कायांतर : देहाच्या कैदेतून माणुसकीच्या मुक्तीकडे



“कायांतर” ही रश्मी पदवाड मदनकर लिखित तृतीयपंथीयांच्या वेदना आणि संघर्ष मांडणारी प्रभावी कादंबरी आहे. अश्विन वर्मा ते आंचल वर्मा असा तिचा जीवनप्रवास अत्यंत खडतर असून समाजमान्य नसलेल्या किन्नर समूहाच्या यातना यात वास्तववादी पद्धतीने उलगडल्या आहेत. ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे; स्वतः आंचल वर्माने लेखिकेशी संवाद साधत तिची जीवनगाथा सांगितली आहे. “कायांतर” हे शीर्षक अत्यंत समर्पक आणि प्रतीकात्मक असून, मुखपृष्ठही स्त्री-पुरुषांतील द्वंद अधोरेखित करत विषयाला पूरक ठरते.

भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांची सुरेख सरमिसळ या कादंबरीत अत्यंत लयबद्धपणे घडताना दिसते. कादंबरीचा सूर आणि ताल एकरूपतेने पुढे सरकत राहतो, त्यामुळे वाचकाची उत्सुकता प्रत्येक पानागणिक वाढत जाते. आंचलच्या यशापासून सुरू होणारा प्रवास हळूहळू तिच्या बालपणात शिरतो आणि अश्विनच्या रूपात, पुरुषी देहात स्त्रीत्वासाठी चाललेली आतली धडपड लेखिकेने अत्यंत संवेदनशीलतेने रेखाटली आहे.

दुःखातून भोगाकडे आणि पुढे यशाकडे वाटचाल करणारी आंचल आणि बालपणीचा अश्विन ही एकच व्यक्ती नव्हे तर जणू दोन वेगवेगळी रूपं वाटतात, तरी ती एकाच अस्तित्वाच्या दोन बाजू आहेत हे समजेपर्यंत आपण बदललेलो असतो.. एका पुरुषाच्या शरीरात कैद झालेली स्त्री बाहेर पडण्यासाठी तडफडत असल्याची जाणीव या कथनातून तीव्रतेने उमटते. आंचल आणि अश्विन या दोन्ही रूपांमधील हा प्रवास लेखिकेने प्रकरणागणिक अत्यंत प्रभावी आणि प्रवाही शैलीत उभा केला आहे. त्यांची पडझड पाहून वाचकाच्या संवेदना जागृत होतात आणि समाज म्हणून या समाजाला समजून घेण्यात आमची चूक झाली असा एक क्षमाभाव निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

लेखिकेची भाषा अत्यंत साहित्यिक, संवेदनशील आणि मनाचा ठाव घेणारी आहे. त्या आंचलबद्दल लिहिताना म्हणतात, “शरीर कुठलंही असलं तरी तिने शंभर टक्के २४ कॅरेट सोन्यासारखं मन मिळवलं होतं,” तसेच “स्थापत्यकलेतील चूक रंगरंगोटीने झाकता येते, डॉक्टरांची चूक टाळता येते; पण नियतीची चूक कुणाकडे मांडायची?” अशा ओळींतून आंचलची वेदना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होते. लेखिकेच्या भाषेतलं सौष्ठव आणि अलंकारिकता ही कृत्रिम न वाटता स्वाभाविकपणे उमटते. एका ओळीत व्यक्तिमत्त्व उभं करण्याची त्यांची हातोटी विशेष लक्षवेधी आहे. अश्विनच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक व्यक्तींचं चित्रण त्यांनी विस्ताराने न करता, अत्यंत थोडक्यात पण नेमक्या शब्दांत उभं केलं आहे. त्यामुळे त्या व्यक्तिरेखा वाचकांच्या डोळ्यासमोर जिवंत होतात. आंचलसोबतच खातिमा, रेशमा, अम्मा आणि आनंद चांदराणी यांसारख्या पात्रांच्या माध्यमातून अनेकांच्या वेदना या कादंबरीत प्रभावीपणे प्रकट होताना दिसतात.

अश्विनचा पुरुषत्वातून स्त्रीत्वाकडे जाणारा प्रवास अत्यंत बोलका आणि अंतर्मुख करणारा आहे. आयुष्यभर प्रेमाच्या अभावाने हळवा झालेला अश्विन खातीमामध्ये जणू मातृत्व शोधतो. लेखिकेने वापरलेल्या प्रतिमा अत्यंत प्रभावी आणि अर्थपूर्ण आहेत. दिल्लीला जाताना अश्विन जणू आपल्या तुडवलेल्या, पडझड झालेल्या बालपणाचे तुकडे गाठोड्यात बांधतो; ही प्रतिमा मनाला खोलवर स्पर्श करून जाते. एखादं नकोसं झुडूप उपटून टाकावं आणि पुन्हा कुठेतरी रुजावं, तसं अश्विनचं आयुष्य उखडत, तुटत आणि तरीही पुन्हा उभं राहत राहणारं, अत्यंत संवेदनशीलतेने उभं केलं आहे.

अश्विन जेव्हा आंचलमध्ये रूपांतरित होतो, तेव्हा त्याच्या मनातील भावनांचा आवेग आणि बदलत जाणाऱ्या आयुष्याचा प्रवास लेखिकेने रेल्वेप्रवासाच्या प्रतीकातून अत्यंत प्रभावीपणे उभा केला आहे. या प्रतीकात्मक मांडणीतून अंतर्मनातील हलचाली आणि आयुष्याच्या वळणांची जाणीव अधिक तीव्रतेने जाणवते.
ही कादंबरी केवळ अश्विन किंवा आंचलच्या जीवनकथेत मर्यादित राहत नाही; ती संपूर्ण किन्नर समाजाच्या वेदना आणि वास्तवाला स्पर्श करते. त्यांच्या प्रथा, परंपरा, श्रद्धास्थाने, दैवतं, तसेच त्यांच्या आयुष्यातील नियम आणि वास्तव यांचा अभ्यासपूर्ण आणि सखोल परिचय लेखिकेने वाचकांना करून दिला आहे. त्यामुळे ही कथा केवळ वैयक्तिक अनुभव न राहता एका संपूर्ण समुदायाची जाणीव करून देणारी ठरते.

रश्मी या लेखिका होतात, कारण समाजातील संघर्ष, दुःख आणि अन्याय त्यांना सतत अस्वस्थ करत राहतात. यापूर्वीची त्यांची #पद्मकोश ही कादंबरी त्याचीच साक्ष देते. संघर्षमय आयुष्याला आवाज देताना त्या केवळ वेदना मांडत नाहीत, तर करुणेने ओथंबलेलं मनही वाचकांसमोर ठेवतात आणि त्यामुळे वाचक नकळत अंतर्मुख होतो. चित्रपटातील कॅमेऱ्यासारख्या नेमकेपणाने, अलिप्त पण संवेदनशील दृष्टिकोनातून त्या पात्रांचे बहिरंग आणि अंतरंग उभे करतात. त्यामुळे #कायांतर ही कादंबरी केवळ वाचनीय राहत नाही, तर ती अनुभवण्याजोगी ठरते. अनेक वाचकांनी प्रत्यक्षात किन्नर समुदायाला जवळून पाहिलेलं नसतं; पण ही कादंबरी वाचताना त्यांचं वास्तव डोळ्यांसमोर उभं राहतं. त्या प्रक्रियेत आपल्या संकुचित, कधी जाचक ठरलेल्या दृष्टिकोनातून बाहेर पडल्याची जाणीव होते. किन्नरांच्या अस्तित्वाच्या लढ्याला सामोरं जाताना मन हेलावून जातं आणि आपण त्यांच्याकडे ‘माणूस’ म्हणून कधीच पाहिलं नव्हतं, ही जाणीव ठसठशीतपणे समोर येते. हीच जाणीव समाजापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य “कायांतर” ही कादंबरी प्रभावीपणे पार पाडते.

घरातून हाकललेला अश्विन, आणि तरीही आंचल झाल्यावरही कुटुंबाशी असलेली नाळ जपण्याची तिची ओढ; ही भावना माणुसकीचा खरा अर्थ अधोरेखित करते. शेवटी कथा जिथून सुरू होते, तिथेच येऊन पूर्ण होते; मात्र वाचकाच्या मनात अनेक प्रश्न, वेदना आणि नव्या जाणिवांची ठिणगी पेटवून जाते. “कायांतर” ही कादंबरी वाचून संपत नाही, ती मनात दीर्घकाळ रेंगाळत राहते, माणूस म्हणून जगण्याचा अर्थ नव्याने उलगडून दाखवते.


सुरुची डबीर
+91 93706 96117

*****************************  

पुस्तकाचे नाव - कायांतर
लेखक - रश्मी पदवाड मदनकर
प्रकाशक - पद्मगंधा प्रकाशन
प्रकार - कादंबरी
विषय - तृतीयपंथी वास्तवावर आधारित  
संपर्क - ७७२०००११३२


 


Comments

Popular posts from this blog

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

From wheels to wings ...