जन्म नेमका कशासाठी घ्यायचा, कशासाठी जगायचे आणि काय नेमके काय करून मरायचे हे बरेचदा अनेकांना सतावणारे प्रश्न असतील. जगतांना येणाऱ्या सगळ्या संकटांना सगळ्या कसोटींना तोंड द्यायला तयार असणारा माणूस, कष्ट करत दुःख भोगत जगणारा माणूस, एकमेव शाश्वत सत्य असणाऱ्या 'मृत्यूला' मात्र घाबरतो,. खरतर आयुष्यच माणसाला जन्मभर छळत असतं. आयुष्य नावाच्या यातनांतून सुटका हवी असेल तर एकमेव मार्ग ... मृत्यू. कवी सुरेश भटांच्या ओळी आठवतात 'इतकेच मला जातांना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते' ... पण ज्यांनी जीवनही वेदना हृदयाशी कवटाळून गोधडीच्या चरचर झालेल्या चिंध्यासारखे निष्प्रभपणे जगले, सुखाच्या सावलीचाही स्पर्श ज्यांच्या वाट्याला कधीच आला नाही अश्या अभाग्यांना मृत्यूनंतरही सुटका मिळू नये? मृतदेहाचीही विटंबना व्हावी... स्मशानापर्यंतचा प्रवास आयुष्याहून अधिक खडतर व्हावा हि कसली नियती? सरणापर्यंत पोचायलाही यातनांचा पूल पार करावा लागावा अन मृतदेहालाही ठेचकाळत, डुचमळत जावे लागावे. वैकुंठापर्यंतचा प्रवासही असा पीडादायी असावा. गरिबीच्या झळा माणसाला कुठवर ...