Posts

Showing posts from 2015

ये मोह मोह के धागे...

आयुष्यातली सगळी नाती आणि नात्यांना जोडणारा भावनिक संवेदनेचा धागा. हा धागा बांधला गेलाय दोघांत किंवा त्या एका धाग्यात दोघे गुंतले गेले आहेत तोपर्यंत सगळं आलबेल असतं. धागाच गुंतायला लागला कि मात्र नात्यांचाही गुंता होत जातो. गुंत्याचं शेवटचं टोक शोधत मग भरकटत राहतो बांधून घेतलेला जीव. हे भरकटनं पण मग गोड वाटू लागतं प्रेमाचा मोहच तसा असतो . जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू एकाचा मोह दुसऱ्याची फरफट होऊ नये एवढे मात्र जपले गेले पाहिजे. असा हा नात्यात बांधणारा न दिसणारा धागा मोहाचा. आपुलकीचा, जिव्हाळ्याचा, आकर्षणाचा अन प्रेमाचाही… मोह दोन्ही बाजूला समान असेल तर आयुष्याच गणित चोख बसतं....गणित बिघडलं कि शिल्लक उरतो फक्त शून्य .…पण तरीही आशेवर तर दुनिया कायम आहे ना मग मोह का असू नये. मी तर म्हणेन मोह असावाच. मोह आयुष्याला दिशा देतो. मोह जगण्याचो उर्मी देतो. मोह निराश आयुष्यात आनंदाची भरती आणतो. सुस्त पडलेल्या कोऱ्या करकरीत आयुष्यात मोहाचा रंग चढला कि प्रेमाची प्रचीती येते. मनाचे मनाशी बांधलेले बंध हवेहवेसे वाटत राहतात. जगणे...

जरतारी वस्त्र

लोकलच्या गेटवर उभी रितू शून्यात बघत होती. नवऱ्यानं दगा दिला आपल्याला या दुःखानं संपूर्ण अस्तित्व व्यापून टाकलं होतं तिचं. गाडीच्या वेगाचे, अंगावर येउन भिडणाऱ्या सुसाट वाऱ्याचे, वेगात मागे पडणाऱ्या झाडांचे, बाहेर दिसणाऱ्या परिसराचे, गाडीच्या आतल्या कोलाहलाचे कसले कसले भान नव्हते तिला. भरदुपारची वेळ, गर्दीही नव्हतीच फारशी …. गाडी थांबली कि जरा बाजूला व्हायला लागायचं आणि गर्दीचा डोंब आत उसळायचा तेवढ्यापुरतंच काय ती तंद्री तुटायची. हे असेच चालले होते महिन्यांपासून. मागल्या कित्तेक महिन्यात ती खळखळून हसली नव्हती. मैत्रिणींशी मज्जा मस्ती केली नव्हती. मनमोकळं बोलली नव्हती, रडली नव्हती. अजब अवस्था होती मनाची कुणी कुणीच नको असायचं भोवताल. अलिप्त करून घेतलं होतं तिनं स्वतःला. जणू एकटीच वावरते आहे जगात.…त्यातल्या त्यात लोकलने प्रवास करतांना हा मधला दीड तास तिचा आवडता वेळ. जगापासून तुटण्याचा.गाडीच्या वेगात स्वतःला वाहवून घेण्याचा. आपल्याच विचारांत. नको त्या हव्या त्या विश्वात गढून जाण्याचा. अधून मधून कधीतरी एक साठीतली आजी बसायची वडाळा स्टेशन वरून. सगळे केस पिकलेले. ओठांवर मात्र सतत स्मित. अस...

पांढरे डाग- समज गैरसमज

वैद्यकीय कामानिमित्त एकदा कुठल्याश्या गावी जावे लागले. काम वगैरे आटोपून परतीच्या प्रवासाच्या वेळी नेमकी गाडी बंद पडली आणि नाईलाजास्तव बस ने प्रवास करावा लागला. नेमकी संध्याकाळची वेळ असल्याने बरीच गर्दी होती. बस गच्च भरलेली आणि बरीच माणसं उभी देखील होती. इतक्या गर्दीतही एक सीट मात्र खाली होती. येताजाता लोक त्याकडे बघत होती, बसायला म्हणून जात होती पण तिथे बसत मात्र नव्हते. असं का होतंय? मुळात जिज्ञासू असणारी वृत्ती जागृत झाली आणि मी प्रत्यक्षच तिथे बघायला गेले. तिथे जे काही बघितले ते आश्चर्यकारकच नाही तर धक्कादायक देखील होते. तिथे एक मध्यमवयीन इसम बसलेले होते, त्यांच्या शरीराचा बराचसा भाग पांढऱ्या डागांनी व्यापला होता. आणि म्हणूनच कुणीही त्यांच्याजवळ बसायला तयार नव्हते. पांढरे डाग ज्याला बोलीभाषेत 'कोड' असे संबोधतात. अश्या व्यक्तीला स्पर्श झाला तर ते डाग आपल्यालाही होतील अश्या बिनबुडाच्या कल्पनेने, भ्रामक विचारांनी लोकं किती ग्रासली आहेत या विचाराने मन सुन्न झाले.  आज तंत्रज्ञानाच्या युगात आपण चंद्रापर्यंत भरारी मारत असतांना. पांढऱ्या डागांसारख्या अतिशय साधारण अन अजिबात घा...

तृष्णा ...!!

Image
'हेल्लो … श्रेयस, श्रेयस मी … मी बोलतेय श्रावणी.. हे बघ फोन ठेऊ नकोस प्लीज ' '…… हम्म   '  'अरे तनुल बद्दल काही कळलं का ? हेलो …ह … ह … हेलो श्रेयस'  श्रावणी पुन्हा मुसमुसू लागली ' सांगा रे कुणीतरी काहीतरी मला… माझ्या एवढ्याश्या गुन्ह्याची एवढी मोठी शिक्षा नका देऊ मला'  बराच वेळ कॉटवर बसून पायात डोकं खुपसून हुंदके देत रडत राहिली  … काही वेळ गेला असेल … जरा भानावर आली  तोंडावर उतरलेले केस मनगटाने मागे सारले, तळव्याने डोळे पुसले, नाकावारुन उलटा हात फिरवला आणि परत लगबगीने ती तनुलचा नंबर डायल करू लागली. फोन कानाला लावला आणि वाजणारा फोन उचलला जाईल ह्याची ती डोळे बंद करून वाट बघू लागली. पण नो रिप्लाय.    तिने नंबर रिडायल केला 'आणि उजवा पाय जागीच हलवत 'तनुल प्लीज रे प्लीज एकदा फोन उचल, शपथ आहे तुला, उचल रे नको जीव घेउस' पुटपुटू लागली. पण काहीच उपयोग झाला नाही.  डोळ्यातून पुन्हा आसवं ओघळू लागले.  भरलेल्या डोळ्याने पुसट दिसणाऱ्या नावांच्या यादीत ती आणखी एक नाव शोधू लागली. नाव दिसताच तिने नंबर डायल केला समोरून फोन ...
भरून आलेले आभाळ पहिले कि पावसाचे अंदाज बांधतोस तू .. वेधशाळेच्या बड्या कारभारावर तिरकस ताशेरे ओढतोस तू... माझं मनाचं आभाळ ओसंडू लागूनही कळत नाहीत अंदाज तुला बुद्धीच्या खुळ्या कारभारावर भावनांची गळचेपी करतोस तू सगळं समजल्याचा आव आणू नकोस नाहीच कळत काही तुला ...

गिमिक...

Image
''hey ! gd mrng mom..HANDA MU TC :)'' रमा काकूंचा जर्मनीला असणाऱ्या मुलाचा रोज सकाळी मेसेज येतो. सकाळची सुरुवात अश्या कुठल्याश्या गुंतलेल्या शब्दांच्या एसेमेसने होते. मुलाला सांगू वाटणाऱ्या सगळ्या भावना अश्या थोडक्या शब्दात पुरत्या तो आईपर्यंत पोचत्या करतो अगदी छानश्या स्माईली सकट. आता हे रोजचंच झालंय रमा काकुंनाही पत्राऐवजी आता हेच सोयीचं अन 'कु~~ल' वाटायला लागलंय. हि आजच्या पिढीची सांकेतिक भाषा. आता वाटलं तर भावना समजून गोड मानून घेता येते नाहीतर नुसताच गुंता समजून गुंडाळूनही ठेवता येते.… मला आमचं लहानपण आठवतं. आपण बोलतोय ते सगळ्यांना कळू नये म्हणून आम्ही भावंड काही निवडक जिवलग मित्रांसोबत मिळून स्वतःची भाषा तयार करायचो. शब्दांची मोडतोड, काही शब्दांची गुंतवणूक ,शब्द्फोड आणि लहेजा (टोन) बदलून आम्ही आमच्यात संवाद साधायचो. 'च' ची भाषा. रफरची' भाषा, उलटशब्दी किंवा 'म' ची भाषा अश्या अनेक सांकेतिक भाषा हि त्यांची जाहीर उदाहरणं. पण तेव्हा मोठ्यांच्या दुनियेत त्याची ती स्वीकारार्ह कि अस्वीरार्ह अशी जाहीर चर्चा होत नसे. बाललीला समजून त्याकडे द...

जन्मदिन कि बधाई अमृताजी...

Image
अमृता प्रीतम उत्कृष्ट लेखिका पण त्याहून अधिक एक हळव्या मनाची स्त्री स्वप्न बघणारी आणि ते तसेच जगून दाखवणारी. स्त्री म्हणून तिच्यात असणाऱ्या प्रेम, ममता, जिव्हाळा आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रियकराची नुसतीच मैत्रीण म्हणून किंवा तिच्या मनात वसलेल्या पण कधीही तिचा न झालेल्या प्रियकराची प्रेयसी म्हणून या सगळ्या उत्कट भावनांतून अनुभवलेल्या जीवन घटना आणि त्यातून निर्माण झालेली हि संवेदनशील कवियित्री. तिचे सारेच रूप मला फार आकर्षित करतात अन प्रभावितही. आज तिच्या जन्मदिनी तिला आदरांजली म्हणून तिच्या मला अतिशय आवडणाऱ्या या दोन कविता. मैं तुझे फिर मिलूँगी कहाँ कैसे पता नहीं शायद तेरे कल्पनाओं की प्रेरणा बन तेरे केनवास पर उतरुँगी या तेरे केनवास पर एक रहस्यमयी लकीर बन ख़ामोश तुझे देखती रहूँगी मैं तुझे फिर मिलूँगी कहाँ कैसे पता नहीं या सूरज की लौ बन कर तेरे रंगो में घुलती रहूँगी या रंगो की बाँहों में बैठ कर तेरे केनवास पर बिछ जाऊँगी पता नहीं कहाँ किस तरह पर तुझे ज़रुर मिलूँगी या फिर एक चश्मा बनी जैसे झरने...

स्वगत .. डेस्टीनेशन !

पावसाळ्याचे दिवस अतिशय देखणे, ओले-गार अन हिरवाईने नटलेले असतात पण कधी लक्षात आलंय का तुमच्या ह्याच दिवसात अनेकदा एक अनामिक उदासीनता जाणवते. जसजसे वातावरण आर्द्र होत जाते उन्ह गळून पडतं अन भरदिवसा अंधारून येतं. घरातून बाहेर पडण्याचे मार्ग बंद झालेले असतात आणि खिडकीत बसून सारख्या पडणाऱ्या पावसाकडे पाहण्याचाही कंटाळा येतो. घरात दडून बसावं वाटत नाही आणि बाहेर पडणेही शक्य नसते अश्यावेळी मरगळ येते. इकडे आकाशात ढग अन मनावर मळभ एकत्रच दाटून येऊ लागतात. विचारांचे वारे वाहू लागतात आणि आपण आपल्याही नकळत आयुष्याचे वादळ आपल्याच पुढ्यात मांडून बसतो. काय चाललंय आपलं नेमकं आपल्यालाच कळत नाही. प्रचंड आवडणारा पाऊस; हवाहवासा वाटणारा, वर्षभर वाट बघायला लावणारा पाऊस आज असा उदासवाणा का वाटतोय ह्याचं उत्तर आपलंच आपल्याकडे नसतं. मग आणखी बऱ्याच गोष्टी आठवू लागतात. आयुष्यात कधीपासून आपल्याला काय काय 'इगरली' हवं होतं. आयुष्याकडून आपली हट्टाची मागणी काय होती? ह्याची यादी मनात-डोक्यात जागा घेऊ लागते. एक एक मागणी एक एक गरज.. अश्या गोष्टी ज्याशिवाय मला जगणे शक्य नाही किंवा जगायचेच नाही असे वाटायचे.. ते ते स...

दैनंदिनी !!

रंग उडालेल्या काळपटलेल्या टेबलच्या खिळखिळ्या झालेल्या ड्रॉवरच्या आत अस्ताव्यस्त पसरलेल्या जुन्या बिनकामाच्या वस्तूंच्या भाउगर्दीत , धुळीने माखलेल्या अवस्थेत पडलेय मी टाचण्या पिना टोचल्यात, पेपरवेट, वस्तू येऊन आदळलेत अंगावर कुणाला सोयर सुतक नाही ...आतातर तुलाही नाही … कधी बैठकीतल्या काचेच्या कप्प्यातली शोभा वाढवायचे मी … येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच कौतुक ऐकायचे मी कधीतरी इथली माणसं प्रेमानं हाती घ्यायचे अंगावरची धूळ पुसून काळजाशी लावायचे पान पान पालटतांना हळवी होऊन सुखावायचे मी अन रात्र होताच उशाशी तुझ्या विसावायचे मी तासंतास माझ्याशी बोलायचीस तू शब्द शब्द पेरतांना किती गुंतायचीस तुझ्या भावनांचा ओघ ओंजळीत सामावून घेतांना मीही मग रमून जायचे तुझ्या अनुभवांची निर्जीवी पण एकमेव जिवंत साक्ष ठरायचे. तुझे अश्रू अंगावर झेलतांना उर भरायचा माझाही तू दुःखात असतांना क्षणभरही साथ सुटायचा नाही तुझाही तुझे मन हलके व्हायचे माझ्याशी बोलून मीही मग धन्य व्हायची तुझे हसू बघून तुझे दिवस सरले अन माझेही तू सुखी झालीस तुला हवं ते मिळव...

अज्ञानात सुख

कलेचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्या कलेची आवड असायला हवी त्याबद्दलची जाण असायला हवी पण त्याचे ज्ञान मात्र असायला नको. फार ज्ञान असले कि कलेतील उणीवा, खाणा-खुणा आणि चुका आधी नजरेला, कानाला अन स्पर्शाला जाणवतात. आस्वाद घ्यायचे दूरच राहते. बघण्या, ऐकण्या अन वाचण्याच्या बाबतीत एक हमखास होतं अधिक चांगल्या गोष्टी बघत वाचत ऐकत गेलो की आपल्या अपेक्षा आपल्या आवडी-निवडीपेक्षाही जास्त वाढतात. दर्जेच्या उद्देशाने नसलेल्या अगदी शुद्ध मनोरंजनात्मक गोष्टी सुद्धा आपण ज्ञान आणि दर्जा अश्या कसोटी वर घासून बघतो. आपले ज्ञान आपली आवड आपल्यालाच मुक्त गोष्टींचा मुक्तपणे आस्वाद घेऊ देत नाही. पुन्हा पुन्हा असे घडत राहिले कि मिळेल तिथून आनंद मिळवण्याच्या स्वभावात कमी येते अन रुक्षपणा वाढत जातो. ह्याची परिणीती काहीही न आवड्ण्यामध्ये होते. अन कुठेतरी मानसिक एकाकीपण जाणवू लागते. अज्ञानात सुख असते म्हणतात ते हेच.  

स्मिता

Image
स्मिता = सावळ्या (offbeat) भूमिका बजावणाऱ्या या गोऱ्यांच्या चाहत्या दुनियेतल्या सावळ्या अभिनेत्रीचे विचारही असे सावळे (out of crowd) असावेत ....हा निव्वळ योगायोग नाही हा तर सावळा योग ... नाही ??

पिंड

पु.ल देशपांडे यांनी एका ठिकाणी म्हटलय शेवटी संस्कॄती म्हणजे बाजरीची भाकरी... वांग्याचे भरीत... गणपतीबाप्पाची मुक्त आरोळी. केळीच्या पानातील भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ... मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी... दुस-याचा पाय चुकुन लागल्यावरदेखील आपण प्रथम केलेला नमस्कार.... दिव्या दिव्या दीपत्कार... आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी... मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहान मोठी होणारी शेपटी.... दस-याला वाटायची आपट्याची पाने... पंढरपूरचे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे.... सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श. कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तस ह्या अदॄश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो तर कुणाला विदेशी कपबशीचा.... शब्द फार छानं आहेत. परिटघडिचे शर्ट घातलें की मलाही आवडतील पण हे असं झालं माझ्या दरिद्री आयुष्या...
  मध्ये व्हाटस्आप वर एक विनोद वाचलेला. ' भलाई कर और दरिया में डाल या फिर कुछ भी कर और फेसबुक पर डाल'  खरतर विनोदच. पण होतंय असंच ना हल्ली , मानूया कि सोशल नेट्वर्किंग च्या माध्यमाने डोक्यातलं सगळं मांडायला मन हलकं करायला एक छान मंच मिळालाय. कल्पनेतले रंग शिंपडायला केन्वास मिळालाय पण म्हणून रंगबिंग सोडून, काहीतरी छान लिहायचं सोडून उठसूट कुणावरतरी तुटून का पडतो आपण. नात्यांमध्ये तुटलेले बंध साहवत नाही म्हणून एकटेपणा घालवायला येतात कित्तेकजण मग इथल्या लोकांनाही तोडत का सुटतात. एकतर तोडायला नाहीतर सनसनी पसरून लोकांना लाईक अन कॉमेंटसाठी जोडायला हाच हेतू…  आपण काय बोलतोय, कशासाठी बोलतोय यातून काय साध्य होणार आहे कशाकशाच भान नसतं. राजकारणाला किती मनावर घेतोय आपण? यापूर्वी परिस्थिती फार काही वेगळी नव्हती पण आपल्या रोजच्या जीवनावर खरच एवढा प्रभाव होता का राजकारणाचा? आपल्या आयुष्यात एवढी खळबळ माजायची का? दिवसरात्र वैचारिक-बौद्धिक खल मांडत बसायचो का आपण? आणि यासर्वातून निर्माण होणारे मानसिक-भावनिक त्रास व्हायचे का इतके? हल्लीतर सोशल नेट्वर्किंग साईट्स...

सखे … !

बयो … अगं हुंदका अलबत गिळायचा नाही सुख सुख मागून मिळायचे नाही मनास टाचून असंख्य धागे मनातला मेघ काही विरायचा नाही मनातल्या मनात कुढायचं नसतं डोळ्यातल्या पाण्यानं भिजायचं नसतं मुक्याने एकांत जगतांनाही गर्दीत अलगद शिरायचं असतं स्वप्नांचे रंग पुसायचे नाही उगाच हळहळायचे नाही क्षितीज देऊन स्वप्नांना...मग पुन्हा मागे बघायचे नाही रीत जगाची विसरून बघ ओंजळीत घे सारे ढग आनंदाची गाणी गा तुझ्याच मनासारखे जग ... सखे … तू तुझ्याच मनासारखे जग (C) रश्मी   २४/०७/१५

स्वगत - आठवणींचे क्षण

तसा स्वतःसाठी म्हणून खास असा वेळ काढणं कठीण असतं जरा,पण स्व-संवाद किंवा चिंतन हा प्रगल्भ होण्याचा उत्तम मार्ग आहे . मनातल्या मनात, मनात येणाऱ्या विचारांचा मनाच्या साक्षीने असा मनोवेध घेता येतो अन रोज स्वतःच्याच बदलत्या विचारांचा आलेख अनुभवता येतो. तुम्ही घेतलाय कधी असा अनुभव ? आपल्याला काय हवंय ? काय आवडतं ? कधी काय नको असतं? काय समोर दिसलं कि गालात हसू खुलतं … कशानं चटकन मूड जातो … अश्या एकनाअनेक प्रश्नांची उत्तर शोधलीय का कधी ? कधी स्वतःच्याच समीप होऊन पाहिलंय ? सुरेश भट म्हणतात 'मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो.' तसे बरेचदा मला माझ्याच प्रश्नांनी भन्नावून सोडलंय. मुळात जिज्ञासू प्रवृत्ती आणि सतत काहीतरी शिकण्याची, काहीतरी छान मिळवत राहण्याची हौस. मी माझ्याच जिज्ञासा शमवत शमवत दमते कधी कधी. सतत माझीच माझ्याशी होड लागलीय असं जाणवतं कधी. प्रत्येक विषयाबद्दल कसकाय आपल्याला ओढ असते… प्रत्येक कलेबद्दल आसक्ती कशी… कश्याही आणि कोणत्याही निसर्गदत्त सौंदर्याच आकर्षण का वाटतं? हे माझेच मलाच पडलेले प्रश्न आणि मी अजूनही उत्तर शोधत हिंडतेय. प...

Stories By Rabindranath Tagore .... on Epic !!

दिवसभराचे काम पाहता २४ तास कमी पडतात एक दिवस निदान ३६ तासांचा हवा अस वाटतं. अश्यात कमी पडलेल्या २४ तासात टीव्हीवर चालणाऱ्या फाल्तू सिरिअल बघणे म्हणजे काहीतरी चांगले गमावनेच नव्हे तर काहीतरी वाईट मिळवणे सुद्धा ठरते. त्यामुळे मी बातम्या आणि काही गायनाच्या किंवा हलक्या फुलक्या विनोदी सिरिअल सोडल्या तर शक्यतोर टीव्ही बघतच नाही. आणि म्हणून कुठे कोणत्या चानलवर काय चालू आहे वगैरे (अति)ज्ञान नसतच कधी. हा रोजचा तसा अनुभव पण गेल्या दोन दिवसापासून आजारी आहे. बाहेर येणेजाणे बंद. ऑफिस नाही किंवा घरकामहि नाही. मुलगा काळजी म्हणून स्वतःच स्वतः आवरून घेतोय. नवराही कामात भरून मदत करतोय. अश्यावेळी विश्रांती झाल्यावर मिळणाऱ्या निवांत वेळेत काय करावं म्हणून टीव्ही वर काहीतरी शोधत होते.काहीतरी म्हणजे रोज २४/७ दाखवतात तसलं नाही. काहीतरी छान दर्जेदार...आपल्या टेस्टच आणि मिळालेच ... नवे सुरु झालेले 'एपिक' नावाचे चानल. त्यावर सगळंच्या सगळं युनिक अन दर्जेदार असतं. आपल्या इतिहासाशी आपल्या परंपरेशी आपल्या पूर्वजांशी जुळलेली आपली पाळं -मूळं ते दाखवतात. अगदी सगळे विषय हाताळतात हा गेल्या दोन दिवसाचा अनु...
काही फ़ाइल्स काही फोल्डर्स अलबत स्मृतीत सेव झालेले असतात. अगदी गच्च चिकटून बसलेल्या आठवणी काही घटना, काही माणसे, काही विचार, काही रिती, काही नावे, काही आवाज, काही स्थळ आणि बरच काही. एक क्लिक आणि काही गोष्टी लगेच कनेक्ट होऊ लागतात. एखाद्या शब्दाने जखम ताजी होते तर एखाद्या गंधाने विस्मरणात गेलेला माणूस मनात जागा होतो …… एखादे गाणे कानावर पडते अन लगेच मनात काहीतरी हलतं. शब्द आत आत उतरत जातात अन सगळंच विस्कटत जातं. रोजची घातलेली घडी निसटते. आपण वाहवत जातो त्या तेव्हाच्या जगात त्य ा क्षणात. गाण्याची एक एक ओळ स्पर्शत जाते, जुने भास होऊ लागतात तरल संवेदना जागृत होतात आणि गाण्याला असणारे आपल्या खऱ्या आयुष्याचे संदर्भच मग त्या गाण्याची ओळख होऊन बसतात. हे संदर्भ खूप अवघड अवस्था निर्माण करतात हवेहवेसे तरीही त्रासदायक. काही आठवणी मुठीत गच्च आवळाव्या पण वाटतात आणि तळव्याला चटका साहवतही नाही. आणि अश्या आठवणींशी चिकटून बसतात … कधीतरी ऐकता ऐकता दूर लोटावी वाटतात अन कधी मुद्दाम शोधून ऐकावी वाटतात.… काही गाणी हि अशी काळजाचा ठाव घेणारी ठरतात.

'स्वप्न' एक 3D Movie (अंबर हडप)

Image
 अंबर हडप या गुणी लेखकाचा सकाळला वाचलेला अप्रतिम लेख.  .......................................................................................................................................... 'स्वप्न' एक 3D Movie (अंबर हडप) ‘स्व प्न‘ या गोष्टीवर आजवर बरंच काही लिहून आलंय. अनेकांनी त्याचे अर्थ लावलेत. काही जणांना स्वप्न ही गोष्ट काल्पनिक वाटते आणि काही जणांनी स्वप्नाला एन्कॅश केलंय. मला कोणी विचारलं की स्वप्न म्हणजे काय, तर मी म्हणेन, स्वप्न म्हणजे आपल्या मनाने तयार केलेला एक थ्रीडी सिनेमा असतो. असा सिनेमा, ज्याचे मेकर आपण असतो आणि प्रेक्षकही. काही स्वप्नं एखादा प्रोमो असतात आणि काही स्वप्न डेलीसोप. ही झाली झोपेत पडणारी स्वप्नं. माझ्या मते हा स्वप्नांचा शो आपल्या हातात नसतो. आपला मेंदू आपल...

भेटी लागी जीवा.....

Image
तांबडा संधिप्रकाश डोकाऊ लागला होता. आकाशात अजूनही सूर्य त्याच्या नैसर्गिक स्वभावानुसार तळपत होता. प्रवासभर बंगाली सौंदर्य न्याहाळण्यात मी गुंगून गेले , रस्त्याच्या कडेने लागणारे अगणित छोटे छोटे तळे, त्याभोवताल पसरलेली समृद्ध हिरवळ, हवा तसा वेढा घेत वळणावळणाने उंची गाठत ताल धरत डोलणारी, तळ्यांची कडा शोभिवंत करणारी नारळाची आकृतीबद्ध झाडे. अधून मधून वाटेत लागणारी छोटी चौकटीपूर्ण खेडी, झोपडीवजा घरे, बाजार आणि माणसांची रेलचेल..... कलकत्त्याहून दीडशे किलोमीटरचा प्रवास जवळ जवळ आटोपत आलेला. हळूहळू वस्तींची झुंबड कमी होऊ लागली. कुठे सपाट मैदान तर कुठे वाळूचा पसारा दिसू लागला. आपण अपेक्षित डेस्टीनेशनच्या जवळ पोचतोय असे आभास आता होऊ लागले होते. मन अंदाज लावू पाहत होते अगाध-अथांग अश्या नजरेला न पेलणाऱ्या अखंड अमर्याद पाणेरी बेटाचा. एका निमुळत्या अर्धवक्राकृती वळणावरून गाडी वळली आणि डाव्या बाजूने दूरवर फेसाळती पांढरीशुभ्र पुसटशी रेषा दिसू लागली. ते शुभ्र सौंदर्य नजरेने टिपण्याचा प्रयत्न करते न करते तोच गाडी कच्च्या दगडी रस्त्यावरून चढावाला लागली. गाडीच्या काचा उतरवून मी डाव्या बाजूच्या...