कायांतर : अस्वीकृतीच्या जखमेतील स्वीकृतीची कहाणी
प्रतिथयश कवयित्री, लेखिका मिनल येवले यांनी #कायांतर कादंबरीवर लिहिलेले हे पुस्तक समीक्षण.. मिनल ताई आणि देशोन्नती मनःपूर्वक आभार ******** *कायांतर : अस्वीकृतीच्या जखमेतील स्वीकृतीची कहाणी* कायांतर ही पद्मगंधा प्रकाशनची निर्मिती असलेली आणि पुणे येथील पुस्तक महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झालेली रश्मी पदवाड मदनकर यांची दुसरी बहुचर्चित कादंबरी आहे. एका देहातून दुसरा जन्म घेतलेल्या तृतीयपंथीय आंचल वर्मा या ट्रान्सजेंडर महिलेच्या जिवंत, ज्वलंत आणि अंतर्मुख करणाऱ्या संघर्षाची ही कहाणी आहे. स्त्री-पुरुष या चौकटींपलीकडील ‘तिसरे लिंग’ आपल्या समाजाला अजूनही सहज स्वीकारता आलेले नाही. त्यांच्या अस्तित्वाकडे पाहताना समाज आजही कचरतो; बोलताना, समजून घेताना, अगदी त्यांच्या शेजारी उभे राहतानाही. निसर्गाने निर्माण केलेल्या या जीवांना मात्र समाजाने उपेक्षेची शिक्षा दिली आहे. लाज, अवहेलना, टाळले जाणे, पावलोपावली करावा लागणारा स्वाभिमानाचा संघर्ष, पोटापाण्यासाठी शोधावे लागणारे खाचखळग्याचे मार्ग आणि केवळ अस्तित्व सिद्ध करण्यासाठीची लढाई....हे सगळे अनुभव या कादंबरीत अत्यंत दाहक आणि अस्सलपणे उल...