म्हणत ती कधी तुमच्या मनाचा ठाव घेते तुम्हालाही कळत नाही.

माया हवीहवीशी, अप्राप्य, जगावेगळी, स्वप्नासारखीच भासते. पाय जमिनीला टेकतात, स्वप्न तुटतात, विश्वास गमावते, नाती हरवतात, जगण्यातली सापेक्षता समजलेली माया, तरी शेवटालाही तिलस्मी जल पिऊन काहीतरी जादू घडेल असे वाटणारी माया. 'मन साफ होगा तोही जादू काम करेगा' असे जादूगाराने सांगितले असते., प्रेक्षकांनी नावे ठेवलेल्या या मायावर मात्र ही जादू काम करते आणि ती पूर्ण प्रकाशमान झालेली आरश्यात दिसते आणि नाहीशी होते...असं का होतं? कारण माया सत्य होती, तुमच्या आमच्यातले सच्चे प्रतिबिंब तीनं दाखवले, मुखवटे घालून वावरणाऱ्यांचे बुरखे फाडले, वास्तवाचे भान दिले.. मोहमायेत अडकलेली माणसे राहिलीत इथेच शिल्लक; माया मात्र वास्तवात, स्वप्नात या तकलादू आयुष्यपलीकडे तिच्या कल्पनेच्या दुनियेत विलीन झाली. खूप सारे प्रश्न मात्र तिने तसेच अनुत्तरित ठेवले.. न जाने यह कैसी माया है.

“इक हसीन निगाह का दिलपे साया है.. जादू है जुनून है, यह कैसी माया है..”


©रश्मी पदवाड मदनकर



Thursday 9 April 2020

माझ्या फाटक्या छताच्या पलिकडे मला
दीसायचे असंख्य ‌तारे ..

विस्कटलेले, सैरावैरा, भरकटलेले
भटकून लढून रडून थकले की
 स्वतःला लोटून देणारे ..
अथांग अफाट अंधार्या अवकाशाच्या डोहात
मला ते ठीबकताना दिसायचे...
ओघळत येऊन हळूच मिटून जायचे ..

एखादाच तारा फाटक्या छतापर्यंत येऊन
डोकावायचा ..
भटकून लढून रडून थकलेल्या मला
अजूनही लखलखताना पाहून प्रेरीत व्हायचा..
आणि मिटून जाण्याचे विचार सोडून
अंगणात पडून रूजायचा..

त्याची जिजीविषा तग धरून अंकुरायची
दिवसागणिक अंगणात ताऱ्यांची पखरण होऊ लागायची..

आता अवकाशाचे सारे तारे रूजून बहरले आहेत.. आणि

आणि ..
वर अवकाशाच्या फाटक्या छतापलिकडे आता दिसतात
असंख्य तारे ..

© रश्मी पदवाड मदनकर




Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...