परवा सुवर्णा भेटली मार्केटमध्ये, सुवर्णा हो .. ती नाही का फेसबुकवर फेमस असलेली. चारेक हजारतरी मित्र असतील तिचे. तशी लिहितेही भन्नाटच...साऱ्या जगावर सूड उगवणारं.. फोटो कसले छान छान टाकते. दिवसाला कित्ती पोस्ट आणि कित्ती कित्ती फोटो. किती लोकं निव्वळ तिच्या वॉलवर पडलेली असतात...कित्येकांना तिच्याशी नाते जोडावे वाटते कित्येकांना मैत्री करावी. तिला भेटायची ओढ जशी सर्वांना तशी मलाही होतीच जरा .. तशी तिची माझी हि पहिलीच भेट...पण भेटून जरा दचकायला झालं...बोलणंही उदासवाणं वाटलं तिचं.. एकटी होती ती फार एकटी ... ४००० मित्र असणारी गर्दीत वावरणारी व्यक्ती इतकी एकाकी ....
विचार करून करून रात्रभर झोपच लागली नाही आणि पहाटे पहाटे मास्तरीण बाई आल्याचं मग भेटायला.
सखे,
माणसं सोबत दिसणं आणि माणसं आपली असणं यात फार फरक आहे राणी. गोतावळ्यात दिसणारी सगळी माणसं आपली असतातच असे नाही.....आणि या गोतावळ्यात न दिसणारी आपली नसतातच असेही नाही. आपल्या अवती भोवती दिसणारी माणसं मनाने किती जवळ असतात आपल्या याचा अंदाज त्यांच्या बाह्य रुपावरुन लावताच येत नाही....गर्दीतली माणसं हरवलेली असतात कुठेतरी, कशाच्यातरी तरी शोधात, कुणाच्यातरी विचारात.. गर्दीच्या ठिकाणीही एकटी झालेली असतात. एकट्यातली माणसं मात्र गर्दी शोधतात. कुणाचीतरी सोबत शोधत हिंडत असतात. आपली माणसं गोतावळा घेऊन येत नाही, दूर असतील कुठेतरी, तरी मनानं सदैव सोबत असतात. त्यांचं अस्तित्व हवेसारखं भोवताल घुटमळत असतं सदैव. न सांगता न बोलताही एकमेकांच्या मनाची स्थिती समजून घेऊ शकतात. सोबत नसूनही साथ देणारी अन सोबत असूनही भरकटलेली, हि सगळीही माणसेच असतात गं. नातं दिसत नाही आणि भासत ही नाही ते अनुभवावं लागतं. बघ विचार कर - शरीरानं दूर राहूनही आपल्या खूप जवळचा असा आपला एखादा मित्र तिथे शरीरानं कुणाच्यातरी जवळ असेलच ना , तिथे असूनही तिथे नसेल... अगदी असेच इथेही .. गोतावळ्यातली सगळी माणसं भरकटून कुणाच्या तरी अस्तित्वाभोवती घुटमळत असतात. असतात तिथं नसतातच ते. नसतात तिथेही असू शकतात. खरतर माणसं माणसांना भेटतच नसतात. मन मनाला भेटत असतं. ते तसं भेटलं पाहिजे तरच माणूस आपला होतो. एखादा क्षणभराच्या भेटीतही आपला वाटतो, नाहीतर वर्षानुवर्ष सोबत राहणारेही कधीच मनाने एक झालेले नसतात. म्हणून गोतावळ्यात दिसणारी माणसेही एकटी असू शकतात आणि एकटी राहणारी व्यक्तीही भावनांच्या सुंदर नात्यांच्या हिंदोळ्यावर आनंदाची अनुभूती घेत जगू शकते.
आयुष्याच्या वळणांवर जेव्हा आपलं स्वतःच अस्तित्वही बोचू लागतं... तेव्हा आपल्याला अलगद सावरतं आणि सहज समजून घेतं ते खरं नातं ती खरी मैत्री असते. हा सगळा असा गुंताच असतो नात्यांचा. हा खरतर नेणिवेतून झालेला जाणिवांचा खेळ असतो. पण .. पण आपल्याला दिसेल तेच सत्य वाटत असतं, इथेच तर आपण फसतो. जी चांगली माणसं आहेत ती आपली असायलाच पाहिजे हा आग्रह धरून लोकं आपली होत नसतात...जी आपली आहेत पूर्ण मनानी, तीच खरी चांगली माणसं असतात..ती तेवढी मूठभरच जपता आली पाहिजे, जपली पाहिजेत. गोतावळ्यात असलीत किंवा नसलीत तरीही.. मग अश्या गोतावळातल्या कित्तेक सुवर्णा एकट्या भासल्या त्याचं नवल वाटणार नाही तुला. हा करता आलं तर एवढं कर. त्यांच्याशी मनाचं नातं जोड...बघ जमतंय का?
तुझ्याच
#आतल्यामास्तरीणबाई
No comments:
Post a Comment