दारं खिडक्या पक्क्या बंद केलेल्या खोलीत किंवा खूप गर्दी असणाऱ्या ठिकाणी एक मिनिटही राहता न येणं, जीव गुदमरणं हा एक प्रकारचा फोबीया आहे. क्लाॅस्ट्रोफोबीया (Claustrophobia) असं त्यांचं नाव आहे. माझ्या आईला ही समस्या असल्याचे आम्हाला लहानपणापासून माहीत आहे. तिच्या लहानपणी एकदा कोणीतरी गमतीने तिला बाथरूममध्ये लाॅक केले होते आणि त्याच अवस्थेत अनेक तास अडकल्यानं नंतर तिला हे विचित्र भीती वाटायचं प्रकरण सुरू झालं. ती claustrophobic असं कळलं. घरात सगळे दारं खिडक्या बंद असणं किंवा बंद एसी कारमधून प्रवास केल्यानं तिचा श्र्वास कोंडल्यासारखा होतो. ती आमच्यासोबत कोणत्याही थिएटरलादेखील सिनेमा पाहायला येऊ शकत नाही. एकदोनदा आम्ही प्रयत्न केला पण अर्ध्या तासातच तिचा जीव गुदमरू लागल्याने आम्हाला चित्रपट अर्धवट सोडून निघून यावं लागलं. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे गेले अनेक दिवस आम्ही राहतोय त्या एरीयात घराच्या चारही बाजूंनी कोरोना पेशंट वाढलेले, भारतीय म्हणून आपल्या जगण्यात मुरलेल्या सार्वजनिक, सांस्कृतिक नियमांनुसार अजूनही आम्हाला विलगीकरणाचं महत्त्व न समजल्याने, पटत नसल्याने किंवा शेजारी पॉझिटीव्ह पेशंटच्या बिंदास फिरण्याच्या वृत्तीने त्रस्त होऊन एकेक बाजू बंद करत, हळूहळू घरातल्या सगळ्या दारं खिडक्या आम्हाला बंद करून घ्याव्या लागल्यात. इतकं करूनही घरात कोरोना शिरलाच. एकामागे एक सगळे सदस्य संक्रमित झाले आणि गेला महिनाभर आम्ही स्वतःला चक्क डांबून घेतले. या महिन्याभरात मनात येणाऱ्या अनेक गोष्टींचा हा आढावा.
लाॅकडाऊन, आयसोलेशन, क्वारंटाईन हे पूर्वी कधीही न ऐकलेले शब्द आज आपल्या जगण्यातला महत्त्वाचा भाग ठरताहेत. पुर्वी कुणात न मिसळणारा, कुणाला न भेटणारा, स्वतःच्या कोषात राहणाऱ्याला एकलकोंडा-घरघुशा म्हणून चिडवले जायचे, आजच्या भाषेत सांगायचे म्हणजे ट्रोल केलं जाई. स्वतःला अनेक दिवस घरात कोंडून घेणाऱ्याला वेडाही ठरवले जाई. पण आज परिस्थिती इतकी उलट झालीये की अशीच माणसे खरी शहाणी आणि माणसाळलेली माणसं मात्र ठार वेडी भासू लागली आहेत. आतबाहेर, उजेडअंधार, चांगले वाईट आणि विशेष म्हणजे पाॅझिटीव्ह-निगेटीव्ह सगळ्यांचेच संदर्भ पार बदलून गेल्यासारखे वाटताहेत.
कवयित्री इंदिरा संत एका कोंडमारा झालेल्या क्षणी, अश्याच हतबल अवस्थेबद्दल एका कवितेत लिहितात
'अंधाराने कडे घातले
घराभोवती,
जळधारांनी झडप घातली
कौलारावर.
एकाकीपण आले पसरत
दिशादिशांतुन
घेरायास्तव...
एकटीच मी
पडते निपचित मिटून डोळे.'
आजच्या घडीला अशीच मनोवस्था प्रत्येकाची झालीये जणू.
२०१८ च्या जून जुलै महिन्यात असेल नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी वाचावे म्हणून एखाद्या चांगल्या इंग्रजी नाॅवेलच्या शोधात होते... सिव्हील लाईनच्या क्राॅसवर्डला फिरताना २५० पानांचं मेलेनी जुस्टेन(Melanie Joosten) लिखित 'बर्लिन सिंड्रोम' नावाचं नाॅवेल हातात आलं. तिथेच बसून त्यात जवळजवळ अर्धा तास गुंग झाले होते. किंमत होती १२०० रू. विकत घेण्याचा मोह जरा टाळलाच, पण त्यातून मन निघेना, मग एकदा या पुस्तकासाठीच गुगल सर्च करताना याच नाॅवेलवरून बनवलेला याच शिर्षकाचा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध असल्याचे दिसले आणि झपाटून एका रात्रीत तो शोधून काढला आणि पाहिला. पुस्तक वाचण्याची भूक तर शमली होती पण या चित्रपटाने पुन्हा कितीतरी प्रश्र्न मनात कोरले आणि अस्वस्थतेच्या लाटेवर आणून सोडले.
२०१७ फेबृवारी महिन्यात रीलीज झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन केट शाॅर्टलॅंड नावाच्या महिलेने केले आहे. ऑस्ट्रेलियाहून जर्मनीच्या राजधानीत म्हणजे बर्लिन शहरात मुशाफिरी करायला आलेली एक तरूण फोटोग्राफर क्लेअर (टेरेसा पाल्मर). क्लेअर एकटीच फिरत असताना तिची भेट एका इंग्रजीच्या शिक्षकाशी होते. पुस्तक वाचन, पेंटींग आणि फोटोग्राफी सारख्या समान आवडीनिवडी असल्याने त्यांच्यात चटकन मैत्री होते. एवढ्या मोठ्या अनोळखी शहरात ॲन्डीच्या (मॅक्स रीमेल्ट) मैत्रीपूर्ण आणि सभ्य वागणुकीमुळे तसेच मदत करण्याच्या वृत्तीमुळे क्लेअरचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसतो आणि एका रात्री ॲन्डीच्या निमंत्रणावर ती बिंदास त्याच्या घरी जाते... एक सुंदर स्वप्निल अशी रात्र ते एकमेकांसोबत घालवतात. दुसऱ्या दिवशी ॲन्डी त्याच्या कामावर निघून जातो. क्लेअर परत जायला निघते तेव्हा तिला लक्षात येतं की, मेनडोअर बाहेरून लाॅक आहे. आधी तिला याचं गांभिर्य लक्षात येत नाही. ॲन्डी परत येतो तेव्हा हसत लाडातच त्याला विचारते पण नंतर घरातली एकूण एक खिडकीसुद्धा विचित्र पद्धतीने लाॅक असल्याचे ती पाहते, तिच्या फोनमधलं सिम आणि तिची सगळी कागदपत्रंदेखील गहाळ झाल्याचे तिच्या लक्षात येते आणि ती घाबरते. पुढे सुरू होतो शहरातल्या विराण ठिकाणी संपूर्ण रिकाम्या ईमारतीतल्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या टाळेबंद फ्लॅटमधून एका विकृत शिक्षकाच्या तावडीतून स्वतःला सोडवून घेण्याचे, त्याचे अत्याचार सहन करत जिवाच्या आकांताने बाहेर पडण्यासाठीचा संघर्ष... क्लेअरला त्या घरात जेरबंदी झालेले बघता बघता आपलाही जीव घाबराघुबरा करणारा हा चित्रपट.
जगण्यासाठी आपल्या अवतीभवती माणसं असणं गरजेचं असतं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. माणसाला माणूस दिसत राहणं, त्यांच्या असण्याची जाणीव, स्पर्श, शब्द, एकमेकांची काळजी- प्रेम हे श्वासांइतकेच महत्त्वपूर्ण आहे. माणूस एकटा जगू शकत नाही हे २००० साली आलेल्या 'कास्ट अवे' चित्रपटातून राॅबर्ट झेमेकिस या दिग्दर्शकानं आणि चित्रपटातला चक नोलन म्हणजे टाॅम हॅंक्स या अभिनेत्याने उत्तम निर्मितीतून आणि उत्कृष्ट अभिनयातून अत्यंत प्रखरपणे दाखवून दिले होते. परिस्थितीवश होऊन एका एकाकी बेटावर जाऊन अडकलेल्या आणि तिथून जिवंत बाहेर पडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे हा चित्रपट. सोबतीला कोणीतरी आहे या भ्रमातूनही जगण्याची उर्जा मिळत राहावी म्हणून एका तुटक्या-फाटक्या फुटबाॅलवर रक्ताने चेहरा आखतो आणि त्याला नाव देतो 'विलसन'. आणि येताजाता चक्क या फुटबॉल चेहेऱ्याच्या विलसनशी मित्राप्रमाणे बोलत राहतो, त्याला सल्ला विचारतो, त्याच्यावर रागावतो, फुरगटतो हा पार्ट या अमेरीकन सर्वायवल ड्रामा असलेल्या सुपरहिट चित्रपटाचा आजही 'साईन मार्क' म्हणजे मोस्ट मेमरेबल भाग आहे.
मागल्या वर्षी याच दिवसांमध्ये अनुराग कश्यप निर्मित 'ट्रॅप्ड' चित्रपट पाहण्यात आला होता काहीच दिवसांआधी फेसबुकने ती मेमरी अचानक पुढ्यात आणली आणि पुन्हा एकदा सगळं भरभर डोळ्यासमोरून गेलं. किती रीलेट झाले म्हणून सांगू. कारणे काहीही असू देत, परीस्थितीच अशी निर्माण होते की एक व्यक्ती काही कारणास्तव संपूर्ण रिकाम्या असलेल्या एका उंच इमारतींच्या तेराव्या मजल्यावरील बेकायदेशीरपणे घेतलेल्या एका ब्लाॅकमध्ये लाॅक होतो. म्हणजे स्वतःच्याच चुकीने स्वतःला अडकवून घेतो, टाळेबंद होतो आणि तो इतक्या वाईट पद्धतीने अडकतो की त्याची जिवंत राहण्यासाठीची धडपड, तगमग, संघर्ष सुरू होतो. उंदरासारख्या प्राण्याला घाबरण्यापासून ते उंदीर पकडून खाण्यापर्यंत ते मानसिक संतुलन गमावण्याच्या दारात उभं राहूनही फक्त बाहेर पडण्याची धडपड, हा संघर्ष करायला स्वतःला जिवंत ठेवण्याची तगमग, असहायता, हतबलता आपण पाहता पाहता अनुभवतो आहे असं वाटू लागतं. कल्पनाच किती भयावह आहे. हे नुसतं पाहणंदेखील सुन्न करणारं आहे. अमित जोशींना ही कथा कशी सुचली असेल? आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी इतकं चपखल निर्देशन कसं घडवून आणलं असेल याचं अप्रुप वाटल्याशिवाय राहत नाही. आणि मग बेस्ट एशियन फिल्मचा पुरस्कार या चित्रपटाला प्राप्त झालाय याची उचित कारणमीमांसा पटते. राजकुमार राव म्हणजे चित्रपटातला शौर्य या एकमेव व्यक्तिरेखेभोवती घडलेल्या थरारक घटनांचा हा स्मृतीत घट्ट बसणारा चित्रपट...
याच धरतीवरच्या काही हलवून सोडणाऱ्या सत्य घटनाही आठवतात. २०११ सालची एक घटना आठवते आहे. बरोबर दहा वर्षांपूर्वी दिल्लीनजीकच्या नोयडा येथील ही घटना खूप वायरल झाली होती. अनुराधा बहल (वय ४२ वर्ष) आणि सोनाली बहल (वय ३८ वर्ष) या उच्च शिक्षित बहिणींनी वडलांच्या मृत्यूनंतर सात महिने स्वतःला घरात डांबून घेतले होते. सलग सात महिने त्या घराबाहेर पडल्या नव्हत्याच पण बाहेरूनही कोणाला घरात येऊ दिले नव्हते. त्या काय खातात कश्या जगतात हे फार मोठे कोडेच होते. त्यांना बाहेर काढण्यात आले तेव्हा त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होती. त्यानंतर त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले जिथे मोठ्या बहिणीचा मृत्यू झाला. अशीच पंजाबमधील धार्मिक दंगलींना घाबरून एका आईने मुलगा आणि मुलीला घेऊन सलग १६ वर्ष स्वतःला घरात बंद करून घेतले होते. त्यांना २०१४ मध्ये कोर्टाच्या मदतीने महत्प्रयासाने पोलीसांनी बाहेर काढले होते. दुसरी घटना नुकतीच वाचनात आली होती गुजरातमध्ये दोन भाऊ आणि एक बहिण तिघेही उच्च शिक्षित.. आईच्या मृत्यूनंतर सलग दहावर्ष त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले होते. त्यांची सुटका अत्यंत हलाखीच्या, दयनीय स्थितीत वडीलांच्या विनंतीवरून नुकतंच एका एनजीओ द्वारा करण्यात आली. हे असे प्रसंग म्हणजे मानसिक कमकुवत असणारी माणसेच करतात असे आपण आजवर म्हणत-समजत आलो आहे आणि ते काही अंशी खरेही तर होते. पण आज मात्र आपल्यासमोर उद्भवलेले संकट आपल्याला या विकृतावस्थेचीच मोडतोड करून नव्यानं व्याख्या करायला सांगताहेत. पूर्वीचे सगळे संदर्भ, सगळी उदाहरणं संशोधनाच्या कामी निकामी होऊन नवीन गृहितकं मांडायला भाग पाडताहेत. कालची सकारात्मकता आज नकारात्मक ठरतेय तर कालचा मुर्खपणा आजची समजदारी. एका व्हायरसनं जगाचा इतिहास, भूगोल उलथवून लावलाय तो जागेवर येईल तेव्हा जगण्याची गणितं, विज्ञान आणि जीवशास्त्राचे रसायन आणि सूत्रं कदाचित बदललेली असतील... आणि माणसाचे हवेत उंच उडालेले पाय जमिनीवर येऊन नव्याने शिकलेले जगणे पुनश्च आरंभ करतील..कोणी सांगावे ... नाही ?
गीतकार राहिब मैत्रेय म्हणतात ना..
कुदरत से खिलवाड़ है , जुर्म बहुत संगीन ।
यह सिखला कर जाएगा, कोविड नाइनटीन ॥
©रश्मी पदवाड मदनकर
(दि. १८ में २०२१ महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रात प्रकाशित लेख)
तुमचं लेखन त्याचे विषय नेहमीच वेगळे आणि परिणामकारक असतात .. thank you.
ReplyDeleteअप्रतिम लिहिलंय...अनेक संदर्भ देऊन अभ्यासपूर्ण लिखाण केलंय. खरोखरंच आपण आपल्याच घरात स्थानबद्ध झालेलो आहोत. कधीतरी जीव गुदमरतोच. सगळे सिनेमे बसावेसे वाटताहेत. शोधून नक्की बघेन.
ReplyDelete