Wednesday 13 May 2020

मन बेबंद .. !



घर .. आंगण .. बाजार .. कार्यालये .. शहर लॉकडाऊन .. ...

शेजारी .. सहकारी .. गणगोत .. मित्र मंडळी ..होम क्वारंटाईन

सगळं सामसूम .. कडेकोट बंदोबस्तात

आता कोणी कोणाला भेटत नाही. भेटल्यावर हसण्यातून-डोळ्यातून दाटून आलेला आनंद आता दिसत नाही. विश्वासाचा स्पर्श म्हणून कोणी हातात हात घेत नाहीत. आधाराची थाप आणि कौतुकाची शाबासकीही देत नाहीत. डोक्यावर आशीर्वादाचा हात कोणी ठेवत नाही आणि मित्र मैत्रिणी भेटल्यावर कोणी आवेगपूर्ण मिठीही मारत नाहीत.

परवा आठवला तो पावसानं सगळा संसार उधळून लावल्यावर कवी कुसुमाग्रजांना भेटायला आलेला तोच तो कोणी.., दारात दूर उभा राहिला एक शब्दही न बोलता
कसे म्हणावे '‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला'' एकटेपणा आता सगळ्यांच्याच पदरी पडलेला नाही का.
'पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा' इतकेही शब्द फुटेनात.. पाठीवर हात मागायचा तरी कसा ? सोशल डीस्टंसिग पाळायला हवे.

''पत्र लिही पण नको पाठवू शाई मधूनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधूनी नको पाठवू हसू लाजरे''


इंदिरा बाईंना कोणी सांगावं की येऊ द्यात निदान तेवढं तरी.. तेवढ्याने काही लागण होणार नाही. पण जगण्याला जरा निमित्त मिळत राहील. अहो सगळंच बंद केलं तर जगायचं तरी कसं?
इतकेही मिळणार नसेल तर सुरेश भटांच्या गजलेतील एका शेराप्रमाणे गत होईल
''नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते''


नुसतेच भासमय जगणे ??
या भासांवर निभावून नेणे कधीपर्यंत ? किती वाट पाहावी किती सहावे विरह .. सुधीर मोघेंना ही अवस्था बरोबर कळली होती बहुदा ..
'मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तूझे होती भास ॥'


अश्या एकांतात इंदिरा संतांना देखील आठवणी दाटून येतात .. गहिवरते मन. क्षणक्षण पुढ्यात येऊन उभा राहतो आणि जीवाची तगमग तगमग होत राहते. स्वतःशीच पुटपुटत त्या विचारतात सख्याला
"ऐक जरा ना"
कौलारांतुन थेंब ठिबकला
ओठावरती
"ऐक जरा ना... एक आठवण.
ज्येष्ठामधल्या - त्या रात्रीच्या
पहिल्या प्रहरी,
अनपेक्षितसे
तया कोंडले जळधारांनी
तुझ्याचपाशी.
उठला जेव्हा बंद कराया
उघडी खिडकी,
कसे म्हणाला..
मीच ऐकले शब्द तयाचे...
'या डोळ्यांची करील चोरी
वीज चोरटी
हेच मला भय."


 कसली हृद्य आठवण.. पण वास्तव सुटतंय का हातातून ? आठवणीतच जगायला भाग पाडतंय. आठवणींचा कल्लोळ मनात धुमाकूळ घालतोय, पण उपाय काय स्वतःला क्वारंटाईन करून घेण्याशिवाय पर्याय तरी काय .. इंदिरा संत हतबल होतात. जीवाचा कोंडमारा सहन होत नाही आणि मग त्या भरभर कागदावर ओळी उतरवतात
"अंधाराने कडे घातले
घराभोवती;
जळधारांनी झडप घातली
कौलारावर.
एकाकीपण आले पसरत
दिशादिशांतुन
घेरायास्तव...
एकटीच मी
पडते निपचित मिटून डोळे."


केवढा हा जीवाचा आकांत केवढी कासावीशी. अश्या जगण्याचा तिढा कधी सुटायचा.. किती वाट पाहायची? आजूबाजूला एवढे मळभ दाटून आले असतांना, मनाला कसे आणि काय समजवायचे. इंदिरा संतांच्या मानसारखीच शांताबाईंची अवस्था झाली असावी का ? त्यांनी इतक्या आर्त भावना कश्या बरं उतरवल्या होत्या.
''घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया
दुःखाचीही अशी लागते अनवट माया
आक्रसताना जग भवतीचे इवले झाले
इवले झाले आणि मजला घेरित आले''


तसे शांताबाई या निराशेतून बाहेर यायला सांगतात तेव्हा त्यांचे शब्द खूप धीरही देतात. कणखरपणे उभे राहायला हवे, तसेच जसे हजार आपदा येऊन आदळल्या तरी निसर्ग निराशेच्या गर्तेत जात नाही. कोलमडून पडल्यावरही नवी पालवी फुटते नवा बहर येतो. त्या म्हणतात मनाचा हिरवा बहर ओसरल्यासारखा वाटत असेल तर जरा खिडकीतून डोकवावे बाहेर, या निराशेतही आशेचे अनेक फुलोरे फुलून आले असतात तिथे -

"तसे वॄक्ष अजूनही बहरतात
फुलांनी गच्च डवरतात
हृदयतळातून फुटतात अंकुर, झुलतात पाने,
एका अज्ञात आकाशात
शुभ्र शुभ्र भरारी घेतात
गातातही पाखरे तिच्या आवडीचे एकुलते गाणे."


हे मन फार हटखोर असतं नाही ? काही केल्या ऐकत नाही ..
मनाला नाही का लॉकडाऊन करता येत ? न हलता-डुलता, कुठेच न जाता, कुणाचीच आठवण न काढता, दूर दूर जाऊन कुणालाच न भेटता गप्प बसायचं 'डिस्टंसिंग राखायचं' असं नाही का सांगता येत ... सांगता आलं असतं .. मनाला क्वारंटाईन करता आलं असतं तर किती बरं झालं असतं ... नाही ?

©रश्मी पदवाड मदनकर

2 comments:

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...