नुसताच वरवर चाचपडतोस
चेहेऱ्यावरच्या खाणाखुणांत भाव शोधतोस
रीतभात जपून भौतिकाचे पडसाद उमटलेला
मुखवटा असतो रे चेहेरा
हा दिसणारा चेहेरा विसरावा लागेल
अंतःकरण वाचावं लागेल
जोखीम तर आहेच ... पत्करावी लागेल
बघ जमतंय का ?
खरे भाव समजायचेत तर
आत्म्याच्या गर्भाला स्पर्षाव लागेल
मनाच्या अथांग अंधाऱ्या डोहात
खोल खोल उतरावं लागेल
स्वतःला विसरून माझ्यात सख्या रे
अलगद हरवावं लागेल
जोखीम तर आहेच ... पत्करावी लागेल
बघ जमतंय का ?
आत असतील काही अडगळी जपलेल्या
जुन्या जखमांचे व्रण, दुखऱ्या भावनांचे पापुद्रे ठसठसणारे
ओले ओघळते ... जराश्या धक्क्याने भळभळणारे
जाणिवांचा डोह खंगाळून काढून
घट्ट जीर्ण दार उघडाव लागेल
आत्मीयतेची फुंकर घालत हळुवार जीव ओतावा लागेल
हळवे मन जिंकावे लागेल...
जोखीम तर आहेच ... पत्करावी लागेल
बघ जमतंय का ?
काठावर बसून नुसतेच न्याहाळण्यापेक्षा
अंतःकरणाच्या गाभ्यात भावना शोधल्या तरच
दिसतील .. तुझ्यात गुंततील
भावभावनांच्या कल्लोळातही मग
तुझ्याच मनात घर करतील
पण ते होण्यासाठी ..घडवून आणण्यासाठी
जोखीम तर आहेच ... पत्करावी लागेल
बघ जमतंय का?
(C) रश्मी मदनकर
२८/०३/१७ - १:४४am
No comments:
Post a Comment