Monday 29 July 2019

दुखऱ्या बाधेचा 'कृष्णकिनारा' !

दिवस समपात बिंदूवर असताना
एखाद दिवस अचानक
उन्ह हरवतं, सावली साथ सोडत जाते
अंधारून येतं सगळं..
आणि आतात मळभ दाटत जातं.
अवेळीच उगवलेली कातरवेळ ..
मी हातातले 'कृष्णकिनारा' उपडे ठेवते..
काळेभोर खांद्यावर पसरलेले कुरळे केस,
एकत्र गुंडाळून टाळूवर बांधून घेते.
चष्म्याची फ्रेम दुमडून ठेवत, खोल उसासा घेते.
जडावलेल्या देहाची बोचकी विसरून, आराम खुर्चीत पाठ टेकते...
मन शांतावण्याच्या प्रयत्नात असताना,
उरी काहूर माजतं, गम्य-अगम्याच्या लाटा उठतात
वेणूची साद रुंजी घालायला लागते ..आणि मी
मी, पुन्हा निळकांती कृष्णाच्या अथांगतेच्या लहरीत खोल खेचली जाते..
ही वेळ समर्पणाची असते
स्वीकार्य .. आहे ती स्थिती ..तशीच मनःस्थिती
समर्पण तसेच.. राधा, कुंती, द्रौपदीनं स्वतःला कृष्णार्पण केले तसे..
काही क्षण अनंत काळासारख्या रंध्रारंध्रातून ओथंबत राहतात.
अंतरंगाचा तळ ढवळून काळ निसटून जातो ..
मिटल्या डोळी काजळओलीतून कातरवेळ वाहून जाते ..
सचैल न्हाऊन निघतो दुखऱ्या बाधेचा 'कृष्णकिनारा' !
औदास्याचे ग्रहण सुटते ..हरवलेले चित्त भानावर येते.
आभाळ घनव्याकूळ ऐलतिरी अन पैलतीरी
नभांगणाच्या नक्षी खुणावू लागतात..
उसासलेला-उधाणलेला आता बरसणार असतो नभ
धरित्री तरारून येते, सृष्टीच्या नवनिर्मितीचे डोहाळे सुरु होतात..
माझ्या मनातला मोर पुन्हा फुलारून येतो ..
पुन्हा उर्मी जागी होते .. आणि मी ..
मी उपडं ठेवलेलं 'कृष्णकिनारा' पुन्हा अलगद हाती घेते ...

©रश्मी पदवाड मदनकर
27 जुलै 2019

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...