दुसरा वरीस उजाडला, यंदाच्या पारी दगा देणार न्हाई, कारल्याचा वेल लगलगून भरून येईन अन मागच्या वक्ताचं समदा गाऱ्हाना धुतला जाईन .. म्हणून मुक्तानं आस सोडली नोहोती ..
गेल्या वक्ताले सोयाबीन कहाडला अन् बजार झाल्यावर माहेराहून धनधान धाडला, तवा माह्या बाबानं शेतातल्या माळावरच्या कारल्याच्या जराश्याक बियाबी धाडल्या व्हत्या. पुरा ऐवज कपाटात कोंबून ठेवताले कारल्याच्या बियावरून 'भिक्कार माहेर' म्हनूनस्यान वाकडं तोंड दाखवू दाखवू सासूबाईन मले केवढाला दुषना लावला होता. मामंजींनंत बाप्पा, सप्पा बिया देल्त्या टाकून पडवीतल्या कोपऱ्यात....जाता जाता पच्च्चकन! पिचकारी मारली तंबाकूची टमरेटवर, आन खाकरत निंगून गेलते चकाट्या हाकाले ...
तिच्या डोळ्यात भस्सकन पानीच आलन ... पहासाठी व्हतच कोण ? गडी तं गेल्ता सहरात..नोकरीपाण्याचा बंदोबस्त कराले.
अर्ध्या रातचाले तिनं जाऊन बिया वेचल्यान अन पदराले गाठ बांधून ठेवून देल्त्या. समदी रात्र इचाराचाच भूत सवार रायला तिच्या डोस्क्यावर. गावचा हिरवाकंच मळा, कारल्याचा चौफेर साजरा मांडव, घराचं मोकड-ढाकळं आंगण आन बिनमायच्या लेकीचा सुखाचा संसार पाहाची मरमर करणाऱ्या बाबाची लडिवाड, मायाडू कुशी आठवूनशान लगीत रडाले आलं तिले. उशी ओली होत राहाली रात्रभर. सकायची कामं पटकानी आटपून.. मामंजींच्या तब्बेतीले चांगली र्हातील असं समजावून, मुक्तानं माडीवर नेऊन पदरातल्या बिया भरल्या डोळ्यानंच पेरल्या व्हत्या. पैला पैला कोंब फुटला तवा मुक्ताच्या आनंदाले पारावर उरला नोहता, खतपाणी घालू घालू खूप मनाभावानं वेल पोसलान तिनं, थो वेलबी बहरून खोवलेल्या खुंट्यावरून जास्वदांच्या झाडाचा सहारा घेत कपडे वाळवाच्या तारेवर मांडवागत पसरू पाहे. लुसलुशीत नाजूक तरारल्या वेलीवर इवले इवले पिवळट साजरे फुलंबी दिसू लागली. आता उगवन ते माहेराच्या गोडव्याचे कारले साऱ्यायले भाजी करून खाऊ घालाची अन समद्याची तडतडणारी तोंड यका घावात बंद कराची, मुक्तानं स्वप्नातले मोनोरे बांधूनशान ठोवले होते ...
पण का झालं कोणजाणे सासरच्या कडू शब्दांईनं घायाड झालेल्या बेच्चार्या माहेरच्या बिया रूसल्यान का काजाने? गेल्या सालात दोन चार बारके कारले उगवले आन तोडण्यालायक होण्याआत पिवळेलाल होऊन वाळूनबी गेलथे ...पानायलेबी गळती लागली. वेल फळत न्हाई म्हनूनस्यान साऱ्यायच्या डोळ्यात खुपू लागला व्हता. येता जाता सासूबाई नीरे टोमने मारे, राहू राहू माहेराच्या नावानं कल्ला करें .याच्या त्याच्यावरून गाऱ्हाणी बोलून चवताडून सोडे... मामंजी तर तोंड फुगवून बसले व्हते. त्यायले तिच्या हातचं गोडधोडबी ग्वाड लागना झाला , सदानकदा तोंडावर बाराच वाजले र्हाये. मुक्ताची मोठी घुसमट होये मंग, पण त्या ना उगवलेल्या कारल्यापायी वेलीले किती परेशानी सहानं पडतेत याचं दुःख कसं का जाने मुक्ताच्या जिव्हारी लगीत लागून र्हाये ...
कसबसं वरीस निंघाला .. वेल वाळून निथळूनबी गेला. वर्षभर मुक्ताचा नशीबबी फळफळला न्हाई. पावसाचा जोर जरासक कमी झाला तसा यंदाच्या बरसलेबी वापस वेल हिरवळून आला. मुक्ताच्या आशेचा दिवा वापस उजडू लागला. पण, या सालालेबी घुमून घात केलाच तिच्यावाल्या नशिबानं, तिनं लावलेली कार्ल्याईची आस फुलता फुलता काऊनतं गळूनच पडायले लागले . सासूबाईंच्या तोंडचा पट्टा आजूकच फाश्ट धावू लागला...माहेरच्या माणसाइची आब्रू त बाप्पा अता वेसीपातूर येऊन पोचली ...बापाच्या नावाची इज्जत चिंध्यावानी टरटर फाडायले कोणालेच कई नई वाटे. मुक्ताले हे सहन झालाच नाही...तिच्या अंदरच अंदर कोंडल्या हुंद्क्याचा अन दाबल्या संतापाचा उद्रेक व्हाल लागला. यक डाव असाच तिचा डोका सरकला आन ते भरभर माडीवर गेली, ऐसपैस पसरलेला वेल सरंसरं वढून काहाडू लागली. वोढला, तोडला, उपडला. वरपला ... खुंटीवरून, जास्वदांवरून, मांडवातून वरबाडून वरबाडुन काहाढला, मुक्त करून टाकला ... शवटची वेदना. वेलीच्या निरंतर दुःखाचा अंत झाला व्हता. न उगवणाऱ्या कारल्याच्या दुषणातून वेलीले कायमची मुक्ती मिळाली व्हती ..... मुक्ता नावाले तिनं वाईस खरंर्रर्रर्र करून दावला.
पन मंग तिची सोताची यंदाच्या बरसलेबी न उजवलेली कूस तितकी नशीबवान काहून नोहोती त कामालुम? ...वेलीचं आनं तिचं नसीब देवादिकान यकाच लेखणीनं लिवलं व्हतं का काजाने ? .. रोज रोजच्या वांझोट्या दुषणातून मुक्त कराले तिच्या उदरात मुक्ता अजून जन्मालेे याची होती ... पुढच्या वक्ताची आशा तिनं या वक्तालेबी सोडली नोहोती ...
रश्मी पदवाड मदनकर
rashmi.aum15@gmail.com
No comments:
Post a Comment