काही गोष्टींचा आनंद मानावा की दुःख हेच कळत नाही ..
संपूर्ण उन्हाळा लॉकडाऊनमध्ये पार पडला. कधी रखरखते पोळून काढणारे ऊन तापू लागले आणि कधी निवळले कळलेही नाही. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सुस्थितीतल्या चपला जमा करून ठेवल्या होत्या..त्या दरवर्षीप्रमाणे उन्हात पाय भाजत चालताना दिसणाऱ्या गरजवंतांना द्यायचे ठरले होते. तसे तळपत्या उन्हात प्रचंड संख्येने दूरदूर पायी चालत निघालेली एक नवीच जमात या काळात उदयाला आली होती पण त्या प्रत्येकापर्यंत पोचणं काही शक्य झाले नाही. लॉकडाऊन असतांना आपली घोडदौड शहराच्या आतल्या भागापर्यंतच सीमित राहिली शेवटी. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑफिसला निघताना (होय माझे ऑफिस चालूच होते) यातले २-४ जोड चपला गाडीत ठेवून घ्यायच्या आणि उन्हात भाजत पायपीट करणाऱ्या लहान मुलांना, गाडा ओढणाऱ्या, सायकलरिक्षा चालवणारे, भीक मागणारे, मजुरी करणारे किंवा गावातून शहरात येऊन भाजी दूध लोणी विकणाऱ्या गरीब मंडळींना द्यायचे हा शिरस्ता पाळायचा होता. पण या टोकापासून त्या टोकापर्यंत भयाण शांतता पसरलेल्या शहरात घरात दारात झोपडीत खोपटात पायपात ब्रिजखाली कुठेकुठे लॉकडाऊन होऊन पडलेली मंडळी दिसलीच नाही. गरजवंत दिसले नाही म्हणून आनंद मानावा की गरजवंत असू...