Thursday, 22 May 2025

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !



परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्यातील सहनशीलता, त्याग आणि समर्पण या गुणांचंच पूजन करण्यात आलं. मात्र, गेल्या काही दशकांत हे चित्र बदलताना दिसत आहे. गुन्हेगारी क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढतो आहे, आणि ही बाब केवळ जागतिक पातळीवरच नव्हे, तर भारतातही प्रकर्षाने जाणवते आहे. अलीकडच्या काळात महिलांद्वारे केलेल्या गुन्ह्यांच्या बातम्या सतत चर्चेचा विषय ठरत आहेत. वृत्तपत्रांपासून ते टीव्ही आणि सोशल मीडियापर्यंत अशा घटना सतत झळकत राहतात; जणू त्या नव्या सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब आहेत.

गेल्या वर्षातही अनेक धक्कादायक घटनांनी समाजाला हादरवून टाकलं आहे. काही स्त्रियांनी आई असून आपल्या मुलांचाच जीव घेतला; तर काहींनी जोडीदाराला किंवा कुटुंबीयांना क्रूरतेनं ठार केलं. जेथे प्रेम, सान्निध्य आणि विश्वास असायला हवा, तिथेच छळ, हिंसा आणि मृत्यू घडताना आपण पाहिले. हे पाहून अंतर्मन अस्वस्थ होतं. या घटनांचा मागोवा घेताना, एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो... अशा गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होण्यामागचं, वाढीला लागण्याचं कारण काय आहे? हा फक्त कायद्याचा विषय नाही, तर तो सामाजिक, मानसिक आणि भावनिक घटकांशी संबंधित आहे. कदाचित वर्षानुवर्षे दडपलेला राग, अन्याय, भावनिक ताणतणाव, किंवा सामाजिक अपेक्षांचं दडपण या सगळ्यांचा स्फोट अशा स्वरूपात होत असेल का ? या प्रश्नांवर केवळ चर्चाच नव्हे, तर सखोल विचार, समाजशास्त्रीय विश्लेषण आणि मानसशास्त्रीय समज आवश्यक आहे. कारण ही फक्त गुन्हेगारी नव्हे; तर ही बदलत्या समाजाच्या वेदनेचा प्रारंभ तर नसेल अशी चिंता वाटू लागली आहे.


विकसनशील सामाजिक भूमिका, वाढते स्थलांतर, व्यवसायांमधील परिवर्तन, महिला मुक्तीची चळवळ, आर्थिक स्वातंत्र्य आणि राजकीय स्वायत्तता; या सगळ्यांमुळे आजच्या काळातील स्त्रियांना विविध क्षेत्रांत सहभागी होण्याच्या नव्या संधी प्राप्त झाल्या आहेत. संधी मिळाल्या की आत्मविश्वास वाढतो, आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण झालेली व्यक्ती नव्या दिशांकडे आकर्षित होते. मात्र या आकर्षणाला एक वेगळीही दिशा मिळत आहे; काही स्त्रिया गुन्हेगारीच्या वाटेवर वळताना दिसत आहेत. एकेकाळी केवळ पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या गुन्हेगारी जगतात आता महिलांची संख्याही वाढताना दिसतेय. ही वाढ इतकी स्पष्ट आहे की, तिच्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. महिलांकडून होत असलेले गुन्हे आता फक्त किरकोळ स्वरूपाचे उरलेले नाहीत. त्या अनेक गंभीर, हिंसक आणि अप्रचलित गुन्ह्यांमध्येही सक्रिय सहभागी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे गुन्ह्यांचा स्वरूप अधिक व्यापक आणि धोकादायक होत चालले आहे.

मग प्रश्न उभा राहतो की, महिलांमध्ये अचानक गुन्हे करण्याची उर्मी का वाढते आहे? हा संताप कुठून निर्माण होतो आहे? हे फक्त सामाजिक बदलांचे परिणाम आहेत की वर्षानुवर्षे साचलेल्या असंतोषाचा उद्रेक? की स्वातंत्र्याचा अर्थ चुकीचे समजण्याची लक्षणं? या प्रश्नांवर विचार होणे आणि त्याचे सखोल विश्लेषण होणे आज अत्यावश्यक झाले आहे.

महिलांचा राग आणि संताप हे काही अलीकडील घटक नाहीत. इतिहास, पुराणकथा आणि लोककथांमध्ये या भावना वारंवार उमटताना आपल्याला दिसतात. परंतु, अलीकडच्या काळात या भावना अधिक स्पष्ट, ठाम आणि प्रखर स्वरूपात व्यक्त होताना दिसतात. समाजमाध्यमे आणि विविध सार्वजनिक मंचांवर, विशेषतः अवहेलनेच्या आणि अश्लीलतेच्या छटांनी युक्त भाषेत, हा राग अधिक ठळकपणे समोर येतो. अनेकदा हा संताप अपरिपक्व, भावनाशून्य आणि बेपर्वा वाटतो. परंतु, हे दुर्लक्ष करता येणार नाही की अनेक पिढ्यांपासून स्त्रियांमध्ये साठून राहिलेला, दाबलेला राग आता उफाळून येत आहे.

पूर्वी महिलांचा राग मुख्यतः साहित्य, सिनेमा किंवा नाट्यरूपांमधूनच व्यक्त होत असे. वास्तविक जीवनात त्याला फारसे स्थान नव्हते. त्याची दखल घेतली जात नव्हती, स्वीकार केला जात नव्हता. त्यामुळे हा दाबलेला संताप आता समाजमाध्यमांच्या मंचांवर अधिक तीव्र आणि आक्रमक रूपात व्यक्त होत आहे. त्यास तिथे एक प्रकारची अनुमती, संमती आणि सहानुभूती मिळत असल्याने, तो अधिकाधिक वाढत असल्याचे जाणवते. मनोविज्ञानतज्ज्ञांचे मत आहे की, स्त्रिया अनेक पिढ्यांपासून अंतर्मनात रागाचे ओझे बाळगत जगत आहेत. दैनंदिन जीवनातील अन्याय, भेदभाव आणि अपमान यांच्या विरोधातील त्यांचा संताप आज चित्रपट, समाजमाध्यमांवरील रील्स, संगीत, साहित्य आणि लोकप्रिय संस्कृतीच्या विविध माध्यमांतून ठळकपणे प्रकट होत आहे. तथापि, प्रत्यक्ष जीवनात या रागाला समाजाकडून आवश्यक ती मान्यता, समजून घेणे आणि गांभीर्याने विचार करणे याचा अभाव जाणवतो. या भावनांवर सखोल मंथन होऊन, त्या समजून घेत योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत हीच यातली खरी शोकांतिका आहे.

या पार्श्वभूमीवर काही मूलभूत प्रश्न समोर येतात —
समाज या भावना समजून घेईल का?
या रागाला योग्य दिशा देण्याची संधी स्त्रियांना मिळेल का?
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आवाज केवळ अभिव्यक्त होण्यापुरताच मर्यादित राहील, की परिवर्तन घडवण्यासाठी आधार बनेल?


आपल्या समाजाची एक मोठी समस्या अशी आहे की, मोकळेपणाने बोलणारी, खळखळून हसणारी, आनंदी राहणारी स्त्री समाजाला खटकते. स्त्रियांनी अल्पभाषी राहावे, नम्र, संयमी वर्तन करावे हे ‘बाळकडू’ तिला लहानपणापासूनच दिले जाते. उघडपणे हसणारी, स्पष्ट बोलणारी स्त्री सहजपणे चरित्रहीन ठरवली जाते. मुलगी जन्मल्यापासून तिच्या आजूबाजूला असलेल्या स्त्रिया तिने दबलेल्या, पिचलेल्या, कुचंबणा झालेल्या अवस्थेत जगताना तिला दिसतात. अशा वातावरणात तिच्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांचा निचरा होण्यासाठी कोणीही नसते; न व्यक्त होण्यासाठी माणसं, न समजून घेणारा समाज. आणि हे चक्र पिढ्यानपिढ्या सुरूच राहिलं आहे. राग हा भाव नेहमी एखाद्या गोष्टीच्या रक्षणाशी जोडलेला असतो. पण समाजाने हा रक्षणाचा अधिकार, हा संताप व्यक्त करण्याचा हक्क आजपर्यंत फक्त पुरुषांसाठी राखून ठेवला होता. स्त्रियांनी राग व्यक्त केला, तर तो "अस्वीकार्य" मानला गेला. मात्र अलीकडच्या काळात हे चित्र हळूहळू बदलू लागले आहे. स्त्रियांच्या हातात आता सोशल मिडिया, साहित्य, कला यासारखी प्रभावी माध्यमं आली आहेत. या माध्यमांतून त्यांच्या मनात वर्षानुवर्षे साचून राहिलेल्या भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत ... कधी सौम्य, तर कधी प्रखर उद्रेकाच्या रूपाने. हा बदल केवळ अभिव्यक्तीपुरता मर्यादित न राहता, समाजाला स्त्रियांच्या अनुभवांकडे नव्या दृष्टीने पाहायला लावेल, अशी अपेक्षा आहे.

स्त्रियांचा राग हा एक अत्यंत वैयक्तिक अनुभव असला तरी, सध्याच्या काळात तो सामूहिक अनुभव देखील बनत चालला आहे. सामाजिक प्लॅटफॉर्मवरून म्हणा किंवा अभिव्यक्त होण्याच्या उर्मीतून आता स्त्रिया स्वतः एकमेकींशी ते शेअर करताना दिसतात. पूर्वी ज्या रागासाठी लाज वाटायची, त्याच रागासाठी आता एकजूट होऊन समर्थन तयार होत आहे. महिलांमध्ये एक नव्या प्रकारची जागरूकता आणि एकात्मता दिसून येत आहे, जिचामुळे त्यांच्या रागाची, त्यांच्या भावना व्यक्त करण्याची व स्वीकार करण्याची त्यांना आपसूकच परवानगी मिळत आहे.

ब्रिटिश गायिका आणि गीतकार पालोमा फेथ यांचं गाणं "लेबर" सध्या अत्यंत लोकप्रिय झालं आहे. या गाण्यात स्त्रियांच्या संतापाची तीव्र आणि थेट अभिव्यक्ती आहे. सुमारे ३५,००० रील्समध्ये या गाण्याचा साउंडट्रॅक वापरण्यात आला आहे. हे गाणं, हे रील्स, आणि अशा कथा हे दाखवतात की आता महिलांचा राग दाबून ठेवला जात नाही; तो जगासमोर स्पष्टपणे, निर्भीडपणे व्यक्त केला जातो आहे.

खरं तर, रागाचा उद्रेक तोच क्षण असतो, जेव्हा स्त्री सहनशीलतेच्या सीमारेषेवर येऊन पोहोचते... जेव्हा तिच्या भावना, अस्तित्व आणि ओळख सातत्याने दुर्लक्षित केल्या जातात. पूर्वी केवळ सहन करणाऱ्या स्त्रिया आता बोलू लागल्या आहेत, व्यक्त होऊ लागल्या आहेत आणि समाजबदल घडवण्यासाठी पुढे येत आहेत. हा राग आता केवळ भावनिक उद्रेक न राहता, कृतीशीलता, आत्मभान आणि सामर्थ्य यांचं योग्य रूप धारण करू लागला आहे. तो दडपशाहीच्या कोंडमाऱ्यातून बाहेर पडून समाजपरिवर्तनाची नांदी ठरू लागला आहे. महत्त्वाचं म्हणजे, हा राग जोपर्यंत सकारात्मकता आणि बांधिलकीच्या दिशेने मार्गक्रमण करतो, तोपर्यंत समाजात खोलवर आणि स्थायिक परिवर्तन घडवण्याची परिणामकारक क्षमता त्याच्यात असते. कारण असा राग विध्वंसक नसून, सृजनशील असतो... स्वतःसाठी नव्हे, तर व्यापक सामाजिक हितासाठी प्रेरित असतो. परंतु हाच संताप जर अराजक व विध्वंसाच्या मार्गाला लागला, तर तो त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी आणि पर्यायाने समाजासाठीही घातक ठरतो.

गेल्या काही दशकांतील चित्रपटांचा मागोवा घेतला, तर लक्षात येतं की स्त्रियांच्या अंतर्मुख संतापाला पडद्यावर आवाज मिळू लागला आहे. हा राग आक्रमक नसला, तरी तो गंभीर आणि गहिरा आहे, खोल आहे. दैनंदिन लहानसहान अपमान, अन्याय, दुर्लक्ष आणि दमित भूमिका यांचा हळूहळू साचणारा असंतोष आहे. मल्याळम चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन' आणि त्याचाच हिंदी रीमेक 'मिसेस' (2025), 'थप्पड' (2020), पगलट (2021) या चित्रपटांनी हाच शांत, पण सतत उफाळणारा स्त्रियांचा संताप दाखवला आहे. त्यातील नायिकांच्या संतप्त नजरा, मौन विद्रोह, आणि शेवटी एका कृतीतून होणारा नात्यांचा किंवा चौकटींचा भंग; हे सर्व आजच्या समाजातील स्त्रियांच्या अंतर्गत लढ्याचं प्रतिनिधित्व करतं. तरीही, खरतर या आधुनिक चित्रपटांमधील राग तुलनेने सौम्य वाटतो, विशेषतः पूर्वीच्या काही चित्रपटांतील रौद्र रूपाच्या तुलनेत. उदाहरणार्थ, स्मिता पाटीलच्या मिर्च मसाला (1987) चित्रपटातील अंतिम दृश्य ! एक अश्रुत पण आगीने पेटलेला संताप जेव्हा उफाळून येतो तेव्हा तो सूड नसतो तो स्वसंरक्षणासाठी उचललेले अंतिम पाऊल असते. मिरची फॅक्टरीत येणारा क्रूर अत्याचारी सुभेदार जेव्हा सहनशीलतेची पराकाष्टा झालेल्या सोनाबाईला पकडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा फॅक्टरीतील सर्व महिला एकत्र येतात आणि ताज्या लाल मिरच्यांच्या मसाल्याने त्याच्यावर हल्ला करतात. या हल्ल्यात सुभेदार घायाळ होतो. ते दृश्य म्हणजे स्त्रियांच्या संयमाच्या सीमेला पार केल्यानंतर झालेला उद्रेक ... एक प्रतीकात्मक विस्फोट ! 'मदर इंडिया' (1957) मध्ये तर नायिका स्वतःच्या मुलाला गोळी घालते. कर्तव्य आणि नैतिकतेच्या संघर्षात तिला स्वीकारावा लागलेला हा क्रूर निर्णय असतो.

मर्दानी, मॉम, कहाणी, गुलाब गँग आणि बँडिट क्वीन हे चित्रपट आधुनिक स्त्रीच्या रागाला केवळ भावनात्मक प्रतिक्रिया म्हणून न दाखवता, त्यामागील परिपक्वता, अन्यायाविरोधातील झुंज, सूडाची भावना आणि अन्यायी समाजरचनेविरोधात घेतलेली ठाम भूमिका दाखवतात. हे चित्रपट स्त्रीचा राग म्हणजे दुबळेपणाची नाही तर दृढ प्रतिकाराची, आत्मभानाची आणि न्यायाच्या शोधातील प्रवृत्तीची अभिव्यक्ती आहे हे अधोरेखित करतात. मात्र, असा प्रतिकार नेहमीच हिंसक असायला हवा, असे नाही. राग व्यक्त करण्याची किंवा सूड उगवण्याची दिशा सकारात्मक आणि सृजनात्मकदेखील असू शकते, याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेत. अनेक अशा स्त्रिया आहेत, ज्या संकटांनी उद्ध्वस्त झाल्यानंतरही पाषाणाच्या छाताडावर एखादे हिरवे कोंब फुटावे तशा जगल्या तगल्या आणि पाय रोवून उभ्या राहिल्या, नव्या उमेदीनं आयुष्य घडवलं आणि समाजासाठी प्रेरणास्थान ठरल्या. काहींनी बेघर अवस्थेतून स्वतःचं विश्व उभं केलं, तर काहींनी शिक्षण, व्यवसाय, समाजसेवा यामध्ये आपलं स्थान निर्माण केलं. त्यांच्या जिद्दीने, आत्मविश्वासाने आणि न झुकणाऱ्या वृत्तीने त्या अनेकांसाठी आदर्श ठरल्या आहेत.

''स्त्रीने ठरवले तर ती काहीही करू शकते'' असे एक वाक्य सर्वश्रुत आहे पण हे ''काहीही'' म्हणजे शब्दशः काहीही नव्हे. ते म्हणजे सृजन, सर्जन, उत्पत्ती आणि कल्पकतेच्या अंगाने काहीही करणे असते. स्त्रीराग केवळ विद्रूपतेचा, दुःखाचा अथवा तक्रारीचा उद्रेक असू नये; तो परिवर्तनाची बीजं घेऊन येणारा, एक सृजनशील उर्जेचा प्रवाह असायला हवा. कारण हीच स्त्रीची मूळ प्रवृत्ती, महत्वाचा स्वभावधर्म आहे. राग येणे साहजिक असले तरी; जेव्हा या रागाला योग्य दिशा, समजूतदार व्यासपीठ आणि स्वीकार करणारा प्रगल्भ समाज लाभतो, तेव्हा तो संहारक न राहता समाज परिवर्तनाचा प्रेरणास्त्रोत बानू शकतो. म्हणूनच एक समाज म्हणून आजच्या काळात सर्वांत मोठी गरज आहे, ती स्त्रीच्या रागाकडे संवेदनशीलतेने, समजूतदारपणे आणि सहानुभूतीने पाहण्याची. अशा रागाला योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक ऊर्जा दिली, तर तो फक्त विरोध न राहता परिवर्तनाचे साधन बनू शकतो असा विश्वास वाटतो.







रश्मी पदवाड मदनकर
rashmi.aum15@gmail.com

No comments:

Post a Comment

Featured post

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्य...