Monday 20 July 2020

काही गोष्टींचा आनंद मानावा की दुःख हेच कळत नाही ..






संपूर्ण उन्हाळा लॉकडाऊनमध्ये पार पडला. कधी रखरखते पोळून काढणारे ऊन तापू लागले आणि कधी निवळले कळलेही नाही. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सुस्थितीतल्या चपला जमा करून ठेवल्या होत्या..त्या दरवर्षीप्रमाणे उन्हात पाय भाजत चालताना दिसणाऱ्या गरजवंतांना द्यायचे ठरले होते. तसे तळपत्या उन्हात प्रचंड संख्येने दूरदूर पायी चालत निघालेली एक नवीच जमात या काळात उदयाला आली होती पण त्या प्रत्येकापर्यंत पोचणं काही शक्य झाले नाही. लॉकडाऊन असतांना आपली घोडदौड शहराच्या आतल्या भागापर्यंतच सीमित राहिली शेवटी. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑफिसला निघताना (होय माझे ऑफिस चालूच होते) यातले २-४ जोड चपला गाडीत ठेवून घ्यायच्या आणि उन्हात भाजत पायपीट करणाऱ्या लहान मुलांना, गाडा ओढणाऱ्या, सायकलरिक्षा चालवणारे, भीक मागणारे, मजुरी करणारे किंवा गावातून शहरात येऊन भाजी दूध लोणी विकणाऱ्या गरीब मंडळींना द्यायचे हा शिरस्ता पाळायचा होता. पण या टोकापासून त्या टोकापर्यंत भयाण शांतता पसरलेल्या शहरात घरात दारात झोपडीत खोपटात पायपात ब्रिजखाली कुठेकुठे लॉकडाऊन होऊन पडलेली मंडळी दिसलीच नाही. गरजवंत दिसले नाही म्हणून आनंद मानावा की गरजवंत असूनही आपल्याला दिसू शकली नाही किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोचूच शकलो नाही याचं वाईट वाटून घ्यावं हा मोठा प्रश्न आहे ..


मागल्या आठवड्यात ऑफिसमधून घरी परतताना ५ आणि ३ वर्षांचे दोन चिमुकले दिसले चपलेविना हातात हात घेऊन रस्त्याने चालताना. पायात चपला का नाही विचारले तर म्हणाले नाही आहेत चपला. कुठे राहता तर खालच्या बस्तीत म्हणाले .. खालच्या बस्तीत म्हणजे ही मुले पारधी समाजाचा जो जत्था राहतायत ओंकार नगरच्या खुल्या मैदानावर त्यांची मुले. दुसऱ्या दिवशी चपला घेऊन पोचले बस्तीवर तर रस्त्यापासून उतारावर असणाऱ्या प्लास्टिक झाकलेल्या त्यांच्या झोपड्या पावसाच्या पाऊलभर पाण्यात तुडुंब डुंबलेल्या दिसल्या. रस्त्यापासून झोपड्यांपर्यंतचा पूर्ण रस्ता चिखल चिखल झालेला. मी दूर वर रस्त्यावरच उभी राहून पाहत राहिले .. जिथे त्यांच्या झोपडीत जमिनीवर बसता येण्याचीही शक्यता नव्हती. प्रफुल्लित वातावरण झाले म्हणून खुश होत आपण आपल्या घरी चार भिंतीत चहा भजी खात असतो तेव्हा.. जेव्हा आकाशातून धो धो पाऊस बरसत असतो, डोकं लपवायला असणाऱ्या तुटक्या झोपडीत जमिनीवरही पाऊलभर पाणी साठले असते, जेव्हा ह्यांना साधे जमिनीवर बसता झोपताही येत नसते, रात्र रात्र डोक्यावर फाटके छत आणि पाणी भरल्या जमिनीवर उभे राहून काढावी लागते , येण्याजाण्याच्या रस्त्यावर पाय रुततील इतका चिखल भरला असताना आपण आणलेले २-४ जोड चपला यांच्या काय कामाच्या असतील हा विचार मनात येऊन मी स्तंभित होऊन तिथेच उभे राहिले बराच वेळ.. यांच्यासाठी काय करता येणार होते? तुटपुंज्या मदती गाडीच्या डिक्कीत घेऊन फिरणारे आपण आपली झोळी किती तोकडी असते, किती बांधले गेलेलो असतो आपण .. अश्यावेळी ह्याची जाणीव होते आणि मग आपणच आपल्यासमोर फार खुजे दिसू लागतो... फार खुजे.

Image may contain: outdoor and nature

-रश्मी ...

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...