Thursday, 21 September 2017

मला ना एकदा नदी व्हायचंय..!!







मला ना एकदा नदी व्हायचंय.. !!


प्रवाही. अवखळ तरीही निस्सीह, शांत. संयमी..जन्मापासून हजारो मैल प्रवास करत न थकता न दमता चैतन्याचे तुषार उडवत.. मार्गात येणाऱ्या मोह माया त्यागत.. एखाद्या ऋषीकन्येचा संयत तेजस्वी भाव लेवून, जुनाच वेष धारूण, वेग आवेगही पांघरून. एकाच दिशेनं, जुन्याच वळणानं लयबद्ध ताल धरत, डोंगर दर्या कपारी पार करत, एखाद्या रणरागिणीप्रमाणे खोल दरीत स्वतःला झोकून देऊनही पुन्हा निश्चयाने कणखर होणारी. अविश्रांत धावत प्रवाहात स्वतःला सामावून घेत अधीक प्रगल्भ होत असोशीनं वाहत राहणारी. सदैव त्याच जागी भेटुनही तीथे न साठणारी रोज दिसणारी तरीही नवी भासणारी..लावण्य सुंदरी...भर दिवसा तळपत्या सुर्याची किरणं आत आत शोषून घेणारी..संध्याकाळी तांबड्यात न्हावून निघणारी अन चंद्राची शितल काया अंगभर लपेटून दिवसभराचा दाह शमवून घेणारी..पिढ्यांच्या रितीभाती..प्रथा परंपरांना मोठ्या मनानं पोटात घालून मायेचा डोंगर पेलणारी..गर्भातल्या जिवांना अंगाखांद्यावर खेळवत.. जागवणारी-जगवणारी ममतामयी मानीनी..सर्व विश्वाचा रंग तिच्यात येऊन मिसळूनही ती तीचा रंग मात्र बदलत नाही. रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा म्हणत ती नित्य नवे गीत गात जाते. मोठ्या दिमाखात डौलात खुळखुळ करत वाहत राहते.


ती कुणाचसाठी थांबत नाही.. ऋतू बदलतात, काळ बदलतो..पिढ्या न पिढ्या ती अखंड अविरत पुढे पुढे धावत राहते निरंतर.. तीच्या प्रवाहात येतो तो तीचा होतो..ती सामावून घेते स्वतःत सगळ्यांना..तिचा एकसुरात-एकलयीत येणार आवाज अध्यात्मिक तादात्मतेची अनुभूती देणारा. जणू वर्षानुवर्षे साधना करणारी एखादी तपस्विनी मंत्रोचारात मग्न आहे. हेच अध्यात्माचे तेज अंगांगावर लेवून.. ओजस्वी, निर्मळ, शीतल काया लपेटून तारुण्याने मुसमुसलेली, ताजीतवानी तरीही मातृत्वाचा शेला चढवून प्रवासाचा टप्पा गाठत मार्गक्रमण करणारी.

तीच्या मार्गातील गाववेशीतल्या, प्राणी-पक्षांची, पांथस्थाची तृष्णा भागवणारी, रानोवनी..कडीकपारी मळा फुलवत नेणारी सर्जनशीलतेच्या सर्व सिमा लांघून मायेच्या शिडकाव्यानं गरिबाचं शेत समृद्ध करित झुलणारी..कुठलाही अभीनिवेश न आणता सृजन करणारी ..जीवनदायिनी..


मला ना एकदा नदी व्हायचंय....सागराला भेटण्याच्या असोशीने मजल दरमजल प्रवास करत, हजारो मैलाची झुंज. संघर्ष पेलत शिणलेली, रापलेली, सोललेली काया विरघळून टाकायचीय. दमला भागला जीव मुठीत घेऊन शेवटच्या आवेगानं सागराच्या कुशीत स्वतःला झोकून द्यायचंय.स्वतःचं अस्तित्व पेरत आले तरी त्याच्यात सामावून हरवून जायचंय, होती नव्हती ओळख पुसून टाकून, प्रवासातल्या सगळ्या जखमांच्या दुखऱ्या खपल्या आणि अंगावर गोंदलेल्या अनुभवाच्या कथा विसर्जित करून उरलेले अस्तित्व विरून जाईपर्यंत त्याच्या अंतःकरणात तल्लीन व्हायचंय..सरीतेचा सागर व्हायचंय ..

मला ना एकदा नदी व्हायचंय.... !!


रश्मी पदवाड मदनकर
rashmi.aum15@gmail.com

२१/०९/२०१७

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...